श्री दत्त दिगंबर आण्णाबुवा महाराज, मिरज – Shri Datt Digambar Annabuva Maharaj, Miraj

लेख पहिला : – मिरजेला कृष्णा घाटावर राहणाऱ्या आपल्या लहान बंधूच्या पत्नीचा जलोदर बरा करुन, भोजन करुन आपल्या भक्तमंडळीसह श्रीस्वामी (श्री कृष्णा सरस्वती दत्त महाराज) कृष्णाघाटावरील आण्णाबुवांच्या समाधी दर्शनाला आले. मिरजग्रामी दत्तावतार आण्णामहाराज दिगंबर अशी त्यांची ख्याती होती. कृष्णातीरी आण्णाबुवांची समाधी सुंदर आहे. स्वामी भक्तांना म्हणाले ‘‘आण्णाबुवांच्या दर्शनाची संधी चालून आली आहे दर्शन घ्या.’’ आण्णाबुवांच्या सत्वर समाधी जवळ येताच गाभाऱ्यातून / समाधीतून स्पष्ट आवाज सर्व भक्तांनी ऐकला ‘‘येथील कार्य कृष्णा संपले काय? कार्यभाग संपला का? करवीरला परत निघालास काय? तुझे चिन्मय रुप बघून अक्कलकोट स्वामींची आठवण झाली’’ स्वामींनी आण्णाबुवांचे समाधीतून आलेले बोल ऐकून समाधीला वंदन करुन म्हणाले ‘‘व्यर्थ का आण्णा करशी माझी स्तुती. आम्ही तुम्ही एकच जगती. तुझी चिन्मय मूर्ती पाहून आनंद झाला. तुझी प्रकृती उत्तम आहे काय? नको करुस माझी स्तुती. तुझी लिला काय कमी आहे.?’’ असे म्हणून स्वामींनी आण्णाबुवांचा निरोप घेतला. समाधीतून आण्णाबुवा स्वामीशी बोललेले पाहून सर्व भक्तजनाना इतर सर्व लोकांना अतिशय आश्चर्य वाटले.

लेखक : – श्री झेंडे महाराज
संदर्भ ग्रंथ :- समुद्र भरला आहे. पान क्रमांक २७८

***

लेख दुसरा : –

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्या खालील मंडपाळे गांवच्या विश्वंभरपंत कुलकर्णी यांच्या पोटी श्री आण्णाबुवांचा जन्म झाला. आण्णाबुवांच्या आईचे नांव अनुसया होते. विश्वभंरपंत हे वंशपरंपरागत मंडपाळ्याचे कुलकर्णी असून सदाचारी ऋग्वेदी देशस्थ ब्राम्हण होते. आण्णाबुवा लहानपणी अत्यंत खेळकर, खोडकर होते. लौकिक विद्येला डावलून शाळा डावलून सदा बाहेर भटकावे, खेळावे, तपोवनी एकान्त भोगावा अशा तऱ्हेने वागत. शाळेत मुळी लक्षच नाही. उठल्या सुटल्या शाळेबाहेरच उनाडत राहून, फिरत राहून त्यांची वृत्ती छंदी फंदी, स्वच्छंदी बनली होती. मुंजीचे वय होताच त्यांच्या आई-वडीलांनी त्यांच्या मुंजीचा विचार केला. मुंजीचा संस्कार होऊन आण्णाबुवांचा चंचल स्वभाव, चंचल बुध्दी दूर होऊन स्थिर बुध्दी येईल असाही त्यांनी विचार केला. परंतु आण्णाबुवा मुंजीलाच तयार होईनात. आई-वडीलांनी त्यांची पुष्कळ समजूत घातली. नातेवाईकांनी प्रयत्न केले. परंतु आण्णाबुवांनी मुंजीला ठाम नकार दिला व सांगितले. ‘‘आपणच साक्षात परब्रह्म आहोत’’ आण्णाबुवांनी ती जानवी, लंगोटी, मौंजी, दंड ही मुंजीची सारी उपकरणे, साहित्य फेकून दिले. व्रतबंधाला जमलेले सर्व उपाध्ये, वैदीक मंडळी, आप्तेष्ट यांना हे सर्व न मानवल्यामुळे मंडपा बाहेर पडले. परंतु आई वडिलांनी कशीतरी त्यांची मुंज पार पाडली.

