
मराठी संस्कृतीच्या जपणूक करणाऱ्या यादव साम्राज्याच्या वेरुळच्या उत्तरेस आठ कोस ‘‘निधोन बावरे’’ नांवाचे एक खेडेगांव आहे. त्या खेडेगांवात रामभटबाबा कृष्णात्री गोत्री एक सात्त्विक ब्राम्हण राहत होते. अंतूर व फलंबरी या दोन गांवचे त्यांच्याकडे पौराहित्य होते. रामभटबाबा हे वेदशास्त्र संपन्न सात्त्विक ब्राम्हण असून जरी व्यवसाय जोतिषी असला तरी स्वभाव निर्लोभी होता. श्री प्रभू रामचंद्र त्यांचे आराध्य दैवत. स्नानसंध्या, पूजा अर्चा, नामस्मरण, ध्यानधारणा यात ते सगळा दिवस घालवीत. त्यांच्या धर्म पत्नीचे नांव गोदावरी होते. पती सेवा, ईश्वर, हरी नामस्मरण, अत्यंत समाधानी अशा त्या थोर पतिव्रता होत्या.
श्री रामभटांना ज्योतिषाचा उत्तम अभ्यास अगवत होता. त्यामुळे ज्योतिषांच्या निमित्ताने लोकांची वर्दळ त्यांच्या घरी अहर्निश होती. त्यांना पहिला मुलगा होता. त्याचे नांव हरिभट होते. त्याचा विवाह झाला होता. सूनही जबाबदारी गृहिणी होती.
श्रीरामभट व गोदाताईना आता संसारातील व्यथा बाजूला ठेवून अध्यात्मिक सुख व शांतता अनुभवयाची होती. कुठं तरी दूर एकांत स्थळी जावून स्वसाधना करायची होती. ईश्वर चरणी एकाग्र व्हायचे होते. यासाठी त्यांनी आपला मुलगा हरिभट व सुनेवर प्रपंचाचा भार सोपवून एके दिवशी सुमुहूर्तावर आवश्यक तेवढे साहित्य घेवून घराचा निरोप घेतला.
मजल दरमजल प्रवास करीत ते कोकणात सागर किनारी असलेल्या हरिहरेशरला पोहचले. हरिहरेशर हे अत्यंत प्रखर जागृत देवस्थान असून, समुद्र किनारी वसलेल्या अत्यंत रम्य ठिकाणी आहे. पाहिजे तसा एकांतवास या रम्य ठिकाणी रामभटबाबांना येथे मिळाला. हरिहरेश्वराच्या पाठीमागे भैरवनाथाचे मंदिर होते. ब्राम्हमुहूर्तावर उठून स्नानसंध्या आटोपून हरिहरेशराची, भैरवनाथाची पूजाअर्चा, वाचन, जप, नामस्मरण, त्रिकाल स्नानसंध्या यात त्यांचा सर्व दिवस जाऊ लागला. होता होता एक तपाचा (बारा वर्षे) काळ त्यांनी श्री हरिहरेशर व भैरवनाथांच्या सेवेत अत्यंत आनंदाने घालविला. त्यांच्या या तपाचे फळ त्यांना लवकरच मिळाले. श्री हरिहरेशराने स्वप्नात दृष्टांत दिला व आदेश दिला की, ‘‘तुमचे कार्य झालेलं आहे. तुम्ही प्रसन्न चित्ताने घरी जा. तुम्हा उभयतांची पूजा अर्चा / सेवा आमच्या चरणी रुजू झालेली आहे. तुमचे कल्याण आहे.’’ या दृष्टांताने श्रीरामभटबाबा व मातोश्री गोदावरीना अतिशय आनंद झाला. आपल्या बारा वर्षाच्या अनुष्ठानाची हरिहरेशरला सांगता घालून गांव जेवण घालून ते आपल्या गांवी ‘‘निधोन बावरे’’ ला परत आले. ‘‘निधोन बावरे’’ या आपल्या गांवी परत आल्यावर लोकांनी / गांववाल्यांनी / त्यांच्या पै पाहुण्यांनी त्यांचे आनंदाने / उत्साहाने स्वागत केले. त्यांच्या खडतर तपश्चर्ये बद्दल धन्योद्गार काढले. श्री रामभटजी आता हळूहळू घरातील व्यवहारात / पौराहित्यात लक्ष घालू लागले. लवकरच बारा वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांना शके १६६५ शालिवाहन शके प्रमोदीनाम संवत्सरात वसंत ऋतू, चैत्र शुध्द पक्षी, श्रीराम नवमी दिवशी, पुनर्वसु नक्षत्र, अतिगंड योग, तैतील करण, मिथुन लग्नी, माध्यान्ह समयी एका बालकाने त्यांच्या पोटी जन्म घेतला. श्री रामभटबाबांनी व सौ.गोदावरींनी या आपल्या दिव्य बालकाचे नांव ‘‘सिध्देश्वर’’ ठेवले. सिध्देश्वरा नंतर रामभटांना व गोदावरींना पुढे कन्या झाल्या. अशा तऱ्हेने रामभटांना एकूण २ मुले व ५ मुली झाल्या.

