श्री रामदास संप्रदाय

श्री समर्थ रामदासांनी श्री दासबोध रचनेसाठी श्री अवधूतगीता व गुरुगीतेचा संदर्भ घेतला आहे. श्री समर्थ रामदास संप्रदयात श्री दत्तात्रयाला गुरुस्वरुप आदर्श सिध्द पुरुष मानले आहे. उपास्य देवता म्हणून मानलेले नाही. श्री समर्थ रामदासांचे शिष्य दिनकरस्वामी तिसगावकर व पट्टशिष्य श्री कल्याण स्वामी यांच्या रचनेत श्री दत्तात्रय यांचे भावपूर्ण वर्णन दिसून येते. उत्कटभक्तीभाव दिसून येतो.

प्रास्ताविक –
देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर यादवांचे राज्य नष्ट झाले व त्याचबरोबरच महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अस्त होऊन पारतंत्र्य झाले व पारतंत्र्याचा काळ १४ व्या शतकाच्या सुरुवातीस सुरुहोऊन सुमारे ३०० वर्षे टिकला, या कालांत मुसलमानी राजसत्तेचा जाच जनतेस सोसावा लागला. कित्येक देवालये मोडली; तीर्थस्थाने भ्रष्ट झाली, स्त्रियावर अत्याचार घडले, सोळाव्याशतकाच्या अखेरीस महाराष्ट्राचे तीन राजकीय भाग झाले. आदिलशाही, निजामशही व मुघलशाही. सन १६३६ मध्ये निजामशाही नष्ट झाली. कारण मोंगलांच्या राजकीय आक्रमणापुढे ती टिकाव धरु शकली नाही. आदिलशाही व मोंगलाई हे आपले सामर्थ्यानेच महाराष्ट्राचे धनी बनले होते. तत्कालीन धार्मिक व सामाजिक स्थितीचे वर्णन रामदासांनी आपल्या ‘‘परचक्र निरुपण’’ या प्रकरणात पुढील प्रमाणे केले आहे

पदार्थ मात्र तितुका गेला । नुस्ता देशची उरला ।
येणे करीता बहुतांला । कष्ट जाले ॥
लोके स्थानभ्रष्ट जाली । कितेक तेथेची मेली ।
उरली ते मराया आली । गावावरी ॥
माणसा खावया धान्य नाही । अंथरुण तेही नाही ।
घर कराया सामग्री नाही । काये करिती ॥
कहींच पहाता धड नाही । विचार सुचेना कांही ॥
अखंड चिंतेच्या प्रवाही । पडिले लोक ॥
प्राणिमात्र झाले दु:खी । पाहता कोन्ही नाही सुखी ॥
कठीण काळे वोळखी । धरिनात कोन्ही ॥
… परचक्र निरुपण २९ ते ४०

समर्थ संप्रदायाचा उगम आणि परंपरा –
वर वर्णन केलेल्या दु:सह परिस्थितीमध्ये वैदिक वर्णाश्रम धर्माचे पुनरुज्जीवन रामउपासनेच्या अधिष्टानावर करणारा संप्रदाय रामदासस्वामींनी सुरु केला. तो रामदासी संप्रदाय होय. या संप्रदायास ‘‘महाराष्ट्र धर्म’’ ‘‘रामदासी संप्रदाय’’‘‘दास संप्रदाय’’ अथवा ‘‘समर्थ संप्रदाय’’ असेही म्हणतात. रामदासस्वामी आपली गुरुपरंपरा एका अभंगात देतात ती खालील प्रमाणे,-

आदिनारायण सदगुरु आमुचा ॥
शिष्य झाला त्याचा महाविष्णू ॥१॥
तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस ।
तेणे ब्रह्मायास उपदेशीले ॥२॥
ब्रम्हदेवे केला उपदेश वसिष्ठा ।
तेथे धरा निष्ठा शुध्द भावो ॥३॥
वसिष्ठ उपदेशी श्रीरामरामाशी ।
रामे रामदासी उपदेशीले ॥४॥
उपदेश देवोनी दिधला मारुती ।
स्वयें रघुपती निरंवीता ॥५॥
निरंवीता तेणे झालो रामदास ।
संसारी उदास म्हणोनीया ॥६॥
म्हणोनीया आमुचे कुळी कुळदैवत ।
राम हनुमंत आत्मरुपी ॥७॥
आत्मरुपी झाला रामी रामदास ।
केला उपदेश दीनोध्दारा ॥८॥

यावरुन आदीनारायण – महाविष्णू – हंस – ब्रह्मदेव – वसिष्ठ – राम – रामदास याप्रमाणे परंपरा दिसते.

सन १६७४ मध्ये छ. शिवाजीस राज्याभिषेक झाला व समर्थ सज्जनगडी रहावयास गेले. पुढे तीन वर्षांनी इ.स.१६७८ मध्ये रामदासांचे ज्येष्ठ बंधू यांचे देहावसान झाले. सन १६७८ मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या एक म्हणजे छ. शिवाजीने रामदासांना सनद करुन दिली (तीअद्यापही चालू आहे) व दुसरे डोमगांवास रामदासांनी आपला शिष्य कल्याण यास मठ करुन राहण्यास सांगितले. सन १६७९ मध्ये छ. शिवाजी व रामदास यांची शेवटची भेट सज्जनगडावर झाली व पुढे सन १६८० मध्ये छ. शिवाजी महाराजांचा अंत झाला.

