श्री संत ज्ञानेश्वरांची गुरु परंपरा श्री नाथ संप्रदायाची जरी असली तरी, श्री संत ज्ञानेश्वरांनी श्री वारकरी संप्रदायाला नवसंजीवनी देवून वारकरी संप्रदाय वाढवून वारकरी संप्रदायाचा गौरव वाढविला. श्री ज्ञानेश्वरांनी रचलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव मधून श्री दत्तात्रेयांचा उल्लेख आढळून येत नाही. परंतु त्यांच्या अभंग गाथेतील एका अभंगावरुन त्यांची श्रीदत्तात्रेयावरील उत्कृष्ट श्रध्दा व भक्ती दिसून येते. तो अभंग खालील प्रमाणे
पैल मेरुच्या शिखरी । एक योगी निराकारी ।
मुद्रा लावूनी खेचरी । ब्रम्हपदी बैसला ॥१॥
तेणे सांडिली माया । त्यजियली कंथाकाया ।
मन गेले विलया। ब्रम्हानंदामाझारी ॥२॥
अनुहतध्वनी नाद । तो पावला परमपद ।
उन्मनी तुर्या विनोदे । छंदे छंदे डोलतूसे ॥३॥
ज्ञान गोदावरीच्या तिरी । स्नान केले पांचाळेश्वरी ।
ज्ञानदेवाच्या अंतरी । दत्तात्रेया योगिया ॥४॥
श्री संत ज्ञानेश्वरांनी श्री नवनाथ संप्रदाय व श्री वारकरी संप्रदाय एकत्र आणला तसा श्रीसंत ज्ञानेश्वरांच्या नंतर श्री क्षेत्र पैठणचे शांतीब्रम्ह संत श्री एकनाथ महाराजांनी श्री वारकरीसंप्रदाय व श्री दत्त संप्रदाय एकत्र आणला. श्री वारकरी संप्रदायाची मुख्य उपास्य देवता जरी श्रीविठ्ठल असली तरी श्री दत्त उपासानाही श्री वारकरी संप्रदायाचा हिस्सा बनली आहे.
श्री संत एकनाथ महाराज श्रेष्ठ दत्त उपासक होते. त्यानींच रचलेली ‘‘त्रिगुणात्मक त्रैमूर्तीदत्त हा जाणा’’ ही आरती श्री दत्त उपासनेत प्रमुख मानली आहे. श्री एकनाथांची गुरु परंपराही मुस्लिम धर्माचा अंग असलेल्या सूफी संप्रदायाची आहे. श्री संत एकनाथ महाराज हे श्रीवारकरी संप्रदाय व श्री दत्त संप्रदयात आनंदाने नांदले. श्री विठ्ठल देवता व श्री दत्तात्रेय देवता यात त्यांना कांहीच भेद दिसला नाही. श्री संत एकनाथांनी भागवता वर टीका लिहिली, मोठी अभंग रचना केली.
‘‘श्री दत्त महिमा’’ ‘‘श्री दत्त मानसपूजा’’ ‘‘श्री दत्त जन्मावरील ६७ ओव्यांचे आख्यान’’ या रचनेतून त्यांची श्री दत्तभक्ती प्रकर्षाने प्रकटली आहे.
श्री संत एकनाथांच्या नंतर श्री वारकरी संप्रदायातील प्रमुख संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी खालील अभंगातून श्री दत्त भक्ती प्रकट केली आहे.
(१) तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ॥१॥
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ॥२॥
माथा शोभे जटाभार । अंगी विभुती सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ॥४॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥
(२) नमन माझे गुरुराया । महाराजा दत्तात्रेया ॥१॥
तुझी अवधूत मूर्ती । माझ्या जीवाची विश्रांती ॥२॥
जीवीचे साकडे । कोण उठविल कोडे ॥३॥
अनुसया सुता ॥ तुका म्हणे पाव आता ॥४॥
याशिवाय ‘‘श्री दत्तप्रबोध’’ लिहणारे कावडीबोवा, श्री निंबराव दैठणकर, श्री ज्ञानेश्वरांची मानसकन्या विर्दभातील अंध संत श्री गुलाबराव महाराज या वारकरी संप्रदायातील महान संतांनी आपल्या साहित्य रचनेत / अभंगात श्री दत्त भक्ती गायली आहे. श्री तुकाराम महाराजांची गुरु परंपरा ही चैतन्य संप्रदायाची असून, राघव चैतन्य – केशव चैतन्य – बाबाजी चैतन्य – श्री तुकाराम अशी गुरु परंपरा आहे. चैतन्य संप्रदायाची मुख्य उपास्य देवता श्रीदत्तात्रय / अवधूत हीच आहे.
