सिध्दपीठ अलंकापुरी ( श्री क्षेत्र आळंदी )

ज्ञानेश्वरांच्या वास्तव्याने आणि समाधि स्थानामुळे वारकरी वैष्णवांना प्रिय अलंकापुरी अथवा आळंदी हे एक सिध्दपीठ म्हणून प्राचीन काळापासून ओळखले जाते. येथील ग्रामदैवत सिध्देश्वरासही ज्ञानेश्वर चरित्रात फार महत्वाचे स्थान मिळाले आहे. ज्ञानेश्वरांच्या पूर्वीच्या काळीही आळंदी हे एक शिवपीठ म्हणून प्रसिध्द होते. अलंकापुरीस आनंदवन असेही नाव त्यावेळी होते. प्राचीन काळी हा प्रदेश अरण्यमय होता ॥ प्रकटोस्मिन्महाक्षेत्रे आनंदाख्य महावने। नास्ति नास्ति समक्षेत्रं त्रैलोक्य पावने स्मृतम् ॥ असे शंकरांनी म्हटल्याचे सह्याद्रिखंडात आले आहे. या प्राचीन सिध्दपीठास कृतयुगात आनंदवन, त्रेतायुगात वारुण, द्वापारात कपिल आणि कलियुगात अलका, अशी नावे मिळाल्याची हकीकत पुराण कथांतून आढळते. नंतरच्या काळात हे सिध्दपीठ वैष्णवांना वैकुंठपीठ म्हणून मान्य झाले. भूमिनामें वैकुंठपीठा । ते हे अलंकापुरी श्रेष्ठा । आदि वरिष्ठापीठ अठरा ॥ या ओवीप्रमाणे नामदेवांना आळंदी हे क्षेत्र अठरा पीठांत श्रेष्ठ वाटते. अलंकापुरी हे शिवपीठ । पूर्वी येथे होते नीलकंठ। ब्रम्हादिकी तप वरिष्ठ । येथेचि पै केले ॥ अशीही माहिती नामदेव देतात. या जुनाट शिवपीठाचे रुपान्तर विष्णुरुपी ज्ञानेशांच्यामुळे वैकुंठपीठात झाले हे नाथपंथाच्या हरिहरऐक्यास धरुनच झाले. जुनाट पै वैकुंठपीठ। पूर्वी येथे होते नीलकंठ । ब्रम्हा, विष्णु, रुद्र, इंद्र । ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष ॥ अशी महती या पीठाची गाइली जाते.

आळंदीची पंचक्रोशीही शिवस्थानांनी विभूषित आहे. पूर्व दिशेस मरकळ- जवळ मातुलिंग व केशवराज, दक्षिणेला पुण्यात नागेन्द्रीकाठी नागेश्वर, पश्चिमेस इंदोरीस ब्रम्हेश्वर, उत्तरेस खेड अथवा राजगुरुनगरला सिध्देश्वर, अशा पवित्र स्थानांमुळे आळंदीचा परिसर प्राचीन काळापासून देवदैवतांनी गजबजलेला आहे. संत एकनाथांनी या पीठाचे वर्णन करताना म्हटले आहे-

सिध्देश्वर स्थान दरुषनें मुक्ती। ब्रम्हज्ञान प्राप्ती वटेश्वरी ॥
चौऱ्यांशी सिध्दांचा सिध्दबेटीं मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥
तयासी घडतां नित्य प्रदक्षिणा । नाही पार पुण्या वास स्वर्गी ॥
अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनी तीर्थराज ॥

काशी, गया, प्रयाग, इत्यादि क्षेत्रांपेक्षा आळंदी श्रेष्ठ, अशी श्रध्दा सर्वत्र दिसते. ज्ञानेश्वर मंदिराचा देऊळवाडा, हैबतरावबाबाची पायरी, गरुड, हनुमंत, सभामंडप, समाधिमंदिर, वा गर्भागार, गणेश मंदिर, मुक्ताबाई मंदिर, सिध्देश्वर मंदिर, अजानवृक्ष, सुवर्णाचा पिंपळ, नाथांचा पार, भोजलिंगकाका; अशा अनेक महत्वाच्या स्थानांशी लक्षावधी साधकांच्या भावना गुंतलेल्या आहेत. महाराष्ट्रातील नाथसंप्रदाय प्रवर्तक ज्ञाननाथ येथेच जिवंत स्वरुपात वावरत असल्याची श्रध्दा त्यांची आहे.

संदर्भ ग्रंथाचे नाव- नाथ संप्रदाय उदय व विस्तार

लेखकाचे नाव – डॉ. प्र. न. जोशी

Comments are closed.