कर्नाटक राज्यातील गुलबर्गा, बसव कल्याण, बिदर (बेदर) या तीन इतिहास प्रसिध्द शहरामधील त्रिकोणाकृती क्षेत्र व्यापून गुलबर्ग्याचे पूर्व दिशेस पसरत गेलेल्या एका डोंगराळ प्रदेशास दरी किंवा दरीपट्टी म्हणतात. या डोंगराळ प्रदेशाचा रंग लाल असून, पाण्याची विपुलता भरपूर असल्याने हा भाग सुपीक चांगला सृष्टीसौंदर्याने व्यापलेला आहे. श्री खंडोबाने मणिमल्ल राक्षसाशी प्रचंड युध्द करुन त्याला जिंकले ते मैलार क्षेत्र येथेच आहे. दुसरी अनेक तीर्थक्षेत्रे या भागात आहेत. श्री गुरु चरित्रात या भागास / प्रदेशास मणिगिरी म्हणटले आहे तर पौराणिक कालात या भागाला मणिचूल म्हंटले आहे. या भागातील / प्रदेशातील लोकांची भाषा ही मराठी, कानडी, तेलगू आहे तर राजभाषा म्हणून उर्दु होती. मणिचूल पर्वत हा अनेक प्रकारच्या नरत्नांची खाण होवून बसला आहे. प्राचिन काळात पुलकेशी, चालुक्य, कलचुरी इत्यादी राज्यघराण्यानी या भागात राज्य केले. आपले साम्राज्य उभे केले. छत्रपती राजाराम महाराज यांचे शूर सरदार चंद्रसेन जाधव व त्यांचा पुत्र रामचंद्र जाधव यांच्या राजघराण्याने यशस्वी कारकीर्द साधली. चंद्रसेन जाधव, रामचंद्र जाधव हे करवीर संस्थानचे सेनापती, धनाजी जाधव यांच्या वंशातले थोर योध्दे, सेनापती, सरदार होते.
आज जे हुमणाबाद आहे ते राजा चंद्रसेन जाधवांनी वसवले असून, हुमणाबाद नगरीचे मूळ नांव हे ‘‘जयसिंग पेठ’’ असून ‘‘जयसिंगराव’’ हा किताब छ. राजाराम महाराजांनी शूर सेनापती धनाजी जाधवांना दिला होता. या धनाजी जाधवांच्या नांवाने, किताबाने ‘‘जयसिंग पेठ’’ वसवली होती. कल्याणच्या बिज्जल राजाच्या पदरीच महात्मा बसवेश्वर होऊन गेले. ते अत्यंत विद्वान शिवभक्त, कीर्तीवान, प्रभावशाली थोर सत्पुरुष श्री शंकराचा अवतार / शिव अवतार होऊन गेले ते या भागातच.

फार प्राचीन काळी थोर सत्पुरुष सदानंद स्वामी, त्यांचे शिष्य पूर्णानंद स्वामी, शिवराम स्वामी हे या भागातच कल्याणीला होवून गेले. अलंप्रभू, बक्कप्रभू असे अनेक लिंगायत धर्मातील थोर पुरुष या भागात बसव कल्याणीला होवून गेले. या अनेक नररत्नांचा बसव कल्याण / कल्याणी भाग जन्मभूमी, कर्मभूमी होती.
एकोणिसाव्या शतकातच एक नररत्न या पूण्यवान भूमीवर जन्माला आले. त्यांचे नांव श्री माणिक प्रभू होय. त्यांच्या वडिलांचे नांव मनोहर नाईक तर आईचे नांव बयमां असे होते. त्यांना बयादेवी सुध्दा म्हणले जायचे. श्री माणिक प्रभूंचा जन्म शके १७३९ मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी मंगळवार दि. २२/१२/१८१७ रोजी लाडवंती या त्यांच्या आजोळी झाला.
