महाराष्ट्रातील श्री कृष्णा सरस्वती दत्त महाराज यांची मंदिरे
- मिरज येथील पवार गल्ली भुईबोळ येथील श्री जाधव यांच्या श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठीची माहिती
- श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, मिरज
- श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, म्हैसाळ स्टेशन (विजयनगर)
- सांगली येथील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी
- श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी/ श्री स्वामी समर्थ मठी कृष्णाघाट मिरज
- श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, नेरळ, कर्जत
- श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर. साईहरिक्षेत्र, आपटा फाटा, कर्नाळा, जि. रायगड
- श्री बहादूरवाडी (जि. कोल्हापूर) येथील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या मठाची माहिती
- गोरखचिंचेखालील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, कोल्हापूर (श्री रामचंद्र घोरपडे यांचे खाजगी मंदिर)
- श्री रांगोळी महाराज स्थापित मालवण येथील श्री स्वामी मंदिर
- ॥ श्री गुरु- स्मृती ॥ श्री गुरुसेवा भक्तपरिवार बडोदा

स्वर्गीय रामचंद्र सखाराम जाधव यांचा जन्म कामठी (जि. सातारा) येथे १८८९ साली झाला. त्यांच्या आईचे नाव मुक्ताबाई व वडिलांचे नाव सखाराम होते. त्यांचे वडिल शेती करत. १८९७ साली आलेल्या प्लेगाच्या साथीमध्ये/ व पडलेल्या मोठ्या दुष्काळात त्यांचे वडिल सखाराम जाधव मरण पावले. संपूर्ण कामठी गावच स्थलांतरीत झाले. स्व. रामचंद्र जाधव हे आपल्या आई, दोन बहिणी व भाऊ यांना घेवून कामठी गाव सोडले. नमळ्याचीवाडी, आंबेदरे इत्यादी गावे फिरत फिरत कोरेगाव रेल्वेस्टेशनवर येवून उदरनिर्वाह करु लागले. त्यांची आई मोलमजूरी करी, त्यांचा भाऊ मारुती हा एका मारवाड्याच्या कापड दुकानात काम करी. लवकरच अविवाहीत मारुतीही वारला. स्व. रामचंद्र हे कोरेगाव रेल्वेस्टेशनवर स्टेशनमास्तराची किरकोळ कामे करीत असत. स्टेशनमास्तरची त्यांच्यावर मर्जी बसली व त्यांनी १९०७ साली स्व. रामचंद्र जाधवना रेल्वेमध्ये नोकरी लावली. सन १९१० मध्ये त्यांची बदली मिरज रेल्वेस्टेशन येथे झाली. गदग, अळनावर इत्यादी ठिकाणीही त्यांची बदली झाली. शेवटी ते मिरज रेल्वेस्टेशन येथेच बदलीवर कायमपणे राहिले.
मिरज स्टेशनच्या व पंढरपूर रेल्वेस्टेशनच्या दक्षिण बाजूस खोल्यांची जी रेल्वे चाळ होती. तेथे स्व. रामचंद्र जाधवांचे वास्तव्य होते. तसेच त्यांच्या शेजारी स्व. यल्लाप्पा तुपारे (उद्योगपती विश्वासराव चौगुले, गोवा यांच्या आईचे वडिल), शंकरराव पांढरे, स्व. भिमाण्णा विजापूरे, स्व. ताराबाई पाटोळे इत्यादी रेल्वे कर्मचारी शेजारी राहात असत. स्व. रामचंद्र जाधव यांना दोन मुले त्यांची नावे स्व. यशवंत व दत्तात्रय होते. दोघेही रेल्वेत नोकरी होते. कोल्हापूरचे श्री नामदेव महाराज चव्हाण व श्री कृष्णाबुवा स्वार हे श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे शिष्य असून त्यांचे सन १९४० च्या आसपास पास पासून स्व. रामचंद्र जाधव यांच्या घरी जाणे-येणे होते. श्री कृष्णाबुवा यांनी श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या चर्मपादुका व टोप्या स्व. रामचंद्र जाधव यांच्या थोरल्या सुनबाई स्व. आक्काताई जाधव यांच्याकडे अंदाजे सन १९४० ला पुजेसाठी दिल्या. अंदाजे १९४४ साली स्व. रामचंद्र जाधव यांनी पवार गल्ली, विठ्ठल मंदिराजवळील भुयाच्या बोळात एक जुने घर विकत घेऊन श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांची प्रतिमा, चर्मपादुका, श्रींच्या टोप्या यांची पूजा चालू केली. पुढे श्री नामदेव महाराज चव्हाण व श्रीकृष्ण बुवा यांचे येणे-जाणे सातत्याने स्व. रामचंद्र जाधव यांच्या घरी चालू होते. अशा रितीने श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे कार्य स्व. रामचंद्र जाधव यांच्या घरातून/ मठीतून सुरु झाले. ते आजतागायत सुरु आहे. श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांची जयंती/ पुण्यतिथी आजही मोठ्या प्रमाणात स्व. रामचंद्र जाधवांच्या मठीत मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.

शब्दांकन- श्री प्रल्हाद जाधव, मिरज
श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, मिरजमी सर्वसाधारण श्री गणेश चतुर्थी १९७५ सालापासून कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला नियमीतपणे जावू लागलो. स्व. आक्काताई जाधव व स्व. लक्ष्मीबाई झेंडे यांच्यामुळेच मी अध्यात्मिक मार्गात आलो. प. पू. माईसाहेब शिर्के, कोल्हापूर यांचेकडून श्री दत्त महाराजांचा फोटो घेऊन पडक्या घरातच गादी स्थापन करुन श्री सेवा चालू केली. परंतु हळूहळू श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला/आरतीला लोकांची गर्दी वाढू लागली. नवीन जागा घेऊन श्रींची मठी बांधावी असे वाटत होते. तथापि आर्थिक अडचणीमुळे ते घडणे शक्य वाटत नव्हते. परंतु ते दत्त महाराजांच्या कृपेने ते शक्य झाले. सन १९८० च्या दरम्यान प. पू. माईसाहेबांनी श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा मोठा फोटो दिला. याच दरम्यान दगड, विटा, मातीत तीन खोल्या बांधण्यात आल्या. वरच्या मजल्यावर एक खोली, माळवद, पत्रा अशी एक इमारत बांधली. या इमारतीस ‘‘ श्री दत्त मठी’’ नाव देवून श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर, श्री शिवचिदंबर, मुरगोड यांच्या मोठ्या तसबीरींची स्थापना प. पू. माईसाहेब शिर्के, प. पू. रमेश महाराज कुलकर्णी, अक्कोळ, स्व. बाळासाहेब शिर्के यांच्या हस्ते करण्यात आली. वास्तुशांती व महाप्रसाद करण्यात आला. सायंकाळी स्व. बाळासाहेब शिर्के यांची हरिभजन झाले. अशा रितीने श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे/ गुरुदेवांचे जग उद्धाराचे कार्य या छोट्याशा श्री दत्त मठीतून सुरु झाले.
दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढतच चालली. त्यामुळे नवीन मठी बांधण्याचे ठरविण्यात आले. याच दरम्यान आम्हाला लगत असलेली स्व. मारुती बेडगे, स्व. किसन बेडगे यांची जागा विकत घेण्याचे ठरविण्यात आले. ही जागा मिळवून देण्याबाबत श्री धोंडिराम केशव म्हेत्रे, श्री सावंता म्हेत्रे या बंधुंनी विशेष प्रयत्न केले. किंबहुना त्यांच्या प्रयत्नामुळेच ही जागा आम्हाला मिळाली. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. आता श्री गुरु देवांचे कार्य जोमाने सुरु झाले. सर्व भक्तांचा समावेश असावा या दृष्टीकोनातून अॅड. कोतवालसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ई. ५९३ दि. २९/६/१९८५ अन्वये हा सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करण्यात आला.
दरम्यानच्या काळात स्व. बाळासाहेब शिर्के यांनी मला बडोद्याच्या श्री ब्रम्हचारी स्वामी महाराज यांचे चरित्र ‘‘श्री गुरु स्मृती’’ वाचायला दिले. श्री ब्रम्हचारी स्वामीजी हे श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे अंतरंगातील शिष्य होते. त्यांचे चरित्र वाचून मी अत्यंत प्रभावीत झालो. मिरजेतील एक सद्गृहस्थ श्री शिवरुद्र बसरगे काका हे टेलिफोन खात्यातून सेवानिवृत्त होवून बडोद्याला स्थायिक झाले होते. त्यांना तीन मुले. श्री प्रमोद हे मिरजेला वास्तव्य करुन आहेत, डॉ. श्री नरेंद्र बसरगे हे कोल्हापूरला वास्तव्य करुन आहेत तर डॉ. श्री महेश हे बडोद्याला वास्तव्य करुन आहेत. डॉ. श्री महेश बसरगे यांचे लग्न बडोदा मुक्कामी दि. २१/११/१९९२ रोजी होते. या लग्नासाठी मी श्री प्रमोद बसरगे यांच्या बरोबर प. पू. रमेश महाराज कुलकर्णी, अक्कोळ, अॅड. श्री कोतवालसाहेब, अॅड. श्री आप्पा कुडचे, श्री चंद्रकांत कुरणे, श्री सावंता म्हेत्रे यांच्यासह लग्नासाठी बडोद्याला गेलो. लग्न झाल्यानंतर श्री सोरटी सोमनाथ, श्री द्वारका, श्री बेट द्वारका, गिरनार, गरुडेश्वर, नारेश्वर इतर महत्वाची तिर्थक्षेत्र पाहिली. तसेच बडोद्याला पिरामित्तर रोडवरील श्री ब्रम्हचारी स्वामींची मठी पाहिली. मला अतिशय आनंद झाला. बडोद्याहून मिरजेला परत आलो ते एका नवीन मठी बांधण्याच्या संकल्पानेच. श्री जयसिंगराव मोरे कोल्हापूरातील नामांकित आर्किटेक्ट इंजिनिअर आहेत. त्यांचा माझा परिचय डॉ. श्री शिरढोणे यांच्यामुळे झाला होता. मी मोरे साहेबांना भेटलो. नवीन मठीची त्यांना कल्पना दिली. तळमजल्यावर श्री दत्त मंदिर, दुसरा मजला बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांसाठी निवासस्थान, तिसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांना राहण्याची सोय अशी इमारत रचना त्यांनी सांगितली व इमारतीचा आराखडा, नकाशे बनविण्यास सांगितले.
