श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे पुजारी स्व. रामभाऊ मुरगुडकर
श्री कृष्ण सरस्वती महाराजांच्या पहिल्या शिष्य पंचकातील रामभाऊ मुरगुडकर हे एक प्रमुख सेवेकरी होत. त्यांचा जन्म द्विज सारस्वत घराण्यात झाला होता. त्यांचे वडिलार्जीत एक किराणा मालाचे दुकान शुक्रवार पोलिस चौकीजवळ होते. अखिल कोल्हापूर शहरात त्यांचा एक थोर व्यापारी म्हणून लौकीक होता. फारिक म्हणजे व्यापारी, फारिक हे आडनांव त्यांचे नव्हते. जमीन जुमला मुरगुड या गांवी असल्यामुळे पूर्वजा पासूनच रामभाऊंचे मुरगुडकर हे आडनांव पडले होते.
रामभाऊ हे सात्विक व धार्मिक प्रवृत्तीचे होते. आपला व्यवसाय सांभाळून धार्मिक ग्रंथाचे ते वाचन मनन करीत असत. वेदान्तात त्यांना फार गोडी होती. दारी येणाऱ्या अतिथी याचकाची ते यथायोग्य संभावना करीत असत. काम धंद्यात गुरफटून गेलेले रामभाऊ कुटुंबाने एकदा त्यांच्या हातातील कडी (पाटल्या) धान्य मोजण्याच्या शेराच्या मापात ठेवल्या होत्या. तेवढ्यात शेजारच्या एका बाईने त्यांनाच सांगून ते शेराचे माप स्वत:च्या घरातील धान्य मोजण्यासाठी नेले व कांही वेळेने ते परत होते तेथे आणून पण ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी हातात त्या पाटल्या चढवण्यासाठी त्या मापात न दिसल्यामुळे संबंधित शेजारणीला विचारण्यात आले. ‘‘शेर नेते वेळी त्यात ती सोन्याची कडी किंवा अन्य कोणतीही वस्तू नव्हती’’ असे त्या शेजारणीने सांगता, चोरीचा पाठपुरावा घेण्यासाठी रामभाऊनी अगणीत ज्योतिषी भविष्य कारांच्या घरचे उंबरठे झिजवले. हे नुकसान त्यांच्या अत्यंत जिव्हारी बसले. हताश झालेल्या रामभाऊना कोण्या एका महाभागाने सांगितले की ‘‘कुंभार गल्लीत दत्तावतारी समर्थ श्रीकृष्ण सरस्वती महाराज हे त्रिकाळ ज्ञानी असून, त्यांची कीर्ती दिगंतात गाजत आहे ते तुला तुझ्या समस्ये विषयी निश्चित काय ते सांगतील तू त्यांच्याकडे जा!’’
रामभाऊ त्वरीत शोध घेत वैराग्य मठीत येऊन महाराजांना प्रणिपात करत असतांना महाराज तारामतींना म्हणाले ‘‘रामजी आला ! रामजी आला ! माझा पुजारी रामजी आला!’’ पण काय? त्याने अशाश्वताचा ध्यास धरला पूर्व ओळख नाही अशी समजूत असणाऱ्या रामभाऊना त्यांच्या नावांचे महाराजांनी रामजी म्हणून संबोधलेले अति आनंदाचे मनोवांच्छित नामनिर्देशक पहिल्याच भेटीत उद्गारलेले हे उद्गार रामभाऊंना पण अति उल्हासित करणारे ठरले.‘‘रामजी अरे तूझी वस्तू तुझ्याच घरी मिळेल’’ हे महाराजांनी प्रश्नाआधी उत्तर दिल्यामुळे रामभाऊची खात्री पटली की, महाराज खरोखर त्रिकाळ ज्ञानी साक्षात दत्त महाराज आहेत. रामभाऊचा दृढ विश्वास महाराजांच्यावर बसला व त्या मुळेच ते महाराजांच्या असिम कृपेला पात्र ठरले! भल्या पहाटे स्नानादि क्रिया आवरून रामभाऊ महाराजांच्या सेवेसाठी जात. पहाटेची काकड आरती, दुपारची माध्यान्ह आरती व रात्री शेज आरती ते स्वत: करत. त्यांच्या खिशात बदाम, खारका, असायच्या. अधून-मधून महाराजांना ते खाऊ घालीत. त्रयोदशी विडा ते स्वत: करीत व जेवणानंतर दुपारी व रात्री ते महाराजांच्या मुखी देत असत. रात्री महाराज शयनगृही शेज करते झाले की, रामभाऊ स्वत:च्या घरी परतत असत. एकदा शेज गृहात महाराजांचा असाच निरोप घेत असता ‘‘आज गृही जागृत असावे’’ अशी महाराजांची त्यांना आज्ञा झाली.
त्या रात्री अजिबात निद्रा घ्यावयाची नाही असे रामभाऊनी ठरवले. मध्यरात्री रामभाऊ पलंगावर पडले असता गवाक्षातून सुवर्णाची हरवलेली ती कडी त्यांच्या अंगावर पडली. त्या बरोबर लगेच रामभाऊ उठून दार उघडून बाहेर पहातात तो त्या काळ्या भिन्न रात्री मनुष्य रुपी व्यक्ती त्यांना कोठे दिसली नाही. तेव्हा हे कृत्य महाराजांचे आहे हे रामभाऊंनी जाणले ‘‘तू आज रात्री गृही जागृत असावे’’ ह्या महाराजांच्या उक्ती बरोबरची प्रचिती आली. सुवर्णाच्या ह्या कड्या /बांगड्या कुणी नेल्या होत्या. इतके दिवस त्या कुठे होत्या? गुरुंनी मात्र सांगितल्या प्रमाणे मला माझ्या घरीच परत आणून दिल्या.
