॥ श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज प्रसन्न ॥
॥ श्री स्वामी समर्थ प्रसन्न ॥
॥ श्री शिव चिदंबर स्वामी प्रसन्न ॥
॥ श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर प्रसन्न ॥
श्री दत्तात्रय भारतीय संस्कृतीतील प्राचीन देवता आहे. श्री दत्त उपासना ही प्रामुख्याने महाराष्ट्रातच गेली हजार बाराशे वर्षे अव्याहतपणे चालत आलेली आहे. श्री दत्त उपासना ही शैव/ वैष्णव / शाक्त या तिन्ही संप्रदायात दिसून येते. तसेच महानुभवी संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदयामध्ये प्रामुख्याने श्री दत्त उपासना विशेषत्वाने / प्रकर्षाने चालत आलेली आहे. महाराष्ट्रात श्री दत्त संप्रदाय गेली पाच-सहाशे वर्षापासून चालत आलेला असून, हिंदू / मुसलमानांचा यात समावेश दिसून येतो.
श्री दत्तात्रेय देवतेचा उल्लेख पुराणात, महाभारतात आढळून येतो. श्री दत्तात्रेयांचा जन्म अत्रिवंश कुळात ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या आशीर्वादाने झालेला असून, याचा उल्लेख मार्कंडेय पुराणात प्रामुख्याने आलेला आहे. अत्रिऋषींनी ऋक्ष पर्वतावर पुत्र प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली होती असा उल्लेख ब्रम्ह पुराणात दिसून येतो. परंतु श्री नारदाने केलेल्या अनुसूयेच्या सतीत्वाच्या गौरवामुळे ब्रम्हा – विष्णू – महेश भगवानांच्या पत्नीमध्ये अनुसुयेच्या सतीत्वाबद्दल द्वेष निर्माण झाला. अनुसुयेचे सत्त्व हरण करण्यासाठी देवी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती नी श्री ब्रम्हा – विष्णू – महेश यांना अत्रिऋषींच्या आश्रमात पाठविले. सत्त्व हरण करणेसाठी आलेल्या भगवान ब्रम्हा, विष्णू , महेश यांनी अनुसूयेला सांगितले की, ‘‘तू विवस्त्र होऊन भोजन वाढीत असशील तर अतिथी म्हणून भोजन करू’’ आश्रमात तर अत्रि ऋषी नव्हते. अतिथींनी तर भोजन स्वीकारले पाहिजे अशा दुहेरी संकटात अनुसूया देवी अडकल्या. अतिथींची भोजनाची अट अनुसूया मातेने स्वीकारून श्री अत्रि ऋषिंचे स्मरण करून या तिन्ही अतिथी देवावर तीर्थ शिंपडले. त्याबरोबर हे तिन्ही देव (ब्रम्हा-विष्णू-महेश) लहान बाळे
झाली. त्यांना दूध पाजून तृप्त केले.
इकडे आपल्या पतींची वाट पाहून श्री देवी लक्ष्मी / पार्वती / सरस्वती अत्रि ऋषिंच्या आश्रमात आल्या. पाहतात तो आपले पती लहान बाळे झालेली असून, पाळण्यात झोपलेली आहेत. त्यांना ओळखणेही कर्म कठीण आहे. अनुसूयेचे सतीत्व/श्रेष्ठत्व मान्य करून त्या तिन्ही देवी अनुसूयेला शरण गेल्या व आपल्या पतींना देवांना पूर्ववत रूप देण्याविषयी विनंती केली. तिन्ही देवांच्या भार्यांनी केलेल्या विनंतीला मान देवून अत्रि ऋषिंचे स्मरण करून पुन्हा तीर्थ शिंपडून अनुसूयेने तिन्ही देवांना पुन्हा पूर्वरूप दिले. पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तिन्ही देवांनी / देवींनी अनुसूयेची प्रशंसा केली / सतीत्त्वाचा उच्च गौरव केला व वर मागणेस सांगितला.यावर अनुसूयेने या तिन्ही देवांना (ब्रम्हा-विष्णू-महेश) आपल्या पोटी अवतार घेणेबाबत वर मागितला. या वरानेच भगवान ब्रम्हा-विष्णू-महेश यांनी अनुसूया देवीच्या पोटी जन्म घेतला. अवतार श्री दत्त अवतार चरित्राबाबतीत अनेक वेगवेगळ्या कथा पुराणातून दिसून येतात. परंतु वरील कथाच सर्व मान्य झालेली आहे. भगवान दत्तात्रेयांनी भगवान शंकराची आराधना करून ब्रम्हज्ञान प्राप्त केले म्हणून नाथ संप्रदायात श्री दत्तात्रेयांची आराधना मुख्यत: दिसून येते. तसेच भगवान दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केल्याचे आढळून येते. या चोवीस गुरूकडून वेगवेगळे गुण घेतले असून, या चोवीस गुणातच त्यांना ‘‘जग संपूर्ण गुरू दिसे’’ ही भावना निर्माण झालेली दिसून येते. हे चोवीस गुण भगवान दत्तात्रयांनी/अवधूतांनी घेतलेले आहेत. अवधूत हे नाव भगवान दत्तात्रेयांचेच आहे. शांतीब्रम्ह पैठण निवासी संत एकनाथ महाराजांच्या खालिल अभंगातून श्री अवधूताचे दर्शन घडून येते.
