सद्गुरुंचे थोर सुपूत्र – श्री म्हादबा कोष्टी
महाराजांच्या पहिल्या शिषोत्तम पंचकातील श्री लाड, दळवी, मुरगुडकर, रामदास यांच्यानंतर श्री म्हादबा कोष्टी हे पाचवे भक्त होते. श्री महादेव पटकार हे त्यांचे नांव असून, म्हादबाच नावाने ते सर्वश्रुत होते. वस्त्र विणणे हा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. त्यांचे रहाते घर कोल्हापूर मध्येच जुना बुधवार पेठेत होते. द्विमुखी हनुमान मंदिर सन्निध होते. बालपणा पासूनच त्यांची बलभीम मारुतीरायावर अपरंपार श्रध्दा होती. जवळच असणाऱ्या हनुमान मंदिरात ते सेवाभाग उरकत असत.
ह्या हनुमान मंदिरात नेहमी पुराण वाचन चालत असे. म्हादबा संसारी असून धार्मिक प्रवृत्तीचे होते. भजन, कीर्तन, पुराण श्रवणाचा त्यांना विशेष छंद होता. म्हादबा पुराण श्रवण करत असता, एकदा निरुपण निघाले. ती थोरवी होती श्री गुरुंची! सद्गुरुंचा महिमा, त्यांचे आपल्या जीवनात असलेली उपयुक्तता सांगण्यात आली. पुर्व पुण्य पदरी असेल तरच साधुसंताचा सहवास मनुष्य प्राण्याला मिळतो. तो सहवास मिळाला की, मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. वैराग्य प्राप्त झाले की, गुरुंच्या कृपेला तो मनुष्य प्राप्त होतो. दुर्लभ असणारे अध्यात्म साधन गुरुंच्या शिवाय मिळूच शकत नाही. एकदा सद्गुरुंनी त्या साधकाचा हात धरला की, वैकुंठीचा नाथ सुध्दा त्याचा सेवक होतो !
सद्गुरुंचा असा महिमा ऐकल्यावर म्हादबांना गुरुंचा ध्यास लागला. ऐन तारुण्य व प्रपंचाच्या उंबरठ्यावर असतानाच ते सावध झाले. तरी पण गेलेले आयुष्य श्री गुरुंच्या सेवा कृपेशिवाय व्यर्थ दवडले ह्याची त्यांना खंत वाटू लागली. आता इथून पुढे तरी आपण आपले आयुष्य सदगुरुंच्या सेवा सानिध्यात घालवू या. असा त्यांनी दृढनिश्चय केला. पण असा सद्गुरु आपल्याला मिळणार तरी कोठे? हा ध्यास, ही चिंता बळावतच चालली. शेवटी एका महाभागाने त्यांना सांगितले. ‘‘कुंभार गल्लीत तारामती सदनात एक दिव्य विभुती आहे. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज या नावाने साक्षात दत्तगुरुंनीच तो अवतार धारण केलेला आहे. गुरु पाहिजे! गुरु पाहिजे! म्हणतोस ना! जा आणि त्यांनाच गुरु करुन घे! तुझ्या मनाची तळमळ शांत होईल’’ हा सल्ला म्हादबांना पटला. त्यांनी त्वरीत तारामती सदनी धाव घेतली. मार्गामध्येच त्यांना समोर येऊन महाराजांनी म्हादबांना दर्शन दिले ‘‘काय पटकार बाबा? माझ्याजवळ रहाणार आहेस होय तू! रहा माझ्याजवळ!’’ महाराजांच्या मायेच्या प्रेमळ उद्गारांनी म्हादबांचे हृदय भरुन आले. त्यांनी त्याच प्रेमभरात महाराजांच्या चरणाला दृढ मिठी मारली. आपले मनोगत महाराजांनी जाणले, खरोखरच महाराज हे थोर अंतरसाक्षी देव विभुती आहेत अशी त्यांची खात्री झाली. अपंरपार श्रध्दा महाराजांच्या चरणांवर जडली. त्यांच्या सेवाकार्यात त्यांनी स्वत:चे जीवन वाहण्याचा दृढ संकल्प केला व तो पुढे पूर्णत्वास पण नेला.