मनोहर नाईक हे देशस्थ ऋग्वेदी ओशलायन शाखेचे एक सुखवस्तू ब्राम्हण होते. त्यांचे मूळ गांव निजामशाहीतील कल्याण / कल्याणी जवळचे ‘‘हरकूड’’ हे होते. मनोहर नाईकाचे वाडवडील आपले खेडेगांव ‘‘हरकूड’’ सोडून व्यापार धंद्यासाठी बसव कल्याणला येवून राहिले होते. कल्याणास त्यांना ‘‘हरकूड’’ या आडनांवानेच ओळखत. त्यांच्या पूर्वजांचा व्यवसाय हा सराफी / सावकरीचा होता म्हणून त्यांना नाईक म्हणत. मनोहर नाईकांचे घराणे अत्यंत ईश्वरभक्त, सदाचारी, सात्विक, देशभक्त होते. त्यांच्या वडिलांचे नांव नृसिंह नाईक तर आजोबांचे नांव केशव नाईक होते. बिदर / बेदर जवळील झरणी नृसिंह हे त्यांचे उपास्य दैवत होते तर श्री खंडोबा त्यांचे कुलदैवत होते. मनोहर नाईकांच्या आईचे नांव बचंम्मा होते. त्या राम उपासक / हनुमान उपासक होत्या.
मनोहर नाईक व बयादेवी यांना शके १७३५ इ.स. १८१३ मध्ये पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले होते. बचंम्मा (आई) या हनुमान भक्त असल्याने मनोहर नाईकांनी या मुलाचे नांव श्री हनुमंत ठेवले होते. हेच श्री माणिक प्रभूंचे थोरले बंधु होय. यांना हणमंतरावदादा ऊर्फ दादामहाराज म्हणले जाई. मनोहर नाईक व श्री बयादेवी यांना तिसरा पुत्र प्राप्त झाला शके १७४९ सर्वजीत नाम सवंत्सर पौष शुक्ल त्रयोदशी, सोमवार इ.स.१८२७ या दिवशी. या पुत्राचे नाव नृसिंह ठेवण्यात आले. या तीन पुत्राशिवाय मनोहर नाईकांना चिमणाबाई नावाची मुलगी होती. मनोहर नाईकांच्या सर्व कुटुंबीयांना माणिक प्रभूंच्या जन्माने परमावधीचा आनंद झाला होता. त्यांचा जन्म बच्चंमाच्या माहेरी म्हणजे वडिलांच्या आजोळी लाडवंती येथे झाला होता. बालकाचे जातक पाहून मनोहर नाईक आश्चर्याने आनंदीत झाले होते. घरातील सर्वजण या बाळाला ‘‘रत्न्या’’ म्हणत. आपल्या कुळात हे एक अद्वितीय रत्न जन्माला आले आहे असे सर्वांना वाटे विशिष्ठ हेतुस्तव ईश्वरी संकेताने या सात्विक संपत्तीच्या साधारण घराण्यात / घरात प्रभूनेच जन्म घेतला होता. श्री दत्तात्रेयाने जन्म घेतला होता. एका सामान्य कुळात जन्म झालेला, स्वत: निस्संग निर्विकार, अनिकेत व अंकिंचन राहून त्यावेळच्या सर्व सामान्यांना आपल्याकडे प्रेमभावाने जवळ करतो, लाखो लोकांना अन्न, वस्त्र, निवारा धन देवून संतुष्ट करतो. सर्व जनांचे इप्सित / इच्छा / मनोकामना पूर्ण करुन कल्पद्रुम मानला जातो. म्हणूनच माणिक प्रभू अवतार गणला गेला / जातो.
तसेच जगाला आदर्शभूत ठरणारे एक तत्व स्वत: आचरणात आणून त्या मताची त्यांनी स्थापना केली. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत इत्यादी अनेक धर्मांच्या लोकांना एकाच ठिकाणी प्रेम भावाने त्यांनी आणले. यामुळे सर्व लोक प्रभुना ‘‘प्रभुखे प्रभू साक्षात’’ ‘‘पिरान पिर दस्तगीर’’ ‘‘नानक सोही माणिक’’ ‘‘धन्य प्रभू’’ म्हणू लागले. अशा रितीने माणिक प्रभूंचे प्रभुत्व लहानपणापासूनच प्रकट झाले. त्यांच्या दिव्यत्वाच्या ज्योतीचा प्रकाशाने बसव कल्याण व आसपासचा भाग दिपून गेला.
