श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे

॥ यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ॥
॥ अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
॥ परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ॥
॥ धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, अधर्माची शीग चढते, साधु-सज्जनांचा छळ होतो. त्यावेळी सज्जनांचे संरक्षण व दृष्टांचे निर्दालन करण्यासाठी, जगाच्या उध्दारासाठी, धर्माला स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी प्रत्यक्ष भगवान भूतलावर अवतरतात. ‘‘संभवामी युगे युगे’’ असे अभय देणारी अवतारी पुरुषांची श्रेष्ठ परंपरा भगवान श्रीकृष्णापासून आजपर्यंत अखंड चालत आलेली आहे. अवतारी पुरुषांना धर्म, जाती, जन्म आणि मृत्यू यांचे बंधन कधीच नसते. श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रात प्रथम मंगळवेढे या गांवी शके १७६० ते सुमारास प्रगट झाले. त्या भागात त्यांचे वास्तव्य जवळ जवळ बारा वर्षे होते. ते सदैव रानावनात वास्तव्य करुन असत. गांवात क्वचित येत कोणी कांही दिले, इच्छा झाली तरच भक्षण करीत. स्वामी समर्थ (शके १७१२ चे सुमारास) मंगळवेढ्याहून मोहोळ या गांवी आले. मोहोळ येथील पाच – सहा वर्षाच्या वास्तव्यानंतर शके १७७९ मध्ये ते अक्कलकोटला आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य शके १८०० पर्यंत होते.

महाराष्ट्रात स्वामी समर्थ कोठून आले याबद्दल निश्चितपणे जरी कांही सांगता आले नाही तरी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एक सूत्र ध्यानी येते आणि ते म्हणजे श्री दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती महाराज गाणगापुराहून निघून कर्दळी वनात गुप्त झाले आणि ते पुढे शके १७६० चे सुमारास महाराष्ट्रात प्रगट झाले.

हिमालयामध्ये गंगानदीचे उत्तरेस असलेल्या अरण्यात एका वृक्षाखाली श्रीनृसिंह सरस्वती ध्यानस्थ बसले असता इतका काळ लोटला की त्यांचे शरीराभोवती वारुळ तयार झाले. वृक्ष तोडतांना एका लाकुडतोड्याचा घाव त्या वारुळावर चुकून बसला, श्री महाराज समाधी सोडून वारुळातून बाहेर आले. त्या कुऱ्हाडीने झालेल्या जखमेचे व्रण त्यांचे मांडीवर दिसत. श्री स्वामी महाराज प्रथम श्री क्षेत्र काशी येथे प्रगट झाले.

एक पारशी गृहस्थाने श्री महाराज यांस एकदा विचारले. ‘‘महाराज आपण कोठून आला?’’ श्री महाराजांनी उत्तर दिले ‘‘प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो, कलकत्ता वगैरे शहरे पाहिली बंगालमध्ये कालीमातेचे दर्शन घेतले. गंगा तटाकाने भ्रमण करीत करीत गोदावरी तटाकी आलो. तीरावर स्नान करुन दक्षिण हैदराबादेस आलो. तेथे कांही दिवस राहून व मंगळवेढ्यास बरेच दिवस राहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळमार्गे सोलापूरास आलो व तेथून अक्क्लकोटला आलो व तेथेच राहत आहोत.’’