महाराजांनी हनुमंतरुपात कांही भक्तांना दर्शन दिले होते. निमिषार्धात महापुच्छपण दाखविले होते. म्हादबांनीपण पाहिलेले होते. बालपणापासून जोपासलेली अंजनिय भक्ती सफल झाल्याबद्दल म्हादबांना धन्यता वाटत होती. हनुमंताचा अंश तेच आपले श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज! आपल्या सानिध्यात महाराजांनी स्वत:ला ठेवले ह्या समाधानात त्यांची भक्तीसेवा चालू होती.
द्विमुखी मारुती मंदिरात रामायणाचा कथाभाग ऐकला की, सीतामाईच्या शोधासाठी हनुमंताने विशाल रुप धारण करुन महासागर पार केला आणि रावणाच्या लंकेत प्रवेश केला. हनुमंताचे ते रुप खरोखर अणू पासून ब्रम्हांडा एवढे असे विराट होते की, त्या हनुमंताची सावली संपूर्ण महासागरावर पडली होती. आवड धरुन लक्षपूर्वक ऐकणाऱ्या ह्या म्हादबांच्या मनात पुराणिक बुवांचे ते शब्द सारखे कानात घुमू लागले. ते सारखा विचार करु लागले की, हनुमंतानी किती विशाल रुप धारण केले असेल बरं! दिवसभरातील सर्व काल त्यांचा ह्याच विचारात गेला. जेवून रात्री विछान्यावर पडले तरी तोच विचार मनात होता. महासागरावर सावली पडावी म्हणजे मारुतीरायांनी किती विशाल रुप धरले असेल!
रात्र झोपेत संपून गेली पण दुसऱ्या दिवशीच पहिल्या प्रभात समयी म्हादबांना स्वप्न दृष्टांत झाला. ध्यास लागलेल्या म्हादबांना हनुमंतरायांनी दर्शन दिले. साक्षात भगवंताच्या दर्शनासाठी ऋषिमुनी तपश्चर्या करत. कैक तपस्व्यांची तपश्चर्या मार्गातच भ्रष्ट झाली, साक्षात नव्हेच पण स्वप्नात देखील भगवंताचे दर्शन दुरापास्त आहे. त्याला पण भक्ती तपश्चर्येचे बळ असावे लागते. ते बळ निश्चितच म्हादबांच्या ठायी होते. त्यांच्या प्रेमळ भक्तीचा लळा म्हणजेच स्वप्न दृष्टांती मारुतीरायांनी दर्शन दिले.
चारी क्षितीजांनी प्रशांत महासागर वेढला होता! कांही क्षणातच त्या सागरावर झाकण घालावे तसे किंवा विशाल नभाला छत घालावे तसे, विशाल छातीचा, बलदंड भीमरुप मारुती! उजव्या हाताने खांद्यावर मागे ठेवलेली गदा, असा महाकाय हनुमंत म्हादबांच्या कडे स्मितपणे गगनात संचार करीत पाहू लागले.
स्वत:च्या आराध्य देवतेने कांही क्षणापुरते जरी म्हादबांना दर्शन दिले तरी त्यांनी हात जोडून नमस्कार करण्याचे भान राहिले नाही, उलट म्हादबांची भीतीने गाळण उडाली! भीतीने त्यांचा एवढा थरकाप उडाला की, साक्षात हनुमंतरायाच्या विशाल देहरुपाविषयी कोणतीही शंका उरली नसतांना त्यांना मात्र स्वत:च्या स्वप्नातील लघुशंकेचा महापूर जागृत अवस्थेत येवूनही रोखता आला नाही. हनुमंत दर्शनाने त्यांच्या मनाची तळमळ शांत झाली होती. मी महाराजांच्या जवळ व महाराज माझ्या जवळ हे त्यांच्या भक्ती जीवनाचे सूत्र आता झाले होते.