त्यांचे घर जणू गोकूळच झाले. धर्मशास्त्राप्रमाणे सिध्देश्वरांचा व्रतबंध / मुंज झाल्यानंतर लवकरच त्यांचा त्या काळच्या परिस्थितीनुसार लहानपणीच लग्नही झाले. लवकरच या लहान वयात म्हणजेच वयाच्या १२ ते १५ व्या वर्षी ते घर सोडून औरंगाबादला वेद अध्ययनासाठी नाना शास्त्री नावांच्या प्रख्यात पंडिताकडे आले. ते कुशाग्र बुध्दीचे एकपाठी होते. त्यांचा स्वभाव विरक्त, शांत, समाधानी, ईश्वर भक्तित गढून जाणारा होता. लवकरच त्यांची पत्नी वारल्याने ते परत गांवी आले. आता संसाराचा धागा तुटला होता. मन विष्षण झाले होते. औरंगाबादच्या एका धार्मिक कार्यक्रमात त्यांची कवी मनाचे, श्री ईश्वर भक्तित सदैव रंगलेल्या महान भगवद् भक्त थोर संत श्री अमृतराय
यांची गाठ पडली. श्री संत अमृतरायाच्या बरोबर श्री सिध्देश्वर हे त्यांच्या श्रीक्षेत्र पैठण गांवी गेले. श्री अमृतरायांनी श्री सिध्देश्वरांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. श्री सिध्देश्वरांना मना सारखा गुरु मिळाला व अमृतरायना शिष्योत्तम मिळाला. लवकरच वेद अध्ययन, ईश्वर प्राप्ती बोध संथा पूर्ण करुन श्री सिध्देश्वर हे आपल्या गांवी परतले.
आता श्री रामभटजी व सौ. गोदावरी आई वृध्द झाले होते. परंपरेने आलेले गांवचे जोशीपण त्यांनी श्री सिध्देश्वराकडे सोपविले व अपुरा संसार पुन्हा पूर्ण करणेस सांगितले. निधोन बावरे गांवापासून अकरा कोस असलेल्या ‘‘सुरंगली’’ गांवच्या गंगाधरपंत व सौ.लक्ष्मीबाई पाटील यांची कन्या भवानीबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. अशा प्रकारे श्री सिध्देशरना पुन्हा एकदा प्रपंचात जाणे भाग पडले. श्री सिध्देश्वर जरी प्रपंचात पडले होते तरी त्यांच्या वृत्तीत व कृत्तीत कांही फरक पडला नव्हता. ते विरक्त होते. स्नान संध्या, ईश्वर चिंतन, वेदाभ्यास यात खंड नव्हता. लवकरच त्यांचे वडील श्री रामभटबाबा वारले. त्यांच्या आई गोदावरीमातेना फारच दु:ख झाले. वडिलांचे वर्ष श्राध्द होताच मनाच्या चित्त शांतीसाठी श्री सिध्देश्वर घरदार सोडून निधोन बावरे सोडून पैठणला आले. त्यांनी आपले गुरु श्री संत अमृतराय यांचा आशीर्वाद व सहवास साधला. श्री अमृतरायांच्या आदेशाने श्री सिध्देश्वर पुढील साधना, विद्या अध्ययनासाठी श्री क्षेत्र काशीला आले. श्री काशी क्षेत्री राहणाऱ्या श्री अमृतराय यांचे गुरुबंधू अद्वैतानंद स्वामी यांच्या आश्रमात राहून पुढील विद्या अध्ययन केले. योगाभ्यास पूर्ण केला. श्री स्वामी अद्वैतानंदाच्या कृपेने श्री सिध्देश्वरला मनोबल, तपोबल, समाधान प्राप्त झाले. त्यांना समदृष्टी साधली. चित्कला प्राप्त झाली, परमानंद प्राप्त झाला, आत्मशांती लाभली. भावसमाधिचा आनंद लाभला. श्री स्वामी अद्वैतानंदाच्या सहवासात दोन वर्षाचा काल व्यतीत करुन त्यांच्या आशीर्वादाने
ते धन्य झाले. श्री स्वामी अद्वैतानंदानी गंगा किनारी समाधी घेतल्यावर ते तीर्थस्थळे हिंडत फिरत, हिमालय पर्वतातील पवित्रस्थलांचे दर्शन घेवून, अनेक साधू संन्याशी, योगी, अवतारी पुरुष यांच्यात कांही दिवस घालवून ते तुळजापूरला आले. बरेच दिवस मुक्काम केला. तेथून सातारा मार्गे कराडला आले. श्रीकृष्णा कोयना संगमात स्नान करुन कृष्णा नदीच्या काठाने प्रवास करीत ‘‘श्री क्षेत्र नृसिंहपूर’’ या त्यांच्या मनाजोग्या निवांत स्थळी आले. हे पवित्र स्थळ म्हणजे श्री भगवान लक्ष्मी नृसिंहाचे स्थान षोडषभूजा नरसिंह देव अखंड शाळीग्रामाची पुरुषभर उंचीची भव्य मूर्ती. श्रीनृसिंहमंदिर हेमाडपंथी बांधलेले आहे. मूर्ती भुयारात आहे. श्री सिध्देश्वराला हे स्थान फार आवडले. ध्यान धारणेसाठी हवा असणारा एकांतवास, समोरुन संथ वाहणारी कृष्णानदी यामुळे श्री सिध्देश्वरांनी श्री क्षेत्र नरसिंहपूर ही आपली तपोभूमी, कर्मभूमी मानली. तेथेच त्यांनी ध्यान धारणा, योगसाधना चालू ठेवली. केवळ जन कल्याणार्थ जन्म घेतलेल्या ईश्वरी अंशाच्या श्री सिध्देश्वरांची कीर्ती आसपासच्या पंचक्रोशीत पसरली. त्यांच्या दर्शनाला लोकांची, भाविकांची, आर्ताची गर्दी होऊ लागली.