प्रत्यक्ष लवकरच कामाची सुरुवात झाली. सुरु होवून दिनांक ३/८/१९९५ रोजी या नवीन तीन मजली श्री दत्त मठीचे उद्घाटन, वास्तूशांती झाली. या निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह ठेवण्यात आला. भजन, किर्तन, प्रवचन व इतर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. हा सर्व
कार्यक्रम प. पू. रमेश महाराज कुलकर्णी, अक्कोळकर, प. पू. रामराय केळकर महाराज (दादा), प. पू. सुरेशपंत बाळेकुंद्रीकर, प. पू. श्री प्रदीपपंत बाळेकुंद्रीकर, प. पू. गोविंद महाराज कुलकर्णी, प. पू. केशवराव गोखले, प.पू. श्री चंद्रशेखर केळकर महाराज, प. पू. श्री गुरुनाथ
कोटणीस महाराज, श्री महेश शिर्के यांच्या उपस्थितीने व आशीर्वादाने उद्घाटन सोहळा सुंदर रितीने पार पडला.
शब्दांकन : श्री झेंडे महाराज, मिरज
श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, म्हैसाळ स्टेशन (विजयनगर)मिरजेतील नदीवेस पाटील गल्लीतील श्री दत्त मठीची जागा ही कमी पडू लागली. सन १९७५ पासून मिरजेत श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांची जयंती, पुण्यतिथी पवार गल्ली येथील स्व. आक्काताई जाधव यांच्या घरी होत असे. या उत्सवाला आता मी सामूदायिक स्वरुप दिले. या पुर्वी हे उत्सव घरगुती स्वरुपाचे होते. त्याकाळी मी व मिरजेतील सर्व स्वामीभक्त कोल्हापूरला सकाळी जात असू व कुंभार गल्लीतील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठीतील उत्सवात भाग घेऊन प्रसाद घेऊन सायंकाळी परत मिरजेला येत असू. हे उत्सव त्यावेळी स्व. बाळासाहेब शिर्के व स्व. माईसाहेब शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असत.
स्व. आक्काताई जाधव यांची मठी म्हणजे त्यांचे ते राहाते घर होते. जागा अपुरी होती. जाणे येणे बोळवजा रस्ता होता. त्यामुळे उत्सवात गर्दीमुळे पावसाळ्यात फार हाल होई. वाहने लावायला जागाही नव्हती. त्यामुळे सर्वांच्या विचाराने श्रींची जयंती, पुण्यतिथी माझ्या मठीकडे नेण्यात आली. परंतु मिरज हे छोटे शहर असल्याने, रस्ते लहान असल्याने महाप्रसादास आमची श्री दत्त मठी कमी पडू लागली. रस्त्यावरच टेबल, खुर्चीवर प्रसादाची सोय करावी लागे. त्यामुळे रहदारीला अडथळा होई. श्री महाप्रसादाला वाढत चाललेल्या गर्दीचा विचार करुन मिरजेपासून जवळपास एखादी मोठी जागा घेऊन नवीनच मठी/मंदिर बांधावे तसेच महाप्रसादाची सोय, निवांत राहाण्याची सोय करावी असे विचार माझ्या मनात येवू लागले.
त्यावेळी मी मिरजेतच वॉटर वर्क्सला नोकरीला होतो. कार्यालय सुटल्यानंतर मी आमचे मित्र श्री विलासराव घोरपडे यांच्या मिरज हायस्कूल जवळील औषध दुकानात जाऊन बसत असे. सौ. सुनंदा विलास घोरपडे यांचे माहेर म्हैसाळ होते. एखाद्या रविवारी मी श्री विलास घोरपडे यांच्या बरोबर म्हैसाळला येवू-जावू लागलो. त्यांच्या सासऱ्यांचे नाव स्व. बाळू तुका घोरपडे होते. कधी-कधी म्हैसाळला मुक्कामही करु लागलो. श्री विलासराव घोरपडे यांचे मेव्हणे श्री तानाजी बाळू घोरपडे यांचा माझा ऋणानुबंध वाढत गेला. वरचेवर माझे म्हैसाळला जाणे-येणे घडू लागल्यामुळे मला म्हैसाळ गाव चांगले वाटू लागले. म्हैसाळ येथे जागा घेऊन नवीनच श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे मंदिर बांधावे, मठी बांधावी असा विचार माझ्या मनात येऊ लागला. सदरचा विचार स्व. बाळू तुका घोरपडे यांच्या कानावर घातला. त्यांनीही इतर त्यांच्या मित्रांच्या कानांवर विचार घातला. परंतु म्हैसाळ गावात मठी बांधण्याचा योग आला नाही. परंतु मी प्रयत्न सोडले नाहीत.
दरम्यानच्या काळात सन १९८० च्या आसपास जुन्या श्री दत्त मठीचे रंगकाम चालू होते. माझे मित्र स्व. श्रीशैल्य शिंदगी यांनी श्री शंकर ढवळे पेंटर यांना माझ्याकडे पाठवले. श्री दत्त मठीचे रंगकाम चालू झाले. दिवसेंदिवस श्री शंकर ढवळे व माझा परिचय वाढत चालला. ते म्हैसाळ स्टेशन येथे त्यांचे सासरे स्व. धोंडीराम गणू शिंदे यांच्याकडे राहात होते. एके दिवशी म्हैसाळला मठी बांधण्याचा विचार मी श्री शंकर ढवळेंच्या कानावर घातला व मठीसाठी जागा बघणेस सांगितले. जवळच म्हैसाळ स्टेशनला एक जागा विक्रीसाठी निघल्याचे त्यांनी मला सांगितले. मिरज म्हैसाळ स्टेशन हे अंतर रेल्वे लाईनने पाच कलोमीटर तर बेडग आडव्या रस्त्याने सात किलोमीटर होते. एके दिवशी श्री शंकर ढवळेंच्या बरोबर सदरची म्हैसाळ स्टेशन वरील जागा मंदिरासाठी बघण्यासाठी गेलो. सदरची जागा साडे सहा गुंठे असून जागा चौक चांगली होती. मला ती निवांत जागा पसंत पडली. ते साल १९८२ असावे. त्याकाळी म्हैसाळ स्टेशन अगदी खेडेगाव होते. वस्ती तर फारच विरळ. रेल्वे लाईनचा पूर्वेला शेतमजूर, बाहेरुन आलेल्या मजूरांची पाले/ छपरे/ झोपड्या तर रेल्वे स्टेशनच्या पुर्वेला मळेकऱ्यांची रानातील साधी घरे होती. एक शाळेची साधी इमारत होती. बेळगाव-तासगाव हा कच्चा रस्ता होता. ही जागा स्व. घेवारी अण्णा, स्व. शंकरराव कांबळे, स्व. बाळू तुका घोरपडे व इतर भक्तमंडळींशी चर्चा करुन श्री स्वामी कार्यासाठी विकत घेण्याचे ठरले. सदरची जागा स्व. गुंडाप्पा गणू शिंदे, स्व. बंडू गणू शिंदे, श्री. रामू गणू शिंदे यांची होती. प्रती गुंठा २ हजार रुपये प्रमाणे जागेची किंमत रुपये १२ हजार ठरविण्यात आली. दिनांक २१/११/१९८५ रोजी जागेची खरेदी करण्यात आली. लवकरच त्या ठिकाणी श्री अजय भोकरे इंजिनिअर, मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे/ मठीचे काम पूर्ण करण्यात आले. दिनांक २०/८/१९८६ रोजी या मंदिरात श्रीकृष्ण सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर, श्री शिवचिदंबर महास्वामी यांच्या तैलचित्रांची स्थापना करण्यात आली. ही तैलचित्रे मुंबईचे प्रसिध्द पेंटर स्व. मारुती दळवी यांनी तयार केलेली आहेत. सदर मंदिरासाठी त्याकाळी १ लाख ३० हजार रुपये खर्च आला. सदर मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ए १४८३/१९८९ हा सार्वजनिक न्यास (ट्रस्ट) स्थापन करण्यात आला. आता म्हैसाळ येथून श्री गुरुदेवांचे जग उद्धाराचे कार्य सुरु झाले.
न्यास नोंदणी क्रमांक ए१४८३/१९८९ द्वारा म्हैसाळ स्टेशन येथे खालील प्रमाणे मंदिरे
बांधण्यात आली. त्यांची उद्घाटने खालील प्रमाणे तारखांना झाली.
१) श्री गणेश मंदिर/ शिव मंदिर/ हनुमान मंदिर दि. १८/६/१९९८
२) श्री साई समर्थ विठ्ठल मंदिर दि. २१/२/२००३
३) श्री शेगाव संत श्री गजानन महाराज मंदिर दि. २/९/२०१३
४) श्री राम मंदिर दि. २८/२/२०१६
तसेच स्वामी भक्तांसाठी भक्तनिवास, सार्वजनिक वाचनालय, दवाखाना, प्राथमिक शाळा, मंगल कार्यालय ही सार्वजनिक कामेही वरील न्यासाद्वारे करण्यात आली. म्हैसाळ स्टेशन (विजयनगर) येथील मंदिरात/ मठीत खालील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करुन महाप्रसाद केला जातो.
१) श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज, कोल्हापूर यांची जयंती/ पुण्यतिथी
२) श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट यांची पुण्यतिथी
३) शेगाव संत श्री गजानन महाराज प्रकटदिन/ पुण्यतिथी
४) श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा)
५) श्री राम नवमी
६) श्री हनुमान जयंती
७) आषाढी/ कार्तिकी एकादशी
म्हैसाळ स्टेशन (विजयनगर) येथील श्री मंदिर परिसर/ मठी परिसर हे आता पर्यटन केंद्र होत चालले आहे. कर्नाटकातून पंढरपूरला पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची राहाण्याची, चहा-नाष्ट्याची सोय वरील न्यासामार्फत मोफत करण्यात येते.
…शब्दांकन- श्री झेंडे महाराज, सांगली

सांगली येथील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी
सन १९६६ ते १९७२ मी स्व. रतनचंद खेमचंद शहा व श्री इंद्रकुमार शहा यांच्या अशोक मेडीकल, मिरज येथे नोकरीस होतो. या औषध दुकानातच श्री राजाराम दत्तोबा घाटगे हेही नोकरीस होते. त्यामुळे त्यांचा माझा चांगला परिचय होता, मैत्री होती. पुढे सन १९७३ ला सरकारी नोकरीत मी लागलो. त्यामुळे श्री राजाराम घाटगे यांच्यागडे जाणे-येणे कमी झाले तथापि संबंध मैत्रीपूर्ण होते.