दीपावलीच्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांनी आठ वेगवेगळ्या स्थानांच्या, वेगवेगळ्या भक्तांच्या घरी एकाच वेळी भिक्षा मागितली होती. त्याच सद्गुरुंनी ह्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज रुपात कोल्हापुरातील वैराग्य मठ हे कायमचे स्थान सोडता नृसिंह वाडीला एक महिनाभर प्रत्यक्ष प्रगट होऊन अनेकांच्या भूत समंध बाधा नाशिल्या होत्या. तेंव्हा तेथे एकटे महाराजच नव्हते तर त्यांच्या बरोबर त्यांचा अनेक शिष्य परिवार होता. त्या समुदायामध्ये श्री म्हादबा पण होते.
महाराजांचे तीन त्रिकाळ दर्शन व सेवा करुन आपला कापड विणकामाचा व्यवसाय ते केवळ घरप्रपंच म्हणून ते करीत. हातमागावर बसले तरी महाराजांचे नामस्मरण त्यांच्या मनात. महाराज समाधिस्त झाल्यावर त्यांचे विरक्त असणारे मन अधिक विरक्त झाले. एकांतात आता जप करावासा वाटू लागला. हनुमंताच्या भक्तीने वेडा झालेल्या साधकाने राम! राम! ह्या व्यतिरिक्त कोणता जप करावयाचा? राम! राम! म्हणत लुटारु वाल्याचा महर्षी वाल्मिकी झाला ते पटत असतांना सुध्दा ‘‘राम’’ ह्या दोन अक्षरात कांही उणेपणा आहे असे त्यांना वाटू लागले. तेंव्हा चर्चा करीत असता त्यांचे गुरु बंधू श्री नामदेव महाराज चव्हाण त्यांना म्हणाले, ‘‘मग तू ‘‘श्री राम! श्री राम!’’ म्हणत जा.
‘‘श्री राम!’’ हा शब्द ऐकतांना रुखरुखणारी उणिवता भरुन निघाल्यासारखे त्यांना वाटले. श्री नामदेव महाराजांनी दिलेला सल्ला त्यांना पटला. घर प्रपंचाला त्यांनी राजीनामा दिला. एकांतवासाठी त्यांनी कोल्हापूरातील ब्रम्हपुरीतील भुयार निश्चित केले. ह्या भुयारात बसण्यापुरतीच जागा निश्चित करुन तेथेच अनुष्ठानाला सुरुवात केली पण!
हे भुयार म्हणजे इतिहास प्रसिध्द कोल्हापूर ते पन्हाळा या मार्गाची ती एक चोरवाट पंचगंगा नदीखालून गेली आहे. इथे म्हादबा नी ‘‘श्री राम!’’ नामाचा जप चालू केला. परेच्याही पलीकडे धाव घेऊ पहाणारी म्हादबांची वाणी वैखरी मध्यमेतून पश्यंतीत विराजमान झाली होती.
म्हादबा श्री रामाच्या नाम जपात भुयारामध्ये येथे निमग्न झाले होते. तेंव्हा त्यांच्या साध्वी पत्नी ते घरात आले नाहीत, ‘‘आज येतील! उद्या येतील! महाराजांच्या भक्ती प्रेमाचे वेड आहे. कुणातरी गुरु बंधूच्या समवेत नृसिंहवाडी वगैरे कोणत्यातरी ठिकाणी गेले असतील, ह्या विचारात चार दिवस वाट पाहून झाल्यावर, त्या साध्वी पत्नीने गुरु बंधू नामदेव महाराज चव्हाण यांच्याकडे खुशाली विचारली.’’
नामदेव महाराजांनी त्यांचा व स्वत:चा संवाद झालेला सांगितला. ‘‘या चार दिवसांत माझी पण त्यांच्याशी भेट झाली नाही. येईल तो, कुठेतरी असणार. मी आणखी त्याचा शोध घेईन’’ त्या साध्वी घरी निघून गेल्या. त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे नामदेव महाराज म्हादबाच्या शोधासाठी बाहेर पडले. जप करण्यास कोणकोणती ठिकाणे योग्य आहेत तिथे म्हादबा असणार म्हणून नामदेव महाराजांनी देवगिरी बुवांचा मठ, कात्यायनी, वडणगे, वगैरे एकांत असणारी देवदेवळे पाहिली. पण म्हादबांचा कांही शोध लागला नाही. मग एके दिवशी या विचारात असतांना ब्रम्हपूरी वरील ह्या भुयाराजवळ रस्त्याच्या कडेला असतांना ‘‘श्री राम’’ श्री राम असा अस्पष्ट आवाज त्यांना ऐकू आला. ते भुयारात गेले, तेथे म्हादबा शांतपणे श्री रामाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले दिसले.