मनोहर नाईक व त्यांची आई बच्चंमाच्या निधनानंतर बयाबाई आपली तीन मुले हणमंतरावदादा, माणिक प्रभू, श्री नृसिंह व मुलगी चिमणाबाई यांना घेवून त्यांच्या थोरल्या भावांचे घरी राहू लागल्या. त्यांचे भाऊ बसव कल्याण नबाबाचे पदरी नोकरी होते. श्री माणिक प्रभुंच्या बालपणी बसव कल्याण / कल्याणी हे गांव नबाबाची जहागिर गांव होते / राजधानीचे गांव / शहर होते. श्रीमंत गांव होते. सोन्याचा धूर निघत होता. कल्याण गांवात गोसावी लोकांचा मठ, हे गोसावी लोक अत्यंत श्रीमंत होते. नबाबांचा किल्ला, सदानंद स्वामींचा मठ, बसवेश्वरांचा मठ व अनेक मोठे वाडे, बंगले यांचा समावेश कल्याण नगरीत होता. कल्याण नगरीत श्री माणिक प्रभू सर्वत्र फिरत असत. कल्याणी जवळ असलेल्या डोंगर, टेकड्या, तलाव, जंगले, आंब्याच्या बागा. हिरवीगार वनराई यातून स्वच्छंदपणे श्री प्रभू फिरत रहात. प्रभुंचे बहुतेक बालपण कल्याणसच गेले. श्री माणिकप्रभूंचे शिक्षण त्या वेळच्या कोणत्याही शाळेत झाले नाही. त्यांचा व्रतबंध / मुंज मनोहर नाईक यांनी करुन त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश दिला. अक्षर ओळख, वाचनही त्यांनीच प्रभुना शिकवले. बालपणाच्या अनेक लीलावरुन ते अवतारी आहेत. अशी सर्वांची खात्री झाली होती. अगदी लहानपणापासून प्रभुंचा एक
अलौकिक दिव्य पुरुष म्हणून लौकिक पसरला होता.
बालपणी प्रभु कधी शाळेत गेले नाहीत. इतर मुलां सारखे पुस्तक, पोथी पाठ करीत बसले नाहीत. सवंगडी जमवून खेळत बसणे, रानावनात एकटयाने फिरणे, देवस्थाने फिरणे, ध्यान लावणे, स्वच्छंदी जगणे. याप्रमाणे ते वेळ घालवित. कधी लंगोटी लावीत तर कधी अंगाला राख फासत, कधी अंगावर कपडे तर कधी दिगंबर. प्रभुंच्या या स्वच्छंदी व स्वैर वर्तनाने, वागण्याने लोक त्यांना वेडा म्हणू लागले. वेडा भाऊ म्हणून हाकही मारु लागले. कधी कधी हा वेडा भाऊ मोठ मोठ्या लोकांत उदात्त गोष्टी बोले तर बहुतेक काळ लहान मुलांच्या खेळात घालवी. त्यांच्या संगतीत लहान मुलांना अतिशय आनंद होई. प्रभुंच्या बोलण्यात व वागण्यात एक प्रकारचा आकर्षक भाव आनंद होता. श्री प्रभु लहानपणी कोणत्याही शाळेत गेले नाहीत, शिकले नाहीत. तरी हिंदी, मराठी, कन्नड, तेलंगी, उर्दू, फारशी, अरबी, व्रजभाषा इत्यादि अनेक भाषावर त्यांचे प्रभुत्व होते. या भाषेत त्यांनी कांही पदे केली आहेत. अध्यात्मिक ज्ञानसंपन्नता त्यांच्यामध्ये वास करीत होती. त्यांच्या वैराग्याची व औदार्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. ते लोकविलक्षण महात्मा, संत, गुरु म्हणून ख्याती पावले होते.