सन १९७५ साली श्री राजाराम घाटगे यांचे सासरे स्व. बाबूराव सुर्यवंशी व स्व. मातोश्री लक्ष्मीबाई बाबूराव सुर्यवंशी यांचा माझा परिचय झाला. स्व. बाबूराव सुर्यवंशी हे त्यावेळी अत्यंत अडचणीत होते. त्यांच्याकडे मी व राजाराम घाटगे वरचेवर जाऊ येवू लागलो, परिचय वाढत चालला. त्यांना घेऊन मी कोल्हापूरला श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी मंदिरात जाऊ लागलो. हळूहळू श्री दत्त महाराजांच्या कृपेने त्यांची परिस्थिती बदलत चालली. स्व. बाबूराव सुर्यवंशी व स्व. मातोश्री लक्ष्मीबाई सुर्यवंशी आता अडचणीतून बाहेर पडत चालले. त्यांनी मला मुलगाच मानले व आपत्यवत माझ्यावर माया केली. वखारभागातील त्यांच्या घरी सन १९७५ साली प. पू. माईसाहेब शिर्के यांच्या हस्ते श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या तसबीरीची स्थापना करुन सांगलीत श्री स्वामी कार्य सुरु झाले. स्व. बाबूराव म्हणजेच सुर्यवंशी दादांचे घर आता श्री दत्त मठी झाले. हे स्थान सांगली गावाबाहेर जुना बुधगाव रोड वखारभाग पांजरपोळ जमीनीजवळ, गावाच्या एका बाजूला होते. सांगलीतील व आसपाच्या खेडेगावातील लोक आता या श्री दत्त महाराज मठीत दर्शनाला येऊ लागले. त्यांच्या मनोकामना श्री स्वामी कृपेने पूर्ण होऊ लागल्या. आता श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांची जयंती/ पुण्यतिथी दोन्ही उत्सव मोठ्या प्रमाणात स्व. सुर्यवंशी दादांच्या श्री दत्त मठीत मोठ्या प्रमाणात होऊ लागले, महाप्रसाद होऊ लागला.
सन १९८०-८२ या दरम्यान याच घराचे रुपांतर श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मठीत झाले. सुंदर स्लॅबची इमारत झाली. प. पू. रमेश महाराज कुलर्णी, प. पू. गोविंद महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते या मठीचे उद्घाटन झाले. महाप्रसाद घालण्यात आला. प. पू. बाबूराव सुर्यवंशी हे दि. ३१/५/२००९ रोजी स्वर्गवासी झाले. तर मातोश्री लक्ष्मीबाई बाबूराव सुर्यवंशी दि. ३/२/२००९ रोजी स्वर्गवासी झाल्या. या पुण्यवान जोडप्याने श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे पूजन-अर्चन, नामस्मरण आयुष्याच्या शेवटपर्यंत केले. त्यांनी स्वामींना आपले केले. श्री स्वामी महाराजांचा मार्ग अनेकांना दाखवून ते स्वामी चरणी विलीन झाले. तथापि वखार भागातील ही दत्त मठीची जागा कमी पडत चालली. उत्सवाला जागा कमी पडत चालली. पावसाळ्यातील पुण्यतिथी कार्यक्रमाला फार हाल होई. तसेच स्व. मातोश्री लक्ष्मीबाईच्या या घरात त्यांची नांदती कुटुंबे राहात असत. त्यामुळे नवीन स्वरुपातील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे मंदिर/मठी उभा करणे आवश्यक होते. प. पू. बाबूराव सुर्यवंशीदादा व मातोश्री लक्ष्मीबाई सुर्यवंशी यांचे थोरले चिरंजीव श्री मोहन बाबूराव सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सांगली कर्नाळ रोडवर मोठी जागा विकत घेऊन श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे सुंदर/ प्रशस्त मंदिर बांधले आहे/ मठी बांधली आहे. सदर मंदिराचे/ मठीचे उद्घाटन नुकतेच दिनांक २९/८/२०१८ रोजी प. पू. श्री चंद्रशेखर केळकर आण्णा व श्री महेश शिर्के यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी मंदिर/ मठी स्वतंत्र असून राहण्यास स्वतंत्र बंगला आहे.
…शब्दांकन- श्री झेंडे महाराज, सांगली


श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी/ श्री स्वामी समर्थ मठी कृष्णाघाट मिरज
मिरज येथे श्री कृष्णा घाटावर श्री कृष्णाबुवा स्वार यांची समाधी आहे. त्यांनी ६/११/१९४७ साली समाधी घेतली. सदरची समाधी मिरज वॉटर वर्क्सच्या कपाऊंडला लागून स्व. धोंडीराम आंबी यांच्या रानात आहे. कालमान परिस्थितीमुळे ती समाधी गावाच्या बाहेर होती. स्व. रामचंद्र जाधव यांच्या निधनानंतर या समाधीकडे दुर्लक्ष होत गेले, समाधी बुजून गेली. त्यावर एक बाभळीचे झाडही पडले. लोकांनी त्या बाजूला उकरंडे केले. एके दिवशी मला पडलेल्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे सदर समाधी जागेचा मी शोध घेण्याचे ठरविले. ते साल अंदाजे १९७४ होते. त्यावेळी मी मिरज वॉटर वर्क्सला नोकरीला असल्याने श्री कृष्णाघाटवरील सर्वच कर्मचारी माझ्या ओळखीचे मित्र होते. स्व. आक्काताई जाधव, स्व. मुकुंदराव गोरे, स्व. दत्तू मोरे, स्व. गजानन मोरे, स्व. धोंडीराम आंबी यांना वरचे वर माहिती विचारुन समाधी स्थळ शोधण्याचा प्रयत्न केला.
यात बरेच दिवस गेले. एक दिवस या समाधीचा शोध पुढे लागला. स्व. धोंडीराम आंबी व त्यांच्या मातोश्री, श्री सुरेश गोरे, श्री श्रीरंग इंगळे, स्व. काशीराम शिष्टे, स्व. बापू शिष्टे या सर्वांच्या प्रयत्नाने श्री कृष्णाबुवा स्वार यांची समाधीची जागा शोधण्यात आली. समाधीवर ‘‘श्रीकृष्णाबुवा दि. ६/११/१९४७’’ असा उल्लेख आढळून आला. सदरची समाधी ही वॉटर वर्क्सच्या कपाऊंडला लागून असून जवळच श्री रामदासीबुवा गाडगीळ, श्री रघुनाथ निरंजन, श्री रावळबुवा यांची जागृतस्थाने आहेत. जवळच मिरजेचे महासाधु आण्णाबुवा यांचीही समाधी आहे. श्रीकृष्णाबुवांची समाधी सापडल्यामुळे मला अतिशय आनंद झाला. मी रोज श्री कृष्णाघाटावर पूजेला जावू लागलो. समाधीची जागा आता स्वच्छ करण्यात आली. लवकरच तेथे कट्टा बांधण्याचे ठरवून मी चार ट्रक दगडही आणून टाकला. परंतु ६/१९७७ ला माझी बदली कोल्हापूर पाटबंधारे विभागात झाल्याने माझे श्रीकृष्णाघाटावरील श्री कृष्णाबुवा समाधी कडे येणे-जाणे कमी झाले. तथापि तेथील श्री सुरेश गोरे, श्री शंकर आंबी व इतर स्वामीभक्त समाधीची पूजा, अर्चा करु लागले. दिवसेंदिवस माझा कृष्णाघाटाशी संपर्क तुटत चालला. तसेच समाधीवर कट्टा बांधण्याचे कामही आर्थिक अडचणीमुळे राहून गेले. श्री कृष्णाघाटावरील लोकवस्ती आता वाढत चालली होती. माझे शालेय मित्र श्री आण्णासाहेब कुरणे, मिरज यांनी श्री कृष्णाघाटावर स्व. धोंडीराम आंबी व स्व. मुकुंदराव दत्तू गोरे यांच्या जमीनीचे प्लॉट पाडले. श्री कृष्णाबुवा स्वार यांची समाधी श्री कृष्णाघाटावरील रि. स. नं. ५९३/३ मध्ये स्व. धोंडीराम आंबी यांच्या जागेत/शेतात होती. त्यामुळे मठीतील सर्व भक्तांशी, श्री आण्णासाहेब कुरणे, श्री रमेश घोरपडे यांच्याशी चर्चा करुन स्व. धोंडीराम आंबी यांच्याकडून २ गुंठे जागा खरेदी केली. तर स्व. मुकुंद दत्तू गोरे व बंधू यांच्याकडून २/६/१९८७ रोजी २ गुंठे जागा खरेदी करण्यात आली. या जागेवरच आता स्वामी समर्थ मठाची स्थापना करण्यात आली. या मठात श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज , अक्कलकोट यांच्या सुंदर तैलचित्रांची स्थापना करण्यात आली. सदरची तैलचित्रे ही स्व. मारुती दळवी, मुंबई यांनी तयार केलेली आहेत. या जागेतच स्व. बबीबाई लुंकड वाचनालय व बालवाडीची इमारत आहे. या मठाची व्यवस्था श्री सुरेश गोरे, श्री मारुती आलदर, श्री कृष्णा दत्तू गोरे, श्री मनोहर कदम, श्री जालंदर गायकवाड व अनेक स्वामी भक्त बघतात. या मठात दरवर्षी
दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात करणेत येतो. महाप्रसादही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. महाप्रसादाची व्यवस्था श्री शिवाजीराव जाधव, श्रीं बेळगावी साहेब, डॉ. श्री म्हेत्रे, श्री मुन्ना भोजमालपाणी, श्री सन्नकेसाहेब, श्री चंद्रकांत हुलवान, श्री दिलीप केसरखाने, श्री वड्ड बंधू, श्री
शंकर कवठेकर व इतर अनेक भक्त मंडळी बघतात.
…शब्दांकन- श्री झेंडे महाराज, सांगली

श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, नेरळ, कर्जत
श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे रायगड जिल्ह्यात ज्ञात असलेले तीन मठ स्थापन आहेत. पैकी एक मठ आपटा येथे श्री कारखानीस यांनी श्री नामदेव महाराजांचा मठ व श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांचा मठ स्थापन केला आहे.
दि. २५/१०/१९९५ रोजी नेरळ येथे श्री माधवसरस्वती स्वामी महाराजांनी मेघदूत सोसायटी येथे श्री श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ यांचे द्वारा ५.५ गुंठे प्लॉट घेतला. तेथे सरकारी परवानग्या व इतर कारणांनी मठ स्थापन करणेस उशीर होत होता. त्यामुळे श्री माधवसरस्वतींनी कर्जत येथे बद्रीनाथ अपार्टमेंट येथे पहिल्या मजल्यावर एक ब्लॉक श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळाला विकत घेण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार ब्लॉक विकत घेऊन तेथे श्रीकृष्ण सरस्वती स्वामीमहाराजांची साधना दि. ५/४/२००० गुढीपाडव्याच्या दिवशी सुरु करण्यात आली.