श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग –
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो म्यां गुरु केला जाण ।
गुरुंसी आले अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥
ज्याचा गुण घेतला । तो सहजे गुरुत्वा आला ।
ज्याचा गुण त्यागरुप घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागे ॥
तो अवधूत जाण दत्तात्रेया । तेने आलिंगूनी यदुराया ।
निजरूपाचा बोधु तया । अनुभवावया दीधला॥
श्री दत्तात्रेय देवांनी १६ अवतार घेतल्याचे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांच्या ग्रंथातून दिसून येते. सोळा अवतार पुढीलप्रमाणे –
१) योगीराज
२) अत्रिवरद
३) दत्तात्रेय
४) कालाग्निशमन
५) योगिजनवल्लभ
६) लिलाविश्वंभर
७) सिद्धराज
८) ज्ञानसागर
९) विश्वंभर
१०) मायामुक्त
११) माया युक्त
१२) आदिगुरू
१३) शिवरूप
१४) देवदेव
१५) दिगंबर
१६) कृष्णशामकमलनयन
वरील अवतार / उपनिषदे, पुराणातून इतर ग्रंथातून प्राचीन काळापासून चालत आलेले दिसून येतात. मात्र दत्त संप्रदायात अत्रिवरद त्रैमुखी श्री दत्तात्रेय – श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, श्री माणिकप्रभू हे प्रामुख्याने अवतार मानणेत येतात.
श्री भगवान दत्तात्रेय हे योगीराज असून हे जटाजूटधारी, अवधूत, दिगंबर स्वेच्छा विहारी आहेत. ते पांचाळेश्वरी स्नान करतात. तर कोल्हापूरला भिक्षा घेतात तर तुळजापूरला हात धुतात व माहूरला निद्रा घेतात/विश्रांती घेतात असा उल्लेख आढळून येतो. श्री ब्रम्हा, विष्णू-महेश ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती अशीच श्री दत्तात्रेयाची ओळख असून, उत्पत्ति-स्थिती-लय तसेच सत्व-रज-तम यांनी अशी ही श्री दत्तात्रेयाची ओळख आहे. संत एकनाथ महाराजांनी श्रीदत्तात्रेयांची आरती ‘‘त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त हा जाणा’’ अशी केली आहे. तर श्री संत तुकाराम महाराजांनी
तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ॥१॥
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ॥२॥
माथा शोभे जटाभार । अंगी विभूति सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ॥४॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥
असे सुंदर वर्णन अभंगात केले आहे. कांही ठिकाणी एकमुखी दत्तात्रेयाची पूजा-अर्चा दिसून येते. महाभारत, पुराणे, अर्वाचीन उपनिषिदे यातून एकमुखी श्री दत्तात्रेयांचा उल्लेख आढळून येतो.
अवधूत संप्रदाय
भारत देश हा अध्यात्माचे माहेरघर आहे. ही गुरूचरणांनी पावन झालेली भूमी आहे. प्राचीन ऋषिमुनी अत्यंत उदारमतवादी होते. त्या काळात प्रत्येक व्यक्तीस धार्मिक व वैचारिक स्वातंत्र्य होते. म्हणून पुरातन वैदिक संप्रदायात अनेक मतभेद दिसून येत होते. यामुळे धर्मस्थापक ऋषिमुनींनी आपापल्या अनुयायांना नित्यनैमित्तिक आचरणाबाबत निर्दिष्टांचे मार्गदर्शन केल्याने, समाजात आचारभिन्नता दिसून आली आणि निरनिराळे पंथ अस्तित्वात आले. असे असून देखील वैदिक धर्माचा अंतिम उद्देश मोक्षप्राप्ती किंवा ब्रम्हात्मैक्य हा एकच होता. विविधतेतून एकता हेच सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे.या जुन्या उदारमतवादामुळे समाजात द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत, शक्तीपद्धती, शाक्त पंथ, अवधूत पंथ अशा अनेक पंथांचा उदय झाला. या सर्वामध्ये अवधूत संप्रदाय अत्यंत प्राचीन होता. अवधूत संप्रदायाचे आद्यप्रर्वतक श्री दत्तात्रय स्वयंभू. त्यांनी भगवान श्रीरामास त्रिपुरा रहस्य सांगितले. विभक्ती संप्रदायाचा अवधूत संप्रदायाशी जवळचा संबंध आहे. श्रुती शास्त्रांच्याप्रमाणे गुप्तज्ञान स्वानुभवाने सिद्ध करून दत्तात्रयां अवधूत मार्गाचा प्रचार केला.