नंतरच्या पहाटे रामभाऊ नित्या प्रमाणे वैराग्य मठीत येऊन महाराजांना ही वार्ता अगदी आनंदात सांगितली. क्षुल्लक ‘‘सुवर्णाचा ध्यास’’ म्हणजेच अशाश्वताचा ध्यास लागला तसाच ध्यास महाराजांच्या बद्दल आपल्याला ध्यास लागला पाहिजे ‘‘माझा पुजारी माझा पुजारी’’ ह्या त्यांनी दिलेल्या किताबाला आपण सेवेत जागृत तत्परतेने राहिले पाहिजे असा निजबोध महाराजांच्या कृपेने रामभाऊंना झाला.
‘‘चला आपण आज जोतिबाला जाऊया! तो केदारनाथ आपल्याला बोलवित आहे!’’ असे म्हणून महाराजांनी एके दिवशी जोतिबाची वारी केली. बाळकृष्ण राशिवडेकरांच्या खांद्यावर बसून महाराजांच्यासह सर्व भक्त सेवक मंडळी निघाली रामभाऊच्या दुकाना जवळ येताच ते बाळकृष्णांना म्हणाले ‘‘जरा थांबा! महाराजांना दुपारी मध्यान्हाची भूक लागेल थोडे लाडू बरोबर बांधून घरातून घेवून येतो!’’ ‘‘कशाला? राहू देत चला! पुढे त्याची सोय झाली आहे! शंका करण्याचे कांही कारण नाही! ’’ असे महाराज रामभाऊंना म्हणाले मग रामभाऊ म्हणाले की ‘‘तुम्ही जेंव्हा आमचे सुवर्ण कंकण दिले तेंव्हाच शंकेचे मूळ उपटले गेले! आता ती शंका येईल तर कुठून ?’’
मग महाराजांच्यासह सर्व सेवक वृंद पंचगंगा धरणावरून वडणगे ह्या गांवात आले. ‘‘आता मात्र मला फार तहान लागली!’’ असे महाराज म्हणता बाळकृष्ण राशिवडेकरांच्या खांद्यावरुन स्वामी उतरले. जवळच्या एका शेजाऱ्याच्या घरातून एक कळशी घेऊन तळ्यातील स्वच्छ पाणी आणावयास रामभाऊ गेले. पाणी भरुन घेत असता तळ्या जवळच एक तेजस्वी ब्राम्हण न्याहरी सोडून खात असलेला रामभाऊंना दिसला.
त्याने पृच्छा करिता रामभाऊ म्हणाले, ‘‘आमच्या गुरुच्यासह आम्ही ज्योतिबाला दर्शनासाठी निघालो आहे. महाराजांना व आम्हा सर्वांनाच तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी येथे आलो.’’ तेंव्हा तो तेजस्वी ब्राम्हण म्हणाला ‘‘माझ्या जवळ हे दहा लाडू आहेत महाराजांच्यासह तुम्ही सर्व सेवकांना पुरणारे आहेत. तेंव्हा हे सर्व लाडू तुम्ही घेऊन जावा!’’ रामभाऊ म्हणाले ‘‘नको नको तुम्ही नुकतेच फराळाला बसला आहांत, बसा! बसा! आम्हाला ते कांही नकोत!’’ तेंव्हा तो द्विज म्हणाला ‘‘हे पहा! ह्यातील एक लाडू जरी तुमच्या गुरुनी सेवन केला तरी मी धन्य होईन.’’ तुमचे गुरु श्रीकृष्ण ह्या नांवाप्रमाणेच मोठेच आहेत. माझ्या सारख्या सुदाम्याचा आहार ते कांही त्याज्य करणार नाहीत. तुम्ही ते घेऊन जावा. माझी तुम्हांला आग्रहाची विनंती आहे.’’ मग ते सर्व लाडू व पाण्याची कळशी घेऊन रामभाऊ महाराजांच्या जवळ आले. घडलेली ही हकीकत महाराजांना सांगितली,’’ महाराज पण म्हणाले, ‘‘दे दे तो लाडू दे’’ त्यासाठी महाराज अगदी अधिर झाले होते.
एक लाडूचे चूर्ण करुन रामभाऊंनी महाराजांचे वदनी भरवला. पाणी दिले. महाराजांची आज्ञा होता एकेक भक्ताने एक-एक लाडू भक्षण केला. मनसोक्त पाणी सर्वजणांनी पिले. क्षुधा तृष्णा शांत होता. महाराजांनी पुढची जोतिबाची वारी पूर्ण केली. तो तेजस्वी ब्राम्हण हा खरोखरीचाच ब्राम्हण होता की, त्या शिवक्षेत्राचा धनी साक्षात अपर्णानाथ होता? ते समर्थच जाणे! कारण आपण आपल्या क्षेत्रातून श्रीकृष्ण सरस्वती महाराज ह्या कलीयुगातले समय पुरुष! भूकेने व्याकुळ होऊन पुढे जावा; हे त्या भोळ्या नाथाला कितपत रुचले? हा ही प्रश्नच नाही का/म्हणूनच महाराजांनी रामभाऊना घरातून लाडू घेण्यास मज्जाव केला होता. महाराजांच्या जवळ सूक्ष्मात सूक्ष्म घडणाऱ्या घटने मागे महत्तम अशा महाराजांच्या लीला होत असत!
