श्री नृसिंहवाडी ( नरसोबावाडी )

कुरवपूर येथील ज्या ‘‘अंबिका’’ नावांच्या ब्राम्हण स्त्रीला श्री श्रीपाद श्रीवल्लभांनी आशीर्वाद दिला होता, ती स्त्री कारंजे (करंजनगरी) जि. अकोला येथे वाजसनेयी ब्राम्हण कुळात जन्मली या जन्मातील तिचे नाव ‘‘अंबा भवानी’’ होय. त्याच कारंज्या गावातील ‘‘माधव’’ नांवाच्या ब्राम्हणाशी तिचा विवाह झाला. कुरवपूर येथील गेल्या जन्मातील पूर्व संस्कारामुळे ‘‘अंबा भवानी’’ शनी प्रदोष व्रत करु लागली. सोळा वर्षानंतर या शनी प्रदोष व्रतामुळे श्री शंकराच्या कृपेने शके १३०० (इ.सन १३७८) च्या सुमारास तिच्या उदरी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हे बालक म्हणजेच ‘‘श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज’’ होय. जन्मत:च या बालकाने ओंमकाराचा उच्चार केला. या बालकाचे नाव ‘‘शालग्रामदेव’’ ठेवणेत आले. परंतु रुढ नाव ‘‘नरहरी’’ हेच झाले. त्यांच्या कुळाच्या उपाध्येनी या मुलांचे जातक खालील प्रमाणे वर्तविले व बालकाला नमस्कार घातला.

कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥
याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विûवासी ॥
याचे वाक्य होईल परिस । चिंतामणी याचे चरण ॥
अष्ट सिध्दी याचे द्वारी । वोळगंत राहतील निरंतरी ॥
होईल हा अवतारी पुरुषी । आम्हा दिसतसे भरवंसी ॥
न धरावा संदेह मानसी । म्हणोनी करिती नमस्कार ॥

श्री गुरुचरित्र

नरहरी आई वडीलांच्या सावलीखाली चंद्र – सूर्याप्रमाणे वाढू लागला. तो आता सातआठ वर्षाचा झाला. परंतु तो बोलत नसल्याने आई-वडील माधव व अंबा भवानीला मोठी चिंता, काळजी लागून राहिली. त्यांना फार दु:ख झाले. निदान मुंजीनंतर तर नरहरी बोलेल या विचाराने त्यांनी त्यांची मुंज करण्याचे ठरविले. मुंज/व्रतबंध मोठ्या थाटाने केला. नरहरीला गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली. तो बटू होऊन आईकडे भिक्षा मागावयास गेला. ही भिक्षा मागतानाच आजपर्यंत मौन स्थितीत असलेल्या, मुका असलेल्या नरहरीच्या मुखातून वेदवाणी प्रकटली, बाहेर पडली, या मोठ्या चमत्काराने दु:खी आई वडिलांना अतिशय आनंद झाला. मुंजीला जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कौतुक वाटले.

ब्रम्हचारी व्रताचे पालन करुन, वेद अध्ययन करुन, भिक्षाटन करुन तीर्थाटन करण्याचा मनोदय नरहरीने आईला सांगताच ती मूर्च्छितच पडली. मूर्च्छेतून सावध होताच ती नरहरीला म्हणाली ‘‘बाळा, सोळा वर्षे शनी प्रदोष व्रत करुन, शिवाची आराधना करुन त्याच्या कृपेने तू माझ्या पोटी जन्मलास, सात – आठ वर्षे तू बोलला नाहीस. मुका मुलगा पोटी जन्माला आला म्हणून आम्ही उभयतांनी दु:खात, विचारात दिवस काढले आणि आता बोलू लागल्यावर आम्हाला अतिशय आनंद झाला. आमचे दु:ख दैन्य संपले असे वाटले. परंतु लगेचच तू आम्हांला सोडून जातो म्हणतोस यामुळे आमचा प्राणच नष्ट होणार आहे.’’ हे ऐकून नरहरी बाळालाही अतिशय दु:ख झाले. कसेबसे त्याने आई ‘‘अंबा भवानी’’ चे सांत्वन केले व तिला पूर्वजन्माचे स्मरण करुन दिले. तिला गेल्या जन्मातील ‘‘श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे’’ दर्शन झाले. तरी, मायामुळे तिने नरहरीला धर्म विहीत आश्रम पालनाची आठवण करुन दिली.