संप्रदाय म्हणजे काय ? (गुरूमार्ग म्हणजे काय ?)
सद्गुरूने, सन्मार्ग दर्शन केल्याप्रमाणे प्रपंची व परमार्थी ब्रम्हात्मैक्याचा पूर्णानुभव घेऊन निर्लिप्तपणे ब्रम्हनिष्ठेने, स्वत:चे दैनंदिन व्यवहारांत केवळ साक्षीभूत राहून समाजात कोणत्या प्रकारे वर्तन ठेवावे या संबंधात, त्या त्या संप्रदायाने आपापल्या अनुयायांना केलेले स्वानुभवसिद्ध मार्गदर्शन हाच खरा संप्रदाय.अवधूत म्हणजे कोण ?
अक्षरत्वाद्वरेण्यत्वाद धूत संसार बंधनात्
तत्वमत्स्यादि लक्षीत्वाद् अवधूत इतिर्यते
यो विलंग्याश्रमान वर्णान् आत्मन्येन्नेवस्थित: सदा ।
अतीवर्णाश्रमी योगी अवधूत: स कथ्यते ।
अवधूत शब्दाचा तात्विक अर्थ
अवधूत चार अक्षरांचा संयोग आहे.
‘‘अ’’ आशापाश विनिर्मुक्त आदि मध्यात निर्मल: आनंदे वर्तते नित्यं अकारं तस्य लक्षणम् ।
अर्थ : आशापाशमुक्त, सर्वत्र निर्मळ, सदोदित आनंदी असे लक्षण असणारा
‘‘व’’ वासना वर्जिता येन वक्तव्यंच निरामयम् वर्तमानेषु वर्तेत वकारस्तस्य लक्षणम् ।
अर्थ : वासनावर्जित, निरामयवक्तव्य, वर्तमानात वावरणारा (भूतकाळाबद्दल किंचितही विषाद न राखणारा व भविष्यकाळाबद्दल योग मग्न न होणारा) असा व अक्षरांचा संकेत.
‘‘धू’’ धुलि घूसरगात्राणि धूतचित निरामय: धारणा ध्यान निर्मुक्तो धूकारस्तरस्य लक्षणम्
अर्थ : बहिरंग शुध्दीकडे विशेष लक्ष पुरविलेले नसले तरी अंतरंगाच्या पावित्र्याकडे संपूर्ण लक्ष देणारा, सदा प्रसन्नचित असणारा, ध्यानधारणाविना क्रियांबद्दल निर्लिप्त असणारा असा ध्यान अक्षराचा संकेत.
‘‘त’’ – तत्वचिंता धृतायेन चिन्ताचेष्टा विवर्जित: तमोहंकार निर्मुक्त: ‘‘त’’ कारस्तस्य लक्षणम्
अर्थ : चिंता व चेष्टा तसेच तमोगुण – प्रधान अहंकार त्याग केलेला. सदोदित तत्वमसी महावाक्यां विचारात निमग्न असणारा हा ‘‘त’’ अक्षराचा संकेत.