मराठी समाजामध्ये, संस्कृतीमध्ये, भाषेमध्ये संत साहित्याला विशेषत: वारकरी संप्रदायाच्यासंत साहित्याला विशेष महत्त्व आहे. संत साहित्याने मध्ययुगीन मराठी समाजाला जे विचारबळ व भावनाबळ देण्याचे एैतिहासिक कार्य केले, ते कार्य या साहित्यामधून आजही होत आहे. मध्ययुगीन काळापासून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचे जे योगदान पाहवयास मिळते ते आजही महत्त्वाचे म्हणता येते. वारकरी संप्रदायास जी उंची व खोली प्राप्त झाली आहे तिच्यामागे या संप्रदायामधील संत साहित्याचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील अन्य संप्रदायाशी तुलना केल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होते. वारकरी संप्रदायातून उगम पावलेली वारकरी काव्यपरंपरासदैव चैतन्याने बहरलेली दिसते. संत जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई आदिंनी आपल्याला विठोबांच्या भावबंधनात अनेक पातळ्यावर बांधून घेतले आहे. वारकरी संप्रदायाच्या आजच्या स्वरुपामागे संत ज्ञानदेवांचे क्रांतीदर्शी, समाजचिंतक, प्रतिभा संपन्न साहित्यिक व आत्मनुभावी श्रेष्ठ संतत्वचे व्यक्तिमत्व उभे आहे. या महाराष्ट्र भूमीत साधुसंताच्या विचारातून अनेक संप्रदाय निर्माण झालेले आहेत. पण विठ्ठल या दैवताचा व वारकरी संप्रदायाचा या भूमीशी व मराठी भाषेशी जसा व जितका दृढत्तम संबंध जुळला गेला तसा इतर संप्रदायामध्ये प्रभावीपणे दिसत नाही. याचे सर्व श्रेय संत श्री ज्ञानेश्वरांना द्यावे लागते. संत नामदेवांच्या समाधीनंतर दोनशे वष दु:खाच्या सागरात सापडलेल्या समाजास आपल्या रसाळ वाणीने आणि कल्याणकारी चारित्र्याने पुन्हा उभा करणारे शांतीब्रम्ह संत श्री एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर युगप्रर्वतक संत होते.
‘‘संत’’ या संकल्पनेचा पहिला ढसढसीत उच्चार मराठीत संत मुक्तार्बाइंच्या ‘‘ताटीचे अभंग ’’ मधून झालेला दिसतो. संत ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई, एकनाथ, तुकाराम, निळोबा,बहिणाबाई यासारख्या संतांच्या अंगातून संतलक्षणे समोर येतात. श्री पंढरपूर क्षेत्रीचे श्री विठ्ठल हे उपास्य दैवत, नामस्मरण हे साधन, व्यक्तिमत्वाची शुध्दता, गुणसंपन्नता, आत्मोध्दाराबरोबर लोकउध्दाराची आस हीच ती संतलक्षणे होय. ‘‘संत’’ ही पदवी अध्यात्म क्षेत्रातील अत्यंत उच्च कोटीची अवस्था दर्शविणारी आहे. तर संत साहित्य / अभंग रचना ही लोकभाषेतून, लोकछंदातून अवतरली. त्यामुळे संत रचनेचा / अभंग रचनेचा प्रभाव व्यापक जन जीवनावर साडे सातशे – आठशे वर्षाहून अधिक काळ टिकला.
संत साहित्याने जनसामान्यांचे जीवन त्यातील दु:खासह स्वीकारले व त्याला उन्नत रुपदिले. म्हणून आजही खेड्यापाड्यात संत साहित्य / अभंग कालच्या इतकेच आजही जिवंतआहेत. किंबहुना ते ‘‘महाराष्ट्र वेद’’ आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा सर्वात जास्त प्रभाव, व्याप्ती आहे. म्हणून आजही लाखोंच्या संख्येने दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरला जातात.
संत साहित्याने जनसामान्यांचे जीवन त्यातील दु:खासह स्वीकारले व त्याला उन्नत रुपदिले. म्हणून आजही खेड्यापाड्यात संत साहित्य / अभंग कालच्या इतकेच आजही जिवंतआहेत. किंबहुना ते ‘‘महाराष्ट्र वेद’’ आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा सर्वात जास्त प्रभाव, व्याप्ती आहे. म्हणून आजही लाखोंच्या संख्येने दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरला जातात.