‘‘माझं नांव नृसिंहभान’’ असे श्री स्वामी महाराज सांगत. त्याचप्रमाणे आमचा जन्म साडेचारशे वर्षापूर्वी झाला असे म्हणत. श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले ते बहुधान्य नाम संवत्सरातच. अर्थातच श्री स्वामी महाराज आपल्या पूर्वायुष्याचा कोणालाच थांगपता लागू देत नसत. श्री महाराजांना आपण कोण असा प्रश्न केला असता ते म्हणत, ‘‘दत्तनगर, मूळपुरुष वडाचे झाड मूळ झाडाचे मूळ’’ एकदा एकाने त्यांना विचारले. ‘‘महाराज आपली जाती काणती?’’ श्री महाराजांनी उत्तर दिले. ‘‘आम्ही यजुर्वेदी ब्राम्हण आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र व मीन राशी’’ श्री महाराजांच्या देहाचे वर्णन शब्दात कसे करावे ? अलौकीक शांती, शरणागत वात्सल्य तसेच यश. श्री औदार्य ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या षडगुणांचे प्रभुत्व यामुळे श्री स्वामी समर्थ वैकुंठाधीश साक्षात श्रीमहाविष्णूच होते. मंगलमुर्ती गजाननाप्रमाणे मोठे कान व लंबोदर, श्रीरामचंद्राप्रमाणे आजानुबाहू, श्री शंकराप्रमाणे तेजस्वी, श्री हनुमंताप्रमाणे मनोजय व भीमरुपी होते. भगवान गोपालकृष्णाप्रमाणे त्यांच्या बाललीला होत्या. डोळ्यात सूर्य, चंद्राचे तेज होते. श्री महाराज चालू लागले तरी बरोबर चालणाऱ्या भक्तमंडळीस पळावे लागे. श्री महाराजास लंगोटी नेसवावी लागे. पण केंव्हा केंव्हा ती फेकून ते दिगंबर होत. नित्य प्रात: काळी श्री महाराजांना स्नान घातले जाई. कपाळी केशर कस्तुरीचा गंधाची उटी लावण्यात येई. (श्री महाराजांच्या दर्शनाचा लाभ ज्यांना झाला त्यांना आजही त्या कस्तुरीचा सुगंध अनुभवयास मिळतो.) श्री महाराज नेहमी दोनच आचमने घेत. स्वत:च हाताने ते क्वचित जेवत. लहान मुलाप्रमाणे त्यांना भरवावे लागे. हा कार्यक्रम भक्तमंडळी दर्शनाला येणापूर्वी भल्या पहाटे उरकला जाई.

सारा दिवस दर्शनास इतकी गर्दी होई की श्री महाराजास पाच मिनिटेही सवड मिळत नसे. दर्शनास पारशी, मुलसमान, हिंदू, ख्रिश्चन सर्व धर्माचे लोक येत. त्यात जसे जिज्ञासू असत, तसे आर्तही आढळत. तर कोणी ऐहिक सुख प्राप्त व्हावे ही भावना घेऊन आलेले असत. तर कोणी श्री समर्थांच्या मार्गदर्शनाने परमार्थांच्या सोपानावर पावले टाकण्याची मनिषा बागळून असत. थोडीफार सेवा करुन मानसिक समाधान मिळवावे असे म्हणणारे कांही असत.

सारा देह श्री स्वामी समर्थ चरणी झिजावा या भावनेने उर्वरीत आयुष्य श्री स्वामी चरणी घालविण्याची इच्छा करणारे असत. परमार्थाचे मार्गात अधिकार प्राप्त झालेले पण अहंकाराने अडथळणारेही असत. या सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे हा कल्पवृक्ष ‘‘जो जे वांछील तो ते लाहो’’ हा कृपा प्रसाद प्राप्त करुन देई.

‘‘अवघे विेशची माझे घर’’ अशी श्री स्वामी महाराजांची वृत्ती असे. क्षणात ते मेण्यात बसतील तर मिनीटांनी मेण्यातून उतरुन रानावनातून पायी एकटेच चालू लागतील. एखादेवेळी मऊ शय्येवर विश्रांती घेतील तर एखादेवेळी कंटक शय्येवर पहुडलेले दिसतील. कोणत्याही देशातील भाषेतील दर्शनार्थी आल्यास लहर असल्यास श्री स्वामी समर्थ त्या दर्शनार्थीच् मातृभाषेत बोलत. श्री स्वामी समर्थ अतिशय आनंदात असले म्हणजे त्यांच्या शरीराचा सुगंध चहुकडे दरवळत असे. दहा निरनिराळ्या देवतांचे उपासक दर्शनास आल्यास त्या उपसकांना श्री स्वामी समर्थ त्यांच्या उपास्य देवतेच्या स्वरुपात दर्शन देत. सान्निध आलेला मनुष्य कोणत्याही विद्येत कितीही पारंगत असला तरी श्री स्वामी दर्शन घेतांना श्री स्वामींचे ज्ञान आपणांहून जास्त आहे असे त्यास वाटे.