एके दिवशी महाराज पहाटे नेहमीप्रमाणे लवकर उठले नाहीत. तसेच निद्रावस्थेत कांही काळ पडून राहिले. भक्तांचा जनसमुदाय काकड आरतीसाठी बराच जमला होता. प्रभात समयाची करुणाष्टके कोणी भक्त म्हणत होती. भक्तिपर स्तुती अभंग कोणी आळवित होते. शेवटी मग महाराज उठले. रामभाऊनी त्यांचे मुख हात पाय प्रोक्षाळण केले. नंतर महाराजांना चौरंगावर बसवून नेहमी प्रमाणे खारीक मुखात घातली. बी वगळून ती खारीक महाराजांनी मुखातच करकरुन चूर्ण करुन निमिषभर थांबून ते घास तोंडातच ठेऊन म्हणाले.
‘‘अरेरे! हे काय? असे कसे घडले? गरीब बापुडे मरत आहे. तुम्ही कसे काय पाहिले नाही! त्याला आवश्य वाचवले पाहिजे.’’ असे म्हणून देवबुवा (कृष्णालाडांचा) हात आपल्या हातात धरुन बारीक केलेल्या खारकेचे चूर्ण त्याच्या हातावर मुखातील घास महाराजांनी टाकला. त्या चूर्ण केलेल्या खारकेतून एक बारीक आळी सहिसलामत सुटून बाहेर पडण्यासाठी निघत असलेली सर्व सेवक भक्त जनांनी पाहिली.
सेवक भक्तजन स्वत:च्या प्राक्तन कराल कर्माच्या दाढेत सापडले, तरी त्यांना ह्या खारकेच्या आळीप्रमाणे मी सहिसलामत सुखरुप ठेवतो असेच महाराजांनी सर्व भक्तांना सुचविले. ‘‘सकळ जनांचा वाचा करिता सांभाळ! तुजा मोकलिल ऐसे नाही. ह्या एकनाथाच्या अभंग ओवी प्रमाणे महाराजांनी सर्व भक्तांना पटवून दिले.’’ ‘‘लक्ष चौऱ्याऐंशी योनी!……. एकच मोक्ष दानी!’’ ग्रंथकर्ते मुजूमदारानी एवढ्यासाठीच महाराजांचे असे वर्णन केले आहे. कृष्णालाड श्री गुरुच्या सेवेत विनम्रपणे तत्पर असत. दररोज पंचगंगेवर स्नान करुन ते महाराजांची कौपीन छाटी स्वच्छ धुवून आणित असत. अति पुण्याई कुणाच्या पदरात पडू लागली की, नियती त्याचा पाय मागे खेचत असते. विनम्रपणे सद्गुरुंच्या सेवेत रममाण झालेल्या कृष्णा लाडांना ह्या नियतीचा फटका बसला. त्याचे चित्त थोर योग्या प्रमाणे असतांना ते एकदा अकल्पित तारुण्य मदाने ध्यानाग्र झाले हे न आवडल्यामुळे व वेळीच त्यांना सावध करण्यासाठी महाराजांनी एक विपरीत घडवले! एक मध्य रात्रीला महाराजांनी कृष्णालाड व रामभाऊना एकाच वेळी स्वप्न दृष्टांत दिला पूर्व कर्म वशात लाडाची जननी कुत्रीच्या जन्माला गेली होती ती पगी शुनी कृष्णा लाडांना म्हणाली ‘‘अरे झोपलास काय? ऊठ आधी! तुला आत्ताच्या आत्ता गुरुनाथ कार्या निमित्त बोलवित आहेत!’’ कृष्णालाड झोपेतून जागे झाले व त्यावर कांही काळ विचार करीत तसेच पडून राहिले. त्याचवेळी इकडे रामभाऊना स्वप्नात एक ब्राम्हण येऊन म्हणाला, ‘‘अरे तुला तुझे गुरुनाथ आत्ताच्या आत्ता कार्यानिमित्त बोलवित आहेत.’’ लगेच त्यांनी मध्यरात्री तशीच वैराग्य मठी गाठली. कृष्णा लाडांनी विचारले ‘‘काय रे अजून पहाटेचा बराच अवधी असता इतक्या मध्यरात्री कसा काय आलास? बरे आलास तर का आलास? झोप आता इथे सुखाने पहाट होईपर्यंत!
रामभाऊनी आपले स्वप्न कृष्णा लाडांना सांगितले. कृष्णालाडानी पण स्वत:चे स्वप्न त्यांना सांगितले. एवढ्या मध्यरात्री आपल्याला महाराज असे काय बोलवित आहेत? पाहुया तरी चला म्हणून ते दासद्वय महाराजांच्या शयनगृहाजवळ येऊन हळूच दार उघडून पहातात तर महाराज पर्यंकावर पाय खाली सोडून दाराच्याच बाजूला त्यांच्या कडेच पहात असलेले दिसले जणू ते उभय दासांचीच वाट पहात होते. दोन्ही भक्तांनी महाराजांचे चरण वंदून ‘‘काय महाराज? काय आज्ञा आहे?’’ अशी प्रार्थना करताच महाराज लाडांना म्हणाले’’ हे बघ कृष्णा आज पासून माझी कौपीन व छाटी रामजी धुवत जाऊदे! एवढे तू करशील ना रे माझ्यासाठी?’’ हे शब्द ऐकताच कृष्णा लाडांना महाराजांचे ते शब्द मरणप्राय वाटू लागले ती अवस्था महाराजांनी जाणून लगेच परत कृष्णा लाडांना म्हणाले ‘‘हे बघ खिन्न होऊ नको. माझ्यासाठी चार दिवस सेवा करु दे रामजी देईल परत तो तुला चार दिवसांनी!’’ कृष्णा लाडाना महाराजांची ती आज्ञा मान्य करणे भागच होते. लाडांनी ‘‘होकार’’ देताच स्वत:ची कौपीन छाटी महाराजांनी लाडांच्या हाती देऊन ‘‘ही दे रामजीस?’’ असे ते म्हणाले जड अंत:करणाने लाडांनी ती कौपीन छाटी रामभाऊना दिली. दुधात साखर पडावी तशी ती पण सेवा रामभाऊनी अत्यंत मनोभावाने केली. चार दिवसा नंतर गुरुंच्याच पुढ्यात रामभाऊनी कृष्णा लाडांची सेवा त्यांच्याकडे परत सुपूर्द केली. ह्या घटनेने कृष्णा लाडांनी जो धडा घ्यावयाचा तो घेतला. रामभाऊ जी पडेल ती सेवा करण्यास तत्पर असत. महाराज कोठेही निघाले तर लांबचे असो वा जवळचे अंतर असो आपल्या इच्छेनुसार कृष्णास्वार व रामभाऊ मुरगुडकर ह्यांच्या स्कंधावर आरोहण करीत असत. पंढरपूर यात्रेच्या वेळी एका घोड्याची बग्गी तारामतींनी बरोबर घेतली होती पण महाराज त्या बग्गीत दोन मिनीटे सुध्दा बसले नाहीत. संपूर्ण पंढरीची वारी कृष्णा लाड, कृष्णा स्वार व रामभाऊंनी महाराजांना स्वत:च्या खांद्यावर बसवूनच पार पडली.