या वारकरी संप्रदायाची / पंथाची महाराष्ट्रात तेराव्या शतकात स्थापना झाली. या वारकरीसंप्रदायातील संतांनी मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड झटकून टाकला.मराठीचा, मराठी भाषेचा,मायबोलीचा गौरव करुन ब्रम्हविद्येचा सुकाळ केला. मराठीची अस्मिता जपतांना,जगवितांना,संस्कृतच्या श्रेष्ठतेचे दडपण आपल्यावर येवू दिले नाही. संस्कृत भाषेचे दडपण झुगारुन दिले व संस्कृत भाषेचे ज्ञान भांडार स्वयंप्रज्ञेने मराठीत आणले. मराठीची निवड केली ती लोकसंवादासाठी.
अहंकार सोडून कर्मे करावीत, इतरांच्या आनंदात आपला आनंद मानावा, समत्वबुध्दी, करुणा, निष्काम भावनेने काम इत्यादी उद्देश त्यांनी आपल्या अभंगातून मराठीतून सोप्या भाषेतून केला. या संतानी जडापेक्षा चैतन्याला अधिक मौल्यवान मानले. मराठी जीवनात सहजपणे अविष्कृत होणारा कृतिशील शक्तीस्त्रोत म्हणून या वारकरी संप्रदायाने भूमीका बजावली आहे. वारकरी संप्रदायाचा भागवत धर्मच स्थायीभाव झाला आहे. म्हणूनच श्रीकृष्ण भगवंताला ‘‘श्री विठ्ठल’’ अवतार मानले आहे. श्री संत ज्ञानेश्वरांनी महाभारतातील संपूर्णकथाभाग वगळून त्याचे जणू सारच असणाऱ्या भगवद् गीतेवर भाष्य केले. म्हणून हा भागवत धर्म आहे. श्री संत ज्ञानेश्वरांनी ‘‘ज्ञानेश्वरी’’च्या रुपाने एका नव्या परिपूर्ण जीवन कलेचाच परिचय अवघ्या मानव समाजाला करुन दिला. ज्ञानेश्वरीची निर्मिती म्हणजे ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय प्रस्थापनेची सर्वांग परिपूर्ण अशी केलेली जणू पूर्व तयारीच. त्यामुळेच स्वतंत्र तत्वज्ञान सांगण्याचा अभिनिवेश प्रगट न करणारे, गीतेच्या आधारे चालणारे ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने नवीन तत्त्व प्रणाली म्हणजेच नवा जीवन विषयक दृष्टीकोन देवून जातात. भक्तीचा
मळा फुलविणारा, वेदप्रामाण्य परंपरा जतन करणारा, संस्कृतीचे संवर्धन करुन भेदाभेद विसरावयास वारकरी संप्रदाय श्री संत ज्ञानेश्वरांनी मुख्यत: चैतन्यमय बनविला. म्हणूनच आज साडे सातशे वर्षानंतरही तो महाराष्ट्र जीवनाचे मुख्य अंग बनून राहिला आहे.
१) प्रतिक – तुळशीमाळ, गोपीचंदन टिळा
२) उपास्य दैवत – श्री विठ्ठल
३) नित्य संध्या – पांडुरंग पूजा, हरिपाठ
४) ग्रंथ पठण – श्री ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नाथ भागवत
५) जपमंत्र – रामकृष्ण हरि
६) ध्वज – भगवी पताका
७) वाद्ये – टाळ, मृदंग,वीणा
८) तत्वे – सत्य, अहिंसा, सेवा, त्याग, दया, क्षमा, शांती, नैतिकता
९) उपवास – एकादशी व्रत
पंढरीच्या विठ्ठलाची भेट हे वारीच्या अत्युच्च सुखाचे आनंदाचे भरती आणणारे. महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र, गुजरात, मध्यप्रदेश, किंबहुना भारत देशातून येणाऱ्या वाऱ्यांचे, दिंडीचे पंढरीहे केंद्र आहे. पंढरीचा विठ्ठल म्हणजे शैव अन वैष्णवांचा महासमन्वय साधणारा केंद्रबिंदू होय.श्री संत ज्ञानेश्वरांनी आळंदीहून श्री पंढरपूरला पहिली दिंडी नेली. त्यानंतर संत नामदेव, संत तुकाराम व इतर संतांनी ही आषाढी – कार्तिक वारीची परंपरा चालू ठेवली. या दिंडी परंपरेत पुरुषां इतकेच महिलांना स्थान आहे. वारकरी संप्रदाय हा वैष्णव मार्ग आहे. म्हणजे त्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते.
या संप्रदायात भक्ती सुखासाठी मुक्तीचे सुखही नाकारले आहे. सर्वच संतानी सद्गुरु सेवेचे महात्म्य गायले आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा गुरुमार्गच आहे. वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदयातूनच निघाला असल्याने तो गुरुमार्ग आहे. चैत्र, आषाढ, कार्तिक, माघ या महिन्यातीलवाऱ्यांना जास्त महत्त्व आहे.
