दर्गाह शरीफ कोल्हापूर
हिंदू मुस्लिम ऐक्याचे / सर्व धर्म समभावाचे प्रतिक
(दर्गाह शरीफचा पूर्व इतिहास)
हजरत पिर शहा जमाल उर्फ बाबू जमाल कलंदर हा सुमारे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचा जुना पुरातन पवित्र दर्गाह शरीफ असून तो सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. हे मूळचे राहणारे बल्क बुखारा (इराण) येथील आहेत. त्यांचे गुरु हजरत इब्राहिम जवाबी (रहै.अ.) यांचे सांगणेवरून हजरत पिर बाबू जमाल दिल्लीला (भारत) येथे आले. त्यांचे मूळ नाव हजरत जमालूद्दीन आहे. दिल्लीला त्यांची मुलाखत बुजुर्ग हजरत कुतबुद्दीन बख्तीयार (काकी) चिस्ती (रहै.अ.) यांच्याशी झाली. त्यावेळा दिल्लीचा बादशहा शमशुद्दीन अल्तमश हा होता. (रजिया सुलतानचे वडिल) हजरत कुतबुद्दीन बख्तीयार (काकी) चिस्ती (रहै.अ.) यांचे सांगण्यावरुन हजरत जमालुद्दीन (बाबूजमाल) हे भारताच्या दक्षिणेकडे महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात कुंभोज या गावी आले. येथील या डोंगरात त्यांचे चाळीस दिवस वास्तव्य होते. त्या दरम्यान तेथेही जैन मुनींचे वास्तव्य होते. त्या काळच्या अख्यायिका नुसार करवीर नगरीत (कोल्हापूर) भला मोठा एक राक्षस जैन मुनींना त्रास देत होता. तो कोणालाही ऐकत नव्हता. त्याच्या त्रासाला कंटाळून कुंभोज येथील जैन मुनींनी त्या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी बाबू जमाल यांना करवीर नगरीत आणले.
बाबू जमाल यांनी आपल्या ईश्वरी ताकदीच्या जोरावर त्या दैत्याचा नायनाट केला. तो मरतेसमयी त्यांना शरण आला व म्हणाला ‘‘बाबा तुमच्या पायापाशी माझे दफन व्हावे’’ तसे बाबांनी त्याला दफन केले. आता जी दर्ग्याची पहिलीच मोठी पायरी लागते तेथेच त्या दैत्याला / राक्षसाला दफन केले आहे. यानंतर हजरत पिर बाबू जमालचे वास्तव्य करवीर (कोल्हापूर) नगरीतच झाले. बाबा आपल्या गोड वाणीने लोकांना लोक कल्याणाचे प्रवचन करू लागले. सर्व धर्माचे लोक त्यांचे प्रवचन ऐकायला येऊ लागले. ते स्वतः जलाली असलेने तेथे स्त्रियांना येणेस परवानगी नव्हती. तरी देखील एक पाच सहा वर्षे वयाची मुलगी तेथे बाबांचे प्रवचन ऐकण्यास नेहमी येत असे. मन लावून भक्ती भावाने बाबांचे लोक कल्याणाचे प्रवचन ऐकत असे. प्रवचन संपले तरी बाबांची सेवा करीत बसत असे. मुलींच्या लोकांना ते आवडत नसे. बाबांचे व त्यांचे खटके उडत असत. एके दिवशी न राहवून मुलीकडच्या काही लोकांनी / आप्तानी बाबांचे प्रवचन चालू असताना सर्व लोकांच्या समक्ष त्यांना जाब विचारला कि ‘‘बाबा तुम्ही जलाली, तुम्हाला स्त्री वर्ज आहे, मग ही मुलगी तुमच्या सेवेला, तुमच्या प्रवचनाला कशी चालते?.’’ हे ऐकून सर्व लोक अचंबित झाले यावर बाबांनी आकाशाकडे आपल्या अल्लाहकडे / परमेश्वराकडे पाहिले व दुवा केली. मग आलेल्या जन समुदायाकडे पाहिले व सर्वांना उद्देशून सांगितले ‘‘हे म्हणतात ते बरोबर आहे, पण हि मुलगी आहे हे जे लोक म्हणतात ते चूक आहे, हि मुलगी नसून मुलगा आहे.’’ बाबांनी तेथेच आपला दैवी चमत्कार दाखविला व त्या मुलीचा मुलगा केला व त्याचे नाव बाबु ठेवले. लोकांना उद्देशून पुन्हा म्हणाले ‘‘माझ्या नावाच्या अगोदर याचे बाबूचे नाव घ्या’’ तेथूनचं शहा जमालूद्दीनचे बाबू जमाल हेच नाव पडले. दर्गाह शरीफ मध्ये आत गेल्यानंतर उजव्या बाजूस लहान कबर / समाधी आहे ती बाबूची आहे. हजरत पीर बाबू जमाल लोक कल्याणाचे शिक्षण देत असत. त्या शिक्षणासाठी लोक त्यांच्याकडे पुष्कळ येत असत त्यांना ते शागिर्द (सेवक) म्हणत असत. शिक्षण पूर्ण झालेनंतर त्यांची परिक्षा घेऊन ती शागिर्दना दुसरीकडे लोककल्याणासाठी पाठवित असत. असेच एकदा आपल्या शार्गिदांचे / सेवकांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कठोर परिक्षा घेणेचे ठरविले. एक मोठी कढई आणून त्यात तेल ओतून ते उखळेपर्यंत गरम केले व सर्व सेवकांना म्हणाले ‘‘मला चाहणारे (अजिज)कोण असेल तर त्याने या उखळत्या तेलात उडी मारावी.’’ सगळे शार्गिद / सेवक /शिष्य घाबरले.