डास, किड्यांनी तर म्हादबांना फोडून काढले होते. ‘‘म्हादबा’’ ही एक हाक मारुन त्यांना समाधीतून उठवणे हे एक घोर पाप होईल असा त्यांनी विचार केला. तो पर्यंत नामदेव महाराजांना पण डासांनी चावले. नामदेवांनी तसाच म्हादबांच्या घराचा रस्ता धरला. त्या साध्वींना नामदेवांनी म्हादबाच्या शोधाचा समग्र वृतांत सांगितला.
‘‘म्हादबा आता घरी येणे कठीण आहे. त्यांची आता थोर योगी तापसी प्रमाणे श्री रामांच्या नाम साधनेत समाधी लागली आहे. मी ती समाधी भंग करण्याचे पातक कांही केले नाही. तुम्ही पण करु नका अशी तुम्हांला विनंती आहे. तुम्ही त्यांचे दर्शन घेण्यास जरुर जावा. पण त्याला समाधीतून उठवू नका. तपश्चर्येचे बळ त्याला आपल्याच श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांनी दिले आहे. ती त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली की आपण होवूनच तो बाहेर येईल, मात्र आता त्याचे घर प्रपंचात लक्ष लागणे कठीण आहे असे दिसते.’’
श्री नामदेव महाराजांचा हा सल्ला त्या साध्वींनी ऐकला. रोज त्या म्हादबांचे दर्शन घेऊन परत घरी येत. त्यांची पण मानसिक स्थिती शोकाकुल अशी होऊन बसली.
आठ पंधरा दिवसातून कधीतरी एकदा ह्या भुयारातून ते बाहेर येत. भिक्षाटन करण्यासाठी ते गांवात फिरत. प्रथम नामदेव महाराजांच्या मठीतून निजबोध वैराग्य मठीत जाऊन श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे दर्शन घेऊन, मग मोजकीच घरे भिक्षा मागून ते परत स्वस्थानी भुयाराकडे परतत असत. भिक्षा मागून आणलेले भाकरीचे चतकोर तुकडे शिळे होऊन लाकडासारखे टणक झाले तरी त्यांचे सेवन ‘‘अन्न हे पूर्णब्रम्ह’’ ह्या विचारानेच करत. त्या भिक्षेतील एखादाही कण खाण्यास योग्य नाही म्हणून त्याचा ते कधीही अव्हेर करत नसत. शेगांवच्या श्री गजानन महाराजांच्या प्रमाणे त्यांनी अन्नातील परब्रम्हाला मान दिला.
अंगावरचे कपडे फाटून गेले. शेवटी एक लंगोटी उरली. दिवस, रात्र, पहाट, सायंकाळ त्यांना एकच झाली. अनुष्ठान मांडल्यापासून मच्छर, माशा, किड्यांनी त्यांना फोडून काढले. नखशिखान्त त्यांचे सर्वांग चावलेल्या किड्यांच्या फोडांनी भरुन गेले होते. पण त्यांनी एका मुंगीला किंवा डास, किड्याला मारले नाही. सद्गुरुंच्या श्रध्देमुळे त्यांची अशी मनोवृत्ती बनत गेली.
अलिकडे बरेच दिवस झाले म्हादबा कोठे दिसले नाही. आपण त्यांची भेट घेतली पाहिजे! हा एक विचार करुन व्यासादिक शोध काढत त्या भुयाराजवळ आले. आत जाऊन त्यांनी म्हादबांना पाहिले तर ते ‘‘श्री राम’’ नामांच्या सुक्ष्म आवाजात ध्यानमग्न असल्याचे दिसले. डोळ्यांची तेवढी जागा सोडली तर त्यांना नखशिखान्त डास किड्यांनी फोडून काढले होते. शेजारी खाण्याच्या वस्तू पदार्थांचा ढीग पडला होता.