भजन, कीर्तनाची व तांबड्या फुलांची त्यांना अतिशय आवड असे. पुरणपोळी, बेसनचे लाडू, भजी, कडबोळी वगैरे पदार्थ त्यांना अत्यंत आवडत. कुत्री व गायीवर त्यांचे फार प्रेम असे. वृक्षाचे एक पानही तोडलेले त्यांना आवडत नसे.

श्री महाराज येणाऱ्या भक्तांचे काम मनात असल्यास झटदिशी करीत, नाहीतर कसोटीचे प्रसंग निर्माण करुन विलंबही लावित. श्री महाराजांचे बोलणे ठाशीव व करारी असे. परमेशरांचे सामर्थ्य त्यांचे वाणीत असे. त्यांना निद्रा अशी नव्हतीच. गाई गुरांच्या चाऱ्या पाण्यावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. त्यांना पावसात हिंडण्याची, निसर्गाशी एकरुप होण्याची स्वाभाविक आवड असे. श्री स्वामी समर्थांच्या महा तेजस्वी मूर्तीकडे पाहिल्यावर चित्तात अत्यंत आदर आणि दरारा उत्पन्न होऊन अतिपरिचीत असलेल्यांनाही यत्किंचित अमर्याद वागण्याचा धीर होत नसे. श्री सोमनाथपासून जगन्नाथपर्यंत तसेच श्री काशिविश्वेश्वरापासून श्री रामेश्वरापर्यंत अगणित स्त्री-पुरुषांना व अबालवृध्दांना या ना त्यानिमित्ताने श्री स्वामी समर्थांनी आपल्याकडे आकर्षित करुन घेतले. त्यांचेवर निरापवाद कृपेचा अमृतवर्षाव केला. सर्व जीवमात्राविषयी त्यांच्या कुसुम कोमल अंत:करणात अमर्याद प्रेम बसत असे. त्यामुळे अंतरी कोणताही हेतू ठेवून कोणी श्री स्वामींच्या दर्शनास गेल्यास तो अंतर्बाह्य बदलून जात असे.

पढीक पंडितांचा अभिमान दूर करुन त्यांच्या विद्यारुपी चंदनाभोवती पडलेला अहंकाररुपी सर्पाचा विळखा त्यांनी दूर केला. शास्त्राभ्यास व वेद विद्येचा पुरस्कार केला. लोकांची धर्म भावना जागृत केली. श्री महाराजांकडे आलेल्या त्या असंख्य लोक त्यांनी रोगमुक्त केले व कित्येकांना भूतबाधेपासून मुक्त केले. दारिद्रीच्या गंगेतून वर काढले पश्चातापाच्या अग्नीने जाळून लोकांची मने शुध्द केली.

षडशास्त्र संपन्न पंडितांपासून अक्षर शत्रू अडाण्यापर्यंत, राजधिराजापासून भाग्यहीनापर्यंत, वेदशास्त्र संपन्न ब्राम्हणापासून अंत्यजापर्यंत, सात्विक सदाचार संपन्न सतीपासून ते दुराचारी वेश्येपर्यंत प्रतिदिनी असंख्य जीवात्मे श्री स्वामी समर्थांसमोर येत असत. कोणी शुध्द भावनेने कोणी निष्काम सेवेसाठी, तर कोणी परीक्षा घेण्यासाठी व निंदानालस्ती करण्यासाठी. पण श्री महाराजांनी आलेल्या व्यक्तीचा कधीही कंटाळा केला नाही. कपाळाला कधी आठी घातली नाही. उलट सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला आयुष्यभर जतन करावसं वाटेल तसा अनुभवांचा अमोल ठेवा प्राप्त करुन देऊन त्या व्यक्तीला परमेश्वराशी प्रेमरज्जूने बांधून टाकीत. एकदा श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले की, महाराज त्यांचे उपास्य दैवत, जीवन, सर्वस्व बनून जात. रुढीपर परंपरांचे किंवा कोणत्याही अंध धर्म भावनांचे अवडंबर न माजविता ईश्वराच्या ठिकाणी अविचल निष्ठा ठेवण्याची कृतीशील प्रेरणा त्यांनी लोकांना दिली. अंत:करणातला अंधार दूर करुन समाजात ज्ञानाचे शतदीप उजळले.