लौकिक अर्थाने कोणत्याही गुरुंचे गुरुत्व श्री माणिक प्रभुना लाभले नव्हते. ते कोणत्याही गुरुंचे शिष्य नव्हते. तरीही विेशाचे गुरुपद प्रभुंना प्राप्त झाले होते. गुरु सार्वभौम ही पदवी त्यांना लाभली होती. विेशाचे गुरुपद त्यांना लाभले होते. याचे बीज त्यांच्या बालपणाच्या कार्यातून दिसून येते. प्रभूंच्या बाललीला निसर्गाशी तादात्म पावण्याची त्यांची तदाकार वृत्ती, निसर्गापासून ज्ञान प्राप्त करुन घेण्याची विद्या, वृत्ती तर प्रभूंना पूर्ण अवगत होती. निर्मल निर्झर, झरे, सुंदर लता, डौलदार वृक्ष यांच्या सानिध्यात रमलेल्या पशु-पक्षींच्या अंत:करणाची भाषा, आत्म्याची भाषा प्रभुंना अवगत होती. त्यामुळे त्यांना उत्तम ज्ञान प्राप्त झाले होते. त्यामुळे ते निरतशयानंदात सदैव रममाण असत. अत्यंत बालवयातच त्यांना ज्ञान, योग सामर्थ्य, वैराग्य प्राप्त झाले होते. अवधूता सारख्या नित्यमुक्त देव दत्तात्रेयाने पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत पक्षी, अजगर, समुद्र, पतंग, मधुकर, हत्ती, मध-हरण करणारा मनुष्य, हरीण, मासा, पिंगळा, कुर्रपक्षी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा कारागीर, साप, कोळी, कुंभारीण, माशी या चोवीस गुरुंच्या वर्तन क्रमावर बारीक लक्ष ठेवून ज्ञान मिळविले. त्याच प्रमाणे श्री प्रभुंनी पंचमहाभूते, सूर्य, चंद्र, पशु, पक्षी, मनुष्यप्राणी यांच्या अंत:रंगात शिरुन बोध, ज्ञान मिळविले व ते ज्ञानसंपन्न, प्रज्ञावान विेशगुरु झाले ते बालपणीच.
गोविंदा गवळी, माळीणीला अपत्य प्राप्ती, भिमाबाई आप्पाराव जमादार (हैद्राबाद) यांना अपत्य प्राप्ती, पांढऱ्या विंचवाची गोष्ट, दगडांचे देव, प्रभुंचे धोतर, पागाटे बंधन, उनाड मुलाचा खोडकरपणा, काळंभट, भालचंद्र दीक्षित यांच्या हळीखेड मधील चमत्कार व वरील सर्व चमत्कार प्रभु कल्याणीस असतानाच घडले. प्रभूंच्या आवडत्या पट्टशिष्यामध्ये कल्याणचे लोकच अधिक होते. बालपणापर्यंतच श्री प्रभूंचा संबंध कल्याणसच जास्त होता. जगाचे कल्याण करण्यासाठी श्री प्रभूंनी कल्याण सोडले. परंतु कल्याणने प्रभूंना सोडले नाही. श्री प्रभू वियोगाने कल्याणच्या लोकांना अतिशय दु:ख झाले. कुलकर्णी, आळीतील आपले मामा बळवंतराव आप्पाराव कुलकर्णी यांच्या घराजवळच्या मारुतीच्या देवळाजवळच्या कट्ट्यावर श्री प्रभू नेहमी बसत या ठिकाणी श्री प्रभूंनी अनेक लिला केल्या. या ठिकाणीच श्री प्रभूंची गादी कल्याणला स्थापन झाली आहे. लहानपणी / बालपणी श्री माणिक प्रभूंच्या तोंडी प्रभू हा शब्द सतत / नेहमी असे. हा प्रभू शब्दच माणिक नांवापुढे जोडला गेला व आदराने नांव श्री माणिक प्रभू घेतले जावू लागले.