श्री रामाचा शांत वाणीत चाललेला जप शेवटी थांबवण्यात आला. श्री व्यासांनी हळूच म्हादबांना हाक मारुन उठविले. गुरुबंधूना पहाताच म्हादबांना अत्यानंद झाला. ‘‘चला, आपण बाहेर जाऊन बसू!’’ म्हणून म्हादबांना भुयाराबाहेर आणून बसविले व म्हणाले, ‘‘आज मोठ्या भाग्याचा दिवस, तुमच्या रुपात श्रीकृष्ण सरस्वती महाराज मला भेटावयास आले.’’
व्यास म्हणाले, ‘‘कसली यातना आणि कसली वेदना ही तर सगळी गुरुरायांची प्रेरणा! ह्यापण मुंगी, माशी, मच्छरादी किड्यांमध्ये सृष्टी व्यापून राहिलेले आपलेच महाराज आहेत. अनंत जन्मीचे सुकृत पदरी होते म्हणून या सूक्ष्मत्तम जीवांची संगत परमभाग्याने लाभली.’’
सुखदाता कोण कोणास ।
देहसुख बंधन कोणास ।
सोडणे आस । ह्या सर्वांची ।
मीपणाच्या बंधनात ते सर्व जग गुरफटले आहे. तिथे मोक्ष दुरापास्त आहे. ह्या मोक्ष प्राप्तीसाठी साधू सज्जनांप्रमाणे आपण आपले मन भगवत् चिंतनात रमवले पाहिजे. असे मग रंगले की ते देहाच्या सुख दु:खाच्या पलिकडे जाते. शत्रूजन निष्कपट होतात. व्याघ्र सर्पादिकांचीही बुध्दी पालटली जाते. असे रक्षण कवच सद्गुरु घालतात. तिथे मग मच्छर मक्षिकांचा काय पाड लागणार? अनुभवाशिवाय या गोष्टी समजू शकायच्या नाहीत. गंगेला गंगा एका ओंजळ (अर्ध्य) अर्पावी. ज्याचे त्यालाच सांगावे तसे तुम्हालाच तुमचे हे सारे निवेदन करतो. आज तुम्ही महाराजांचे दास पण महाराज म्हणूनच तुमचे मला दर्शन झाले. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज रुपातच नटून आल्यासारखे मला वाटत आहे. आत्मस्तुती म्हणून नव्हे पण आपल्याच गुरु बंधूना मार्गदर्शन व्हावे, ही सद्गुरुंची प्रेरणा म्हणून म्हादबा हे बोलत होते.
म्हादबांचे हे भाषण एकाग्र चित्ताने ऐकता सर्व गुरु बंधू आश्चर्यचकित झाले. श्री व्यास म्हणाले, ‘‘म्हादबा, तुम्ही श्री गुरुंचे सुपूत्र आहात. तुमचे हे अनुष्ठानही दिव्य आहे. तुमच्या सारखा जेष्ठ गुरु बंधू आम्हांला लाभला ही महाराजांची आमच्यावर थोर कृपा होय! आम्ही महाराजांचे सेवक शिष्य म्हणवून घेतो, पण आमचे सर्वांचे हे घडे रिकामे आहेत. तुमचाच मार्ग थोर तपस्वी, सिध्द पौरुषत्वाकडे नेणारा आहे. शरदचंद्राप्रमाणे शांत शीतल तेजस्विता तुमच्या दर्शनात मिळते. तेंव्हा आता एक आमची विनंती मान्य करा. तुमच्या भोजन सहवासाचा आम्हांला स्वाद द्या!’’ म्हादबा म्हणाले ‘‘तुमच्या रुपातच महाराज मेजवानी देत आहेत मला!’’ प्रसाद व भोजनानंतर श्री व्यास म्हणाले, ‘‘म्हादबा,आता तुमचे महाराजांचे अनुष्ठान सुखे चालू द्यावे, आम्ही जातो संसार कुपाते – जन्माची झडती द्यावया!’’