अवधूताची लक्षणे
रथ्या कर्पट विरचित कंथा । पुण्यापुण्य विवर्जित पंथा
शून्यागारे तिष्ठती नग्नो । शुध्द निरंजन समरस मग्न: ।
अवधूत संप्रदाय प्राचीन –
१) नित्यानित्य वस्तुविवेक (नेशर संसाराची कल्पना)
२) वैराग्य
३) मुमुक्षूत्व
४) वर्णाश्रम बंधनमुक्त
५) बलहीन व अशक्तांना देखील अधिकार
६) साधनेची आवश्यकता नाही
७) स्त्रियांना प्रवेश नाही
८) बंधमुक्त, योग्य – अयोग्य हे भेद नाहीत
९) अनन्य शरणागती
१०) अनुग्रहप्राप्ती
११) तात्काळ मुक्ती
१२) कर्मकांड वर्ज्य (विधी निषेध त्याग)
१३) गुरुभक्ती,गुरुमंत्र आवश्यक
१४) गुरुसेवेची अपेक्षा नाही
१५) आश्रमवासी नसल्याने भिक्षा जीवन
१६) अरण्यवास
१७) अहंकाराला जागा नाही
१८) प्रारब्धाला किंमत नाही
१९) पूर्वजन्म व पुर्नजन्मावर विश्वास नाही
२०) ब्रम्हनिष्ठा
२१) ब्रम्हप्राप्ती, ब्रम्हानुभव कृतकृत्यता
२२) सदगुरुभजन
२३) जीवनमुक्ती, देहांतमुक्ती अपेक्षित
२४) निरंकुश वृत्ती
पंतप्रणित अवधूत मार्ग
१) संसार अशोशत – तुच्छ, गुंतणे अयोग्य
२) वैराग्य असले तरी प्रपंचत्याग नको
३) मुमुक्षूत्व
४) वर्णाश्रम बंधने नाहीत
५) बलहीनाला देखील अधिकार
६) साधना करण्याची गरज नाही
७) स्त्रियांना पण प्रवेश
८) बंधमुक्त, योग्य – अयोग्य असे भेद नाहीत
९) अनन्य शरणागती
१०) अनुग्रहप्राप्ती – ऐक्य बोध समरस भाव
११) तात्काळ मुक्ती
१२) कर्मकांड वर्ज्य
१३) गुरुभक्ती, गुरुमंत्र पठण आवश्यक
१४) गुरुला सेवेची अपेक्षा नाही
१५) स्वावलंबन
१६) सहजीवनाची आवश्यकता
१७) अहंकाराला जागा नाही
१८) प्रारब्धाला किंमत नाही
१९) पूर्वजन्मावर विश्वास पण पुर्नजन्म नाही
२०) ब्रम्हनिष्ठा
२१) ब्रम्हप्राप्ती, ब्रम्हानुभव कृतकृत्यता
२२) सदगुरुभजन, सदगुरु चरणप्रीती
२३) जीवनमुक्ती,
२४) निरंकुश वृत्ती, अखंड शांती
२५) अनियमित बंधुप्रीती
२६) निरहंकार वृत्ती निजबोध खड्ग अपेक्षित
अवधूत संप्रदायाचे तत्वज्ञान :
संप्रदायाचे तत्वज्ञान मुख्यत्वे अद्वैत सिध्दांतावर आधारीत आहे. श्रीपंत महाराजांनी केंव्हाही वेदमर्यादेचे उल्लंघन केलेले नाही. एवढेच नव्हे, तर वेदशास्त्राला नित्कृष्ट मानले नाही. तरीपण शास्त्रापेक्षा स्वानुभवाला महत्त्व दिले आहे.
अवधूत मार्गीय गुरु :
१) मोक्ष अपेक्षेने येणाऱ्या कोणाही व्यक्तीस जवळ करणारा.
२) येणारा मुमुक्षू खरोखर वैराग्य भावनेने किंवा अंत:करणापासून मोक्ष अपेक्षणारा आहे किंवा कसे याचा ताबडतोब निर्णय घेतो.
३) अनन्य भावनेने शरण आलेल्यास आपलेसे करुन घेणारा
४) शिष्याकडूनसेवेची अपेक्षा न करणारा
५) कुल, गोत्र, तरुण, वृध्द, गरीब, श्रीमंत, विद्यावंत किंवा अज्ञानी या कशाचाही भेद न करणारा
६) शिष्यांनी साधना करावी असा आग्रह न धरणारा
अवधूत सदगुरु साक्षात अग्निसारखा परमपावन आहे. आपल्याकडे ज्ञानापेक्षेने आलेली व्यक्ती ही गुरुरुप आहे अशी त्याची भावना असते. त्याच्या दृष्टीने सर्व मुक्त आहेत. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नीमध्ये सुके अगर ओले लाकूड टाकल्यास ते तात्काळ अग्नीरुप होते तसे अनन्यभावनेने गुरुला शरण गेलेली व्यक्ती मुक्त होते.
विधीनिषेध त्याग
कोणत्या समाजात आपणास जीवन व्यतीत करावयाचे आहे. त्या समाजाचे नियम आचरणात आणणे, यात मानव गुरफटलेला असतो याला आपण विधी म्हणतो. श्री सदगुरुच्या अनुग्रहप्राप्तीमुळे आपली कर्तृत्वाभिलाषा नाहीशी होते. सर्वत्र सदगुरुला पहात सदैव चरमअवस्थेत, ब्रम्हानंद स्थितीत विधीची आवश्यकता रहात नाही. जे सोडावयाचे आहे, ते अगोदरच सोडल्यामुळे. निषेधाचा प्रश्नच येत नाही. पण हा विधीनिषेध त्यात फक्त प्राप्त पुरुष किंवा कृतकृत्य असणाऱ्यांना लागू पडतो. मात्र इतरांना हा स्मरणात ठेवणे आवश्यक ठरते.
