॥ श्री कृष्णा लाड ऊर्फ देव बुवा ॥

श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे अनुग्रह लाभलेले सर्वात पहिले शिष्य म्हणजे कृष्णा लाड हे होय. उत्तरेश्वर पेठेमध्ये राहणारे बाबू जमाल तालमीचे प्रसिध्द मल्ल म्हणून त्यांची ख्याती होती. भल्या पहाटे प्रल्हाद सरोवरात स्नान करुन श्री बाबू जमाल तुरबतीचे दर्शन घेऊन अंग मेहनत करुन ते शरीर कमवित असत. अशाच एका पहाटे ते दर्शन घेत असताना तुरबतीतून साक्षात कलंदर अल्ला बाबू जमाल फकीर रुपात प्रगट होऊन कृष्णा लाडांना म्हणाले ‘‘आजसे तुम यहाँ नही आनेका, श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज अल्ला के पास जावो.’’ हे ऐकताच कृष्णा लाड म्हणाला, ‘‘तुम तो मेरे सब कुछ हो!’’ परंतु हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतांनाच त्या तुरबतीमध्ये अल्ला बाबू जमाल अंतर्धान पावले.!

कृष्णा लाडांची बाबू जमाल वर एवढी निष्ठा होती की, साक्षात ह्या अल्लांनी आज्ञा केली तरी कृष्णा लाड श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या दर्शनास गेले नाहीत. तशी त्यांची तब्येतही बिघडली. तापाने त्यांचा संपूर्ण देह होरपळून जावू लागला. मग मात्र त्यांनी वैराग्य मठीकडे धाव घेतली ते दर्शनाला येताच श्रीकृष्ण सरस्वती महाराज त्यांना म्हणाले, ‘‘या तुम्हांला बाबूने पाठविले काय? या या बाबू आमचा प्यारा दोस्त आहे. तुमचा ज्वर आम्ही १२ वाटे पळवून लावू’’ असे उद्गारत महाराजांनी कृष्णा लाडाच्या पाठीवरुन आपला करुणाकर फिरवताच तापाने होरपळणारी तनू निमिषात शांत झाली. महाराजांच्या हस्त स्पर्शाने क्षणार्धात त्यांच्या देहामध्ये पडलेला विलक्षण फरक त्यांच्या प्रगाढ निष्ठेला कारणीभूत ठरला. त्या निष्ठेतच महाराजांच्या दिव्य शक्ति सामर्थ्यांचे दर्शन कृष्णा लाडांना आजन्म मिळत राहिले.

एकदा सर्व भक्तासमवेत श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्यासाठी सहभोजनाचे प्रयोजन लक्षतीर्थ येथे करण्यात आले होते. जागेची साफसफाई करण्यासाठी म्हणून कृष्णा लाड आधी पुढे गेले होते. त्या तीर्थाच्या घाटावरील शेवळलेल्या पायरीवरुन पाय घसरुन ते पाण्यात पडले. त्यांचे पाय कमल वेलात गुरफटून ते पाण्यात बुडू लागले. पोहण्यात तरबेज असलेले धडधाकट मल्ल पण या प्रसंगाने पुरते गांगरुन गेले. प्राण वाचविण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड चालू होती. हातापायांच्या चाललेल्या शेवटच्या खटाटोपात त्यांनी मनोमनी महाराजांचे स्मरण करताच ते घाट काठावर फेकले गेले! त्यांनी सुटकेचा श्वास टाकला तो महाराजांच्या जय जयकारातच! गजेंद्राच्या हाकेला धावणारा वैकुंठेश्वर श्री गुरुंच्या रुपात आपल्याला मिळालेला आहे. त्यांच्या भक्ती सेवेपुढे अधिक सुख – सौख्य, काय भार्या मुले संसारात मिळणार? या विचाराने ते पूर्ण विरक्त बनले. त्यांचे वैराग्य पाहून महाराजांनी पण त्यांना यथाकाली दीक्षा दिली. भगवे वस्त्र परिधानास दिले. श्रावण वर्षाकाली महाराज कृष्णा लाडाला म्हणाले ‘‘कृष्णा आज वीज भेटायला येणार आहे बघ!’’ यानंतर कांही वेळाने दुपारच्या जेवण्याची भांडी स्वच्छ धूत असता आधिच चालू असलेल्या श्रावणधारेतून मेघ गर्जना करी करीत विद्युल्लतेने आगमन केले. कान गडप करणारा प्रचंड आवाज आणि पुढ्यातील भांड्यावरुन पुढे गेलेला दिव्य अग्नी लोळ पाहून कृष्णा लाड अवाक् झाले. दोन तीन दालनातून माहितगार व्यक्ती प्रमाणे वीजेने शायनागारात जाऊन महाराजांना प्रदक्षिणा काढली; नव्हे आपल्या दिव्य तेजाने ओवाळणी करीत औदुंबर वृक्षी निघून गेली.