लक्ष एकीकडे तर चालणे दुसरीकडेच, चालतांना स्वत:चीच बोलणे, अकारण मोठ्याने हसणे, अबोलच राहणे, स्वच्छ, अस्वच्छ जागा न बघता कोठेही बसणे, हे त्यांचे लोकबाह्य वागणे बघून गावकरी, घरचे लोक त्यांना वेडाच समजू लागले. रानावनातून हिंडावे, अन्नपाणी वर्ज्य करावे, रात्रंदिवस विचार करु नये यामुळे त्यांचे आई-वडील काळजीत पडले. श्री नृसिंहवाडीला जावून श्री दत्तात्रयाची सेवा करावी, तसे दत्ताला साकडे घालावे म्हणजे आण्णाबुवाचे वेडेपण व वेडाचार कमी होईल असा त्यांनी विचार केला व आण्णाबुवाला घेवून ते श्री नृसिंहवाडीला येवून राहिले. श्रीदत्त दर्शन, सेवा सुरु झाली. श्रीनृसिंहवाडीतील लोकही आण्णाबुवांना वेडाच समजत होते. संगमावर स्नान करणे, श्रींचे पादतीर्थ घेणे, अंगारा लावून घेणे, प्रदक्षणा घालणे हा आण्णाबुवाना जुलूमच वाटे. यासाठी आई-वडीलांना फारच कष्ट पडत. कांही महिन्यानंतरच्या सेवेनंतरही आण्णाबुवाच्या वेडेपणात कांहीही बदल झाला नाही. वेडेचार कमी न होता वाढतच चालले. आपला मुलगा जन्मत: वेडा आहे असे आण्णाबुवांच्या आई-वडीलांना कधीच वाटले नाही. श्री दत्तात्रयांच्या सेवेने तो निवळेल, शांत होईल. त्याचे वेड कमी होईल. वेडेचार कमी होतील अशा विचाराने त्यांनी श्री दत्तात्रेयाची सेवा चालूच ठेवली. कांही महिन्यानंतर श्री भगवान दत्तात्रेयांनी आण्णाबुवांच्या आईवडीलांना स्वप्नात दर्शन देवून दृष्टांत देवून, सांगितले ‘‘तुम्हा उभयतांच्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. दत्तात्रयाच्या रुपाने मीच तुमच्या पोटी अवतार घेतला आहे. आईबापाच्या नात्याने तुम्ही कृतार्थ झाला आहात. या अवतारातील माझे बालपण आता संपले आहे. हा अवतारी दत्त तुम्हासोबत घरी कधीच राहणार नाही. गृहस्थाश्रमी होणार नाही. जगद्उध्दाराचे कार्य करील. नृसिंहवाडीतच त्याला एकट्याला ठेवून तुम्ही गावी जावा. त्याची मी स्वत: काळजी घेईन.’’ या दत्तात्रेयाच्या दृष्टांताने उभयतांना आनंदही झाला व आण्णाबुवांला सोडून जाण्याचे दु:खही झाले. एके दिवशी आण्णाबुवाला श्रीनृसिंहवाडीला श्री दत्तात्रेयाच्या सेवेला सोडून मोठ्या जड अंत:करणाने विश्वंभरपंत व अनुसया मातेने श्री नृसिंहवाडीचा निरोप घेवून मंडपाळेला परत फिरले. पोटाला अन्न मिळो न मिळो, वस्त्र मिळो न मिळो दिवसेंदिवस आण्णाबुवा वैराग्यशाली बनत चालले. वाडीत विवस्त्र हिंडू लागले. अशा विरक्त आण्णाबुवाला कांही खट्याळ वाडीकर दुष्ट, ऐदी, ऐतखाऊ, म्हणू लागली. मारपीटही करु लागली. एकदा तर त्यांनी हिरव्यागार मिरच्या आण्णाबुवांना खावविल्या, खायला बळेच लावल्या. याचा आण्णाबुवांना खूपच त्रास झाला. त्याच रात्री भगवान श्री दत्तात्रेयांनी ज्या ज्या वाडीकरांनी आण्णाबुवाना हिरव्या मिरच्या चारल्या, त्रास दिला त्यांना झोपेतच काठीने बदडून काढले.