यथावकाश दि. ३०/७/२००२ रोजी नेरळ प्लॉटची कागदपत्र पूर्तता व परवानग्या प्राप्त झाल्यावर नेरळ येथे स्वतंत्र मठ बांधण्यात आला. हा मठ १००० चौ. फूटांचे ध्यानमंदिर व आजूबाजूला बाग अशा स्वरुपात असून नेरळ स्टेशनपासून (मध्य रेल्वे) १० मिनिटांचे अंतरावर आहे. येथे प्रत्येक शनिवारी सामुहिक साधना होते. तसेच कर्जत येथे प्रत्येक चौथ्या शनिवारी समुहिक साधना केली जाते. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी जयंती, कर्जत वर्धापन दिन (गुडीपाडवा), श्री माधवसरस्वती जयंती, गुरुपौर्णिमा, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात.
श्री माधव सरस्वती (श्री माधव टिकेकर) हे मूळ कोल्हापूरचे असून त्यांचे सी. ए. पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांची र्मभूमी मुंबई राहिली व त्यांचे निवासस्थान देवनार येथे श्रीदत्तगुरु सोसायटी मध्ये स्वत:चे घर असे आहे. श्री माधव सरस्वतींनी ४ मे २००१ रोजी देह ठेवला. श्री माधव सरस्वतींनी आम्हा सर्वांना श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांचा अनुग्रह दिलेला आहे व कुंडलिनी शक्ती जागृत असा अनुग्रह दिलेला आहे.
श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या कै. गणेश नारायण मुजुमदार लिखित पोथीचे पारायणही सामुहिक साधनेत व वैयक्तिक साधनेत केले जाते.
श्री श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ:
कर्जत पत्ता –
बद्रीनाथ अपार्टमेंट
पहिला मजला, शिवाजीनगर
दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड
पिन – ४१०२०१
नेरळ पत्ता-
मेघदूत को-ऑप हौ. सो.
प्लॉट नं. १४, दगडी बंगल्यासमोर
नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड
पिन – ४१०१०१
…संपर्क – श्री अविनाश पु. वैद्य



श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर. साईहरिक्षेत्र, आपटा फाटा, कर्नाळा, जि. रायगड
मुंबई गोवा महामार्गावर आपटा फाटा येथून अर्धा किलोमीटर अंतरावर, पाताळगंगानदीच्या तीरावर सुंदर आणि पवित्र असे साईहरिक्षेत्र वसले आहे. १९८२ सालापासून उर्जितावस्थेत आलेल्या या क्षेत्रात श्री दत्तगुरु, श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, श्री शिर्डी साईबाबा, श्री गजानन महाराज, श्रीकृष्ण सरस्वती महाराज, श्री नामदेव महाराज, श्री द्वारकाधीश यांची मंदिरे असून मुंबई, पनवेल, ठाणे परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्री दत्तजयंती, श्रीस्वामी समर्थ प्रकटदिन, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्री रामनवमी, श्री महाशिवरात्री असे अनेक उत्सव साईहरिक्षेत्री उत्साहात साजरे होतात.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त आणि माझे गुरु स्व. परमपूज्य नाना महाराज परांजपे आणि बदलापूर येथील थोर कृष्णभक्त स्व. लीलाताई कर्वे यांच्या प्रेरणेतून आणि आशिर्वादातून हे क्षेत्र उभे राहिले. आज हे क्षेत्र असंख्य भक्तांना शांत व निसर्गरम्य वातावरण ईश्वरदर्शनातून मन:शांती देणारे क्षेत्र म्हणून प्रसिध्दीस येत आहे. या साईहरिक्षेत्राशी माझा ऋणानुबंध जडला तो १९८२ साली जेव्हा मी माझे गुरु परमपूज्य नाना महाराज परांजपे मला प्रथम साईहरिक्षेत्री घेऊन गेले. त्या दिवसापासून आज पर्यंत साईहरिक्षेत्री भगवंताने माझ्या सारख्या एका सामान्य भक्ताच्या हातून जी सेवा करवून घेतली ती केवळ सद्गुरुंचे आशीर्वाद आणि पूर्वजन्मीची पुण्याई म्हणूनच.
साइहरिक्षेत्रात १९८३ साली श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर परमपूज्य नाना महाराज यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून परमपूज्य नाना महाराजांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र न्यासामार्फत स्थापन झाले. त्यापूर्वी साईहरिक्षेत्राचे मूळ मालक श्री हरिभाऊ मुणगेकरांनी श्रीदत्त मंदिराजी स्थापना केली होती.
माझे गुरु परमपूज्य नाना महाराज हे मूळ शिवोपासक. एक दिवस नाना महाराजांच्या स्वप्नात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आले व त्यांना म्हणाले, “अरे मी शिव काही वेगळे नाही’’ त्यानंतर परमपूज्य नाना महाराजांनी श्री स्वामी समर्थ जप सुरु केला. श्री स्वामी समर्थांनी स्वप्न दृष्टान्तात परमपूज्य नाना महाराजांना आशीर्वाद देऊन आज पासून दोन वर्षांनी तुला एक व्यक्ती भेटेल व ती तुला मार्गदर्शन करेल असे सांगून परमपूज्य नामदेव महाराजांचा फोटो दाखविला. त्यानंतर दोनच वर्षांनी परमपूज्य नामदेव महाराजांशी परमपूज्य नाना महाराजांची कुर्ला, मुंबई येथे भेट झाली. परपमूज्य नाना महाराजांचे गुरु परमपूज्य नामदेव महाराज यांनी १९७१ साली वयाच्या १३० व्या वर्षी कोल्हापूर येथे आपला देह ठेवला. परमपूज्य नामदेव महाराज हे श्रीकृष्ण सरस्वती महारारजांचे अत्यंत आवडते शिष्य होते. १९०० साली श्रावण वद्य दशमीस श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी परमपूज्य नामदेव महाराजांच्या मांडीवर मस्तक ठेवून आपला अवतार संपवला. परमपूज्य नाना महाराजांची श्री नामदेव महाराजांशी झालेली भेट ही स्वामी समर्थांच्या वरील दृष्टांतानुससार झाली. परमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी परमपूज्य श्री नामदेव महाराजांना आपला अवतार संपवताना असे सांगितले की, नाम्या या कार्याची वेल तू वाढव. माझे कार्य पुढे चालू ठेव. त्यानुसार श्री नामदेव महाराजांनी परमपूज्य नाना महाराज परांजपे आणि परमपूज्य नानासाहेब गद्रे या शिष्यांमार्फत आपले कार्य चालू ठेवले.
१९८३ साली श्री स्वामी समर्थ मंदिराची साईहरिक्षेत्री उभारणी झाल्यानंतर १९८७ चे सुमारास मी साईहरिक्षेत्री अर्धा एकर जमीन घेतली. उद्देश हाच की स्वामींच्या सान्निध्यात भविष्यात एखादी वास्तु बांधता यावी. नाना महाराजांची इच्छा होती की श्रीस्वामी समर्थांची गुरुपरंपरा साईहरिक्षेत्री यावी म्हणजेच श्री श्रीकृष्ण सरस्वती महाराज, नाना महाराजांचे गुरु प. पूज्य नामदेव महाराज यांची मंदिरेही साईहरि क्षेत्री निर्माण व्हावीत. एक दिवस स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडपात मी व नाना महाराज दोघेच असताना नाना महाराजांनी ही इच्छा मला बोलून दाखवली, मी नाना महाराजांना भेटलो, नाना तुमचे आशीर्वाद आणि स्वामींनी सामर्थ्य दिलं तर काहीच अशक्य नाही. परमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या काळ्या पाषाणातील पादुका फार पूर्वीपासूनच परमपूज्य नामदेव महाराजांनी बनवून घेतल्या होत्या. श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज ज्योतीबाच्या डोंगरावर गुरुंच्या शोधात हिंडत असत त्यामुळे त्यावेळी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्योतिबाच्या डोंगरावरील काळ्या पाषाणात परमपूज्य नामदेव महाराजांनी आपल्या गुरुंच्या पादुका बनवून घेतल्या होत्या. गोव्याचे सुप्रसिधद उद्योगपती श्री. चौगुले यांनी या पादुकांची गोव्यात श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे मंदिर बांधून स्थापना करावी अशी पूज्य नामदेव महाराजांची इच्छा होती. परंतु नामदेव महाराजांच्या हयातीत त्यांची इच्छा पूर्ण होऊन शकली नाही याची खंत परमपूज्य नाना महाराजांना होती. १९७० मध्ये नामदेव महाराजांनी देह ठेवल्यानंतर या पादुका २७ वर्षे कोल्हापूरात मठीत होत्या.
नाना महाराजांची इच्छा पूर्ण करण्यास भगवंताने लवकरच संधी उपलब्ध करुन दिली. मी साईहरिक्षेत्री १९८७ मध्ये जी छोटीशी जमीन घेतली होती, त्या जमिनीवर एक छोटेखानी मंदिर बांधून तिथे आपण श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुकांची स्थापना करु शकू असे मी नाना महाराजांना सुचवताच त्यांना विलक्षण आनंद झाला. पूर्वी गाईचा गोठा होता तिथे आम्ही मातीची एक झोपडी बांधली होती व तिला मृण्मयी असं नाव दिलं होत. ती झोपडी पाडून तिथे हे छोटेखानी मंदिर उभारण्याचे ठरले. नाना महाराजांच्या हस्ते भूमीपूजन पायाभरणी झाली. कमीतकमी खर्चात मंदिर बांधायचं होत कारण कोणाकडून आर्थिक सहाय्य न घेण्याचा माझा संकल्प होता. अर्ध्या भिंती व त्यावर छतासाठी लोखंडी सांगाडा आणि त्यावर कौलं घालायची असे ठरले. त्यानुसार मंदिराचे बांधकाम कंत्राटदाराने सुरु केले. दरम्यान परमपूज्य नाना महाराजांनी कोल्हापूरहून पादुका साईहरिक्षेत्री आणावयाचे ठरवले. १९८८ च्या मध्यास पादुका आणण्यासाठी मी, पूज्य नाना महाराज व स्वामीभक्त श्री सोपान मंत्री सुमो गाडी घेऊन कोल्हापूरी दाखल झालो. कोल्हापूरचे परमपूज्य काटकर महाराज, नाना महाराजांचे गुरुबंधु नानासाहेब गद्रे आदिंच्या उपस्थित गंगावेश मठीतून पादुका हलवण्याचा प्रयत्न सुरु झाला. २०० किलो वजनाच्या पादुका उचलण्यासाठी ८ कोल्हापुरी पैलवान आले. तरीही पादुका काही हलेनात. नाना महाराजांनी श्री श्रीकृष्ण सरस्वती महाराजांना प्रार्थना केली. महाराज आता आणखी परीक्षा पाहू नका. फुलासाारखे हलके व्हा आणि काय चमत्कार, ४ पैलवानांनी लीलया त्या पादुका उचलल्या आणि सुमोत ठेवल्या. पादुकांचे कोल्हापूर येथून समारंभपूर्वक प्रस्थान झाले. वाटेत खूप अद्भूत अनुभव आले. धो-धो कोसळणारा पाऊस, खराब रस्ते यामुळे आम्हाला आपटा फाटा येथे पोहोचण्यास पहाटेचे ३.४५ वाजले. अशा रीतीने ब्राम्हमुहूर्तावर श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या पादुकांचे साईहरि क्षेत्री आगमन झाले. मंदिराचे काम अपूर्ण असल्याने पादुका शेजारीच असलेल्या कुटीत तात्पुरत्या ठेवण्यात आल्या व त्यांचे नित्यपूजन सुरु झाले. या काळात सतत एक चमत्कार घडत होता. एक भला मोठा नाग पादुकां भोवती वेटोळे घालून आपल्या फण्याची छाया पादुकांवर धरत असे. त्यामुळे पुढे मंदिरात पादुकांची स्थापना झाल्यावर पादुकांवर एक पितळी नाग व शिवलिंग ठेवावे असे परमपूज्य नाना महाराजांनी सुचवले.