द्वापारयुगात कंसाच्या करातून निसटून गेलेली यशोदा नंदिनी वीज या कलियुगात ह्या कृष्णाला आपल्या लाडक्या बंधुला आपल्या दिव्य तेजाने भाऊबीजेप्रमाणे ओवाळणी करुन चिरंतन स्मृतीमागे ठेवून गेली! तो दिवस होता बंधु-भगिनींच्या प्रेमाचा! नारळी पौणिमा रक्षा बंधनाचा! ह्याच औदुंबर वृक्षाखाली महाराजांची चरण सेवा कृष्णा लाड आणि वासुदेव दळवी करत होते. अलक्षलक्षी रक्षण करणाऱ्या ह्या महाराजांनी आपल्या अंगावरचा शर्ट व कोरडी छाटी पिळत ‘‘धरा! धरा!’’ असे म्हणत ओंजळभर पाणी काढून ते वासू कृष्णाना पिण्यास दिले ते अगदी खारट समुद्रातील पाण्याप्रमाणे होते! त्याच क्षणाला एक राजापूरचा व्यापारी समुद्र तुफानात बुडून मरण्याच्या अंत्य घडीला पोहचला होता. त्याने फक्त महाराजांचे स्मरण करताच त्याला त्या समुद्रावर महाराजांची मूर्ती दिसली! क्षणार्धात एका हाताच्या कोपर ठोशाने त्याचे बुडणारे जहाज किनाऱ्याला पण थडकावले! त्याला मृत्यूच्या जबड्यातून महाराजांनी सोडवले!

महाराजांच्या ही अगम्य शक्ति व लीला पाहून महाराजांचे गुरु किती सामर्थ्यशाली असतील? आपण त्यांचे एकदा तरी दर्शन घेतले पाहिजे! हा विचार कृष्णा लाडांनी महाराजांना बोलून पण दाखवला. ‘‘तुझे मानस तात्यासाहेबांचे दर्शन घेऊ इच्छिते काय? बरं! बरं होईल तुझी इच्छा पूर्ण!’’ महाराज तेंव्हा उद्‌गारले ! लाडक्या भक्ताच्या इच्छेला महाराज तरी मग कशाला विलंब लावणार! लगेच कृष्णा लाडांना स्वप्नात दृष्टांत झाला. एका भव्य मंडपामध्ये सिंहासनाधिष्ट वैराग्याचा मेरु भवार्णवीचे तारु अक्कलकोटीचे जगद्‌गुरु अजानुबाहू नृसिंहभान सरस्वती विराजले असून, त्यांच्या उजव्या बाजुला उभे असलेल्या श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी स्वामी समर्थगुरुंचे पदवंदन करण्यास कृष्णा लाडांना नेत्र संकेताने सुचविले. कृष्णा लाडांनी पण विनम्रपणे गुरुची आज्ञा झेलत परमेष्ठींना साष्टांग प्रणिपात केला! डोळे भरुन त्या जगनियंत्याचे मनसोक्त दर्शन घेतले.