कल्याणीला श्री माणिक प्रभूंचा जन्म झाला. कल्याणीला श्री प्रभू लहानाचे मोठे झाले. बालवयातील त्यांचे सवंगडी, अबाल वृध्द यांचे प्रभू साक्षात देव बनून पूज्य झाले. प्रभूंचे सवंगडी / खेळगडी त्यांचे पुढे शिष्य बनून राहिले. घरची सर्व नाईक मंडळी, आप्त स्वकीय त्यांना देव दत्तात्रेय मानीत. सर्व चमत्कार, लीला या वयाच्या पंचवीसाच्या आतच घडल्या होत्या. आसपासच्या खेड्यातून, भागातून लोकांचा ओघ प्रभू दर्शनाला कल्याणीला येवू लागला होता. जमाव जमू लागला होता. कल्याण आता ‘‘नित्यश्री नित्यमंगल’’ उल्हासाने नांदत होते. अशाच एके वेळी श्री प्रभू एकाएकी गुप्त झाले. प्रभू कुठे गेले? कां गेले? कधी परत येणार? हे कोणालाच समजले नाही. श्री माणिक प्रभू कल्याण पासून तीन कोस मंठाळ गांवाजवळील चंडकापूर हद्दीतील अमृतकुंडावर प्रकट झाले. या अमृतकुंडालाच अंबीलकुंड म्हणतात. हे प्राचिन तीर्थ आहे. उन्हाळा – पावसाळा हे कुंड पाण्याने भरलेले असते. येथे हेमांड पंथी कलाकुसरीचे श्री शंकराचे जागृत प्राचीन स्थान आहे. ही तपोभूमी आहे. तक्की सोमण्णाचे (शिवमंदिर), सीतेची न्हाणी या अंबीलकुंडापासून जवळच आहेत. श्री प्रभूंचा वास या निर्जन स्थळी सहा महिने होता. येथुनच श्री प्रभूंचे जगउध्दाराचे कार्य सुरु झाले. येथे अनेक लीला / चमत्कार त्यांनी केल्या अंबीलकुंडाचे महात्म्ये श्री प्रभूंच्या मुळे वाढले. लोकांची वर्दळ वाढली, लोकांनी गजबजून गेले. जंगलात, निर्जन स्थळी मंगल वाद्ये वाजू लागली. भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठू लागल्या. श्री प्रभूंच्या जयजयकाराचा ध्वनी गर्जू लागला. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी लोकांच्या झुंडीच्या झुंडी श्री प्रभुंच्या दर्शनाला अंबीलतीर्थावर येवू लागल्या. अंबीलकुंडालाच ‘‘बूत्तीयात्रा’’ (काल्याचा प्रसाद) सुरु झाली. हे अरण्य आनंदाचे आनंदवन बनले ‘‘नित्यश्री नित्य मंगल’’ हे प्रभुसानिध्य राहिले. घरच्या व कल्याणच्या लोकांच्या आग्रहाने श्री प्रभू सहा महिन्यानंतर कल्याणीला परत गेले. परंतु श्री प्रभूंचे वास्तव्य पुढे कायमपणे कल्याणीस झाले नाही. पुढे बारा वर्षे श्री प्रभूंचा संचार या मणिचूल पर्वतावरील निर्जन स्थानी, जंगलात, मंदिरात झाला. श्री प्रभूंजवळ चिमणाजी नांवाचा शिष्य असे. झोळी व सटका ते सतत बरोबर घेत.
मणिचूल पर्वता प्रमाणेच मैलार हे अति प्राचीन क्षेत्र आहे. खंडोबाचे मुख्य क्षेत्र आहे. इकडील लोक मैलारला दक्षिण काशी समजतात. श्री प्रभु या क्षेत्री आल्यावर ‘‘नित्यश्री नित्यमंगल’’ सुरु झाले. हजारो लोक दर्शनाला येवू लागले. खारका, सुपाऱ्या, नारळ, पेढे, बर्फी हार यांचे ढीग श्री समोर पडू लागले. द्रव्यही अगणित जमू लागले. नाच, गाणे, पुराण, कथा, कीर्तन यांनी श्री प्रभुंचा दरबार भरु लागला. नित्य नवा रंग. खंडोबा यात्रा पार पडली. येथेच व्यंकम्मला श्री प्रभु गुरु गाठ पडले.
