एकदा कार्तिक माहिन्यात कृष्णा लाडाने श्री क्षेत्र पंढरपूरला श्री. विठ्ठल दर्शनाला जाण्यासाठी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज (श्री कुंभारस्वामी) यांचेकडे परवानगी मागितली. श्री स्वामी कृष्णा लाडाला म्हणाले ‘‘माझ्या रुपातच श्री पांडुरंगाला पहा. उगीच देहाला कष्ट देवून पंढरपूरला जाऊ नको’’ परंतु श्री स्वामींचे हे बोलणे कृष्णा लाडाला रुचले नाही, पटले नाही. पुन्हा पुन्हा कृष्णा लाड श्री स्वामींची श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शनाला जाण्याची परवानगी मागू लागला. शेवटी श्री स्वामींनी त्याला नाईलाजाने श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्याची अनुमती / परवानगी दिली. परंतु प्रवासात यातना होतील. पडत्या फळाची आज्ञा मानून कृष्णा लाड श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शनाला निघाला. प्रथम मिरजेत आला. त्याकाळी मिरजेत वंदनीय रामदासी गाडगीळबुवा म्हणून थोर सत्पुरुष होते. कृष्णा लाड त्यांच्या दर्शनाला गेला. कृष्णा लाड गाडगीळबुवांचे दर्शन घ्यायला जाताच गाडगीळबुवा त्याला रागाने म्हणाले ‘‘श्रीकृष्ण गुरु. जाऊ नको म्हणतांना त्यांची आज्ञा मोडून कां आलास? गुरु वचन मोडणारा भक्त आम्हांला आवडत नाही. श्रीकृष्ण गुरू सागर असतांना माझ्या सारख्या ओढ्याला भेटणेस कां आलास? चिंतामणी सोडून खड्याला कां भुललास? तुझा स्पर्शसुध्दा नको. माझे दर्शन घेवू नकोस. चालता हो’’ अशा रीतीने वंदनीय गाडगीळबुवांनी कृष्णा लाडाची श्रीकृष्ण गुरुंचे वचन मोडले म्हणून, आज्ञा भंग केला म्हणून निर्भत्सना केली. या वंदनीय गाडगीळबुवांचे पूर्ण नांव स्व. महादेव प्रभाकर गाडगीळ, गाडगीळबुवांचे मूळ घराणे वेळणेश्वरचे (ता. गुहागर). त्यांच्या वडीलांचे नांव वेदशास्त्र संपन्न प्रभाकर गाडगीळ. वंदनीय गाडगीळ यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार उत्तम झाले होते. त्यांचा जन्म इ.स. १८६० साली मिरजेत झाला. घरात वडिलोपार्जित भिक्षुकी चालत असल्यामुळे व लहानपणापासून त्याच वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले होते. त्यातूनच त्यांनी वेद अध्ययन करुन वेदशास्त्र संपन्न शास्त्री पदवी मिळवली होती. लहानपणीच त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती. त्यांचा सर्वस्व ओढा श्री दत्त भक्तिकडे होता. श्री दत्त उपासनेमुळे ते सतत नृसिंहवाडीस वास्तव्य करीत. बारा वर्षे कठोर तपस्या त्यांनी नृसिंहवाडीत केली. त्यावेळी कृष्णा नदीला पूल नव्हता. पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर आल्यावर गाडगीळबुवांची आज ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी बसून नृसिंहवाडीकडे तोंड करुन ते तपाचरण करीत. कांही काळ त्यांनी श्री सज्जनगडावर वास्तव्य करुन श्री रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथाची अनेक पारायणे केली. श्री रामदास स्वामींच्या विचारानी त्यांना भारावून टाकले होते. सज्जनगडावर ते वास्तव्याला असल्यामुळे त्यांना रामदासी म्हणत, समर्थ म्हणीत. पुढे पुढे त्यांच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही गेली. त्यांची समाधी मिरजेच्या पुण्यभूमी कृष्णाघाटावर वॉटर वर्क्सच्या परिसरात आहे. त्यांची पुढील पिढीची माहिती खालील प्रमाणे – त्यांच्या लहान भावाचे नांव स्व. जनार्दन प्रभाकर गाडगीळ, स्व. जनार्दन प्रभाकर गाडगीळ यांना एकच मुलगा. त्यांचे नांव स्व. हरि जनार्दन गाडगीळ (भावाचा मुलगा-नातू)
स्व. हरि जनार्दन गाडगीळ यांना एकूण तीन मुले
१) स्व. प्रभाकर हरि गाडगीळ :- यांना १) भास्कर व २) शरद (मयत) ही दोन मुले
२) स्व. पंडित हरि गाडगीळ :- ब्रह्मचारी होते
३) स्व. हणमंत हरि गाडगीळ :- यांना दोन मुले
(अ.) श्री माधव हणमंत गाडगीळ (ब.) स्व. मिलींद हणमंत गाडगीळ – हे ब्रम्हचारी होते
श्री माधव यांना दोन मुले श्रेयस, तेजस ही दोन मुले
श्री वंदनीय रामदासी गाडगीळ बुवा हे अंध होते. ते वेदशास्त्र संपन्न श्री नृसिंह सरस्वती कृपापात्र थोर उपासक होते. तसेच समर्थ रामदास भक्त होते. गाडगीळ बुवांचा मिरजेत ब्राम्हणपुरीत वाडा आहे / होता. त्यांची समाधी मिरज कृष्णाघाटावरील वॉटर वर्क्सच्या कंपाऊंड मध्ये रस्त्यालगत आहे. त्यांच्या समाधीला समर्थ रामदासीबुवांची समाधी म्हणतात. दगडी चौथऱ्यावर वीट बांधकामाची घुमटी असून, त्यात त्यांच्या पादुका आहेत. शेजारीच राऊळ बुवांची समाधी आहे. निरंजन रघुनाथांची समाधी आहे. कुंभार स्वामींचे शिष्य श्री कृष्णास्वार (बुवा) यांची समाधी आहे तर जवळच श्री दत्तावतार आण्णाबुवांची समाधी आहे.
शब्दांकन :- श्री. माधवराव गाडगीळ, मिरज