श्री स्वामी महाराजांनी भक्तजनांना असंख्य चमत्कार दाखविले. त्या चमत्कारामागील हेतू ध्यानात घेणे आवश्यक आहे. लोकांच्या मनातील परमेश्वरांविषयीची श्रध्दा दृढ करणे, समाजातील पाखंड नाहीसे करुन त्यांची मने ईश्वराकडे वळविणे, ईश्वराच्या शक्तिचे दर्शन घडविणे, हा हेतू या चमत्काराप्रमाणे असे. आपल्या संस्कृतीची यथार्थ ओळख पटविणे हा त्यामागील उद्देश असे. या चमत्कारांकडे पाहण्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. हे चमत्कार म्हणजे जादुगाराने केलेले चित्त विभ्रमाचे प्रयोग नाहीत किंवा नजरबंदीचे खेळ नाहीत, तर पंचमहाभूतांवर सामर्थ्य गाजविणाऱ्या विेशपालक जगन्नियंत्याच्या शक्तिचे ते ओझरते दर्शन होय. समाजाची अध्यात्मिक बैठक तयार करणे, लोकांमध्ये विवेक संपन्नता, पुण्यशीलपणा, धर्म परायणता आणि सौख्य नांदावे यासाठी अवतारी पुरुष ईश्वर शक्तिचे दर्शन घडवित असतात. ‘‘अनन्यश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते ॥ तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहम॥’’ ही भगवंताची भुमिका असते ती मात्र आपण जाणली पाहिजे. केवळ चमत्कारांच्या दृष्टितून पाहणाऱ्यांना अवताराचे मर्मच कळले नाही असे म्हटले पाहिजे.

अक्कलकोट, जमखिंडी, इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा इत्यादी संस्थानिक, विंचूरकर, माने इ. सरदारापासून ते दरिद्री बसाप्पासारख्या लोकांपर्यंत, ब्रम्हनिष्ठ वांबोरीकर, विष्णूबुवा ब्रम्हचारी, न्यायमूर्ती रानडे, ठाकुरदास बुवा इ. विव्दान श्रेष्ठांपासून ते थेट चोळाप्पासारख्या अज्ञ जीवापर्यंत, वासुदेव बळवंतासारख्या क्रांतिकारकापासून सर्व पेशातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यावसायिकापर्यंत अनेक सरकारी अधिकारी सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या अद्भूत सामर्थ्याने मंत्रमुग्ध झाले होते. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला मनातील विचार बोलून दाखवून सर्व जीवांच्या अंतर्बाह्य मीच भरलेला आहे. कर्तुम अन्यथा अकर्तुम मीच आहे ही सर्वसाक्षी, सर्वज्ञानी त्रिकालबाधीत परमेûवराची वाणी यथार्थ असल्याचे दाखवित.