टिपः- श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्यानंतर या अवधूत संप्रदायावर श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांनी विस्तृत लिखाण व प्रसार केल्याचे दिसून येते,
श्री दत्त संप्रदयातील थोर संत सत्पुरुष/योगी
श्री दत्त सांप्रदायाची ओळख करुन देणारा आद्य ग्रंथ म्हणजे ‘‘श्री गुरु चरित्र.’’ या गुरुचरित्राची रचना सरस्वती गंगाधरांनी केली. श्री नृसिंह सरस्वतींचे जे चार प्रमुख शिष्य होते त्यासायंदेवाचे पाचवे वंशज म्हणजे गंगाधर सरस्वती. श्री गुरुचरित्र हा दत्त सांप्रदायाचा वेदचमानला जातो. श्री गुरुचरित्राचे ५१ अध्याय असून, ५२ व्या अध्याय कळस अध्याय आहे. श्रीगुरु चरित्रात प्रामुख्याने श्री दत्तावतार चरित्र, श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र अवतार, श्रीनृसिंह सरस्वती अवतार चरित्र आहे. गुरुभक्ती हे या ग्रंथाचे सार आहे, मुख्य विषय आहे.
१) श्री श्रीपाद श्रीवल्लभ : – अनुसुया पोटी अवतार घेतलेल्या भगवान दत्तात्रेयांचाहा मनुष्य रुपातील पहिला अवतार. श्री गुरुचरित्राच्या ५ ते १० या अध्यायात या अवताराची माहिती आहे. श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा काळ इ.स.१३२० ते १३५० असा आहे. त्यांचेजन्मस्थान पिठापूर होय. श्री आपळराज व सुमता या आपस्तंब शाखेच्या ब्राम्हण दांपत्य पोटी त्यांचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी मौजीबंधना पर्यत त्यांचे वेद अध्ययन पूर्ण झाले होते. श्री दत्तात्रेयांच्या/अवधूतांच्या कृपेने श्रीपाद जन्मला हे त्यांच्या आई वडिलांना पूर्ण ज्ञात होते. वयाच्या सोळाव्या वर्षी श्री श्रीपाद श्री वल्लभांनी घर सोडले. बद्रीनाथ/केदारनाथ, काशी, जगन्नाथपूरी अशी अनेक तीर्थक्षेत्रे भ्रमण करुन ते गोकर्ण महाबळेश्वर येथे आले. तीन वर्षे गोकर्ण महाबळेश्वर येथे गुप्त वास करुन ते श्रीशैल्य या तीर्थक्षेत्रावर आले. श्रीशैल्य येथे चारमहिने राहून ते कुरवपूर/कुरगड्डी कृष्णाकाठी आले. श्री गुरुचरित्रामध्ये या कुरवपूरचे वर्णनखालील प्रमाणे आहे.
कुरवपूर महाक्षेत्र । कृष्णागंगा वाहे नीर ।
महिमा सांगता असे अपार । भूमंडळात दुर्लभ ॥
श्रीपाद राहिले कुरवपूरी । ख्याती झाली भूमीवरी ।
प्रगट महिमा अपरांपरी । सांगता विस्तार असे देखा॥
…श्री गुरुचरित्र
श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज या पुढील अवताराशी संबंधित दोन घटना श्री श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारात घडलेल्या आहेत. कुरवपूर येथे राहणाऱ्या वेदशास्त्र संपन्न ब्राम्हणाची अंबिका नावाची पत्नी व तिच्या मंदमतीच्या मुलाची कहाणी व श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांची भक्ती भावाने सेवा करणारा, त्यांच्या मठाची झाडलोट करणारा त्यांची छाटी/लंगोटी धुणारारजक (धोबी) या दोन्ही घटना त्यांच्या पुढील अवतारात घडलेल्या आहेत. श्री श्रीपाद श्रीवल्लभ हे अवधूत रुपात सर्वत्र संचार करीत. त्यांनी कुरवपूर क्षेत्री अेिशन वद्य १२ (गुरुद्वादशी) निजानंदी गमन केले.
श्री पीठापूर हे काकिनाडा / राजमहेंद्री रेल्वे स्टेशन जवळ आहे. आजही तेथे श्रीपाद आडनाव धारण करणारे श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे ब्राम्हण वंशज आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबे) स्वामी महाराज यांनी भगवान श्री दत्तात्रेयांच्या दृष्टांतानुसार या स्थानाचा शोध इ.स.१९०८ मध्ये लौकिक अर्थाने लावला, त्यांच्या जन्मस्थानी पादुका स्थापन करुन श्री दत्तसंप्रदायाचा मार्ग तेथील लोकांना दाखविला.