श्री म्हादबाचा निरोप घेऊन व्यासादीक गुरु बंधू आपल्या मार्गाला लागले. इकडे परत म्हादबा आपल्या अनुष्ठानावर जाऊन बसले. जरी, म्हादबाचा निरोप घेऊन निघाले तरी, त्या सर्व गुरु बंधूच्या मनात म्हादबांचा विषय घर करुन बसला होता. एवढे डास चावले तरी म्हादबा त्यांच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहतात. भुयारातील डास म्हादबांनी स्वत:च्या रक्तावर पोसले होते. ‘‘भूत प्राण्यावर दया’’ हे संतांचे स्पष्ट लक्षण म्हादबांच्या ठायी दिसून येत होते. इथे श्री म्हादबांनी श्री रामाच्या नामस्मरणात किती काळ कंठला हे समजणे कठीण झाले. कारण कांही कालावधीसाठी म्हादबांनी हे स्थान सोडले. महाराजांनी त्यांना सिध्दावस्थेत मात्र निश्चितच नेले होते. त्यांचे चिरंजीव व कै. डॉ. जनार्दन चव्हाण (श्री नामदेव महाराजांचे चिरंजीव) यांची भेट झाली होती. त्यानुसार डॉक्टर साहेबांनी मला सांगितलेला हा वृत्तांत असा की, स्वत: डॉ. जनार्दन चव्हाण हे मिरजेला मिशन हॉस्पिटल कडून निघाले होते. जवळच्याच एका फुटपाथावर एक संन्याशी महाराज बसले होते. त्यांच्या जवळ पुढ्यात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा फोटो दिसला. डॉ. साहेब महाराजांचा फोटो पाहताच तेथे तसेच थबकून विचार करु लागले की, ह्या संन्याशाच्या जवळ महाराजांचा फोटो कसा काय?
हा संन्याशी महाराजांच्या जवळ बसून त्यांना ते म्हणते झाले ‘‘महाराज तुम्ही कोण कुठून आलात?’’ तेंव्हा ते संन्याशी म्हणाले, ‘‘आम्ही संन्याशी तिर्थ यात्रा करत सारखे फिरत असतो. एका गांवात तीनदिवसा उपर आम्ही राहत नसतो.’’ डॉक्टरसाहेब परत विचारते झाले ‘‘बरं आमच्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा फोटो तुमच्याजवळ कसा काय?’’ तेंव्हा ते महाराज म्हणाले, ‘‘श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज आमच्या गुरुंचे गुरु!’’
डॉक्टरसाहेबांना अधिकच जिव्हाळा वाटल्यामुळे परत त्यांनी विचारले, ‘‘तुमचे गुरु कोण? त्यांचे नांव काय?’’ तेंव्हा संन्याशी महाराज उद्गारले, ‘‘माझे वडील तेच माझे गुरु!’’ महादेव हे त्यांचे नांव पण ‘‘म्हादबा’’ ह्या नांवानेच ते संबोधले जात. पण आपण एवढे सखोल कशाबद्दल विचारता? ‘‘म्हादबा कोष्टी हे आपले पिताजी काय?’’ डॉक्टरसाहेबांनी हा प्रश्न विचारताच संन्याशी महाराज पण त्वरित होय म्हणाले. मग डॉक्टरसाहेबांनी स्वत:चा परिचय सांगितला. एक नामदेव महाराजांचे चिरंजीव व एक म्हादबा कोष्टींचे चिरंजीव । दोघे गुरु बंधू । क्षणात दोघांच्या हृदयात आपुलकीचा स्नेह उफाळला । डॉक्टरसाहेबांच्या आग्रहामुळे नजिकच्या हॉटेलात त्यांनी प्रेमाने नाष्टा, चहा पान उरकले, एवढ्या मुदतीत डॉक्टरसाहेबांनी विचारली म्हणून म्हादबांची विशेष माहिती त्यांच्या या सुपूत्रांनी निवेदन केली, ती अशी तो काळ इंग्रजी आमदानीतला होता. म्हादबांना जिवंत समाधी घ्यावयाची होती. परंतु त्यावेळच्या इंग्रजी कायद्याप्रमाणे ती आत्महत्या ठरत असल्याने जिवंत समाधी घेण्यास परवानगी कलेक्टर साहेबाने नाकारली. म्हादबांचे मूळ गांव दक्षिण सातारा जिल्ह्यात (सध्याचा सांगली जिल्हा) कृष्णाकाठी होते. एक शुभदिवस ठरवून कृष्णा नदीच्या डोहात जलसमाधी घेण्याचे श्री म्हादबांनी निश्चित केले.