पुढे कांही चमत्कार दाखवून श्री आण्णाबुवा मिरजेजवळील म्हैसाळ गांवात आले. संत एकनाथांच्या वंशात जन्मलेल्या केशव मोरेश्वर कुलकर्णी यांच्या घरी आण्णाबुवा चालून गेले. त्यांच्यावर अनुग्रह केला. केशव कुलकर्णी, म्हैसाळ यांनी ‘‘श्रीगुरु कथामृत’’ पुस्तकात श्री आण्णाबुवांची महती गायली आहे.

माधवराव पंडित, रामकृष्ण दिवाण, भास्कर पंत जोगळेकर, उत्तुरकर, करजगार व इतर अनेक भक्त मंडळी म्हैसाळला होऊन गेली. म्हैसाळला असतांना आसपासच्या बेडग वगैरे गांवात भक्त मंडळीकडे आण्णाबुवा जात असत.

म्हैसाळहून ते मिरजेला आले ते चमत्कार करुनच. बापू शिंदेच्या विहीरीत आण्णाबुवांनी पोहायला उडी टाकली. परंतु बराच उशिरा ते वर आलेच नाही. गावकरी घाबरुन गेले. गांवातले पटाईत पोहणारे, पाणबुडे यांनी सारी विहीर पोहून काढली आण्णाबुवा जिवंत सापडावेत निदान त्यांचे प्रेत तरी सापडावे. परंतु सर्वांची निराशा झाली.

गावकरी गांवात परतु लागले. मिरजेहून म्हैसाळला येणाऱ्या एका गृहस्थाने गावकऱ्यांना विचारले काय घडले आहे? यावर गावकरी म्हणाले आण्णाबुवा विहीरीत बुडला आहे. यावर तो इसम म्हणला ‘‘आण्णाबुवा स्वारी खुशाल मिरजेत वावरत आहे मी पाहिले आहे. एका तेलीणीच्या दुकानात मजेत बोलत बसले आहेत.’’ ते ऐकून म्हैसाळ गावच्या लोकांना आनंदही झाला व विस्मयही वाटला.

आण्णाबुवांचा जन्म जरी ऋग्वेदी देशस्थ ब्राम्हण कुळात झाला असला तरी, त्यांना कर्मकांड आवडत नसे. सारे विश्व हे आपलेच आहे. ‘‘अहं ब्रम्हास्मि’’ असे त्यांना वाटे.

मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे ।
अलौकिक नोहावे । लोकाप्रती ॥१७१॥
तेच सतक्रियाची लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।
नैष्कर्मीही दावावी । आचरोनी ॥ १७४ ॥
तया लोक संग्रहालागी । वर्तता कर्मसंगी ।
तो कर्मबंध अंगी । वाजेल ना ॥ १७५ ….ज्ञानेश्वरी