संवत्सर एक तुझ्या घरी । राहू माते निर्धारी ॥
वासना पुरतील तुझ्या जरी । मग निरोप दे मज ॥

श्री गुरुचरित्र

असे ‘‘आई अंबा भवानी’’ ला सांगितले, एक वर्षाच्या कालावधीत कारंज्या नगरीतील सर्व लोकांना नरहरीने आपल्या वागण्याने, बोलण्याने, प्रज्ञेने जणू वेडच लावले. एक वर्षात ‘‘अंबा भवानी’’ ला दोन जुळे मुलगे झाले. ही दोन्ही तान्ही बाळे तीन-चार महिन्यांची होताच नरहरीने मातापित्यांचा दु:खद अश्रुंनी निरोप घेतला व भक्तकल्याण, जनकल्याण, धर्मस्थापनेसाठी श्री काशीक्षेत्राकडे प्रस्थान केले. यावेळी त्यांचे वय केवळ ८-९ वर्षाचे होते. मणिकर्णिकाघाटावर स्नान करणे, श्री विश्वेश्वरांचे दर्शन घेणे, भिक्षा मागणे, साधुसंत, तपस्वींच्या सहवासात काळ घालविणे, हा त्यांचा नित्यक्रम झाला. केवळ हे आठ-नऊ वर्षांचे तेजस्वी बालक काशीच्या लोकांच्या कुतुहलाचा विषय झाला.

मणिकर्णिका घाटावर रोज स्नानाला येणाऱ्या शृंगेरी मठातील विद्यारण स्वामींच्या परंपरेतील ३०० वर्षे वयाच्या श्रीकृष्ण सरस्वती या यतीना, योग्याला नरहरी विषयी विस्मय, कौतुक वाटू लागले. त्यांच्यात नरहरीविषयी वात्सल्याची भावना निर्माण झाली. त्यांनी काशीतील सर्व अधिकारी पुरुषांशी चर्चा करुन संगनमताने संन्यास धर्माच्या रक्षणासाठी, प्रतिष्ठेसाठी नरहरीला संन्यास दीक्षा दिली व नरहरी चे संन्यास, दीक्षेनंतरचे नाव ‘‘नरसिंह सरस्वती’’ ठेवले. काशीत काही काळ श्रीकृष्ण सरस्वती गुरुंच्या सानिध्यात राहून, ज्ञानदानाचे कार्य करुन अनेक जिज्ञासूना अनेक मुमुक्षांना परमार्थाची वाट दाखवून अनेक मुनींना, साधूंना घेवून श्री नरसिंह सरस्वती बद्रीनाथ, केदारनाथ, तीर्थयात्रा करुन गंगासागर करुन प्रयागच्या तीर्थसंगमावर आले. प्रयागला माधव सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानजोती सरस्वती, सिध्द सरस्वती यांना संन्यास दीक्षा देवून शिष्य बनविले.

प्रयागहून निघून नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे निघाले. वयाच्या ८-९ व्या वर्षी त्यांनी घर, आपले गाव कारंजे सोडले होते. परत एकदा ते कारंज्याला ३० वर्षांनी परत आले. त्यांच्या पुर्नदर्शनाने त्यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण यांना अतिशय आनंद झाला. नरहरींनी जेंव्हा कारंजा सोडून काशीकडे प्रयाण केले, त्यावेळी त्यांना दोन जुळे भाऊ होते. नंतर आई ‘‘अंबा भवानी’’ ला दोन पुत्र व एक कन्या (रत्नाई) झाली. एकूण चार भाऊ व एक बहीण ही आता मोठी झाली होती. आपल्या संन्याशी भावाचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व पाहून, परमज्ञान पाहून, तेज-पुंजपणा पाहून सर्व भावंडांना या अपरिचित भावाविषयी विस्मय वाटला, आनंद वाटला. पूज्यभाव त्यांच्यात निर्माण झाला. कारंजाच्या ग्रामस्थांमध्येही त्यांच्या विषयी आदर, पूज्यभाव निर्माण झाला. आपल्या घरच्या लोकांना ग्रामस्थांना अल्प सहवास देवून नरसिंह सरस्वती कारंज्याहून त्र्यंबकेश्वर शिव दर्शन करुन, गोदावरी प्रदक्षणा करुन वासर ब्रह्मेश्वरला आले. तेथे पोटशुळ्या ब्राम्हणाचा उध्दार करुन ते भिलवडी, औदुंबरला (सन १४२२) च्या आसपास आले. औदुंबराच्या घनदाट छायेत एक चार्तुमास काढून (चार महिने) कोल्हापूर येथील एक मंद बुध्दीच्या ब्राम्हणाचा भुवनेश्वरी देवीच्या आज्ञेने उध्दार करुन नरसिंह सरस्वती कृष्णा पंचगंगा संगमावरील ‘‘अमरापूर’’ औरवाड या गांवी इ.स. १४२२ आले. या निसर्गरम्य ठिकाणी आल्यावर श्री नृसिंह सरस्वतींचे मन रंगून, आनंदून गेले.