‘‘गुरुंच्या शिवाय तरणोपाय नाही!’’ मनुष्य जन्माची सार्थकता सद्गुरुंच्या शिवाय होत नाही. ‘‘सदगुरुकृपा’’ हेच मानवी जीवनाचे अंतिम लक्ष होय. आपल्या मातेला रामभाऊंनी सद्गुरुचा महिमा व त्याचे मानवी जीवनातील महत्व विशद करुन सांगितले. गुरु केला पाहिजे हे त्या वृध्द मातेला वाटले पण श्री कृष्ण सरस्वती महाराज तिला पहिल्या पासूनच काही भ्रमिक कल्पनेमुळे आवडत नसत. उलट ती महाराजांची आत्ता पर्यंत निंदा करतच आली होती. कोल्हापुरात त्यावेळी अशा मताची बरीच माणसे होती. चिंतामणीला खडा म्हणणाऱ्या, कामधेनूला हाकलून लावणाऱ्या व्यक्ती मध्ये ती वृध्दा वावरत असल्यामुळे रामभाऊना ती म्हणाली ‘‘हे बघ रामजी गुरुची थोरवी मोठी आहे परंतु तुझ्या ह्या कृष्ण सरस्वती महाराजांच्या संगतीने कदापीही मुक्ती मिळणार नाही!’’ हापूस आंब्याला किड लागावी त्या प्रमाणे हे वृध्द मातेचे विचार ऐकून रामभाऊना मनोमनी वाईट वाटले. खिन्न अवस्थेत वैराग्य मठीत महाराजांच्या कडे आल्यावर त्यांना महाराज म्हणाले ‘‘हे बघ रामजी ! सर्वत्र आम्ही व्यापून उरलो असता तुझे मन असे विषण्ण कशाला व्हायला पाहिजे? जे बहकत गेले आहे ते पुन्हा येईल ताळ्यावर ! आम्ही त्याला जबाबदार आहे त्या बद्दल मी तुला ग्वाही देतो. तू नुसती मौज पहात रहा!’’न सांगताच महाराजांनी मनातले शल्य काढून टाकलं. महाराजांच्या त्या अमृतोद्गारामुळे मानसिक खिन्नता दूर पळून गेली. थोड्याच दिवसात पंढरीच्या वारीचे दिवस आले हेाते. उभा जन्म आपण घालवला पण आयुष्यात पंढरीनाथाचे दर्शन घेतले नाही. आता तरी तो दीनांचा कैवारी भक्तांचा सोयरा! पंढरीनाथ एकदा डोळे भरुन पहावा, ही मनिषा त्या मातेने रामभाऊना बोलून दाखवली.
जन्म दायिनिची इच्छा पुरी करणे आपले कर्तव्यच आहे. आपण तिला पंढरीला घेऊन जाऊ, पण महाराजांचा ह्या बाबतीत विचार घेतला पाहिजे. म्हणून ते वैराग्य मठीत येऊन महाराजांना हा बेत सांगता रामभाऊना महाराज म्हणाले ‘‘करा! करा! पंढरीच्या वारीची तयारी करा! आणि वृध्देला एकदा पंढरीनाथ दाखवून लवकर आणा!’’ महाराजांची अशी आज्ञा होताच रामभाऊनी शकटारोहण करुन आपल्या मातेस दशमी दिवशी पंढरीला आणले. पंढरीचा वारकरी सोहळा रामभाऊनी आपल्या मातेला दाखवला. हजारो भाविकांच्या सोज्वळ स्नाने चंद्रभागा आनंदाच्या पुराने ओसंडत होती. हजारो वारकऱ्यांच्या नामघोषाने वाळवंटातील कण आणि कण विठ्ठल रखुमाईच्या गजराने मळला जात होता. ठिक ठिकाणी मंडप उभारुन ज्ञानेûवरींच्या पारायणात हरिभक्त जणू ज्ञान गंगेत डुबूंन जात होते जो सोहळा पहाण्यासाठी देव देवांची नभी दाटी होत होती. तो सोहळा पाहून धन्य झाल्याचे त्या वृध्द मातेने रामभाऊना सांगितले.