२) श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराज :- (इ.स. १३७८ ते इ.स. १४५८ = ८० वर्षे)
श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या नंतरचा म्हणजे दुसरा अवतार, उत्तर अवतार म्हणजे श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराज होय. श्री श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात श्री कुरवपूर क्षेत्री ज्या अंबिकानावांच्या विप्रस्त्रीला आशिर्वाद दिला होता. तीच विप्रस्त्री ‘‘अंबा भवानी’’ या नावाने कारंजा गावी वाजसनेय शाखेच्या ब्राम्हण कुळात जन्मली. कारंजा गावातील माधव नावांच्या शिवभक्त ब्राम्हणाशी अंबा भवानीचा विवाह झाला. विवाहा नंतर ती शनिप्रदोष व्रत करीत राहिली.सोळा वर्षाच्या या व्रताच्या तपानंतर तिच्या उदरी एक दिव्य बालक जन्मास आले. जन्मत:चहे दिव्य बालक ओमकाराचा उच्चार करु लागले. हे दिव्य बालक म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज होय. त्यांचे जन्म नाव ‘‘शालग्रामदेव’’ जरी ठेवणेत आले तरी त्यांचे लौकीक नाव ‘‘नरहरी’’ हेच राहिले. गुरुचरित्रात त्यांचे पूर्ण आयुष्यांचे वर्णन पुढील प्रमाणे लहानपणीच वर्णिले आहे.
कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिका ॥
याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विेशासी ।
याचे वाक्य होईल परीस । चिंतामणी याचे चरण ॥
अष्टै सिध्दीयाचे द्वारी । वोळंगत राहतील निरंतरी ।
नवनिधी याच्या घरी । राहती ऐक द्विजोत्तमा ॥
न होती यासी गृहिणी – सुत । पूज्य होईल त्रिभुवनात ।
याचे दर्शनमात्रे पतित । पूनित होतील परियेसी ॥
होईल हा अवतार पुरुषी । आम्हा दिसतसे भरंवसी ।
संदेह न धरावा मानसी । म्हणोनी करती नमस्कार ॥
…श्री गुरुचरित्र
मौजीबंधना पर्यंत म्हणजे वयाच्या सातव्या वर्षापर्यंत नरहरी न बोलल्याने मुका मुलगा म्हणून त्यांच्या आई वडिलांना खूप दु:ख झाले. व्रतबंधातील गायत्री मंत्राची दीक्षा मिळताच नरहरीच्या मुखातून वेदवाणी प्रकट होताच त्यांचे आई-वडिल, गुरुजन लोक चकितच झाले. त्यांचेमन आनंद व विस्मयाने भारावून गेले. श्री नरहरी हा अवतारच आहे असे सर्वांना वाटू लागले.नरहरी ने श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारातील स्मरण आईला म्हणजे अंबा भवानीला करुन देवून वयाच्या आठव्या / नवव्या वर्षी बद्री / केदारकडे प्रस्थान केले. अनेक तीर्थयात्रा करुन तेकाशीला विेशनाथांजवळ स्थिरावले. मनकार्णिका घाटावर त्रिकाळ स्नान, विेशेश्वरांची आराधना,पूजा अर्चा, साधूसंत, तपस्वींचा सहवास हाच त्यांचा नित्य नियम. या आठ/नऊ वर्षाच्यातेजस्वी बालकाची कीर्ती सर्व काशीत पसरली. शृंगेरी मठातील विद्यारण्य स्वामीच्या परंपरेतील एक यती संन्याशी श्री श्रीकृष्ण सरस्वती नरहरी या बालकाच्या आचरणाने भारावून गेले, स्तंभित होवून गेले व संन्यास धर्माची रक्षा करणेसाठी त्यांनी नरहरीला विचारणा केली.