श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मंदिराचे काम डिसेंबर १९८९ च्या सुमारास पूर्ण होत आलं होतं. पण खिडक्या तयार झाल्या नव्हत्या. तरीही १२ डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी पादुकांची प्रतिष्ठापना ठरल्याप्रमाणे करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापनेचे पौरोहित्य वेदशास्त्री श्रीरंग जुन्नरकर गुरुजी यांनी केले. यावेळी परमपूज्य श्री नानासाहेब गद्रे यांनी मातीने भरलेली एक पिशवी माझ्याकडे दिली व म्हणाले, या पिशवीतील मातीला श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा पदस्पर्श झाला आहे. श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे पाय जिथे जिथे भूमिला स्पर्श करीत त्या भूमीवरील सद्गुरुंच्या स्पर्शाने पावन झालेली त्यांच्या पावलांखालची माती परमपूज्य नामदेव महाराज जमा करु साठवत असत. ही पवित्र माती श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुकांखाली ठेवण्यात यावी अशी नामदेव महाराजांची इच्छा होती. तेव्हा आता ही माती श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुकांखाली स्थापन करुया. इतरही पवित्र पादुका साईहरिक्षेत्री संगमरवरी सिंहासनावर विराजमान झाल्या. नाना महाराजांचे एक स्वप्न अशा रितीने पूर्ण झाले.
नाना महाराजांच्या मनात आता श्री नामदेव महाराजांचे मंदिर साईहरिक्षेत्री व्हावे अशी इच्छा प्रबळ होऊन लागली. तशी इच्छा त्यांनी माझ्याकडे प्रकट केली. श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मंदिरा शेजारील जागा रिकामी होती. त्या जागेवरच श्री नामदेव महाराजांचे मंदिर बांधण्याचे ठरले आणि लगेचच मंदिराचे बांधकाम सुरु झाले. श्री श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या मंदिराच्या धर्तीवर पण थोडे छोटेखानी बांधण्याचे ठरले. १९९४ च्या दत्तजयंतीला प्राणप्रतिष्ठा करावयाची होती. परमपूज्य नाना महाराजांनी ज्योतिबाच्या डोंगरावरील काळ्या पाषाणात श्री नामदेव महाराजांच्या पादुका घडवून घेतल्या होत्या. त्या कोल्हापूरला होत्या. त्या पादुकांची मंदिरात प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित झाले आणि पादुका कोल्हापूरवरुन समारंभपूर्वक आणण्यात आल्या. दत्त जयंतीच्या एक दिवस आधी कोल्हापूरचे शंकराचार्य अचानक साईहरिक्षेत्री आले. पूज्य लीलाताई कर्वे व पूज्य नाना महाराजही आदल्या दिवशीच आले होते. त्यांची शंकराचार्यांबरोबर भेट झाली. चर्चा झाली. साईहरिक्षेत्री उभी राहिलेली विविध मंदिरे पाहून शंकराचार्यांनीही आनंद व्यक्त केला. शंकराचार्यांनी मंदिराच्या वास्तूला भेट दिली आणि मला व माझ्या पत्नीला आशीर्वाद दिले. १७ डिसेंबर १९९४ रोजी दत्तजयंतीचे दिवशी पूज्य लीलाताई कर्वे व पूज्य नाना महाराज यांच्या साक्षीने श्री नामदेव महाराजांच्या पादुका साईहरिक्षेत्री विराजमान झाल्या. गुरुमंदिर असं या वास्तुचे नामकरण करण्यात आले. यावेळी नाना महाराजांनी त्यांची गुरुपरंपरा साईहरिक्षेत्रात आणण्यासाठी माझ्या सारख्या सामान्य भक्ताच्या हातून जे प्रयत्न झाले त्याबद्दल एक प्रासादिक भगवी छाटी मला दिली. स्वत:च्या गळ्यातील पुष्पहार माझ्या गळ्यात घातला व म्हणाले, अजितने ही दोन्ही मंदिर बांधण्याची माझी इच्छा पूर्ण केली म्हणून माझ्या गुरुंनी १९६६ साली जशी शक्तिरुप छाटी मला दिली तशी ही शक्तिरुप छाटी आज मी अजितला प्रदान करत आहे. असं म्हणून माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवून दीर्घ ओंकारोच्चार केला. परमपूज्य लीलातार्इंनीही मला आशीर्वाद दिला. माझ्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. गुरुंची इच्छा पूर्ण करु शकल्याचे समाधान लाभले होते.
दोन्ही गुरुमंदिर बांधल्यानंतर मी त्यावरच स्वामीत्व सोडून ती नाना महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीस्वामी समर्त विश्वकल्याण केंद्राला अर्पण करावीत अशी इच्छा नाना महाराजांनी व्यक्त केली आण पूर्वी त्यांना मी तसं वचनही दिलं होत. त्या प्रमाणे ही दोन्ही मी परमपूज्य नाना महाराजांच्या इच्छेनुसार श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्राला दि. २१ जुलै २००५ रोजी अर्पण केली व गुरुंची इच्छा पूर्ण केली.
श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मंदिरातील पादुकांच्या प्राणप्रतिष्ठापने नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला मंदिरात गायत्री हवन करण्यास मी प्रारंभ केला. सलग १२१ हवनांचा संकल्प २००० साली पूर्ण झाला. श्री दत्त जयंती व गुरुपौर्णिमा उत्सवाबरोबरच माघ वद्य पंचमीस महाराजांचा जन्मदिवस तसेच श्रावण वद्य दशमीस त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेस प्रतिवर्षी प्रतिवर्षी तुलसी विवाह संपन्न होतो. श्री नामदेव महाराजांच्या मंदिरात गुढी पाडव्यास त्यांचा जन्मदिवस आणि कुष्माण्ड नवमीस त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. परमपूज्य नामदेव महाराजांचे अनुग्रही आणि परमपूज्य नाना महाराजांचे गुरुबंधू परमपूज्य स्व. नानासाहेब गद्रे यांच्या पुणे येथील शिष्य परिवारातील भक्तगण, पूज्य श्री दुर्वे काका यांच्यासह या उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
पूर्वपीठिका:
परमपूज्य नाना महाराजांशी माझी भेट १९८२ साली झाली. त्यांच्या भेटीनंतर अवघ्या पंधरा दिवसातच श्री अक्कलकोट स्वामी समर्थांनी मला स्वप्नात दर्शन दिले, त्यांच्या चरणी मस्तक ठेवताच माझे शरीर फुलासारखे हलके झाल्याची विलक्षण अनुभूती मला आली. त्यानंतर थोड्याच दिवसात मला स्वप्नामध्ये दादर येथील श्री स्वामी समर्थ मठात मी गेलो आहे आणि तिथे लावलेल्या स्वामी समर्थांच्या प्रत्येक फोटोत मला नाना महाराजच दिसत आहेत असे जाणवले. त्या दिवसापासून परमपूज्य नाना महाराज आपल्यासाठी स्वामी समर्थ आहेत असे जाणून त्या दिवसापासून मी परमपूज्य नाना महाराजांना गुरुस्थानी मानले. परमपूज्य नाना महाराजांचा सहवास मला पस्तीस वर्षे लाभला. नाना महाराजांचे श्री स्वामी समर्थांशी संभाषण होत असे आणि त्यानुसार ते भक्तांना मार्गदर्शन करीत असत. नाना महाराजांनी २०१३ साली देह ठेवला.
१९८४ साली नाना महाराजांनी मला आदेश दिला. आजपासून तू भगवान गोपाल कृष्णाची आराधना कर. तो योगेश्वर आहे, तो तुला ऐश्वर्य देईल आणि तुझ्या हातून कार्य करुन घेईल. त्या दिवसापासून मी कृष्ण आराधना करु लागलो. समोर श्री स्वामी समर्थांचा फोटो असला तरी नमस्कार करताना माझ्या मुखातून कृष्ण असेच शब्द निघत. पुढे तीनच वर्षांनी माझी बदलापूरच्या थोर कृष्णभक्त परमपूज्य लीलाताई कर्वे यांची भेट झाली. त्यांच्या रुपात साक्षात कृष्ण परमात्मा मला भेटला, माझ्या सोबत वावरला आणि माझ्या सारख्या एक नोकरदार भक्ताच्या हातून साईहरिक्षेत्री एक प्रसादतुल्य असे श्रीद्वारकाधीश मंदिर उभे राहिले. परमपूज्य नाना महाराज आणि परमपूज्य लीलाताई कर्वे यांच्या कृपेमुळे जे कार्य हातून घडलं त्यामुळे माझे अवघे जीवन धन्य झाले. परमपूज्य लीलाताई या आम्हा सर्व भक्तांसाठी एक वात्सल्यसिंधु आईच होत्या. त्यांच्याशी श्रीकृष्ण परमात्मा बोलत असे व त्यानुसार आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभे. असंख्य भक्तांना याचे आश्चर्यकारक अनुभव आले. २००३ साली परमपूज्य र्ताइंनी ध्यानसमाधीत इहलोकीची यात्रा संपवली.
गुरुंनी धन्य मज केले.