वरील अभंग उक्तीप्रमाणे आण्णबुवांचे जीवन होते. मिरजेत प्रकट झाल्यावरही पोटापुरते मागून खाणे, अखंड फिरत राहणे, सर्व लोकस्तरातून भगवद्भक्ती रुजविणे हे त्यांचे जीवन होते. शनिवार पेठेतील गंगाबाई तेलीणीच्या झोपडीवजा घरात ते रहात. गंगाबाई तेलीणीची आण्णाबुवांवर अत्यंत श्रध्दा होती. त्यांना ती आपले गुरु मानत असे. तिच्या घरी रेड्या वर बसून आण्णाबुवा तेलाचा घाणा हाकत. त्यांची वृत्ती लहान मुलांप्रमाणे होती. खोडकर होती. त्यांना गाणे बजावण्याचा नाद होता. टाळ मृदंगाच्या साथीने चाललेले भगवद् भजन त्यांना फार आवडे. संगीत / गायन हा तर त्यांचा जीवप्राण. वृत्तीशून्य होऊन, बेहोष होऊन ते भजनात, गायनात, यल्लमाच्या जगापुढे नाचत. गंगाबाई तेलीणीच्या घराच्या आसपास सतारी बनविणाऱ्या कसबी सतारमेकरांची दुकाने, कलावंताची घरे, करजगार लोकांची घरे, शिकलगारांची घरे होती.

आजही या भागाला सतारमेकर गल्ली म्हणतात. गाणे बजावणेत नामांकीत असे अनेक सतारीये, गायक, वादक मिरज ही संगीताची पंढरी असल्याने येत. या मोठ्या नामवंत लोकांची आण्णाबुवांना आयतीच संगत लाभे. त्यांची बैठक या गायक / वादक लोकांच्यात असे. त्याकाळी साहेबजान नांवाची गाणारी प्रसिध्द नायकीण होती. आण्णाबुवा तिचे गायन अत्यंत आवडीने ऐकत. प्रसंगी बेहोश होऊन लहान मुलांप्रमाणे नाचत. बाळा सानी म्हणून एक प्रसिध्द नायकीण होती. तिच्या ओसरीवर अंथरलेल्या गाद्या-गिरद्यावर बसून तनमन विसरुन तिचे गायन ऐकत, आण्णाबुवांना लहानपणा पासूनच गाणं ऐकण्याचा / बजावण्याचा नाद असल्याने मिरजेत त्यांची रोजची उठबस सतारमेकरांच्या / तंतुवाद्यकारांच्या घरात वाढत गेली. ती उठबस इतकी वाढली की, आण्णाबुवा त्यांच्या घरातल्या, नात्यातला वाटू लागला. आपला वाटू लागला. त्यामुळे ते आण्णाबुवाला हाताखाली राबणारा पोरगाच वाटू लागला. सतारीची भोके पाडणाऱ्या सामत्याच्या वादया ओढ, सुऱ्या, कातऱ्यांना धार लावताना दोऱ्या ओढ, सतारीसाठी करवतीने लाकडे काप, घणाचे घणावर घाव घाल अशी बारीकसारीक कामे ते करुन घेत तर आण्णाबुवा अत्यंत खुषीने ही कामे करीत. अशा या आपुलकीमुळे आण्णाबुवा सतारमेकरांच्या पंगतीलाच घरच्या सारखे बसून जेवीत. गंगाबाई तेलीणीचा घाणा हाकत. तर शिकलगारांच्या कामात मदत करीत. गांवभर मोकळ्या मनाने फिरत.

गांवोगांव कधी कधी सांगली / इचलकरंजी / नृसिंहवाडी / कुरुंदवाड या गांवीही जात. ते वृत्तीने जगन्मित्र होते. संत होते, अवतारी होते. परंतु जगाला ते वेडेच वाटत. अशा मिरजेत सुध्दा त्यावेळी त्यांना देव मानणारा / श्रध्दा ठेवणारा जनभाव होता. त्यात प्रामुख्याने गणेश पांडुरंग वाटवे, यशवंतराव पटवर्धन, केशवदास, गद्रे, सितारामदास, गजानन हरिबा गुरव, गुंडभट जोशी, मेलीकट्टीआण्णा, अहमदसाहेब सतारमेकर, रामचंद्र वाटवे, राघू दिक्षीत. गंगूनाना दामले, भाऊराव सोवनी, वासुदेवराव टाकळीकर, वे.शा.सं. बंडभट केळकर, वे.शा.सं. केशवभट पाटणकर, वामनराव वाटवे. शिवरामबापू गोरे, टोणपी मास्तर इत्यादी मिरजेतील सर्व लोक आण्णाबुवांना त्यांच्या अलौकिक जीवनाने दिपून जाऊन श्रीदत्त अवतार मानू लागले.त्यांचा वावर सर्व स्तरातील घरातून अनिर्बंध प्रेमपूर्वक होता. ते लीलावतारी संत होते.