लोक अनुग्रहाकारणे । तुम्ही आता संन्यास घेणे ।
आम्हा समस्ता उध्दरणे । पूजा घेणे आम्हा करवी ॥
या कलीयुगी संन्यास म्हणोन । निंदा करती सकळै जन ।
स्थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥
…श्री गुरुचरित्र
श्री श्रीकृष्ण सरस्वती यती या संन्याशाचे वय त्यावेळी ३०० वर्षाचे होते. त्यांनी नरहरी लाविधीपूर्वक संन्यास दिला व संन्यास दीक्षेनंतरचे नरहरींचे नाव ‘‘श्री नृसिंह सरस्वती’’ असे नामकरण केले. काशीत कांही काळ व्यतीत करुन अनेक शिष्यांसह ते बद्री केदारनाथाला गेले.गंगासागर, प्रयाग अनेक तीर्थस्थानावर जावून राहिले. प्रयाग तीर्थ येथे माधव नावांच्या ब्राम्हणाला संन्यास दीक्षा देवून त्याचे नाव माधव सरस्वती ठेवले. या प्रवासातील माधव सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, सिध्द सरस्वती या शिष्यांना घेवून ते दक्षिण भारताकडे वळले. वयाच्या आठव्या / नवव्या वर्षी श्री नृसिंहसरस्वतीनी कारंजा नगरी सोडली होती. वयाच्या तिसाव्या वर्षी ते आपल्या शिष्यांसह कारंजाला परत आले. त्यांचे तेजस्वी संन्यस्त जीवन पाहून त्यांचे आईवडील भारावून गेले. त्यांच्या पुर्नभेटीने आई-वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांचे चार भाऊ व एक बहिणहीआपल्या ज्ञानसंपन्न / तेजसंपन्न थोरल्या भावाच्या सहवासाने भारावून गेली. कारंजातील सर्वजण कुतुहलाने, आनंदाने भारावून गेले. श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज कांही काळ कारंज्याला राहून त्या नगरीचा निरोप घेवून गोदावरी काठी नाशिक त्रंबकेश्वर येथे शिष्यांसह आले. तेथून तेमंजरिका गावी गेले. तेथे माधवारण्य मुनिना आत्मबोध करुन वासर ब्रम्हेशरला आले. वासरब्रम्हेशरला त्यांनी कडघंची गावच्या सांयदेव नावाच्या ब्राम्हणाची पोटदुखी बरी केली. त्याला अभय दिले. सायंदेवाने बिदर बादशहाची नोकरी सोडून श्री नृसिंह सरस्वतींचे शिष्यत्व पत्करुन सेवा पत्करली व पुढील प्रमाणे मागणे मागितले.
माझे वंशपरंपरी । भक्ती द्यावी निर्धारी ।
इहसौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्गती ॥
ऐसी विनंती करुनी । पुनरपी विनवी करुणावचनी ।
सेवा करीतो द्वारयवनी । महाशूर क्रूर असे ॥
प्रतिसंवत्सरी ब्राम्हणासी। घात करीतो जीवेसी ।
याची कारणे आम्हासी । बोलिवतीसे मज आजी ॥
जाता तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण ।
भेटी जाहलो तुमचे चरण । मरण कैचे आपणांसी ॥
-श्री गुरुचरित्र
सायंदेवाला अभय वचन देवून श्री नृसिंह सरस्वती परळी वैजनाथ येथे झाले. तेथे त्यांना सिध्द सरस्वती लाभला. परळी वैजनाथ येथे ते गुप्तपणे एक वर्ष राहून औदुंबर-भिलवडी येथे आले. तेथे त्यांनी एक चातुर्मास पूर्ण केला. भुवनेश्वरी येथील देवीचे माहात्म्य वाढवून ते कृष्णा-पंचगंगा संगमावरील औरवाड (आमरापूर) गावी आले.
शिवा भद्रा भोगावती । कुंभा नदी सरस्वती ।
पंचगंगा ऐसी ख्याती । महापातक संहारी ॥
ऐसी प्रख्यात पंचगंगा । आली कृष्णेचिया संगा ॥
प्रयागाहून असे चांगा । संगमस्थान मनोहर ॥
अमरापूर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम्य ।
जैसा प्रयाग संगम । तैसे स्थान मनोहर ॥
वृक्ष असे औदुंबरु । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु ।
देव असे अमरेश्वरु । तया संगमा षट्कुळी ॥श्री गुरुचरित्र
बारा वर्षे या तपोभूमीत श्री नृसिंह सरस्वतींनी तप केले, वास्तव्य केले म्हणून या स्थानाला नृसिंहवाडी हे नाव रुढ झाले. घेवड्याच्या शेंगाचा अध्याय व इतर अध्याय येथेच झाले.
औरवाड – नृसिंहवाडी येथील बारा वर्षांचा वास्तव्यानंतर श्री नृसिंह सरस्वती भीमा -अमरजा संगमावरील कर्नाटकातील गाणगापूर येथे आले. येथेही त्यांनी २३ वर्षे सिध्दजीवनव्यतीत केले.