शिवा भद्रा भोगावती । कुंभी नदी सरस्वती ॥
पंचगंगा ऐसी ख्याती । महापातक संहारी ॥
ऐसी प्रख्यात पंचगंगा । आली कृष्णेचीया संगा ॥
प्रयागाहूनी असे चांगा । संगमस्थान मनोहर ॥

श्री गुरुचरित्र

असे हे पंचगंगा संगमस्थान पूर्वीपासून तपोभूमी, तीर्थभूमी निसर्ग सौंदर्याने नटलेली होती. श्री नरसिंह सरस्वतींचे तप:प्रिय मन येथे आनंदाने स्थिरावले, विसावले. बारा वर्षे ते या पवित्र संगम स्थानावर वास करुन राहिले. त्यांच्या या बारा वर्षाच्या तपाने या स्थानाला त्यांच्याच नावाने ‘‘नृसिंहवाडी/नरसोबा वाडी’’ ओळखले जाऊ लागले. श्री नरसिंह सरस्वतींचा निवास अलिकडे तिरावर म्हणजे नृसिंहवाडीला तर नदीच्या दुसऱ्या तिरावर / समोर अमरापूर (औरवाड) हे वस्तीचे गाव. श्री नरसिंह सरस्वतींनी नृसिंहवाडीला तपश्चर्या, चिंतन, मनन करावे, अनेक आर्ताची दु:खे दूर करावीत. अनेक जीवांचे कल्याण करावे तर पैलतीरा वरील आमरापूर/ औरवाडला भिक्षेला जावे.

घेवड्याच्या वेलाचा प्रसंग अमरापूर / औरवाडला घडला आहे. ज्या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वतींनी तपश्चर्या केली त्या ठिकाणी आपल्या मनोहर दिव्य पादुका स्थापन करुन त्यांनी गाणगापूरकडे प्रस्थान केले. श्री नरसिंह सरस्वतींच्या नांवाने नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र निर्माण झाले. त्यांनी सन १४२२ ते १४३४ अशी बारा वर्षे या तपोभूमीत घालविली.

श्रीक्षेत्र गाणगापूर हे भीमा अमरजा या दोन नद्यांचा संगमावरील गाव. येथे त्यांनी दोन तपे म्हणजे २४ वर्षे तपश्चर्या केली. गाणगापूरच्या वास्तव्यात त्यांनी अनेक आर्ताची दु:खे दूर केली. अनेकांना, त्रिविक्रम भारतींना गुरुबोध ज्ञान दिले. स्वधर्माची जागृती केली, बेदरचा बादशहा अल्लाऊद्दीन (दुसरा) याचा उध्दार केला. बेदरहून ते सिंहस्थ यात्रेसाठी कुंभमेळ्याला नाशिक-त्र्यंबकेश्वरला जाऊन परत गाणगापूरला आले. गाणगापूरला येवून येथील लोकांना धर्म उपदेश करुन गाणगापूरला संगमावर कायमपणे निर्गुण रुपाने राहण्याचे आश्वासन देवून श्री शैल्य गमन केले. श्री सिध्द सरस्वती, सायंदेव, नंदी कवीश्वर, नरहरी कवीश्वर यांनी त्यांना कर्दळीच्या पानाच्या आसनावर बसवून जड अंत:करणाने निरोप दिला. तो दिवस म्हणजेच गुरुद्वादशी होय.

श्री नृसिंहवाडीला श्री नरसिंह सरस्वतींच्या पूर्वी श्री रामचंद्र योगी तपस्वी होवून गेले. त्यांच्या कठोर तपश्चर्येचे फल देण्यासाठी श्री नरसिंह सरस्वती या स्थानी आले. श्री नारायण स्वामी, श्री कृष्णानंद सरस्वतीे, श्री गोपाळस्वामी, श्री मौनी स्वामी, श्री ब्रह्मानंद सरस्वती, श्री गोविंदस्वामी, श्री महादबा पाटील महाराज धुळगांवकर इत्यादी थोर तपस्वींची नृसिंहवाडीला वंदनीय समाधीस्थाने आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामींनीही बराच काळ या तीर्थक्षेत्रावर वास्तव्य करुन घालविला आहे. तर श्री नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेल्या दिव्य मनोहर पादुकांची / मंदिराची पूजा ही आलास गांवच्या बहिरंभटजीच्या घराण्यात वंश परंपरेने चालली आहे.

संदर्भ ग्रंथाचे नाव :- श्री नृसिंहवाडी माहात्म्य

संकलन/संपादन :- प्रा. सौ. नम्रता भट

Comments are closed.