श्री आनंद संप्रदाय

महाराष्ट्रातील हा एक प्रमुख प्राचीन संप्रदाय असून तो बसव कल्याण येथून सुरु झाला. या संप्रदायातील अख्यानकवी श्रीधर स्वामी नाझरेकर होवून गेले. त्यांची गुरु परंपरा श्री दत्तात्रय – सदानंद – रामानंद – आमलानंद – गंभीरानंद – ब्रम्हानंद – सहजानंद – पूर्णानंद – दत्तानंद -ब्रम्हानंद – कवी श्रीधर अशी होती. त्यांनी त्यांच्या काव्य रचनेतून व ‘‘श्रीराम विजय’’ ग्रंथातून उत्कृष्ट श्री दत्त भक्ती गायली आहे. पूर्णानंद नारायण हे स्वामी सहजानंदाचे शिष्य होते. ते एक महान साधू होते. बसव कल्याणीतील बरीच मुस्लीम मंडळी त्यांची शिष्य होती. त्यातच बेदरचा बादशहा शहा मुंतोजी, बहामनी होय, सहजानंदाच्या या शिष्याचे नाव गुरु परंपरेने ज्ञानसागरानंद होते, मृत्यूंजय स्वामी होते. पूर्णानंद नारायण यांनी लिहीलेल्या ‘‘गुरुगीतेत’’ या आनंद संप्रदयातील सर्व गुरुंची गुरु तत्वाची चर्चा दिसून येते. या ‘‘गुरुगीता’’ ग्रंथावर मुकुंदराज लिखित ‘‘विवेकसिंधू’’ ग्रंथाचा प्रभाव आहे. गुरुगीता व विवेकसिंधू या मधील ओव्यामधून साम्यस्थळे व गुरुस्तुतीच आढळून येते. आनंद संप्रदयातील सत्पुरुषांची विवेकसिंधूवर अत्यंतिक श्रध्दा दिसून येते. आनंद संप्रदयाचे आदीगुरु दत्तात्रेय असल्याने या संप्रदयात गुरुगीतेला असाधारण महत्व आहे. पूर्णानंद नारायण हे संत श्री एकनाथ महाराज यांचे नातजावई आहेत. त्यांचे पुत्र शिवरामस्वामी होय. तर श्री रंगनाथस्वामी निगडीकर, श्री केशवस्वामी भागानगरकर हे शिवराम स्वामींचे गुरुबंधू आहेत.

गुरुदेव दत्ता, अनंत ब्रम्हांडी तुझी सत्ता ॥ धृ.॥
विश्वव्यापका विश्वंभरीता, विश्वधीशा विश्वातीता ।
प्रमेय-प्रमाता – प्रमाणरहीता, जगद्गुरु अवधूता ॥१॥
नित्य निरंतर अगमागोचर, परात्परतर सुखदाता ।
दीनदयाकर दत्त दिगंबर, सत्यज्ञानानंता ॥२॥
नि:संगा निजरंगा सत्वर, धावेधावे आता ।
निजात्मदर्शन देवूनी निरसी, दुर्गयममता चिंता ॥३॥

वरील प्रमाणे भगवान दत्तात्रेयाची स्तुती श्री रंगनाथस्वामी निगडीकरांनी गायली आहे.

Comments are closed.