दुसऱ्या दिवशी एकादशी होती. भल्या पहाटे पासूनच विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरात जाण्यासाठी अजिबात वाव नव्हता. रामभाऊंनी एका ठिकाणी मातेस बैस म्हणून सांगितले. लवकरात लवकर सुलभ दर्शन होण्याच्या हेतुने आत जाण्यास कुठून मार्ग मिळतो का ते पाहून येतो असे मातेला सांगून रामभाऊ हरिभक्तांच्या त्या गर्दीमध्ये गुडूप/अदृश्य झाले. मनात मात्र सारखे महाराजांना आपली चिंता वहात होते. महाराज ह्या लाख लाख लोकांच्या मधून माझ्या आईला कसे दर्शन होणार? ह्या बद्दल त्यांच्या मनात सारखा महाराजांचा जप अविरत चालू होता.
रामभाऊंना येण्यास उशिर होऊ लागला. तशी ती वृध्द माता जास्तच काळजी करु लागली. घाबरुन गेलेल्या त्या अवस्थेत असता तिच्या जवळ एक व्यक्ती दत्त झाली! सुगौरवर्ण, दाढी वाढवलेली, बलदंड अशी ती व्यक्ती माऊलीला म्हणाली ‘‘आजी बाई! चला राऊळात तुमच्या मुलाचे समर्थ गुरु कोल्हापूरचे श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज आज भल्या पहाटेच आपल्या कांही सेवक मंडळीसह येथे आले आहेत. त्यांच्याच आज्ञेने मी येथे आलो आहे. ते आता राऊळात आहेत. तुम्हांला ह्या गर्दीचा त्रास होणार नाही.’’ रामभाऊच्या मातेने त्या बोलण्यास होकार दिला. एवढी गर्दी असतांना पण तिने डोळे भरुन श्री विठ्ठलाचे २८ युगे उभे असलेले प्रसन्न दर्शन घेतले. धन्यता पावलेल्या त्या मातेने परत एकदा समाधानाने पंढरीनाथाचे दर्शन घेतले. परत त्या व्यक्तीने खांद्यावर बसवून मातेला तिच्या मुळच्या स्थानावर आरामात आणून खाली उतरले. ‘‘काय आजी, झाले न व्यवस्थित विठोबाचे दर्शन?’’ ती माता म्हणाली ‘‘हो’’ मग आता मी जातो असे बोलत तिच्या पुढ्यातच ती व्यक्ती अंतर्धान पावली. तो देहधारी मनुष्य इकडे तिकडे पहाता कुठेही दिसेना. असली कसली मला भूल पडली. या विचारात ती माता असतानाच तेथे हताश झालेले रामभाऊ परत आले व तिला म्हणाले. ‘‘अगं आई ह्या गर्दीत विठ्ठल दर्शन अगदी दुरापास्त आहे.’’ ती माऊली रामभाऊना म्हणाली ‘‘अरे असे काय म्हणतोस? कांही नाही दुरापास्त, झाले मला विठ्ठल दर्शन!’’ आश्चर्यचकीत मुद्रेने रामभाऊ तिला म्हणाले, ‘‘आं, ते कसे काय गं!’’ तेव्हा ती माऊली पुत्राला सर्व इत्युंभूत हकिगत सांगती झाली. गुरुचा आज्ञांकीत म्हणून तो कोणी मनुष्य आला. त्याने स्वत:च्या खांद्यावर मला बसवून सुखरुप पणे पंढरीनाथाचे दर्शन घडवून आणले. दोन वेळा तुमचे नांव काय? असा प्रश्न विचारला असता तुमच्या मुलाच्या गुरुंचा अंकीत एवढेच तो बोलला. मला त्याने खांद्यावरुन खाली ठेवले. नंतर तो इथल्या इथे कसा गुप्त झाला ते न कळे पण आज तो आपल्या कामास आला. त्याने माझी विठ्ठल दर्शनाची अभिलाषा मात्र पूर्ण केली.’’
मातेचे हे बोल ऐकत असता रामभाऊ सद्गदीत झाले व तिला म्हणाले, ‘‘अगं आई ज्याला तू निंदीत आलीस ना तेच आपले ज्ञानदेव, भक्तांना ज्ञान देणारे, भक्तांचा भार वाहणारे त्यांची चिंता हरण करणारे श्री कृष्ण सरस्वती महाराज त्यांनीच तुला खांद्यावर बसवून लाखो भक्तांच्या थव्यातून तुला आत गाभाऱ्यात नेऊन विठोबाचे दर्शन व्यवस्थित घडवून परत इथे आणून ठेऊन तुझ्या पुढ्यात गुप्तपण झाले. जर भक्तांच्या बरोबर ते इथे जर आले असते तर ते मला न भेटता राहिले असते का? आता तरी तू ती मूढ वृत्ती सोडून महाराजांना शरण जा! महाराजांच्या सारखे मायाळू ,महाराजांच्या सारखं समर्थ महाराजच!’’
त्या वृध्द मातेच्या विचारात अमूलाग्र बदल झाला. रामभाऊचे म्हणणे तिला मग निर्विवाद पटले. समयोचीत लीला महाराजांनी केली. स्वत:च्या डोळ्यांनी ती पाहिल्यामुळे त्या मातेचा बुध्दीपालट झाला मग ती पुत्राला म्हणाली ‘‘आता तुझ्या महाराजांच्याकडे मला लवकर ने! त्यांना मी शरण जाईन! मोक्षदानी असणाऱ्या साक्षात अत्रिनंदन महाराजांना मी काय मूढपणे आयुष्यभर निंदा करुन नरकात जाण्याचे कवाड उघडू पहात होते. आता मला दुसरे तिसरे कांही नको! तुझ्या महाराजांच्या चरणावर एकदा मला लवकर नेऊन घाल!’’