मैलारहून, भालकी, चिटगोपी अशा ठिकाणी प्रभुनी निवास करुन तेथील लोकांचा उध्दार केला. प्रभूंचा लौकिक वाढत होता, प्रसिध्दी वाढत होती. या वाढत्या लोकगर्दीला आळा घालण्यासाठी श्री प्रभूंनी तीर्थाटन करण्याचे ठरविले. तुळजापूर-पंढरपूर-गिरनार-प्रयागक ाशी-गया-हरिद्वार-गंगोत्री-बद्रीनाथ-केदारनाथ-माहूर-व्यंकटगिरी (तिरुपती)-कोल्हापूर- नृसिंहवाडी-मुधोळ-शेवटी गाणगापूर करुन शारीरिक कष्ट सहन करुन, लोकांना भगवद् भजनी लावून, कल्याण करुन ते परत कल्याणास अचानक प्रकट झाले. कांही दिवस कल्याणास राहून मणिचूल पर्वतावरील शेष स्थळी त्यांनी तीर्थाटन सुरु केले. गोट्टगोट्टीचे भयंकर अरण्य, करकनळ्ळीची बक्कप्रभूंची समाधी, रेकुळगी, केतकीसंगम अशा स्थळांना भेटी दिल्या. केतगीसंगमी श्री प्रभूंची गादी स्थापन झाली. न्यायक्कल करुन त्यांचे कुलदैवत झरणीनृसिंह बिदरजवळ आले. बिदर-राजुरी-भालकी-मंगलगी-कल्याण करुन हुमणाबादला आले. सर्वेेशरांच्या देवळा जवळील दोन बेलाच्या झाडांच्या सावलीत प्रभु निवांत बसून राहिले.
कल्याणच्या पूर्वेस पांच कोस (मैलावर) अंतरावर हुमणाबाद आहे. हुमणाबाद गांवाच्या पश्चिमेस एका मैलावर गुरुगंगा व विरजा दोन लहान नद्यांचा संगम आहे. या संगमावरच श्री प्रभुंनी माणिकनगरची स्थापना केली. शके १७६७ इ.स. १८४५ साली श्री प्रभुनी माणिकनगरची स्थापना केली. यापूर्वी श्री प्रभू या ठिकाणी बऱ्याच वेळा येवून गेले होते. त्यांना हा नद्यांचा संगम, भाग बरा वाटल्याने त्यांनी येथेच कायम वसतिस्थान करण्याचे ठरविले. हुमणाबाद (जयसिंगनगर) गडवंती, धुमणसूर या तिन्ही गांवच्या सीमा येथे मिळतात तेथे माणिकनगर वसले. श्री प्रभू हुमणाबाद जवळील संगमावर आत्ताचे (माणिकनगर) येथे येऊन राहिले त्यावेळेची परस्थिती बेबंदशाहीची होती. चोर, दरोडेखोर व पापवृत्तीच्या लोकांचा हा अड्डा होता. खून, हत्या, दारिद्र याने हा भाग अपवित्र बनला होता. परंतु भरपूर पाणी, स्वच्छ हवा, सुंदर निसर्ग यामुळे श्री प्रभू श्री सर्वेश्वरांच्या (महादेवाच्या) देवळाजवळील दोन बेलाच्या झाडांच्या सावलीत एका दगडाच्या कट्ट्यावर बसून राहिले. या कट्ट्याला ‘‘प्रभू कट्टा’’ म्हणतात. अशा रीतीने माणिकनगर स्थापन झाले. श्री प्रभू या स्थळी येऊन बसल्यानंतर थोड्याच दिवसांत विलक्षण शोभा आली. श्री प्रभूंच्या दर्शनासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. हुमणाबाद व आसपासच्या भागातून मोठमेाठे व्यापारी, नायब, अमीन, नवाब, लोक दर्शनांस येऊ लागले. सर्वेश्वराचे / महादेव