समाज उन्नतीसाठी तेराव्या शतकापासून साधू संतांनी जे प्रयत्न केले आहेत. त्यात स्त्रियांचावाटा फार मोठा आहे. संत संप्रदायाचे नीती नियम स्त्री संतांनी आत्मसात करुन वारकरीसंप्रदायाचा धर्म, विचार धर्म, साधना, उपासना, अध्यात्म, तत्वज्ञान आपल्या अभंगातून व्यक्तकेले आहे. बहिणार्बाइंनी विपुल अभंग रचना केली आहे. खालील अभंगातून त्यांनी वारकरी संप्रदायाची इमारत सिध्द केली आहे.
संतकृपा झाली इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर तेणे रचिले ते आवार
जर्नादन एकनाथ खांब दिला भागवत
तुका झालासे कळस भजन करा सावकाश
बहेणी म्हणे फडकती ध्वजा निरुपण केले ओजा
तर खालील अभंगात संत जनाबाईने ईश्वराशी असलेला जिव्हाळा, सेवाभाव व्यक्त केला आहे.
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी
पाटी घेवूनी डोईवर । नेऊनिया टाकी दूर
ऐसा भक्तीसी भुलला । नीच कामे करु लागला
जनी म्हणे बा विठ्ठला । काय उतराई होऊ तुला
संत जनाबाईने पांडुरंगाशी जोडले ते प्रेमभक्तीचे नाते. हीच प्रेमभक्ती वारकरी संप्रदयाच्या विकासाला उपकारक ठरली. खालील अभंगातून आत्यंतिक भावबळावर विठ्ठलाला तिने अंकित करुन घेतले होते असे दिसून येते.
धरीला पंढरीचा चोर । गळा बांधूनीया दोर
हृदय बंदीखाना केला । आत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडाजुडी । विठ्ठला पायी घातली बेडी
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुला
वारकरी संप्रदायाच्या वाटचालीत निवृत्तीनाथ – ज्ञानदेव यांच्या बरोबरीचे स्थान संतमुक्तार्बाइंना मिळाले आहे. संत मुक्तार्बाइंच्या अभंगात मातृत्व, वात्सल्य, ममत्व यांच्यासहअध्यात्म दर्शन घडते. समाजाच्या दारुण विद्रोहाला तोंड देण्यास मुक्तार्बाइंने पुढाकार घेतला.समाजाने वाळीत टाकले, ब्रम्हवृंदाने तिरस्कार केला, धर्म मार्तंडांनी बहिष्कृत केले. झिडकारले, दारिद्र्याने पाठ सोडली नाही अशा आपत्तीत मुक्ताबाईने आपल्या भावंडांची प्रतिभा ज्योतविझू दिली नाही. ताटी लावून बसलेल्या ज्ञानेश्वरांना तिने लहान असून उपदेश केला. आपल्या भावंडाची जबाबदारी स्वीकारली, धर्म कीर्तनासाठी त्यांना सज्ज केले. पतित, भ्रष्ट म्हणून समाजाने त्यांना अंगाबाहेर लोटले पण ती खचली नाही. ती विव्हळली, आर्त बनली, हिरमुसली पण पुन्हा ती सावध झाली हे खालील अभंगातून दिसून येते.
तात आणि माय गेलीसे येथून । तेंव्हा आम्ही लहान पांडुरंगा
निवृत्ती ज्ञानदेव कोरान्नाचे अन्न । सांभाळी सोपान मज लागी ॥
नाथ सांप्रदायाचा मुक्ताईवर प्रभाव होता आणि संत ज्ञानदेवा प्रमाणे तीही सिध्दावस्थेत पोहचली होती. तिचा अध्यात्मिक अधिकार फार मोठा होता. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर मुक्ताबाई उदास झाली ‘‘मुक्ताबाई उदासी असे फार । आता हे शरीर रक्षू नये॥ यामन:स्थितीत मुक्ताबाईने कांही दिवसांनी समाधी घेतली असे संत नामदेव महाराजांच्याखालील अभंगातून दिसून येते.
कडाडली वीज निरांजनी जेव्हा । मुक्ताबाई तेव्हा गुप्त जाली ।
गर्जत गगन कडाडली वीज । स्वरुपी सहज मिळीयेली ।
मावळता दीप ज्योत कोठे होती । सहज सामावली निरंजनी
अशा प्रकारे थोर संत कवयित्री स्वरुपाकार झाली, गुप्त झाली.