शके १६०३ (इ.स. १६८१) मध्ये माघ कृष्ण पंचमीस तंजावराकडून व्यंकोजी राजे यांनी पाठविलेल्या रामाच्या मूर्ती सज्जन गडावर येऊन पोहोचल्या. पुढे समर्थांनी त्या मूर्तीच्या डोळ्यांवरील मेण काढून मूर्तीचे ध्यान पाहिले व समाधान व्यक्त केले. त्याच दिवशी त्या मूर्तीची स्थापना व यथासांग पूजाअर्चा करण्यात आली. आपल्या शिष्यांना बोलावून त्यांनी आज्ञा केली की, ‘‘या व चाफळच्या मूर्तीची पूजाअर्चा करुन संस्थान सांभाळून उपासनामार्ग चालवावा’’ पुढे चार दिवसांनीच म्हणजे माघ कृष्ण नवमीस शनिवारी दोन प्रहरी या मूर्तीचे अवलोकन करीत असतानाच समर्थानी आपला देह ठेवला.

जांब ही जन्मभूमी, चाफळ ही कर्मभूमी व सज्जनगड ही समाधीभूमी म्हणून समर्थचरित्राशी निगडित आहे. या तिन्ही मठांचे महंत समर्थ स्वत: होते. याखेरीज कांही प्रमुख मठांची नावे त्यांच्या मूळ मंहंतांच्या नांवासह खाली दिली आहेत.

टाकळी मठ व इंदूरबोधन मंहत उध्दव स्वामी (प्रथम शिष्य) तंजावर मठ – भीमस्वामी; डोमगांव मठ – कल्याणस्वामी (समर्थांचे पट्टशिष्य) शिरगांवमठ – दत्तात्रयस्वामी; तिसगांवमठ – दिनकरस्वामी. काही मठांवर स्त्री – शिष्या अधिकारी होत्या. त्या मठात मिरज – मठ – वेणाबाई; राशिवडेमठ – अंबिकाबाई; वाळवेमठ – अंबिकाबाई, अशी नांवे आढळतात.

रामदासांची ग्रंथरचना –
रामदासांची ग्रंथरचना विस्तृत आहे. त्यांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ दासबोध असून, त्याखेरीज पुढील वाड:मय प्रसिध्द आहे (१) मनोबोध अथवा मनाचे श्लोक, (२) करुणाष्टके,(३) जुना दासबोध, (४) आत्माराम, (५) रामायण (६) ओव्या चवदा शतक, (७) स्फुट ओव्या, (८) स्फुट श्लोक व (९) भारुडे

रामदासांच्या उपलब्ध असलेल्या २६०० कवितापैकी सुमारे तीन – चतुर्थांश कविता अध्यात्मपर आहेत; सुमारे चार हजार कविता देवता – आख्यानपर उरलेली कविता आत्मपर भावगीतात्मक आहे. दासबोध व इतर रचना –

दासबोध म्हणजे दासांनी – रामदासांनी – शिष्यांना केलेला बोध आहे. यात स्वत:च रामदासांनी पहिल्या दशकातील समासातील दुसऱ्याच ओवीत दासबोधांत काय सांगितले ते लिहीले आहे.

ग्रंथा नाम दासबोध । गुरु शिष्यांचा संवाद ।
येथे बोलिका विशद । भक्तिमार्ग ॥

वीस दशकांचा हा दासबोध एकदम तयार झालेला नसून, त्याची रचना क्रमाक्रमाने झाली आहे. पहिल्या आठ दशकांची रचना सन १६५९ च्या सुमारास झाली. उरलेले बारा दशक मधून मधून लिहीले गेले आणि इ.स. १६८० – ८१ मध्ये संपूर्ण चित्र गुंफले गेले. म्हणजे सुमारे २० /२२ वर्षात हा संपूर्ण ग्रंथ तयार झाला आहे.

दासपंचायतन –
समर्थांच्या समकालीन आणखी चार मंडळी होती व त्यांचा आणि समर्थांचा स्नेहसंबंध होता. चौघेजण म्हणजे (१) जयरास्वामी वडगांवकर (२) रंगनाथस्वामी निगडीकर (३) केशवस्वामी भागानगरकर व (४) आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर या सर्वांना रामदासांचे श्रेष्ठत्व मान्य होते. म्हणून हे पंचायतन ‘‘समर्थ पंचायतन’’ या नावानेही ओळखले जात होते.

समर्थ संप्रदायाचे कार्य –
रामदासी संप्रदायाचे रोपटे रामदासस्वामींनी कृष्णेच्या काठी भक्तीच्या मळ्यात लावले. दासबोधाच्या आणि स्फुट काव्याच्या रुपाने त्याला जीवन दिले. आपल्या हयातीतील उत्तरार्धात हे रोपटे जोमाने वाढून त्याचे वृक्षांत झालेले रुपांतर पाहण्याचे भाग्यही त्यांना लाभले.

या वृक्षाला मठ महंताच्या रुपाने फांद्या फुटल्या. शिष्यप्रशिष्यांचा मनोहर पर्णसंभार त्यावर वर्धमान झालेला दिसला व या संप्रदायाच्या शाखा दूर प्रांती पसरुन गर्द छायेखाली रामोपासना हनुमंताच्या साक्षीने प्रकर्षाने होऊ लागली. रामदासांना ७३ वर्षाचे दीर्घायुष्य लाभलेले होते. त्यातील पूर्वार्धाचा तीन तपांचा काल बालपण, तपश्चर्या आणि तीर्थाटन यात त्यांनी घालविला व तीर्थाटनात डोळे आणि कान उघडे ठेवून केलेल्या संचारातील अनुभवांच्या भांडवलावर उत्तरार्धात संप्रदाय स्थापून त्याचा विकास आणि विस्तार केला.

Comments are closed.