स्वप्न दृष्टांतामधून कृष्णा लाड जागे झाले. गुरुंच्या गुरुंचे दर्शन गुरुंनी दिलेल्या तृप्त मानसिक समाधानाने ते धन्य झाले. या साक्षात्कारानंतर मध्यंतरी बरीच वर्षे लोटली होती. ह्या कालावधीत स्वामी नृसिंहभान सरस्वती अक्कलकोट महाराज समाधीस्त पण झाले होते आणि नंतर श्रीकृष्ण सरस्वती महाराज कृष्णा लाडांच्यासह कांही निवडक शिष्य भक्तांसमवेत पंढरपूरहून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरात आले होते. दर्शन घेत असता कृष्णा लाडांच्या मनात स्वामी समर्थांच्या रुपाविषयी विकृत विचार डोकावले त्याचक्षणी ते उद्‌गारले, ‘‘हा काय माझ्या गुरुंचा गुरु?’’ निर्मिषात उभ्या असलेल्या इतर गुरु बंधुच्या बरोबर समाधीचे दर्शन घेणाऱ्या कृष्णा लाडांना विना देह आकृतीचे शब्द कानावर पडले ‘‘मुर्खा ! हा असला द्वाडपणा सोड आणि पहा ! उघड्या डोळ्यांनी बघ! या अक्कलकोटच्या गुरुशिष्याची विष्ठा तुझ्या सर्वांगास लागली आहे.’’ कृष्णा लाड त्या विष्ठेने प्रत्यक्ष परिपूर्ण माखले गेले होते. जवळील त्यांचे गुरुबंधू त्यांना विचारत होते. ‘‘काय कृष्णा! समर्थाचे दर्शन घेत असता, काय ही दुर्गंधीत विष्ठा तुला कुठली लागली आहे?’’ जागृती स्वप्न सुषूप्ती ह्या कुठल्या अवस्थेत आपण आहोत ह्याचे कृष्णा लाडांना भानच राहिले नाही. गुरु बंधुनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देतांना भक्ति मनातील विचारांबरोबर झालेला हा साक्षात्कार कृष्णा लाडांनी त्यांना निवेदन करीत शेवटी सांगितले’’ ‘‘गुरुंचे गुरु हे समाधिस्त खरे, पण इथे नको असलेल्या विष्ठे प्रमाणे केलेला दुर्गंधीत कुतर्क मला नडला आणि महाराजांनी तो भ्रम क्षणात दूर पण केला!’’

विशिष्ठ उद्देश साध्य करण्यासाठी एकदा महाराजांनी तारामती सह सर्व भक्तांना सोडून वासू दळवी व कृष्णा लाडांना घेऊन प्रयाग तीर्थाहून सह्याद्री पर्वताकडे धाव घेतली. डोक्याला घेरी येणाऱ्या दऱ्यात उतरुन गगनाला भिडणारे कडे ते अनवाणी काटेरी मार्ग अवलंबत होते. निसर्ग देवतेचे नयनरम्य दर्शन बरोबर आक्राळ विक्राळ, क्रूर, महाभयंकर दृष्ये त्यांच्या पुढे तरळत होती. महाराजांच्या आज्ञेने मार्गात पडलेल्या एका अजस्त्र अजगराला कृष्णा लाडाने तृणपेंढीसम उचलून बाजूला दूर फेकून दिले. वाघ, डुकरे तर महाराजांसह ह्या दोन जयविजयासम असणाऱ्या शिष्यांना पाहून भयभीत होऊन दूर पळत होती. ह्या हिंस्त्र क्रूर जनावरांच्या दृष्टीला हे त्रयमूर्ती कसे दिसले असतील? क्षुधा तृषेने तळमळत असलेल्या या भक्तांना चार दिवसांनी एक गांव दिसले. झाडापाला खाल्लेल्या आतड्यांना अन्नाच्या घासाचा ध्यास लागला होता. महाराजांनी पूर्ण भाकित केल्याप्रमाणे व वासू दळव्यांनी गुर्वज्ञा उल्लंघल्यामुळे ‘‘चोर लुटारु’’ समजून या त्रयमूर्तींना कैदेत ठेवण्यात आले. वासू कृष्णांना मग महाराज म्हणाले, ‘‘आता गंमत पहा हं!’’ त्या पहारेकऱ्यांच्या समोरुन महाराज सरळ बाहेर पडले व तेथील पाटलाच्या बायकोकडून भाजी भाकर घेऊन आले. पाटलाच्या बायकोने तिघांना एक भाकरी कशी पुरेल म्हणून आणखीन दोन भाकरी घेऊन आली व चार दिवसानंतर त्या त्रयमूर्तींनी प्रथमच अन्न भक्षण करुन थोडी क्षुधा शमवली, त्या गांवचा कोतवाल महाराजांचा भक्त निघाला. त्याने या सर्वांचा आदर सत्कार करुन कैदेतून सुटका केली.