मंदिराची स्वच्छता झाली. दुकानदारांची दुकाने लागली चोहीकडे यात्रेचे स्वरुप आले. सर्वेश्वराची पूजा, अर्चा, अभिषेक चालू झाले. बेलाखालील दगडी कट्टयावर प्रभू बसू लागले. दरबार भरू लागला. त्याठिकाणी ‘‘नित्यश्री नित्यमंगल’’ सतत चालू झाले. प्रभूंच्या अवतार कार्यातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे पतित उध्दार तेथून चालू झाला. श्री प्रभुच्या आई बयादेवी, भाऊ हणमंत दादा, नृसिंहतात्या, व्यंकम्मा व इतर अनेक लोक कल्याणहून हुमणाबादला आले. मोठ्या थाटाने माणिकनगराची स्थापना झाली. आदिभौतिक, आदिदैविक, अध्यात्मिकवास ज्या देव श्री दत्तात्रयामध्ये आहे. त्यांच्या गादीची स्थापना श्री अवधूत योगी माणिकप्रभुंनी केली. अवधुत दत्तात्रय हे स्वतः श्री माणिकप्रभु हेच होत. पुढे या माणिकनगरचा कायापालट, व्यवस्था, श्री प्रभुंच्या दोन्ही बंधूनी केला.
काशिपासून रामेश्वरपर्यंत प्रभूंची कीर्ती पसरली होती. हजारो लोक श्री प्रभूंच्या नित्य दर्शनाला येत व आपल्या परीने संतुष्ट होऊन जात. लोकांचे अंतरंग ओळखून श्री प्रभू त्यांचे ईप्सित/इच्छा पूर्ण करीत. श्री प्रभू सर्वकाळ आत्मरूपात निमग्न राहून आत्मानंदात डुलत रहात असत. आपल्या भक्तावरील सर्व संकटाचे ओझे आपल्या शिरावर घेऊन त्यांना निर्भयता देत असत. हिंदू, मुसलमान, शीख, लिंगायत, जैन इतर सर्व धर्माचे लोक श्री प्रभूंच्या दर्शनाला प्रेमभावाने येत. गरीब, श्रीमंत, श्रेष्ठ, कनिष्ठ, लहान, थोर, बालक, वयोवृध्द या सर्वांशी श्री प्रभु आत्मभावाने, प्रेमभावाने वागत व त्यांचे चित्त आकर्षित करून त्यांना आनंद देत. अशा प्रकारे आपल्या भक्तांना त्यांच्या आवडीच्या मार्गाने नेऊन , त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा उत्कर्ष करून त्यांचा उध्दार केला. श्री प्रभू हे उदारमतवादी होते. ते मूर्तीमंत, परमपवित्र, श्रेष्ठ ज्ञानावतार होते. हिंदू, मुसलमान, शीख, जैन, लिंगायत, ख्रिचन, बौध्द व इतर धर्मातील ज्ञान त्यांना प्राप्त झाले होते. ते सर्वोत्तम ज्ञान आपल्या अनुयायींना, शिष्यांना व्हावे या हेतुने त्यांनी ‘‘सकलमत’’ स्थापित संप्रदायाची’’ स्थापना केली. मुसलमान लोक त्यांना ‘‘महबूब सुबहानी’’ म्हणतात व पूजा करतात. श्री दत्तावतार श्री माणिकप्रभुनी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी शके १७८७ मंगळवार दिनांक २९ नोव्हेबर १८६५ रोजी माणिकनगर (हुमनाबाद) येथे समाधी घेतली.
संदर्भ गं्रथाचे नांव :- श्री माणिकप्रभु चरित्र
लेखक :- गणेश रघुनाथ कुलकर्णी