शब्दांकन : श्री अजित कारखानीस, मुंबई

श्री बहादूरवाडी (जि. कोल्हापूर) येथील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या मठाची माहिती
श्री रमानंद सरस्वती महाराज उर्फ रमाकांत नेसरीकर यांचा जन्म सोमवार दि. ९/१२/१९३५ रोजी शहापूर जि. बेळगाव येथे झाला. त्यांच्या मातेचे नाव अनुसया, वडिलांचे नाव हणमंत. रमाकांता यांचे आजोबा हरिपंत नेसरीकर हे अत्यंत सद्वर्तनी व मोठे निष्ठावंत होते. दत्तभक्त होते. त्यांच्या या प्रखर दत्तभक्तीचा प्रभाव त्यांच्या पुढील पिढ्यांवरही पडल्यावाचून राहिला नाही. त्यांच्या दत्तभक्तीमुळे संपूर्ण नेसरीकर घराण्याला एक प्रकारचा उजाळा मिळाला. वास्तविक पाहिले तर रमाकांताचे कुलदैवत मार्मा-गोवा येथील सप्तकोटेश्वर महादेव हे आहे. परंतु हरिपंतांच्या दत्तोपासनेचा असा काही प्रभाव पडला की त्यांच्या पुढील पिढीतील वंशजांनी दत्ताचीच भक्ती व उपासना ओघानेच स्वीकृत केली व आजही तीच उपासना सातत्याने चालू आहे. रमाकांताच्या नेसरीकर घराण्याचे ज्ञात असलेले मूळ पुरुष अनंत दिवेकर हे होत. ते दिवाडगाव (गोवे) येथे राहात असत. पुढे या घराण्यातील कर्ता पुरुष नेसरी येथे आला व तेव्हापासून त्यांना नेसरीकर या नावाने संबोधण्यात येते.
रमाकांताची मातोश्री अनसूया या शहापूरचे विठ्ठलराव सराफ यांच्या कन्या होत. नेसरीकर हे देशस्थ यजुर्वेदी शाखेचे सारस्वत ब्राम्हण होते. त्यांचे गोत्र अत्री. वयाच्या जवळजवळ सहाव्या वर्षापासून रमाकांताला एक प्रकारच्या व्याधीने पछाडले होते. त्या बालवयात रमाकांताला वारंवार मेंदूचे, झटके येऊन तो बेशुध्द होई. त्यामुळे घरातील मंडळींना त्याच्या बद्दल काळजी वाटे. त्यांनी स्थानिक डॉक्टर व वैद्य यांना रमाकांताला दाखवून पुष्कळ औषधोपचार करुन पाहिले, परंतु गुण म्हणून काही दिसेना. मेंदूचा झटका येण्यापूर्वी रमाकांताच्या मनात कसल्यातरी भीतीचा संचार होत असे. कधी कधी डोळ्यासमोर उग्र व भेसूर अशी मूर्ती दिसावी, अंगाला कंप यावा व बेशुध्द होऊन निपचीत पडावे. कधी कधी त्या उग्र व भव्य मूर्तीने आपले तेज:पूंज डोळे विस्फारुन त्याच्याकडे एकसारखी नजर भिडवावी व त्यामुळे रमाकांताच्या अंगात भीतीने कापरे भरावे व शेवटी तो बेशुध्द व्हावा. असे प्रकार वारंवार घडत. तो बेशुध्द होऊन कुठे व केव्हा पडेल याचा नेम नव्हता. असे अनिष्ट प्रकार वारंवार होऊ लागले. लोकांना वाटे हा मुलगा वेडा आहे. कोणी म्हणत याला फेफरे आले, अनेकांनी त्याला पिसा, पिसा म्हणून चिडविण्यास कमी केले नाही. अशा रीतीने लोक रमाकांताकडे एक खुळा व वेडा मुलगा म्हणून पाहू लागले. त्याचा परिणाम आईबापांच्या मनावर होणे अपरिहार्य होते. त्यांच्या मनाला हे पाहून फार दु:ख होई. रमाकांताच्या व्याधीवर अनेक वैद्यकीय उपाय करुनही जेव्हा गुण म्हणून येईना तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विजापूर येथील त्याचे चुलते शांताराम नेसरीकर यांच्याकडे पाठविले. हेतू असा की हवापालट झाल्याने तरी रमाकांताला बरे वाटावे. शांताराम हे तेथे जिल्हा बोर्डात लिपिक म्हणून नोकरी करीत.यावेळी रमाकांताचे वय नऊ वर्षांचे असावे. शांताराम काकाने सुध्दा रमाकांताची प्रकृती सुधारावी म्हणून अनेक उपाय करुन पाहिले परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी त्यांच्या शांताराम काकांनी त्यांना परत बेळगावला घरीआणून सोडले. यानंतर रमाकांतांना बेळगावहून त्यांना सोलापूरच्या काकांच्याकडे पाठविण्यात आले. त्यांना तेथे सुध्दा त्यांच्या तब्येतीत फरक पडला नाही. सोलापूरहून रमाकांत पुन्हा बेळगावला आले. कांही काळ बेळगावला दुर्गाबाई विडीकर यांच्याकडे राहू लागले. त्यांचीं सेवा करु लागले. दुर्गा आजी या दि. १५ ऑगस्ट १९४८ रोजी स्वर्गवासी झाल्या. रमाकांतावर या दु:खाचा आघात झाला. त्यांना अगदी उदासपणे वाटू लागले. त्यांचे चित्त कोणत्याही कामात लागेना. तरीपण ते बेळगाव येथील त्यांच्या ‘‘ओगले ग्लास’’ दुकानात जाऊन बसत. त्यावेळी त्यांच्या नजीकच श्री पंतनाथ महाराज यांचे वास्तव्य होते. हुबळीचे प्रख्यात स्वामी सिध्दारुढ स्वामी यांचे बंधू सिध्दावधूत महाराजांचे चिरंजीव म्हणजेच पंतनाथ महाराज हे होत. लवकरच या पंतनाथ महाराजांची श्री रमाकांतांवर कृपा झाली. पंथनाथ महाराज हे थोर संत व त्रिकाल ज्ञानी योगी पुरुष होते. त्यांच्या पहिल्या भेटी पासून रमाकांताच्या मनातील संकोच, भिती नाहीशी झाली. श्री पंतनाथ महाराजांनी त्यांच्या मागील जन्मातील सत्कर्मे व मागील जन्मातील पुर्वसंचित या विषयीची संपूर्ण माहिती रमाकांतांना दिली. मागील जन्माचे गुह्य उकलून दाखविले. नंतर पुढे श्री रमाकांत हे वडिलांच्या आज्ञेप्रमाणे निपाणीला आले. त्यावेळी त्यांचे वय २२-२३ वर्षांचे होते. रमाकांतांनी निपाणीचे दुकान सरासरी पाच वर्षे चालविले. निपाणीत त्यांनी भारत टूथ पावडर, सुवर्णकांती गंध, मसाल्याचा बाप या लोक उपयोगी वस्तू तयार करुन विकण्याचा उद्योग केला. त्यांचे शिक्षण कसेबसे सहावी पर्यंत झाले असले तरी या उद्योगात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले होते. यात त्यांना स्व. विष्णू रामचंद्र आमले यांनी मार्गदर्शन केले होते. तथापि त्यांच्या मनाने मी आता एकाकी आहे. जग आपले नाही व आपण जागाचे नाही ही दारुण दशा भावी जीवनाबद्दल नाउमेद करु लागली. दिवसेंदिवस ते वैफल्यग्रस्त होऊ लागले. सन १९५९ सालापर्यंत त्यांचे जवळचे मनोहर काका यांच्या बरोबर ते नरसोबावाडीला दर्शनाला गेले. तेथेच त्यांना श्री दत्त महाराजांनी अकल्पीत दृष्टांत दिला. या दृष्टांताचा/ स्वप्नाचा अर्थबोध रमाकांतांना लवकरच झाला. पुढे लवकरच श्रीं गंगावेशीतील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मठीत आले व नामस्मरणाची सेवा करु लागले. तसेच ते कुंभार गल्लीतील ताराई शिर्के यांच्या मठीत जाऊ लागले. लवकरच त्यांची गाठ कोल्हापूर येथील प. पू. श्रीखंडे महाराज, प. पू. चिले महाराज यांच्याशी पडून त्यांचा परमार्थाचा मार्ग सुखकर झाला. त्यांनी अत्यंत कडक असे मौन व्रत धारण करुन माधुकरी मागून फक्त पाच घास भक्षण करुन ते उच्च कोटीतील सत्पुरुष बनले. त्यांना दत्त पदाचा उच्च लाभ झाला. त्यांनी पुष्कळ तिर्थाटन केले. कोल्हापूरातील स्वर्गीय शंकरराव भोसले हे रमानंद सरस्वती महाराजांचे अनुग्रहीत शिष्य होते. त्यांची बहिण बहादूरवाडीला दिली होती. त्यांचे नाव अनसूयाबाई आनंदराव घोरपडे होते. स्व. अनसूयाबाई या सुध्दा श्री रमानंद सरस्वती यांच्या शिष्या होत्या. त्यांनी बहादूरवाडीतील आपल्या मालकीच्या जागेत काही जागा श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या मठाकरीता प. पू. श्री रमानंद सरस्वती महाराज यांना दिली. या ठिकाणीच श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा मठ उभा आहे.
श्री रमानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी दि. १७ फेबु्रवारी १९९५ रोजी समाधी घेतली आहे. या मठाची व्यवस्था प. पू. आत्मानंद महाराज पाहातात.
संदर्भ ग्रंथ – श्री सद्गुरु प. पू. श्री रमानंद सरस्वती जीवन दर्शन
लेखकाचे नाव – द. बा. महाजन, यवतमाळ

गोरखचिंचेखालील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठी, कोल्हापूर (श्री रामचंद्र घोरपडे यांचे खाजगी मंदिर)
आमचे पणजोबा स्व. रावजी रामजी मुधोळकर घोरपडे हे दर गुरुवार- दर पौर्णिामेला नृसिंहवाडीला पायी चालत जात असत. काही वर्षानंतर एके दिवशी पादुकांचे दर्शन घेऊन, भोजन करुन थोडी वामकुक्षी करत असताना, त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात श्री दत्त प्रभु म्हणाले, ‘‘रावजी तु आता माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुझ्याकडे येईन. तु निर्धास्तपणे घरी जा.’’ काही कालावधी नंतर एके दिवशी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज आमचे घराशेजारी असणाऱ्या गोरक्षवृक्षाच्या जाड मुळीवर बसलेले दिसले. बटु वेशधारी बघुन, कोण, कुठून आलास? वगैरे चौकशी केल्यावर मी वाडीचा कृष्णा आहे. अक्कलकोटावरुन आलो आहे असे सांगितले. त्यानंतर अधूनमधून महाराज यायचे, आमच्या घराजवळ बसायचे, शेतात फिरायचे, राहण्यास, मुक्कामास महिना-महिना रहायचे. आमक्या या ठिकाणी खोदा, पाणी लागेल असे सांगितले. त्या जागी विहिर काढल्यावर भरपूर पाणी लागले. त्यावर बारा एकर जमीन भिजू लागली.
