श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी, कोल्हापूर

भगवान शंकराने अगस्ती मुनींना साक्षात्कार देवून वर्णलेली करवीर नगरीलाच दक्षिण काशी म्हणतात. या क्षेत्रात महालक्ष्मीचे वास्तव्य आहे. इतर सर्व प्रकारची तीर्थ क्षेत्रे आहेत. म्हणून या क्षेत्राला ‘‘महामातृक क्षेत्र’’ असेही म्हणतात. या दक्षिण काशीचा एक प्रमुख शक्तिपीठ म्हणून उल्लेख काशीखंड, पद्मपुराण, देवी भागवत, हरीवंश पुराण, स्कंदपुराण, मार्कंडेशर पुराणात आढळून येतो. करवीर नगरीचा इतिहास ४ ते ५ शतकांपूर्वीचा आहे. कोल्हापूरच्या शिलाहाराच्या पाच पिढ्यापैकी पहिला ‘‘जतिग’’ याने कोल्हापूरात / करवीरात वास्तव्य केले होते. नवव्या शतकात राजा गंडवादीत ११ व्या शतकात जयसिंह, सिंघल, १३ व्या शतकात राजा तौलम, १६ व्या शतकात राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे राजाराम, महाराणी ताराबाई यांनी आमदनी, राज्य चालविले. या करवीर नगरीला ‘‘दक्षिण काशी’’ म्हणून ओळखले जाते.

कोल्हापूरच्या / करवीरच्या श्री महालक्ष्मी मंदिर व श्री महालक्ष्मी / श्री अंबाई मूर्ती यांची स्थापना केंव्हा झाली या बद्दल निश्चित असे कांही सांगता येत नाही. परंतु हे महालक्ष्मी मंदिर / श्री महालक्ष्मी / श्री अंबाबाई मूर्ती या अतिप्राचीन आहेत. श्री देवीची मूर्ती ही रत्नशिलेची असून वजन अंदाजे चाळीस किलो आहे. मूर्तीचा आकार साळुंकीच्या आकाराप्रमाणे असून, ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. मूर्तीच्या मागे सिंह उभा असून, मूर्तीत हिरकखंड मिश्रीत द्रव्य व वालुकामय दगड सांपडतो. मूर्तीच्या भूमध्यावर पद्मरागिणी आहे. मूर्ती चतुर्भुज असून, उजव्या हातात म्हाळुंग, डाव्या हातात पानपात्र आहे. मस्तकावर मुकूट असून, त्यावर शेषाने छाया धरली आहे. संशोधकाच्या मते मूर्ती पाषाणाची प्राचीनता ५ ते ६ हजार वर्षाची आहे. दररोज देवीची पाद्यपूजा, महापूजा, कुंकुमार्चन, रुद्राभिषेक यामुळे मूळ श्री देवीच्या मूर्तीची झीज होवून मूळ स्वरुप नष्ट होऊ लागले. म्हणून फाल्गुन शुध्द तृतीया १९५४ मध्ये श्री महालक्ष्मी / श्री अंबाबाई मूर्तीला वज्रलेप करण्यात आला. या श्री अंबाबाई/महालक्ष्मी सभोवताली लहान मोठी ३५ मंदिरे असून, मूळ मंदिराला जोडून सभा मंडप आहे. त्याला ‘‘गरुडमंडप’’ म्हणतात. या मंदिराची सर्व व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती करते.श्री अंबाबाई / श्री महालक्ष्मी भारतातील लाखो लोकांची कुलस्वामिनी आहे. मंदिराचा मुख्य उत्सव दसरा होय. चैत्र महिन्यात रथोत्सव मोठा साजरा करणेत येतो. या मंदिराच्या सभोवताली अनेक छोटी मंदिरे आहेत. त्यातीलच पूर्व बाजूचे राम मंदिर असून, त्या मंदिरात अक्कलकोटहून श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज करवीरी येवून प्रथम राहिले.

संदर्भ ग्रंथाचे नाव :- श्री महालक्ष्मी दर्शन

लेखकाचे नाव :- नंदकुमार मराठे

हा लेख, परम पूज्य श्री झेंडे महाराज लिखित, “समुद्र भरला आहे” या ग्रंथातून घेतला आहे.

Comments are closed.