ठरलेल्या दिवशी कांही भाविक मंडळी जमली होती. विशेष ह्या गोष्टीचा डांगोरा मुद्यामच त्यांनी केला नाही. का तर याही प्रसांगाला इंग्रजी सरकार मज्जाव करील. श्री म्हादबांनी मग सर्वांचा अखेरचा प्रेमाचा निरोप घेतला व कृष्णानदीवर चालत चालत मध्यावर गेल्यानंतर परत सर्वजणांस तिथून नमस्कार करीत कृष्णा डोहात बुडू लागले. पोटापर्यंतचा भाग पाण्यात बुडाला असतांना तेथे त्यांचा एक मुलगा ‘‘बाबा! बाबा!’’ म्हणत धावत काठावर आला.
‘‘का रे, काय झालं ओरडायला’’ असे म्हादबांनी विचारता ‘‘तुम्ही गेल्यावर मला कोण?’’ असे अश्रुपूर्ण नेत्रांनी भरलेल्या सद्गदीत स्वरात विचारता, ‘‘आता ते तुझे बाबा’’ उजवा हात तिरकस आकाशाकडे निर्देश केला. तेंव्हा त्यांच्या चिरंजीवानी तिकडे पाहता शोकाकूल स्थितीत असतांना त्रयमुर्ती दत्तगुरु दिसले. कांही क्षण त्याने दत्तगुरुंचे दर्शन घेतले. नंतरच्या क्षणाला कृष्णाडोहात शेवटचा नमस्कार करुन कृष्णा नदीच्या डोहात प्रवेश केला. गुरुंच्या भक्तीसेवेतला देह म्हादबांनी कृष्णागंगेला अर्पण केला.
हा मुलगा म्हणजेच डॉक्टरसाहेबांच्या बरोबर बोलणारे म्हादबांचे चिरंजीव त्यांनाही दत्तगुरुंचा अनुग्रह झाला. तीस वर्षांपूर्वीचा हा संवाद. आज ते म्हादबांचे चिरंजीव निश्चितच शतसंवत्सरी केंव्हाच पार केलेले असावेत. ज्या कृष्णा डोहात म्हादबांनी देह विसर्जन केला ते ठिकाण, गांवाचे नांव डॉक्टरसाहेब पण पंचाहत्तरी ओलांडून गेलेल्या वार्धक्याच्या विस्मृतीने आठवू शकले नाहीत. दत्तगुरुंच्या अनुग्रह लाभलेला साधक हा सिध्दच होता. त्याप्रमाणे म्हादबा व त्यांचे संन्यास घेतलेले चिरंजीव सिध्दावस्थेला पोहोचलेले.
महाराजांनी स्वत:च्या एका कृपाकटाक्षाणे उत्तरप्रदेशातून आलेल्या योग्याभ्यासियांना अंतिम सिध्दी दिली होती. म्हादबांना पण महाराजांनी सिध्द केले होते. पाण्यावरुन चालत जाऊन डोहामध्ये देह समर्पण करणे म्हणजे स्वत:हून जल समाधी घेणे ही कांही सामान्य बाब नव्हे. ज्या डोहात त्यांनी देह समर्पण केला तेथे पोहण्यात निष्णात असलेल्या लोकांनी नदीतला तळगाळ शोधून पाहिला पण म्हादबा कोणालाही मिळाले नाहीत.