ऐसा संगम मनोहरु । तेथे वसती श्रीगुरु ।
त्रिमुर्तीचा अवतारु । गौप्य होय कवणापरी ॥
सहसा किरणे सूर्यासी । केवी राहे गौप्येसी ।
आपोआप प्रकाशी । होय सहज गुण तयाचा ॥
…श्री गुरुचरित्र
रजक/बेदरचा बादशहा, कुमसी गावातील त्रिविक्रम भारती, ब्राम्हणांचे अध:पतन असे अनेक प्रसंग गाणगापूरला घडले. तेवीस वर्षांच्या गाणगापूर येथील वास्तव्यानंतर, श्री नृसिंहसरस्वती, सिध्द सरस्वती, सायंदेव, नंदी कवीश्वर, नरहरी कवीेशर या चार शिष्यांसह श्री शैल्यशिव तीर्थस्थानी आले. श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथील पाताळगंगेच्या पात्रात, कर्दळीची पाने, कमळांची पाने, शेवंतीच्या फुलांनी सजवलेल्या आसनावर बसून ते कर्दळी बनाकडे गेले.पाताळगंगेच्या पलिकडे श्री नृसिंह सरस्वती पोहचताच शेवंतीची फुले पाण्याच्या प्रवाहा बरोबरवाहत येवून अलिकडील काठावर उभे असलेल्या त्यांच्या चारी शिष्यांना ती प्रसाद म्हणून मिळाली.
कन्यागती बृहस्पतीसी। बहुधान्य नाम संवत्सरेसी।
सूर्य चाले उत्तर दिगंतेसी । संक्रांती कुंभ परियेसी।
शिशिर ऋतु माघमासी । असित पक्ष प्रतिपदेसी ।
शुक्रवारी पुण्यदिवशी । श्रीगुरु बैसले निजानंदी॥
…श्री गुरुचरित्र
वरील प्रमाणे नृसिंह सरस्वतींचा अवतार समाप्त झाला.
श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे सदेह अवतार कार्य हे जवळ जवळ ८० वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर समाप्त झाले. श्री श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या अवतार कार्यापूर्वीस्वतंत्र असा दत्त संप्रदाय अस्तित्वात नव्हता. स्वतंत्र श्री दत्त उपासना नव्हती. परंतु यांच्या जन्मानंतर, अवतारा नंतर श्री दत्त उपासना, श्री संप्रदाय पुन्हा जोमाने कार्यरत झाला, अस्तित्वात आला. त्यांनी पीठापूर, कुरवपूर, कारंजा, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर व इतर स्थानांना आपल्या तपाने / सानिध्याने तीर्थक्षेत्र बनविले. श्री दत्तस्थाने बनविली. ही तीर्थक्षेत्रे त्यांच्या पाऊल खूणा आहेत. अनेकांनी या तीर्थक्षेत्रांना जावून, उपासना करुन श्री गुरु सेवा करुन आपले जीवन सफल केले आहे. तप-साधनेने देवत्व प्राप्त केलेले आहे. समाजाला आचारधर्म उपासना देवून सुख-समृध्दी सत्याचा मार्ग दाखविला आहे. श्री श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अवतार कार्यानंतरही या दत्त संप्रदयात अनेक मनुष्यदेही अवतार जन्मले, तपोनिधी जन्मले व हा संप्रदाय सर्वार्थाने व्यापक, समृध्द होत गेला आहे. मुख्यत: हा संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा कांही भाग आंध्र-कर्नाटकचा भाग व्यापून राहिला आहे.
संत एकनाथांचे गुरु श्री जनार्दन स्वामी (इ.स.१५०४ ते १५७५) (दौलताबाद) श्री संतएकनाथ महाराज (इ.स. १५३३ ते १५९९ पैठण) श्री दासोपंत (इ.स. १५५१ ते १६१५ आंबेजोगाई) श्री निरंजन रघुनाथ (इ.स. १७८२ ते १८५५ मिरज) श्री नारायण महाराजजालवणकर (इ.स.१८०७ ते १८६७) श्री माणिकप्रभू (इ.स. १८१७ ते १८६५) (हुमणाबाद) श्री स्वामी समर्थ (इ.स. प्रकट दिन अेिशन शुध्द पंचमी १८५७ ते चैत्र वद्य त्रयोदशी १८७८ -अक्कलकोट) श्री वासुदेवानंद सरस्वती (इ.स. १८५४ ते १९१४ – गरुडेशर) श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर (इ.स. १८५७ ते १९०५ – श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री) श्री विष्णूदास (इ.स. १८४४ ते १९१७ – श्रीक्षेत्र माहूर) श्री साईबाबा (समाधी दसरा इ.स. १८१८ – शिर्डी) श्री गजाननमहाराज (इ.स. प्रकट दिन २३/२/१८७८ ते ऋषिपंचमी १९१० शेगाव) श्री श्रीकृष्ण सरस्वतीदत्त महाराज (इ.स. १८३६ ते १९०० – श्री क्षेत्र कोल्हापूर) असे अनेक थोर सत्पुरुष, थोर तपोनिधी श्री साक्षात्कारी सिध्द पुरुष या संप्रदायात होवून गेले. श्री दत्त संप्रदायात मुख्यत:महाराष्ट्रात वाढला, महाराष्ट्र केंद्र राहिले आहे.