यानंतर या सर्वांनी गावकऱ्यांचा निरोप घेऊन दुसऱ्या गांवाकडे प्रयाण केले. दुसऱ्या गांवात प्रवेश करताच तेथील इनामदाराने वाटेवर येऊन महाराजांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांच्या हाताला धरुन महाराज आतुर आतुरतेने त्यांच्या घरी गेले. त्या इनामदारांने महाराजांसह वासुकृष्णांना सुवासिक तेल लावून गरम पाण्याने स्नान घातले. तीन चार दिवस त्या इनामदाराच्या भक्ति सेवेचा मनमुराद स्वाद घेतल्यावर आणि इनामदाराने तयार केलेल्या शकटा रोहणाने महाराज राजापूरला रामभाऊ वैद्यांकडे गेले. ‘‘कोल्हापूरचा दत्त’’ म्हणून उभ्या राजापूर गांवाने महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले. एक दिवसात नारळ खारिकांच्या ढिगासह त्यावेळच्या स्वस्ताईत १०० रुपयावर खजिना भांडार जमा झाले. रामभाऊ वैद्यांनी कृष्णा लाडाला तो देऊ करत असता नाकारला व महाराजांच्या बरोबर ते २१ दिवसांनी कोल्हापूरला परतले. कृष्णा लाड नेहमी स्वत:च्या गळ्यात महाराजांच्या पादुका धारण करीत असत. त्यांच्या मातोश्रींच्या हातून आयुष्यात बरेच पापाचारण झाले होते. अंत्य घडीच्यावेळी तिला डोळ्यासमोर अंत्यजांचा थवा दिसला ती कृष्णा लाडांना म्हणाली, ‘‘हे इतुके कशाला रे मुला! काढ त्यांना हाकलून!’’ कृष्णा लाडानी ओळखले आयुष्यात केलेली ही क्रूर पापे सदृष्यपणे आता डोळ्यापुढे उभी राहिलेत. त्यांनी स्वत:च्या गळ्यातील महाराजांच्या पादुका काढून त्या मातेच्या गळ्यात घातल्या लगेच त्या मातोश्रीला त्या अंत्यजांच्या ऐवजी तिथे ब्रम्हवृन्द दिसला! तिच्या मुखीचे ब्रम्हवृन्द हे शब्द कृष्णानी ऐकताच ‘‘काय हा गुरु पादुकांचा प्रभाव आहे,’’ ह्या पादुका नव्हेत तर ह्या जीवन नौका आहेत म्हणून त्यावर कृष्णा लाड नतमस्तक झाले! त्यांची आई वारली! तिला सद्गती मिळावी म्हणून काकुळतेने कृष्णा लाडांनी महाराजांना प्रार्थना केली. तेव्हा महाराज उद्गारले आधी येथेची आणू पोरगी ! मग पाठवू मागील मार्गी ! अनायसे साधीली सुगी। निवास स्वर्गी होईल । ह्या उक्तिप्रमाणे लाडाच्या आईस ेशान गती प्राप्ती झाली. शिवूबाई ह्या महाराजांच्या सेवक शिष्याजवळील कुसारी कुत्री ही कृष्णा लाडांची आई होय. या कुत्रीचे महाराजांसह सर्व भक्तगण एखाद्या प्रिय व्यक्तीप्रमाणे लाड करीत असत यथा काली महाराजांच्या कृपेने तिला मुक्ति मिळून वैकुंठास उध्दरुन गेली.