रामभाऊंना महाराजांचे बोल तिथे आठवले ‘‘बहुकले ते परतेल सहज!’’ बहकत गेलेली ती माता योग्य वेळेवर ताळ्यावर आली. रामभाऊनी परत शकटारोहण करुन गुरुंच्या नामस्मरणात मातेला कोल्हापूरात आणली. वैराग्य मठात ती माय लेकरं श्रीगुरुंना साष्टांग प्रणिपात करती झाली. ती माता करुणा भक्तिने महाराजांना म्हणाली ‘‘महाराज ! बुध्दीवंतानाही भ्रम पडावा अशी तुमची लीला सारी! तुमची निंदा करणाऱ्या अधमाधमात मी मूर्खपणे देवा तुम्हाला दूर्मतीने दूर्दैवाने आत्तापर्यंत निंदीत आले तू गुरुनाथ थोर आहेस! माझ्या सारख्या पामरीचा अन्याय पोटात घाला. मज दीन अबलेला पदरात घ्या’’ रामभाऊंनी पण महाराजांना अत्यंत कृतज्ञतेने परत नमस्कार केला व महाराजांची परवानगी झाल्यामुळे ती माय लेकरं स्वगृही परत आली.
महाराजांच्या कृपेने रामभाऊ चांगले धनिक व्यापारी म्हणून सर्वश्रूत झाले होते. महाराजांच्या समाधी कालानंतर रामभाऊची काशी यात्रा मजेशीर झाली होती. ही यात्रा एका महाभागाने रामभाऊची संपत्ती लुटण्याच्या उद्देशानेच आखली होती. साक्षात दत्त महाराजांची त्यांची बहुमोल सेवा अंतरल्यामुळे रामभाऊ मनोमनी खिन्न झाले होते. ह्या त्यांच्या विषण्ण मन:स्थितीचा फायदा आपल्या पथ्यावर पडेल असे त्या महाभागाला वाटले. वारस म्हणून मुलगा रामभाऊना नव्हता. ह्याचे तर त्या महाभागाने भांडवल केले. काशीला गेल्यावर गंगास्नान विश्वेश्वरादी दैवतांचे यथासांग दर्शन झाल्यानंतर त्या महाभागाने आपली नखे बाहेर काढली. रामभाऊना तो म्हणाला ‘‘रामभाऊ अलिकडे तुम्ही बरेच उदास दिसता. तुमच्या विषण्ण अवस्थेतून परमेश्वराचे चिंतन करण्यासाठी मी एक मार्ग सुचवतो तो तुम्हांला पटतो का ते पहा. महाराजांची तुम्ही उदंड सेवा केलीत. त्यांची तुमच्यावर कृपा आहेच! तुमचे आता उतार वय झाले आहे तेंव्हा आता प्रंपचातून पूर्ण परावृत्त होऊन त्यातील लक्ष वैदीक धर्माने सांगितल्याप्रमाणे चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास घेऊन परमेश्वराचे चिंतन मननात व्यग्र करा. तुमची संपत्ती, घर, अडी अडचणीची जबाबदारी मजकडे सोपवा. केवळ तुमच्या प्रेमासाठी म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारीन. तेंव्हा तुमचा विचार काय तो तुम्ही ठरवा. तुमचे हित कशात आहे ते मी तुम्हाला सांगितले. महाराजांचे सेवक संन्याशीच नव्हते का तो गाणगापूरचा रामदास, वास्देव दळव्याने तर महाराजांच्यासाठी संन्यास घेतले नव्हता काय? तुम्ही घेतला तर त्यात नवल कांहीच नाही. आपल्या वैदीक धर्माने तो मार्ग आपल्या चांगल्यासाठीच सांगितला आहे. अनायासे आपण ह्या काशीसारख्या पुण्य नगरीत आलो आहोत.’’ त्या महाभागाचे खळ विचार सरळमार्गी रामभाऊनी मनावर घेतले. त्यांचा होकार मिळताच एक अगदी जवळातील जवळचा मुहूर्त काढून संन्यास दीक्षेसाठी लागणारे वस्त्रं व इतर दीक्षा विधीची चीज वस्तू आणल्या. दीक्षा दिनाच्या आदल्या रात्री तर रामभाऊना झोपच येईना. रामभाऊंच्या जवळ त्या खल विचारी महाभागा बरोबर कांही इतर मंडळी पण त्या भटजीच्या वाड्यात झोपली होती त्या मध्ये एक बाल वयाचा किशोर पण झोपला होता. रामभाऊनी उभे आयुष्य महाराजांच्या सेवेत घातले. उद्या आपण सर्वसंग परित्याग करुन वैदिक धर्माच्या आज्ञेप्रमाणे संन्याशी होणार आहे असा बेत आखत आयुष्याचे रामभाऊ सिंहावलोकन करत असतांना त्या मध्यरात्रीच्या शांत वेळी तो बाल किशोर झोपेतच ‘‘नाही! माझ्या आईला संन्यास देऊ नका! असा दोन वेळा जोरात ओरडला!’’
काशीच्या त्या ब्राम्हणाच्या वाड्यात जरी तो किशोर जोरात ओरडला तरी त्याच्या ओरडणाऱ्या शब्दामुळे दुसरे कोणीही जागे झाले नाही, जागे झाले होते ते फक्त एकटे रामभाऊच! रामभाऊच्या व्यतिरिक्त तो वाडा गाढ निद्रीस्त झाला होता. जागे असणाऱ्या रामभाऊना अधिक जागे केले त्या बाल किशोरने. ह्या घटनेने रामभाऊना महाराजांनी निजबोध करुन दिला. त्यांना महाराजांच्या खांद्यावरील षण्मासाच्या बालकाने बोलून व्यसनी माणसाची केलेली कान उघडणी आठवली. त्या मागे महाराजच कारणीभूत होते. आज ह्या वाड्यात बाल किशोरला ‘‘नाही! माझ्या आईला संन्यास देऊ नका. नका हो माझ्या आईला संन्यास देऊ नका!’’ हे बोल महाराजांनीच माझ्यासाठी बोलले आहेत. रामभाऊंनी ह्या मागील सूक्ष्म त्वरितपणे जाणला व लागलीच आपला संन्याशी होण्याचा बेत बदलला.