जनमानसातील अज्ञान दूर करण्याचे कार्य श्री स्वामी समर्थांनी केले आहे. एकदा युरोपीयन छायाचित्रकाराने श्री स्वामी समर्थांचे छायाचित्र घेतले. ते जेंव्हा श्री स्वामीभक्तांना दाखविले तेंव्हा प्रत्येकाला त्या छायाचित्रात आपआपले कुलदैवत दिसू लागले. चराचर व्यापी परमेश्वराचे विेशरुप ते हेच नव्हे काय? परमेशर अवडंबराचा, डामडौलाचा आणि वृथा स्तुतीचा भुकेलेला नसतो तर त्याच्या खऱ्या भक्तिची भूक आणि अंत:करणातून निर्माण झालेल्या प्रेमाची तहान लागलेलीच असते. या तहान भुकेतूनच तो कबिराचे शेले विणतो, जनाईला दळू लागतो, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो, श्री एकनाथांच्या घरी कावडीने पाणी भरतो, दामाजीसाठी तो विठू महार बनला, पांडवांनी केलेल्या यज्ञात उष्टीखरकटी काढतो, सतीत्वाचे रक्षण करण्यासाठी सागराचे उल्लंघन करतो, धर्म रक्षणासाठी भवानी तलवार बनतो. परमेश्वर फक्त भाव पाहतो. हाच परमेशर एकाच वेळी अक्कलकोटला व मुंबईला असतो. हाच परमेश्वर समुद्रात बुडणाऱ्या नाखव्याला आधार देऊन वाचवितो,हाच परमेश्वर बंब गार्डन साहेबाचे विषारी किरडूचे विष तांदळाच्या धुवणाने व आळूच्या रसाने उतरवितो, बसप्पाची भक्ती पाहून हाच परमेशर त्याला सर्पाचे सोने करुन देतो. ह्या परमेश्वराला पाहूनच वांझ म्हशीला पान्हा फुटतो. हाच परमेश्वर रेड्याच्या मुखातून वेद वदवितो, भिंत चालवितो. ब्रम्हतदाकार वृत्ती म्हणजे काय? असा प्रश्न परमेशराला विचारणाऱ्या विव्दान श्रेष्ठांचा भ्रमपरिहार करणारा, स्वप्नात विंचवाचा दंश दूर करणारा परमेशर हाच.

चराचराशी श्री स्वामी समर्थ कसे एकरुप झाले होते. त्यांची अनेक उदाहरणे आहेत. एके दिवशी श्री महाराजांनी एकाएकी अंगावरील कपडे काढून टाकले. डोक्यावरची टोपी फेकून दिली व पितांबर सोडून अंगाला गुंडाळला. त्यांचे नेत्रातून खळखळा अश्रू वाहू लागले. दिवसभर ते उदास होते. तोंडाने ते सारखे म्हणत होते. ‘‘पंढरीच्या लोकां! किती मारु हाका ॥ तेथे माझा सखा पांडुरंग ॥ ह्या त्यांच्या अंतरसाक्षीत्वाचा प्रत्यय दुसऱ्या दिवशी आला. ज्या दिवशी श्री स्वामी समर्थ विमनस्क होते त्याच दिवशी कोणी यवनाने श्री पांडुरंगाच्या पायावर दगड मारला होता. श्री पांडुरंगास दुखापत होताच श्री स्वामी समर्थांचे नेत्रातून चंद्रभागा वाहू लागली.

श्री महाराजांनी त्यांचे सन्निध आलेल्यांना नवे चैतन्यमय जीवनप्राप्त करुन दिले. मुंबईस हरिभाऊ ऊर्फ स्वामीसुत हे म्युनिसिपालिटीत नोकरीस होते. एका व्यवहारात झालेल्या नफ्याबद्दल श्री स्वामी महाराजांचे दर्शनास गेले. त्यावेळी श्री स्वामींनी हरिभाऊवर कृपादृष्टी टाकली व त्यांना पादुका करुन आपणास सांगितले. मुंबईस परत आल्यावर त्यांचे दोन स्नेही आपआपले उद्योगात मग्न झाले. परंतु हरिभाऊंना मात्र श्री स्वामी समर्थांशिवाय कांही सुचेना. संसारातील त्यांचे चित्त उडाले. त्यांनी चांदीच्या पादुका तयार केल्या. अक्कलकोटला स्वामी दर्शनास आले. स्वामींनी त्या पादुका सतत चौदा दिवस आपल्या पायात ठेवल्या व आपले आत्मलिंग म्हणून हरिभाऊंना दिल्या. श्री स्वामी समर्थांनी हरिभाऊंना आज्ञा केली, ‘‘तू माझा सुत आहेस, धंदा रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर’’