भक्तियुक्त अंत:करणाचे कृष्णा लाड भजन गायनात रमून जात. अभंग गाथेत गाईलेली ज्ञानेश पंढरीनाथांची थोरवी पाहून आळंदी पंढरी पाहण्याची अनिवार इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. महाराजांची पूर्ण अनुमती नसतांना महाराजांच्या इच्छेविरुध्द आळंदी पंढरीच्या वारीसाठी कोल्हापूर सोडले. प्रथम ते मिरजेच्या दोन्ही नेत्रांनी अंध असणाऱ्या रामदासी बाबा गाडगीळ या संत पुरुषाच्या दर्शनास गेले. तेथे लाड जाताच ‘‘चिंतामणी टाकून खडे गोळा करायला आलास का?’’ असे म्हणून त्यांनी लाडाकडे पाठ पाठविली. लाड फिरुन जाऊन त्यांच्यापुढे चरण स्पर्श करताच गाडगीळ बाबा म्हणाले, ‘‘अमृतोदधी जवळ असतांना ओढे नाले शोधत आला आहेस काय?’’ म्हणून लाडांना त्यांनी गाली प्रदान केले. तरी लाडांना या उक्तितला अर्थ अजिबात उमगला नाही. मग कृष्णा लाड आळंदी वाटेस लागले. त्यावेळच्या जमान्यात चोर लुटारुंचा सुळसुळाट होताच. अधिक सदगुरुची आज्ञा उल्लंघली म्हणून त्यांना कुणी भिक्षा घालीत नसत तर विश्रांतीसाठी कुठे पहुडले तर लाडाना गांवातील वाटसरु गोसावी वेषातील हा लुटारु ! चोर असावा ह्या कल्पनेने बोवा पुढच्या गांवात विश्रांती करा. खरे तर आता इथून उठा! असे म्हणत जवळ जवळ त्यांना हाकलून काढीत असत. मुठभर भिक्षा त्यांना कुणी दिली नाही तेंव्हा लाड किती लोक पाखंडी-नास्तिक होत निघालेत! असा दोषारोप करीत.परंतू त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली नाही. केवळ जल प्राशनाने क्षुधा तृष्णेचा वणवा शांत करीत सव्वाशे मैलाचा पायी प्रवास हतबल होऊन एकदाचे आळंदी क्षेत्रात प्रवेशिले. समय रात्रीचा नुकतीच शेजारती होऊन गेलेली होती. प्रवासातील थकव्यामुळे ते सरळ विना समाधी दर्शन घेत निद्रीस्त जाऊन पहुडले.

रात्री स्वप्नांमध्ये एक ब्राम्हण लाडांना म्हणाले, ‘‘काय बोवा! केव्हां केव्हां भिकेचा नाद लागतो की काय वाटते, म्हणून तुम्ही इकडे शिळे तुकडे मागत आला?’’ लाड म्हणाले ‘का, रागवता मी आलो माऊलीच्या दर्शनाला ‘‘मग का नाही झाले अजून दर्शन?’’ असे ते ब्राम्हण म्हणता लाड त्यांना सांगते झाले ‘‘मी आलो रात्री शेजारतीनंतर उशिरा!’’ त्यावर ते ब्राम्हण म्हणाले, ‘‘जरी उशिर झाला असला तरी तुम्हाला कोण मज्जाव करणार होतं? दर्शन हे इच्छेनुरुप असते!’’

असे ब्राम्हण म्हणत असता कृष्णा लाड स्वप्न दृष्टांतामधून जागे झाले. द्विज रुपात ज्ञानेश्वर माऊलींनी दर्शन दिले हे त्यांनी ओळखले. भक्ति मार्गातील ज्ञानबोध ज्ञानेûवर माऊलीच्या शिवाय दुसरे देणार तरी कोण? मिरजेच्या गाडगीळ बाबांच्या उक्तितला अर्थ आता त्यांच्या लक्षात आला. महाराजांना आपण सोडून आलो हे गाडगीळ बाबा आणि ज्ञानेûवर माऊलींना आवडले नाही ही चूक लाडांच्या लक्षात आली. दुसऱ्या दिवशी इंद्रायणीत स्नान करुन माऊलींच्या समाधी दर्शनासाठी आले. दर्शन घेत ते म्हणाले,

‘‘ज्ञानेश्वरा तूची श्रीकृष्ण । तूची माझा स्वामी पावन ।
नाही कळले तव महिमान । आलो म्हणून ये ठायी ।
श्रीगुरु कृष्ण सरस्वती । ज्ञानेश्वरा तुझीच मूर्ती ॥
नेणे माझी अल्पमती । कळले शेवटी परी ॥’’

