श्री क्षेत्र पंढरपूर

श्री क्षेत्र पंढरपूर

श्री क्षेत्र पंढरपूर हे हिंदू धर्मीयाचे प्रमुख स्थान आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखा मेळा, गोरा कुंभार, दामाजी , सावता माळी, जनाबाई, सखुबाई, कान्होपात्रा, भानुदास वगैरे अनेक संतानी पंढरीच्या विठ्ठलाचा महिमा गायला, वाढवला. श्री विठ्ठल कानडा समजला जातो. ‘गो-पाल’ श्रीकृष्ण व्दारेकहून आपले गुराखी व ‘नवलाख’ गुरे बरोबर घेऊन आला ही पारंपारिक समजूत एकेकाळी ‘कानड’ असणाऱ्या पंढरपूरच्या आसमंतातील जानपद, धार्मिक श्रध्दा व गोपजन संस्कृतीचे वातावरण यांच्याशी जुळते. श्री विठ्ठल देवतेची प्रसिध्दी सहाव्या शतकात होती. त्यांच्या अगोदर दोनशे तीनशे वर्ष तरी देवस्थानचे अस्तित्व असावयास हरकत नाही. तेव्हा इ.स.तिसऱ्या शतकापासून ज्ञानदेवाच्या कालापर्यंतचा काल हजार वर्षांचा भरतो. या काळात विठ्ठल भक्तीचा उदय होऊन तो संप्रदाय वृध्दिंगत होत गेला. ज्ञानेश्वराने पंढरीच्या भक्तीपंथाचा पुरस्कार केला. भक्तीप्रेमाच्या पंथात ते पूर्णपणे समरस झाले.

पूर्वापार चालत आलेल्या या भक्तीपंथात त्यांनी नवीन आशय ओतला, तो सोपा सुटसुटीत अधिक सखोल व व्यापक केला. पंढरीच्या भक्ती केंद्रास नवीन तेज प्राप्त झाले. पंढरीच्या प्रेमळ वारीस प्रेमळांच्या स्नेह संमेलनाचे स्वरुप लाभले. प्रत्येक वर्षी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भारतातील लक्षावधी भक्तजन वारीच्या यात्रेच्या काळात व इतर वेळेस पंढरीस येतात आणि चंद्रभागेत स्नान करतात. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन कृत कृत्य होतात. पंढरपूर हे दक्षिण काशी असून त्यास संतांचे माहेरघर म्हणतात. संत मंडळी आणि भक्त मंडळीच्या भक्तीने भारावून जाऊन श्री विठ्ठलाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याची उदाहरणे श्री विठ्ठल दैवताच्या भावी अभ्यासात आढळतात. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संतांनी भक्तिरस प्रधान काव्य रचले आहे. त्याची प्रचिती संतांच्या अभंग, ओव्या, गवळण, भारूडे, या प्रयत्नातून येते. पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात असून श्री विठ्ठल मंदिर हेच देऊळ आहे. त्याशिवाय नगर प्रदक्षिणा व चंद्रभागा स्नान यामुळे देखील या स्थानास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. चंद्रभागा या नदीचे नाव भीमा आहे. पण या ठिकाणावरील ती चंद्रकोरीप्रमाणे वाकल्यामुळे हिला या पंढरपूर पुरते चंद्रभागा नाव पडले असे सांगतात. ही वारकरी संप्रदायाची पुण्यवान नदी आहे. ही नदी भीमाशंकर जवळच्या डोंगरात उगम पावलेली आहे. या नदीची लांबी २००/२५० मैल असावी. दक्षिणवाहिनी भीमा नदीच्या काठी वसलेले पंढरपूर सुमारे १८०० ते १९०० वर्षापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. पूर्वी पंढरपुरास पंढरी, पांडुरंगपूर, फागनीपूर, पौडंरिक क्षेत्र, पंडरंगे, पांडुरंग पल्ली अशी नावे होती.

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर भव्य आणि विशाल आहे, तसेच लांब रुंद ही आहे. मंदिराला आठ दरवाजे आहेत. मंदिरातील प्रत्यक्ष गाभाऱ्यात तीन फुटाची विठ्ठल मूर्ती आहे. पांडुरंग कटीवर हात ठेवून उभा आहे. विटेवर उभा असलेल्या विठोबाचे वर्णन ‘युगे अठ्ठावीस, कर कटेवरी ठेऊनिया’ असे करतात. कृत, त्रेता, व्दापार व कली अशी चार युगे सांगितली जातात. या चार युगात भगवंतानी दशावतार पूर्ण केला. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे मिळून एकूण अठ्ठाविस युगे होतात आणि म्हणूनच संत नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीत विठ्ठलास युगपुरुष व चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे मिळून अठ्ठावीस असा, ‘युगे अठ्ठावीस विटेवर उभा’ अर्थ धरला असावा. अशा पंढरपूर वारीला ताराई श्री स्वामींना घेऊन निघाल्या.

संदर्भ ग्रंथाचे नाव :- वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य

संपादक :- डॉ. शिवाजीराव मोहिते

लेखकाचे नांवः- डॉ. अरविंद नेरकर

Comments are closed.