महाराजांनी स्वत:च्या पादुका कृष्णा लाडांच्या हाती दिल्या. आपल्या मागून येण्यास त्यांनी सागितले स्वत: ते नृसिंहवाडीला कृष्णा नदीत उतरुन पाण्यावरुन चालत पुढे गेले. त्यांच्या आज्ञेने त्यांच्या पादुका घेऊन कृष्णा लाड व वासुदेव दळवी त्यांच्या पाठोपाठ पाण्यावरुन चालत गेले. त्याच महाराजांचे म्हादबा हे पण तेवढेच लाडके शिष्य तपसिध्दीचे फळ म्हणून महाराजांनी त्यांना पण असेच सिध्दच करुन सोडले. अग्नीतून चालणे, आहे त्या स्थानीच अंतर्धान पावणे, पाण्यावरुन चालणे ह्या सारख्या सिध्दी प्राप्त असणारे कैक योगी अजुनही आहेत. स्वत: जनसमाजाचा उपद्रव नको म्हणून दूरच रहात असतात. ह्या विद्येवर जगांत प्रतिष्ठा मिळविण्यासाठी ह्या सिध्द पुरुषांचा अट्टहास नसतो. सिध्द झाले तरी त्यांचे भगवत चिंतन कमी झालेले नसते.
विधात्याने घालून दिलेली आयुष्याची मर्यादा संपली की, एक क्षण ह्या जगात जगण्यासाठी ते राजी नसतात. देहविषयी ते अनासक्त असतात. मृत्यूला थोपवून धरण्याची त्यांची हिंमत असते. अशी त्यांना दिव्य शक्ती प्राप्त झालेली असते. १४०० वर्षे ह्या शक्तीवर योगीराज चांगदेव जगले होते. होडीतून गंगा नदी पार करत असतांना एका जिज्ञासूने श्री रामकृष्ण परमहंसांना विचारले, ‘‘आपण पाण्यावरुन सहज चालत जाऊ शकत असतांना ह्या होडीत कसे काय बसलात? परमहंस उद्गारले, ‘‘हे पहा आपले काम चार पैशात होत असतांना विनाकारण एका रुपया कशाला खर्च केला पाहिजे.?’’ सिध्दी प्राप्त विभुती अशी शक्ती अनाठायी वापरत नसतात. म्हादबांना लाभलेल्या दिव्य शक्तीचा त्यांच्या गुरु बंधूनाही सुगावा लागला नाही. मोठेपण मिळवण्यासाठी ते कधी धडपडले नाहीत. सद्गुरुंचे ध्यान व श्री रामाचे नाम त्यांचे अव्याहतपणे चालत असे. महाराजांच्या नामस्मरणात कापड विणणारे म्हादबा म्हणजे महाराजांचे संत कबीरच होय. कमालाप्रमाणे त्यांच्या सुपुत्राने त्यांना धन्य केले. श्रीरामाचा जप करणारा साधक हा श्रीरामापेक्षा हनुमंताला अधिक प्रिय असतो. आपले श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज साक्षात हनुमंताचा अंश आहेत. हनुमंतानी श्री रामाला जसे हृदय मंदिरात कोंडले, तसेच श्री म्हादबांनी महाराजांना हृदय मंदिरातच कोंडले होते. बालपणापासून द्वेष, मत्सरादी पासून दूर असलेले पे्रमळ शुध्द अंत:करणाचे म्हादबा महाराजांच्या आसिम कृपेला पात्र ठरले. म्हादबा हे वेदशास्त्रात पारंगत असणारे कोणी पंडित नव्हते, पण पंडितालाही आचरता येणार नाही असा मार्ग म्हादबांनी आचरला, तो केवळ महाराजांच्या कृपेवर. ह्याच त्यांच्या श्रध्दा कृपेवर डास, कृमी, किड्यांचा तप साधनेत देहाला होणारा दंश दाह शमवला. त्या सूक्ष्मतम उपद्रवी किड्यांमध्येही त्यांनी सद्गुरुंची प्रतिमा पाहिली. देही असून विदेही झालेले म्हादबा म्हणजे गुरुबंधूनी व्यासांनी गौरवलेले खरोखरीचे सद्गुरुंचे थोर सुपुत्र होय. त्यांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम।
लेखक : – श्री. बाळासाहेब शांताराम नाडकर्णी, कोल्हापूर.