स्व. रावजी मुधोळकर यांना मुळबाळ नव्हते. कृष्ण सरस्वती दत्त महाराज रावजींना म्हणाले, ‘‘तू दुसरे घर कर म्हणजे तुला मुल होईल.’’ महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी दुसरे लग्न केले. लवकरच त्यांना मुलगा झाला. दत्त कृपेने मुलगा झाला म्हणून त्याचे नाव दत्तात्रेय ठेवले. एके दिवशी महाराजांनी आमचे कडील घरगडी शिदबाला म्हणाले,‘‘तू जुन्या पुलावरील दगडी कारखान्यात जा, त्या मुल्लापठाणला सांग मला पादुका पाहिजेत आणि तू पादुका घेऊन ये.’’ शिदबा ने पैशाचा विषय काढल्यावर त्याला पुन्हा महाराज म्हणाले,‘‘मी पादुका मागितल्या आहेत असे त्याला सांग तो पादुका तुला देईल.’’ त्यानुसार शिदबाने दगडी कारखान्यात जाऊन तेथील मालकाला पादुका मागितल्या. शिदबाचे ऐकून त्या दगडी कारखान्याच्या मालकाला काहीतरी आठवले व खूप आनंद झाला. त्याने पूर्वीच तयार करुन ठेवलेल्या पादुका स्वखर्चाने बैलगाडीतून वाजत गाजत आमच्या घरी पोहोच केल्या. त्याचे कारण की, त्या कारखानदाराला पुर्वीच दृष्टांत देऊन पादुका करणेबद्दल महाराजांनी सांगितलेले होते. त्यानुसार पादुका तयार करुन तो कोण व कधी पादुका नेण्यासाठी येतो याची वाटच पाहत होता. असो सदर पादुकांना दुधाचा अभिषेक करुन त्यांची स्थापना गोरक्षवृक्षा शेजारी स्वत: महाराजांनी केली. त्या पादुकावर पाय ठेवून दही भात खाल्ला व या ठिकाणी नृसिंहवाडी आहे असे सांगितले. त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करुन सर्वांना जेवण केले. त्यानंतर महाराज प्रत्येक दत्त जयंतीला पुरणपोळीचे जेवण करण्यास सांगत. सदर पादुकांच्या ठिकाणी छोटे खाणी मंदिर व हॉल बांधला. श्री दत्त महाराजांनी या ठिकाणी पादुका स्थापन केल्यापासून भजन-पूजन, प्रसाद, महाप्रसाद व्यवस्थित चालू आहे. स्व. रावजी यांचे नंतर स्व. दत्ताजीराव, मग गणपतराव व त्यांच्या नंतर मी स्वत: रामचंद्र व माझे कुटुंबीय आम्ही जमेल तशी श्री दत्त महाराजांची सेवा करीत आहोत.
या मंदिरात पूर्वी बाबू जमाल फकिर महाराजांना भेटण्यास येत असत. तसेच अलिकडच्या काळातील शंकर महाराज (माळकर तिकटी वरील) चिले महाराज नेहमी महाराजांशी गप्पा मारणेस येत असत. तसेच बरेच साधुसंत (अंर्तज्ञानी) दर्शनास येतात.
वरील सर्व माहिती वाडवडिलांच्याकडून ऐकीव माहिती वरुन दिली आहे. माझ्यावर श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त प्रभूंचे अनंत उपकार आहेत ते शब्दांत सांगू शकत नाही..
शब्दांकन :- श्री रामचंद्र गणपतराव घोरपडे
घर नं. २९७४, सी-वॉर्ड ‘‘गोरक्ष छाया’’,
जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर


श्री रांगोळी महाराज स्थापित मालवण येथील श्री स्वामी मंदिर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालडीगाव हे कालावली खाडीच्या दोन्ही बाजूंनी बसलेले छोटेखानी गाव. माड, पोफळीच्या, केळींच्या बागा, आंबा, फणस, काजूंची झाडे यामुळे हा भाग आजही रमणीय वाटतो. या गावात रामशेठ बाबाजी बावडेकर व विष्णूशेठ बाबाजी बावडेकर हे दोन बंधू सराफीचा व्यवसाय करीत होते. लहान असतानाच माता-पित्यांचे त्यांचे छत्र हरपले. जिद्दीने दोन्ही भाऊ पुन्हा उभे राहिले. मालडी येथील सराफीचा व्यवसाय कमी झाल्याने ते बावडा संस्थानात सराफी व्यवसायासाठी आले. बावडा काय किंवा मालडी काय सगळीकडे व्यवसायाची परिस्थिती सारखीच होती. आपण चांगले कलाकार असूनही आपल्याला काम नाही ही या दोन्ही भावांची खंत होती. त्यावेळी बावडा संस्थानात पंडित नावाचे संस्थानिक कारभार करीत होते. त्यांनी त्यांची भेट घेतली. श्री पंडित संस्थानिकांनी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे श्री रामशेठ बावडेकर यांच्या कामाची/कलेची शिफारस केली. त्या शिफारसपत्रावरुन राजर्षी शाहू महाराजांनी त्या दोन्ही भावांना आपल्या रत्नशाळेत रत्नपारखी म्हणून नोकरी दिली. त्याच बरोबर पालखी, घोडे यांचाही मान दिला. लवकरच दोन्ही बंधूंचा लग्न सोहळाही पार पडला.
रामशेठ यांच्या पत्नीचे नाव सिताबाई तर विष्णुशेठ यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई होते. रामशेठ आणि सिताबाई यांना मुले नव्हती. मात्र विष्णूशेठना शिवराम, वामनराव ही दोन मुले व जनाबाई, वेणूबाई, कानूबाई अशा तीन मुली झाल्या. रामशेठ अपत्यहीन असले तरी विष्णूशेठची
मुले ही आपलीच मुले आहेत असे समजून त्यांनी त्यांचे पालन पोषण, कौतुक, लाड केले. विष्णूपंतांचा मुलगा शिवराम यांच्यावर काकी सिताबाईचा विशेष जीव होता. शिवराम लहानपणापासून घरभर रांगोळ्या घालून घर-अंगण सजवायचा. कधीकधी शिवराम एकटाच बसून ध्यानस्थ बसून राहायचा. शिवराम शाळेत जायचा पण शाळेत त्याचे लक्ष अभ्यासाकडे नसायचेच. सारे लक्ष चित्रकलेकडे असायचे. शाळेत इतर विषय शिकवण्यापेक्षा चित्रकला हाच विषय त्यांना आवडायचा. जसा-जसा शिवराम मोठा व्हायला लागला, तसा-तसा शिवराम आपल्या तंद्रीतच राहू लागला. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना व काकींना त्याच्याविषयी चिंता वाटू लागली. या मुलाचे आता पुढे कसे होणार हा प्रश्न भेडसावू लागला.
कुणीतरी सिताबार्इंना सांगितले की, कुंभारगल्लीत श्रीकृष्ण सरस्वती नावाचे साधुपुरुष आहेत. त्यांच्याकडे शिवरामला घेऊन जा म्हणजे शिवराम व्यवस्थित मार्गाला लागेल. त्यांच्या घरापासून कुंभार गल्ली जवळच होती. सिताबाई शिवरामला बरोबर घेऊन कुंभारगल्लीतील श्रीकृष्ण सरस्वतींच्या मठाकडे गेली. त्यावेळी ताराबाईच्या घरात उंचच उंच वाढलेल्या औदुंबराच्या झाडावर श्रीकृष्ण सरस्वती चढून बसले होते. शिवरामला पाहताच श्रीकृष्ण सरस्वती झाडावरुन खाली उतरले आणि आपल्या आसनावर बसले. सिताबाईने शिवरामला श्रीकृष्ण सरस्वतींच्या पायावर घातले. श्रीकृष्ण सरस्वतींनी शिवरामच्या चेहऱ्यावरुन हात फिरवले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि आपल्या अंगावरील भगवी शाल शिवरामच्या खांद्यावर पांघरली. तसेच बंद मुठीतून एक वस्तू आणून ती शिवरामच्या भगव्या फडक्यात बांधून तो फडका त्यांनी शिवरामच्या गळ्यात बांधला व सितार्बाइंना सांगून टाकले ‘‘आजपासून हा मुलगा आमचा झाला. तू त्याला घरी घेऊन जा. योग्यवेळी तो इथे येईल. ’’ श्रीकृष्ण सरस्वतींनी त्यांना श्रीस्वामी समर्थांनी जे आत्मलिंग दिले होते. ते आत्मलिंग फडक्यात बांधून त्यांनी शिवरामच्या गळ्यात बांधले होते. शिवरामने ती वस्तू आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याजवळ बाळगली होती. छत्रपती शाहूमहाराजांच्या पदरी नोकरी असतानाच शिवरामने आपला रांगोळीचा छंद जोपासला होता. इचलकरंजीच्या लवेकर घराण्यातील गंगूबाईशी शिवरामचा विवाह झाला. शिवराम पंतांना तीन मुले झाली. शामराव, बाबूराव आणि द्वारकाबाई. श्रीकृष्ण सरस्वतींच्या मठीत गेल्यापासून हळूहळू ते पूर्ण विरक्त होत चालले होते. स्वामींच्या समाधीनंतर आता त्यांचे वास्तव्य मठीतच होवू लागले. शिवरामपंत आता तर शाहू महाराजांच्या रत्नशाळेकडे जाईनासे झाले. कोल्हापूरात कोठे काही कार्यक्रम असला की शिवरामपंतांना रांगोळी घालण्यासाठी निमंत्रणे येवू लागली. महालक्ष्मीच्या मंदिराच्या प्रांगणात, श्रीकृष्ण सरस्वतींच्या पालखीपुढे अशि काही रांगोळी शिवरामपंत घालीत की पाहणारा आश्चर्यचकीत होऊन जाई. छत्रपती शाहू महाराजांची मुलगी राधाबाई यांच्या विवाह प्रसंगी वरातीत, रस्त्यावर सुमारे दीड मैल अंतराची दीर्घ अशी रांगोळी शिवरामपंतानी घातली. या रांगोळीवर बेहद्द खुश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या हातातील सोन्याचे कडे काढून शिवरामपंत बावडेकरांच्या हातात घातले. आणि शिवरामपंतांचे ‘रांगोळी महाराज’’ असे नाभाभिधान करुन अत्यंत श्रध्देने आणि भक्तीभावाने त्यांना नमस्कार केला.