परंतु एक शिष्य त्या उखळत्या तेलात उडी मारण्यास तयार झाला. त्याचे नाव उस्मान मूलबन्दी. त्याने त्या उखळत्या तेलात उडी मारली. त्यानंतर बाबांनी त्याला उखळत्या तेलातून बाहेर काढले. तो लालभडक झालेला व जीवंत हे बघून बाबांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले. ‘‘शहेबाज लाल शहेबाज कलंदर!.’’ तेव्हापासून मूलबुंदी या शिष्याला लाल शहेबाज कलंदर ही पदवी मिळाली व ते तेव्हापासून जगामध्ये साडेतीन कलंदर मध्ये जाऊन बसले. शिष्याच्या कलंदरीतून गुरुला कलंदर हि पदवी मिळाली. तेव्हापासून बाबांना हजरत पिर बाबू जमाल कलंदर हे नाव पडले. बाबांनी लाल कलंदरला येथून लोककल्याणासाठी पाकिस्तान मधील सिंधरोयन ह्या गावी पाठवले. तेथे त्यांचे नाव तरवीलाल शहेबाज कलंदर असे आहे. त्यांना सिंधी समाज फार मानतो व झुलेलाल या नावाने संबोधतो. ह्या गुरुशिष्याचे नाते म्हणजे बाबांचे गुरु करबलाचे हजरत ईब्राहिम जवाबी (रहै.अ.) हे होय. त्या गुरुचा मुलगा उस्मान मूलबंदी म्हणजेच लाल शहाबाज कलंदर असे हे गुरुशिष्याचे नाते आहे.
असा हा पूरातन पवित्र दर्गाह असून तो सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. ह्या दर्गा शरीफचा घुमट श्रीमंत पेशवे यांनी आपल्या नवस पूर्तीसाठी बांधला आहे. पूर्वी या दर्गा शरीफच्या उरुसांचे (उत्सवाचे) गलेब व इतर खर्च कोल्हापूर संस्थान कडून मिळत असे. राजश्री छत्रपती श्री शाहू महाराज प्रतिवर्षी मोहरम मध्ये आपल्या चिरंजीवासहित येथे दर्शनसाठी येत असत. नवसाला पावणारा म्हणून भक्तगणांत ख्याती / कीर्ती असलेला हजरत पिर बाबू जमाल हा संस्थान काळातील एकमेव दर्गाह शरीफ आहे. उरुस व मोहरम हे उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. ह्या पवित्र कार्यक्रमात / उरुसात सर्व धर्मीयांचे लोक मोठ्या उत्साहाने भाग घेतात. असा हा हजरत पिर बाबू जमाल दर्गाह शरीफ व तेथील परिसर कोल्हापूरातील मोहमीडन एज्युकेशन सोसायठी यांच्या व्यवस्थापनाखाली आहे. हजरत पिर बाबू जमाल दर्गाह शरीफ यांच्या उरसा अगोदर त्यांचे शिष्य हजरत पिर लाल शहबाज कलंदर यांचा उरुस होतो. तो मुसलमानी रोजेचा महिना रमजान शरीफच्या २३ तारखेला होतो. त्या नंतर बाबांचा उरुस मुसलमानी रोजेचा महिना रमजान शरीफच्या २६ तारखेला होतो.