संताचा अवतार जगाच्या कल्याणासाठी असतो. जग हे त्यांचे कार्यक्षेत्र असते. मंडपाळ्याला जरी आण्णाबुवा जन्मले तरी त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने मिरज / म्हैसाळ दिसून येते. अशा या महासाधू आण्णाबुवांनी आपला देह मिरजेत आषाढ शुध्द ४ शके १७९४ (दि. ९/६/१८७२) मंगळवार रोजी शनिवार पेठेतील गंगाबाई तेलीणीच्या घरी देह ठेवला. निर्वाण झालेली गंगाबाई तेलीणीची जागा कै. बाळाराम पुरुषोत्तम शेठजी यांनी विकत घेवून आसपासच्या तेली, शिकलगार, सतारमेकर, कलावंत यांना पर्यायी जागा, घरे बांधून देवून मिरजेचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांच्या सहाय्याने आण्णाबुवांच्या पादुका स्थापन करुन त्यांचे टोलेजंग सुंदर मंदिर बांधले. या मंदिराची सर्व व्यवस्था आण्णाबुवांची पुण्यातिथी, पुण्यतिथीतील सात दिवसातील भजन / कीर्तन / प्रवचन व्यवस्था व शेवटच्या दिवशी (आषाढ शुध्द चतुर्थी) होणारा महाप्रसादाची व्यवस्था आता श्री विजयभाई शहा व त्यांचे लहान बंधू सुभाषभाई, जवाहरभाई, दिलीपभाई शहा व त्यांचा परिवार अत्यंत आनंदाने करीत असतो. रोज या मंदिरात सकाळ पासून रात्रीच्या आरती पर्यंत भक्तांची वर्दळ असते. पूजेची व्यवस्था आता रघू गुरुजींच्या नंतर अनंत गुरुजी पाहतात.

मिरजेतील या आण्णाबुवांच्या मंदिरात दर पौर्णिमेला – पौर्णिमा ते पंचमी पर्यंत सायंकाळी श्री दत्त अवतार श्री म्हादबा पाटील महाराज येवून सर्व भक्तांना दर्शन देत. त्यांनी वटसावित्री पौर्णिमा, रविवार दि. ६/६/१९८२ ला समाधी घेतली. त्यांची समाधी नृसिंहवाडी येथे आहे.

महासाधू आण्णाबुवांची समाधी मिरजेतील कृष्णा घाटावर आहे. हे समाधी मंदिर छोटे होते. अलिकडेच मिरजेतील श्री बाळासाहेब नरगुंदे सराफ यांनी या जुन्या समाधी मंदिराचा जिर्णोध्दार करुन दुमजली मंदिर उभा केले आहे. पूर्वी कै. धोंडिराम आंबी समाधीची पूजा अर्चा करीत. आता त्यांचे चिरंजीव श्री दत्तात्रय आंबी हे आण्णाबुवा समाधी मंदिराची पूजा अर्चा / व्यवस्था पाहतात. या कृष्णाघाट पवित्र भूमित महासाधू, आण्णाबुवा, रघुनाथ निरंजन, राऊळबुवा, रामदासीबुवा, कृष्णाबुवा इत्यादी संताच्या समाध्या आहेत. श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी श्री. आण्णाबुवाचा भंडारा (महाप्रसाद) मोठ्या प्रमाणात घातला जातो.

लेखक :- वि. गो. साठ्ये, मिरज
संदर्भ ग्रंथ :- श्री दत्त दिगंबर आण्णाबुवा महाराज

Comments are closed.