अशी करुणा भाकून आळंदी क्षेत्रात भिक्षेसाठी फेरी केली, कोल्हापूर सोडल्यानंतर प्रथमच त्यांना पोटभर मधुर भिक्षा मिळाली. एक दिवस त्यांनी तेथेच विश्रांती घेतली. माऊलीला जिव्हाळ्याचा निरोप दिला. कोल्हापूरच्या ऐवजी पंढरीचा मार्ग धरला. परत उपासमार, परत जन समाजातून तिच बोळवण, त्याच देहकष्टाच्या हाल अपेष्टातून चार दिवसांनी पंढरपूर क्षेत्रात आगमन केले. पंढरीनाथांचे त्यांनी कलकललेल्या अंत:करणाने डोळे भरुन दर्शन घेतले.

त्या रात्री परत लाडांना दुसरे स्वप्न पडले. एक काळा एक गोरा द्विज संभाषण करीत असून स्वत: लाड ते जवळच बाजुला राहून ऐकत आहेत. एक दुसऱ्यास विचारत आहे ‘‘हे कोण? इथे का दडला आहे असा’’ दुसरा द्विज म्हणतो ‘‘तिकडे त्याचे भरेना पोट म्हणून आला आहे इकडे, शिळे तुकडे मागायला! श्रीकृष्ण गुरुचा श्रेष्ठ भक्त हा खरा, तरी पण आम्हाला त्याचा वीट आला आहे!’’ ह्या विप्रसंवादातून खजिलपणे लाड जागे झाले. त्यांच्या लक्षात आले. श्री गुरुंचे चरण सोडले हे पंढरीनाथ व ज्ञानेश्वर माऊलींना आवडले नाही व म्हणून त्यांच्या आपण कृपेला आता दुरावलो आहे. दुसऱ्या दिवशी मग हाल अपेष्टांनी झडती, दिलेल्या स्वत:च्या देहास इंद्रायणी प्रमाणे पवित्र पतितास पावन करणाऱ्या चंद्रभागेत स्नानाभिषेकच घातला म्हणावयाचा. देहाचे एकवटलेल्या त्राणांनी नयनाश्रुतून त्रयलोक्याचा लावण्यगाभा पाहिला आणि मग क्षीणात क्षीण होत निघालेल्या आवाजात गल्ली बोळातून भिक्षेसाठी फेरी मारली ! पण व्यर्थ !

पंढरी म्हणजे पतितांचा उध्दार करणाऱ्या दीनांचा कैवारी म्हणून मिरवणाऱ्या विठुरायाच्या त्यावेळचं चार सहस्त्र धार्मिक लोकवस्तीने गजबजलेल्या संत सम्राटांच्या या राजधानीत चार घास भिक्षा या कृष्णा लाडाला कुणी घातली नाही. श्रीकृष्ण सरस्वतींच्या या लाडक्या लाडाचा पाहुणचार पंढरीनाथाने असा केला कारण की, श्री गुरुंची गैरमर्जी हे कृष्णा लाड परिपूर्ण जाणत होते. क्षुधा तृष्णेने मृत्यू सामोरे जात असतांना सुध्दा कोणत्याही प्रकारच्या असूयानी पंढरीनाथांना दोष देण्याचा विचारही लाडाच्या मनाने केला नाही . एवढी त्यांची भक्ति विनयशील व जागृत होती आणि त्याच विनयशील भक्तितून त्यांनी पंढरीनाथाच्या शिखरास शेवटचा नमस्कार केला. व्याकूळ झालेल्या तशा अवस्थेत कोल्हापूरचा मार्ग धरला. मनोमन सद्गुरुंना शरण जाऊन त्यांनी प्रार्थना केली. जर मी जगलो वाचलो तर तुमची चरण सेवा आमरण करीन! आणि आतांच जर मरण आले इथूनच तुम्हाला प्रणिपात अशा विचारात ते जड अंत:करणाने एक एक पाऊल पुढे पुढे टाकत निघाले.