रामभाऊ दुसऱ्या दिवशी त्या महाभागाला स्वत:चा संन्याशी होण्याचा निर्णय बदललेला सांगता तो रामभाऊना म्हणाला ‘‘अहो! पण संन्याशाची वस्त्रे आपण मागवलीत ती काय करावयाची?’’ रामभाऊ म्हणाले ‘‘ती सर्व तुम्ही घ्या! मी कोल्हापूरला जातो.’’
ह्याप्रमाणे त्या महाभागाचे कारस्थान महाराजांनी रामभाऊच्या कडून उधळून लावले. तो महाभाग रामभाऊचाच पाहुणा लाटकर ह्या आडनावाचा होता. बाळकृष्ण राशिवडेकराच्या विठाबाई राशिवडेकर यांच्या बरोबर रामभाऊचा विवाह झाला होता. त्यांना एकच कन्या झाली तिचे नांव चंद्राबाई हे होते. वयाच्या ५८ व्या वर्षी त्या निवर्तल्या. रामभाऊना मुरगुडकर हे नांव चालवणारे वासु मुरगुडकर हे एकमेव पुतणे होते पण त्यांना मुलगा नसल्याने मुरगुडकरांना वंशज असा कोणी राहिला नाही. मुलीच्या कडूनच त्यांची आता नातवंडे परतवंडे ठिकठिकाणी विखरत चालली आहेत.
सूर्यास्त झाला की, संध्या प्रकाशाचा समय हा ही थोड्याच वेळाचा असतो. नंतर तो पण संपतो. त्याप्रमाणे अनंत लीलाचा स्वामी प्रताप भानू श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची समाधी घेतल्यावर त्यांच्या कांही निकटवर्ती शिष्यांनी पण आपली जीवन यात्रा लवकरच आटोपती घेतली. त्यात हे शिष्योत्तम रामभाऊ मुरगुडकर पण होते.
रामभाऊ ‘‘माझा पुजारी, माझा पुजारी’’ म्हणून महाराज अभिमानाने संबोधित असत. सुवर्ण कंकणा सारख्या अशाश्वतातून सद्गुरुपी शाश्वत परिस रामभाऊनी हस्तगत केला. तसेच त्यांनी त्याच सद्गुरुंच्या विनम्र अखंड सेवेत राहून शाश्वत चिरंतन सौख्य हस्तगत करुन जीवन धन्य केले!
लेखकाचे नाव :- श्री बाळासाहेब शांताराम नाडकर्णी, कोल्हापूर
***
लेख दुसरा: वैराग्यमठीत एकदा कोणी एक ब्राम्हण रामायण वाचू लागला. बरेच श्रोतेजन जमून सद्भावाने रामायण ऐकू लागले. ज्ञानी श्रोतेही मन लावून रामायण ऐकू लागले. रामभाऊ मुरगुडकरही मन लावून नित्य रामायण ऐकत असे. रामायण वाचनाच्या वेळी एके दिवशी एक मोठा वानर पुराणिका समोर बघून मुरगुडकर भयभीत झाला. हा समाचार गुरुंना / स्वामींना सांगण्यास निघाला. त्रिभुवनातील ज्या ज्ञात अशा गोष्टी स्वामींना मुरगुडकराच्या सांगण्यानेच का वानर आल्याचे थोडेच कळणार आहे?. स्वामींकडे जाऊन मुरगुडकर नमन करुन उभे राहिले तोच स्वामी फारिकाला म्हणाले ‘‘रामायण ऐकण्या हनुमंत आला. मुरगुडकरा तो दिसला. परंतु इतरांचे नशिब खोटे’’ ते ऐकून मुरगुडकर विस्मित झाला व स्वामींना म्हणाला ‘‘माझे दैव आडवे आले हनुमानाला मी नमिले नाही. तुमच्या कृपेने मात्र हनुमानाचे दर्शन झाले’’ यावर स्वामी मुरगुडकराला म्हणाले, ‘‘पूर्व पुण्य तुझे बळकट होते. म्हणून त्या वानराचे / हनुमानाचे तुला दर्शन झाले तू भयग्रस्त कां झालास?. ते सामान्य वानर नसून श्रीरामभक्त वायुनदंन हनुमानाचे तुला दर्शन झाले.’’