श्री महाराजांच्या प्रासादिक पादुका मस्तकी धारण करताच हरिभाऊला आत्मज्ञान प्राप्त झाले. मुंबईस परतताच त्यांनी श्री आज्ञेप्रमाणे आपला सर्व संसार लुटून टाकला, सर्व सोने ब्राम्हणास वाटून दिले. धर्मपत्नी यांचे मंगळसूत्रही काढून दिले. तिला एक पांढरे पातळ व स्वत:स एक कफनी ठेवली. श्री स्वामी समर्थांची अन्यय साधारण भक्ति केली. या थोर स्वामीसुताचे श्री स्वामी समर्थांच्या अगोदर श्रावण वद्य प्रतिपदेस निर्वाण झाले. श्री महाराजांचे एकनिष्ठ भक्त म्हणजे चोळाप्पा हे होत. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटला आल्यानंतर जर कोणाकडूनच तीन दिवसांचे उपवासानंतर प्रथम चोळाप्पाकडेच श्री स्वामींनी अन्न भक्षण केले. एक वेडसर मनुष्य घरात आणल्याबद्दल घरातील बायका माणसांनी चोळाप्पांना खूप त्रास दिला. श्री स्वामी समर्थांनीही त्यांची अग्नीपरीक्षा पाहिली. घरातील वस्तु कोणासही द्यावी, धान्य गाईला घालावे, घरात कोठेही मलमूत्र विसर्जन करावे. घरातील मंडळी त्रासून गेली. पण चोळाप्पा मात्र जाणून होते की, महाराज हे अतिमानुष आहेत. सामान्य कोटीतील नाहीत. घरातील भांडीकुंडीदेखील गहाण टाकून त्यांनी श्री महाराजांची सेवा केली. श्री महाराजांच्या निर्वाणापूर्वी सहा महिने अगोदर स्वामीभक्त चोळाप्पा यांचा अंत झाला.

श्री महाराजांचे एक थोरभक्त श्री बाळाप्पा महाराज धारवाड जिल्ह्यातील करजगी तालुक्यातील हवेरी या गांवचे राहणारे. हे यजुर्वेदी ब्राह्मण, घरी सावकारी, सराफी, गजान्त लक्ष्मी. संसारात कोणतेही न्यून नाही. पण एके दिवशी अचानक मनात वैराग्य उत्पन्न झाले. सदगुरु प्राप्तीविषयी विलक्षण तळमळ लागली. वय अवघे ३० वर्षांचे बाळाप्पा गाणगापुरास आले. त्या ठिकाणी दृष्टांत झाला की, अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करावी. त्यानंतर बाळाप्पा अक्कलकोटास आले. त्यांना पाहताच साता जन्माची ओळख असल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी आनंद व्यक्त केला. बाळप्पांनी श्री स्वामी समर्थांची अनन्य सेवा केली. श्री महाराजांच्या अंतरीच्या खुणा ते बिनचूक सांगत असत. साधकावस्थेत त्यांच्या दैवी समर्थ्यांच्या प्रचिती देई श्री स्वामी समर्थांच्या निर्वाणा नंतर ते ३२ वर्षे हयात होते.

शके १८०० बहुधान्य नामसंवत्सरी चैत्र वद्य त्रयोदशीला मंगळवारी दुपारी ४ वाजता श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. त्यासमयी श्री स्वामी मुखातून खसखशी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले.

श्री स्वामी समर्थांना समाधीस्त होऊन १४० वर्षे झाली. या काळात अक्कलकोट मुंबई, पुणे, सुरत, बडोदा, वेगुर्ले, जालना, आळंद, मैदर्गी, येवले, केज, विजापूर, वसई, ठाणे, चिपळूण, गोवा, फलटण वगैरे ठिकाणी मठ स्थापन झाले आहेत.

पार्थिव देहाने स्वामी आपल्यातून गेले असले तरी ‘‘हम गया नही, जिंदा है’’ हे त्यांचे वचन भक्तजनांना आधार आहे. ज्या ज्या वेळी आपण त्यांचे स्मरण करु त्या त्यावेळी श्री स्वामी आपणापाशी आहेत हे नि:संशय.

संदर्भ ग्रंथाचे नाव :- सारांश मासिक २०१७

लेखकाचे नाव :- डॉ. श्री. प्र. रा. बारलिंगे

Comments are closed.