आळंदी क्षेत्रात ज्ञानेशानी दिलेल्या भोजनाव्यतिरिक्त आत्तापर्यंतच्या १० दिवसात त्यांच्या पोटात अन्न नव्हते. २५० मैलाहून अधिक झालेल्या पायी प्रवासाने मल्लाप्रमाणे असणारी देहयष्टी पूर्णपणे ढेपाळली होती. नेत्रांतर्गत प्राण गरागर फिरत असता हेलपांड्या जाऊन ते एक वृक्ष छायेत मुर्च्छा येऊन पडले. तेंव्हा त्यांना तृतीय स्वप्न पडले. एक विप्र त्यांना म्हणाला,‘‘रथी बैसला सूर्यनारायण! आता तुज काय चिंतेचे कारण?’’ हे ऐकून कृष्णा लाड जागे झाले. समोर एक शेतकरी अबला त्यांना खुशाली विचारत होती. तिने हे गोसावी महाराज भुकेने व्याकुळ झालेले पाहून पतीसाठी आणलेली आपल्या जवळची शिदोरी सोडून तिने लाडाला खावयास दिले. त्यांच्या अंगात थोडे प्राण आले. तिने आग्रह करुन शेजारीच असणाऱ्या स्वत:च्या शेतात लाडांना नेले. पतीसहीत तेथील कामगार लोक भगवतभक्त होते. तेथे जाताच,‘‘गोसावी महाराज’’ म्हणून सगळ्या लोकांनी लाडांच्या चरणावर डोके ठेवले. लाडाला पुन्हा तेंव्हा उत्तमपैकी जेवण देण्यात आले. एक दिवसाच्या विश्रांतीने लाड कोल्हापूरच्या वाटेला लागले. तेंव्हा त्यांना दोन दिवस पुरेल एवढी शेंगा कणसांची शिदोरी त्या शेतकरी अबलेने दिली. यानंतरचा प्रवास सुखरुप होऊन कृष्णा लाड विनासायास कोल्हापूरला वैराग्य मठीत आले.

वैराग्य मठात प्रवेश करताच महाराज त्यांना म्हणाले, ‘‘काय बुवा हिंडून फिरुन झाले की नाही?’’ महाराजांना नमस्कार करीत लाड म्हणाले, ‘‘महाराज! माझी चूक झाली! मला आता क्षमा करा! अज्ञानाने तुम्हाला सोडून गेलो व दारुण यातना भोगून आलो! आता मात्र तुमच्या चरण सेवेत कधी नंतर पडू नये! गुरुराया एवढी माझी इच्छा पूर्ण करा!’’ महाराज म्हणाले, ‘आता एकांतवासच धरा’’ कृष्णा लाड परत मनात अधिकच चरकले. आपल्यावर महाराज अधिक रागावले आहेत असा त्यांचा विचार झाला. गुरु आज्ञेप्रमाणे त्यांनी एकांतवास धरला. कुणाशीच एकही शब्द न बोलता अगदी मौनव्रत स्वीकारले. मात्र ते मनातच्या मनात स्वत:शीच फार दु:ख करु लागले. गुरुंच्या मर्जीतून आपण उतरलो? त्यांच्या क्रोधालाही अपात्र ठरलो अशी ते स्वत:शीच खंत वाढवीत असतांना मग एकदा अशाच विचारात त्यांना दृष्टांत झाला.

एक तरुण युवती लाडांना मनसोक्त स्तनपान करत आहे व लाड पण लाडीकपणे एखाद्या शिशू सेवेने आकंठ स्तनामृत पित आहेत. बराच वेळाने कृष्णा लाड भानावर आले! आपण वयोवृध्द असून एखाद्या लहान किशोरप्रमाणे स्तनपान कसे करत आहोत? ह्या विचाराने ते स्वप्नातल्या स्वप्नातच फार ओशाळले व त्या ओशाळलेल्या क्षणालाच मग ते जागे पण झाले! परंतू हे स्वप्न तरी कसे म्हणावयाचे? स्वप्नातले ते स्तनामृताचे थेंब जागृतपणे पण कृष्णा लाडांच्या ओठी गाली ओंघळत होते!