रायाजी हिंदळेकर व राजाराम अंब्रे यांचे मालवणच्या सोमवारपेठेत दुकान होते. दुकानासाठी रायाजी हिंदळेकर कोल्हापूरहून माल खरेदी करण्याचे काम करीत. रायाजी कोल्हापूरला गेले की तेथील कुंभारगल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मठात दर्शनासाठी जात. त्यामुळे रायाजींची व रांगोळी महाराजांची दाट ओळख झाली. रायाजींशी ओळख झाल्यानंतर श्री रांगोळी महाराज मालवणला त्यांच्याकडे वरचेवर जावू लागले. रांगोळी महाराजांच्या मालवणातील ओळखी वाढत चालल्या होत्या. आता रांगोळी महाराज विरक्त अशा संन्यासाचे जीवन जगत होते. रांगोळी महाराजांनी मालवणला राहण्याचा निश्चय केला होता. रायाजी हिंदळेकर व नारायणराव धुरी यांची तर महाराजांनी मालवणला राहावे अशी तीव्र इच्छा होती. रायाजी त्यावेळी अंब्रे यांच्या माडीवर राहात असत. रायाजी ब्रम्हचारी होते. मालवणला रांगोळी महाराज कायम वास्तव्याला आले. ही बातमी समजल्याने रायाजी हारखून गेले. तेथे माडीवर रांगोळी महाराजांनी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, आपले गुरु श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या तसबिरींची स्थापना केली. आजही या तसबिरी आश्रमात आहेत. हेच मालवणमधील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे मंदिर आहे.
मालवणमध्ये श्री रांगोळी महाराजांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. सन १९२४ सालापासून रांगोळी महाराजांचा मालवणशी संबंध होता. परंतु १९३३ सालापर्यंत ते मालवणला येऊनजाऊ न असत. १९३३ ते १९४७ या काळात म्हणजेच देहावसान होईपर्यंत ते मालवण सोडून कोठेही गेले नाहीत. मालवणवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. अंब्रे यांच्या माडीवरच मठात त्यांचे वास्तव्य असे. अनेकांचा त्यांनी उद्धार केला. वयाच्या ८०व्या वर्षी वैशाख शुद्ध त्रयोदशी ५ मे १९४७ रोजी त्यांनी आपली अवतार समाप्ती केली. महाराजांच्या निधनानंतर श्री बाबासाहेब अंब्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. तारा यांनी स्थानिक लोकांच्या सहकार्याने एक ट्रस्ट स्थापन करुन भव्य असा मठ म्हणजेच आश्रम मालवणला उभारला आहे. बुधवार दि. २८ एप्रिल १९९९ वैशाख शुध्द त्रयोदशीला प. पू. डॉ. शशिकांत चिटणीस महाराज यांच्या हस्ते रांगोळी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
संदर्भ ग्रंथाचे नाव : श्री स्वामीभक्त श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे शिष्य सद्गुरु श्री रांगोळी महाराज
लेखकाचे नाव : श्रीकांत देसाई

॥ श्री गुरु- स्मृती ॥ श्री गुरुसेवा भक्तपरिवार बडोदा
श्रीमत् ब्रम्हचारी (बालानंद स्वामी) यांचा जन्म फाल्गुन वद्य ४ इ. स. १८७२ रोजी भोर येथे झाला. श्रींचे पूर्ण नाव मोरेश्वर बाळकृष्ण होनप होते. भोरच्या एका जहागिरदार कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. जहागिरीबाबत भावकीमध्ये वितुष्ट आल्याने त्यांच्या आईने भोर हे गाव कायमचे सोडले व बडोद्यास राहावयास आल्या. त्यावेळी श्रींचे वय अंदाजे ८ ते १० वर्षे असावे. श्रींचे घराणे देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हणांचे होते. त्यांची आई त्यांना बाळू म्हणे.
बाळूची आई बाळूला घेऊन बडोद्यातील भुतडीझापा परिसरात राहु लागल्या. गरीबीमुळे आई कोणाकडे तरी स्वयपांकपाणी करी आणि बाळू माधुकरी मागून व वार लावून अभ्यास करु लागला. बाळू हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. उर्दू, पर्शियन, गुजराती, मराठी इत्यादी भाषेत बाळू प्रविण होता. बाळूचे शिक्षण इंग्रजी पाचवी-सहावी पर्यंत झाले होते. बाळू यांना आपण श्री ब्रम्हचारी महाराज (बालानंद) श्री म्हणून येथून उल्लेख करुया. श्रींनी शाळेत असताना बापूराव कोराण्णे या गायन मास्तरांच्याकडे संगीत शिक्षणाचा उत्तम अभ्यास केला होता. शास्त्रीय गायनात नावारुपाला आलेले पंडित भास्करबुवा बखले हे श्रींचे मित्र होते.
शाळा सोडल्यानंतर श्रींनी बडोदा सोडून आपल्या आईला घेऊन ते गाणगापूरला आले. तेथे आल्यावर स्नान, पूजा, अनुष्ठान वगैरे कार्यक्रम यथाविधी सुरु झाले. श्रीनृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या पादुका हेच त्यांचे दैवत झाले. त्यावेळी त्यांचे वय अंदाजे १८ वर्षांचे असावे. मंदिरातील एक पूजारी श्री वेदमूर्ती देवणभट्टजी श्रीकल्लेश्वर देवस्थानात राहात असत. श्री त्यांच्याकडेच राहू लागले. त्यांना त्यांच्या श्रीनृसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या सेवाकार्यात श्री ब्रम्हचारी स्वामी महाराज दररोज त्यांना मदत करु लागले. देवण्णभट्ट स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्याजवळ राहात असलेल्या श्री ब्रम्हचारी स्वामी महाराजांच्यावर देवसेवेची कामगिरी येवून पडली. अशा प्रकारे बरेच दिवस गेले. सेवा, अनुष्ठान वगैरे चालू असताना श्रीनृसिंह सरस्वती दत्त महाराज/ श्रीदत्त प्रभू यांचा त्यांना आदेश झाला. तुझे या क्षेत्रीचे सेवा-कर्तव्य पूर्ण झाले आहे. ‘‘आता तू श्री क्षेत्र कोल्हापूर येथे जा व तेथे कुंभार स्वामी या नावाने प्रसिध्द असलेले यति श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे दर्शन घे. ते महान साधु तुला तुझा पुढचा मार्ग दाखवतील. त्यांच्या आज्ञेचे पालन करावे व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिवन व्यतित करावे. जरुर पडेल तेव्हा इथे ये, आम्ही सदैव येथे आहोतच.पण आता तू इथे न थांबता कोल्हापूरला निघून जा.’’ श्री ब्रम्हचारी स्वामींनी लहानपणी शाळा सोडल्यावर आईस बरोबर घेऊन श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दत्त सेवे करीता गेले. काही वर्षे सेवा, उपासना केल्यावर श्री दत्तगुरुंनी त्यांना कोल्हापूर निवासी श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज स्वामी यांच्याकडे जाण्याची आज्ञा केली. श्रींनी (बाळूने) व त्यांच्या आईनी श्री दत्तप्रभूंची आज्ञा शिरोधार्य मानून गाणगापूर सोडले व कोल्हापूरला आले. श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज स्वामींनी त्यांना सेवेत ठेवून घेतले. काही वर्षे सेवा व उपासना झाल्यावर त्यांना योगमार्ग व उपासनेसाठी ईश्वर इच्छेने शिनोर निवासी श्री सच्चिदानंद स्वामींच्याकडे पाठविले. श्री सच्चिदानंद स्वामींनी त्यांना आतूर संन्यास दिला. श्री सच्चिदानंद स्वामींनी योग्य ते शिक्षण देवून त्यांना गुजरात/बडोदा भागात ईश्वरी कार्य करण्यास पाठविले. श्री सच्चिदानंद स्वामी हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य होते. श्री टेंबे स्वामी महाराज व श्री गांडा महाराज व श्री रंगावधूत स्वामी महाराज यांच्या कार्याप्रमाणेच श्री ब्रम्हचारी स्वामी महाराज यांनी गुजरात व इतर भागात श्री दत्त संप्रदाय वाढविला, रुजविला, दत्त भक्तांना प्रेम देवून मार्गदर्शन केले. आजही त्यांचा भक्तपरिवार महाराष्ट्र/ कर्नाटक/गुजरात इत्यादी भागात विखुरलेला आहे. श्री ब्रम्हचारी स्वामी महाराज यांनी चैत्र वद्य त्रयोदशी बुधवार दिनांक २० एप्रिल १९५५ (श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी)रोजी समाधी घेतली.
सन १९६२ साला पासून श्रींचे एक निस्सीम भक्त साळुंखे हे श्री ब्रम्हचारी स्वामी महाराज यांच्यासाठी घर बांधून देण्यासाठी खटपट करु लागले. पीरामीतर, कला भवनच्या मागे बडोदा येथे एक घर घेण्यात येवून एक ट्रस्ट करण्यात आला व घराची चांगली दुरुस्ती करण्यात येवून या घराला गुरुसेवा हे नाव देण्यात आले. हेच श्री ब्रम्हचारी स्वामी महाराज यांचे बडोदा येथील मंदिर / मठी/आश्रम आहे. श्रींच्या निर्वाण समयी पुढील २१ भक्त मंडळी हजर होती १) भारतीबुवा २) काशिबाई ३) तेंडूलकर मास्तर ४) वैद्यराज दादा हर्डीकर ५) वैद्यराज दत्तोपंत देव ६) निळकंठ कृष्ण लेले ७) भैय्यासाहेब दशपुत्रे ८) राजाभाऊ कावळे ९) लालजी एकबोटे १०) हरिश्चंद्र खाडे ११) शंकरराव संत १२) काका कानिटकर १३) पद्माकरराव पुरोहित १४) विष्णुपंत संत १५) रमणलाल जामदार १६) रानडे मास्तर १७) सुप्पा १८) सौ. कानिटकर १९) सौ. संत वहिनी २०) द्वारका कानिटकर २१) कानिटकरांच्या सुनबाई वरील सर्व भक्त मंडळींनी व गुरुसेवा भक्त परिवार बडोदा यांनी श्री ब्रम्हचारी स्वामी महाराजांचे कार्य/ उत्सव/ गाणगापूर/ कोल्हापूर येथील सर्व धार्मिक कार्यक्रम सुरळीत चालू ठेवले होते /आहेत. आत्ता सध्या श्री गुरुसेवा आश्रमाची/ मंदिराची व्यवस्था/श्री स्वामींनी आखून दिलेले धार्मिक कार्यक्रम श्री सदानंद खाडे, श्री किशोर लेले व इतर भक्तमंडळी पहात असतात.
संदर्भ ग्रंथांचे नाव – श्री गुरु-स्मृती
लेखकाचे नाव- निलकंठ कृष्ण लेले, बडोदा