रामभाऊ फारीक नावाचा एक सारस्वत ब्राम्हण करवीरात राहत होता. ब्राम्हण असून उदर पूर्तीसाठी व्यापारधंदा करीत होता. तसेच वेदांत ग्रंथ वाचीत होता. यथाशक्ती अन्नदान करीत होता. यातून सतत दत्त सेवा / नामस्मरण करीत होता. देव भक्तांचे लीला गं्रथ, वेदांत वाचन, भजन पूजन नित्य करीत असे. एके दिवशी त्याच्या घरातून सुवर्ण अलंकार कोणी चोरुन नेला. बरेच दिवस तो सुवर्ण अलंकार शोधण्याचा त्याने बराच प्रयत्न केला. सुवर्णअलंकार चोरीला गेलेला परत मिळाला नाही. फारीकाचे सर्व प्रयत्न वृथा गेले. करवीरातील ज्योतिषी, देव देवक यानाही त्याविषयी विचारुन पाहिले परंतु सुवर्ण अलंकार परत मिळवून देण्यात सर्वच असफल झाले. त्यामुळे फारीक फार दु:खी झाला. शेजारच्या कोणीतरी मनुष्यांने श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची कीर्ती फारीकाच्या कानावर घातली व त्याला म्हणाला ‘‘श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्याकडे जावा म्हणजे तुमची चोरीला गेलेली वस्तु / सुवर्ण अलंकार सापडेल.’’ रामभाऊ फारीकाने विचार केला. प्रयत्न करता राहू नये कृपा करता सद्गुरु चोरीला गेलेला सुवर्ण अलंकार देतील. श्रीगुरुंचे कळता महिमान सांगावे तयाना वर्तमान. सुवर्ण अलंकार मिळेल याचा त्यांना लोभ दाटला. फारीक श्रीकृष्ण सरस्वतींचा शोध करीत ताराबाईच्या घरी आला.
त्याला पाहताच श्रीकृष्ण सरस्वती / श्रीकृष्णगुरु म्हणाले ‘‘अशोशताचा लोभ धरला / सुवर्णअलंकाराचा परत मिळण्याचा लोभ धरला त्यामुळे मनी शोक दाटला. सुवर्णाचा लोभ तुजला पूर्वपुण्याई येई कामाला. सुवर्णअलंकार घरीच आहे. सुवर्ण अलंकार परत मिळेल. इच्छा सफल होईल. अलंकार घरीच आहे.’’ यापूर्वी श्रीकृष्ण गुरुंचे कधी दर्शन नाही कधी ताराबाईच्या घरी येणे जाणे नाही, न विचारता श्रीकृष्ण गुरु मनुष्य वाटले तरी त्यांची अघटित सत्ता फारीकाने जाणली. पूर्वपुण्याईने श्रीकृष्ण गुरुंची भेट झाली. आता केवळ हे दत्त म्हणून त्यांची पूजाअर्चा नित्य करावी असे त्यांना वाटले. दैवी असेल तर चोरीला गेलेला सुवर्ण अलंकार प्राप्त होईल. आमचा आम्हांस श्रीकृष्ण गुरु परत देतील. अथवा न देतील परंतु आपल्या कुळाचा उध्दार मात्र नक्की होईल असे फरीकाला वाटू लागले. सुवर्ण अलंकाराचे झाले कारण परंतु दुर्लभ गुरु लाभला असे फारीकाला वाटू लागले. रामभाऊ फारीकाला श्रीकृष्ण गुरुंची भक्ती जडली. तिन्ही त्रिकाळ श्रीकृष्ण गुरु जवळ जावून मनोभावाने आरती करु लागला / पूजा करु लागला. कांही दिवस गेल्यावर रामभाऊ फारीकाला गुरुने सांगितले / म्हणाले ‘‘आज मध्यरात्रीला जागा रहा भयभीत होवू नकोस. भीती सर्वथा सोड. आज थोडी प्रचिती पाहा’’ रामजीने गुरुआज्ञा मानली. श्रीकृष्ण गुरु शेजघरात झोपी गेल्यावर रामभाऊ घरी परत आला. घराचे कवाड पुढे करुन जागरुकपणे नामस्मरण करत बसून राहिला. येवढ्यात कवाडाच्या / दाराच्या फटीतून सुवर्ण अलंकार / सोन्याची बांगडी त्याच्या जवळ येवून पडली. त्याने कवाड उघडून सुवर्ण अलंकार / सोन्याची बांगडी आत कोणी टाकली पाहण्याचा प्रयत्न केला परंतु अंधारात कोणी दिसले नाही. त्याच्या मनात सुवर्ण अलंकार / सोन्याचे कंकण बघून तो आश्चर्यचकित झाला. तो मनात म्हणू लागला. हा सुवर्ण अलंकार / कंकण कोणी नेले? इतके दिवस कोठे गेले? आज कोणी परत दिले? या सर्वापुढे त्याचा विचार चालेना त्याला समजणे कठीण गेले. श्रीकृष्ण गुरुंची अतर्क्यलीला बघून तो पुन्हा चकित झाला. चोरीला गेलेला सुवर्ण अलंकार / कंकण श्रीकृष्ण गुरुने परत मिळवून दिले तर तो त्रिताप भंग कां करणार नाही? नष्ट करणार नाही? येथून पुढे श्रीकृष्ण गुरुंचा संग करण्याचा, सेवा करण्याचा त्याने विचार केला. सर्व रात्र त्याने गुरुंच्या चिंतनात घालवून प्रात:काळी श्रीकृष्ण गुरुंजवळ धावून आला. अनन्य भावे त्यांच्या चरणी लोळू लागला. गहिवरुन रडू लागला व म्हणू लागला ‘‘माझ्या मोहाची जळूदे वासना, तुम्ही मोक्षदाणी असता समर्थ असता मी सुवर्ण अलंकार / कंकण हा नाशवंत पदार्थ मागितला. आता तुझा विसर क्षणभर न पडो, आता तुझे चरण कधीही सोडणार नाही, तुझ्या चरणाजवळ निरंतर ठेवा हेच निरंतन मागणे. या भवसागरातून तूच माझा तारक होशील, असा मला भरोसा आहे.’’ तेंव्हा पासून रामभाऊ फारीक लोभांपासून मुक्त झाला. संसारातून मुक्त झाला अशी त्याच्यावर श्रीकृष्ण गुरुंची कृपा झाली.
लेखकाचे नाव : – श्री झेंडे महाराज
संदर्भ ग्रंथ : – समुद्र भरला आहे (पान क्रमांक २७८)