‘‘आम्हांला तुझा बिलकुल राग आला नाही’’ हे वत्सल ममतेने श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी लाडक्या कृष्णा लाडांना पटवून दिले! कृष्णा लाड सद्गुरुंच्या प्रेम गंगेत असे अथांग न्हावून निघाले होते! तू जीवन मुक्त आहेस! असे म्हणून महाराजांनी त्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त केले होते! पंचगंगेच्या ब्राम्हण घाटा पलिकडील घाटास राजपूत घाट म्हणत. तो घाट आज परिपूर्ण उखडला गेला आहे. कृष्णा लाडांची देहवसनानंतर तेथे तुळशीवृंदावना सहीत एक स्मारक शिला त्यावर पादुका करुन बसवली होती. पंचगंगेच्या दरवर्षी येणाऱ्या महापूराने लाडांची ती स्मारक शिला वाहून गेली! कृष्णा लाडाचा स्वभाव मनमिळावू, शांत, निगर्वी होता. उभ्या आयुष्यात त्यांचे कुणाशीच भांडण झाले नव्हते, तपस्वी देव माणसाप्रमाणे त्यांचे शुध्द आचरण होते. त्यामुळे महाराजांसहीत सर्व भक्तगण त्यांना ‘‘देव बुवा’’ म्हणून संबोधित होते.

लाडाचे गुरुबंधू स्व. नामदेव महाराज चव्हाण यांच्या स्व. धर्मपत्नी सौ. गंगाबाई रोज पहाटे तीन वाजता पंचगंगेवर स्नान व कपडे धुण्यास जात असत. गंगाबाई एकदा एक वाजताच तीन वाजले समजून पंचगंगेवर गेल्या. त्यांच्या घरच्या जवळील तहसीलदार कार्यालयातील घड्याळाप्रमाणे दर तासाला एक ह्याप्रमाणे घंटा-टोल दिले जात असत! ह्यावेळी एक वाजताच तिथल्या शिपायाने एकच्या ऐवजी तीन टोले मारले म्हणून ह्या सौ. गंगाबाई तीन वाजले समजून पंचगंगेवर आल्या. तेंव्हा देहवासानंतर प्रत्यक्ष कृष्णा लाड सदेह तिथे प्रगट होऊन गंगाबाईना म्हणाले ‘‘आज तुम्ही ह्या मध्यरात्री एक वाजताच आला! तीन वाजले नाहीत पण झोपेतच त्या शिपायाने एकच्या ऐवजी तीन टोल मारलेत. परत इतक्या मध्यरात्री तुम्ही इकडे येऊ नका! ह्या पारावर एक समंध आहे व पेरु बागेच्या चिंचेवर एक नालायक (पिशाच्च) आहे. तेंव्हा आज मी तुम्हांला पोहचवायला येतो.’’ असे म्हणून गंगाबाईचे काम अटोपल्यावर कृष्णा लाड भोपेरावाच्या वाड्यापर्यंत पोहचवण्यासाठी आले. शेवटी गंगाबाईची कौटुंबिक खुशाली विचारुन झाल्यावर ते अंतर्धान पावले.’’अलिकडच्या कांही वर्षापूर्वी लाडाच्या संदर्भात त्यांच्या समाधी स्मारकाच्या जागेकडे हात दाखवीत पंचगंगेवरील घाटावर श्री समर्थ चिले महाराज आमच्या पूज्य मातोश्री स्व. श्रीमती सीताबाई शांताराम नाडकर्णीला म्हणाले, ‘‘अगं देव बुवा इथेच आहे असे आपण समजायचे. जरी शिळा वाहून गेली तरी त्याला नाही म्हणायचे नाही हं!’’

श्री कृष्णा लाड म्हणजे सदगुरु श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या गळ्यातील अनमोल कौस्तुभच होय. श्री कृष्णा लाडांनी भक्ति सेवा करुन श्री कृष्ण सरस्वती महाराजांशी अशी सायुज्जता मिळवली!

संदर्भ ग्रंथाचे नांव :- श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज लीला मासिक

पुण्यतिथी विशेषांक दि. १५/८/१९९०

लेखकाचे नांव :- श्री. बा. शां. नाडकर्णी

Comments are closed.