राधाबाई व्यास, मुरारीभट व्यास, काब्रस सावकार, आलास गांवचे कुलकर्णी व त्यांची पत्नी भीमाबाई, कराड कोळ्याची वेणुताई गुणे, वेणुताईचा उपाध्याय महादेव भट अशी बरीच मंडळी श्री सिध्देशरांची शिष्य झाली. श्री नरसिंहपूरच्या पूर्वेस असलेल्या शिरटे गांवाजवळ असलेल्या श्री पशुपतीनाथ मंदिरात श्री सिध्देशरांनी एकांतवास करुन ईश्वर चिंतनात नामस्मरणात, जप तपात आपला नित्यक्रम चालवू लागले. शिरटेच्या पशुपतिनाथ मंदिरापासून जवळ असलेल्या कापूसखेड गांवातील काशिपंत कुलकर्णी, कऱ्हाडचे मोरोपंत पेंढारकर, रेठरेच्या माधवराव रेठरेकर, त्र्यंबकराव रेठरेकर बंधू आदी मंडळी त्यांची शिष्य झाली.
श्री नृसिंहपूर, शिरटे पशुपतिनाथ व आसपास भागात ११ वर्षांचा काळ तप साधनेत घालवून श्री सिध्देश्वर आपल्या जन्मगांवी पुन्हा एकदा जाणेसाठी निघाले. कराड, पंढरपूर, सोलापूर, नगर, नाशिक करुन औरंगाबादला आले. आपल्या वृध्द झालेल्या श्रीसंत अमृतरायना भेटून त्यांचा आशीर्वाद घेवून आपल्या ‘‘निधोन बावरे’’ गांवी आले. गांवात त्यांचे जंगी स्वागत करणेत आले. घरी आल्यावर त्यांचे थोरले बंधू, भावजय यांना फारच आनंद झाला. परंतु श्री सिध्देश्वरांनी घर सोडल्यावर त्यांच्या मातोश्री गोदावरी या त्यांना शोधायला बाहेर पडल्या त्या पडल्याच. सगळी तीर्थक्षेत्रे, मंदिरे, गिरीकंदरे मातोश्री गोदावरीनी पालथी घातली. परंतु श्री सिध्देशराचा शोध त्यांना लागला नाही. परंतू गांवातील पूर्ण वाचासिध्दी असलेला, तपश्चर्या जमालशहा फकिराने त्यांना सांगितले की ‘‘श्री सिध्देश्वर तुला येवून भेटेल तो योगी आहे.
काळजी करु नकोस. उडीदडाळ कालवण व भाकरी मला वाढ. लवकरच तो येईल’’ रखम भटजींना मातोश्री गोदावरींच्या ठावठिकाण्याची माहिती होती. श्री सिध्देश्वरांच्या आज्ञेने रखम भटजी करवीर क्षेत्री श्री अंबाबाईच्या मंदिरात आले. त्यांनी मातोश्री गोदावरींची भेट घेतली व श्री सिध्देश्वर बावऱ्याला आल्याचे सांगितले. मातोश्रींनी श्री अंबाबाईची भरल्या डोळ्यांनी पूजा बांधून नवस पूर्ण करुन रखम भटजी बरोबर बावऱ्याला आल्या. वृध्दत्वाने थकलेल्या आईची गाठ पडल्याने श्री सिध्देश्वरास अतिशय आनंद झाला. घर गोकुळ झाले. श्री सिध्देश्वर ईश्वर शोधात, गुरु शोधात बाहेर पडल्यावर त्यांची मंडळी सौ. भवानीबाई या त्यांच्या माहेर सुरगंली / कळंबसर येथे जावून राहिली होती. त्याही बावऱ्याला परत आल्या. श्री सिध्देश्वर आपल्या आई गोदावरी व पत्नी भवानीबाई यांना घेवून श्री नरसिंहपूरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. सर्व लोक, भक्तमंडळी श्री सिध्देश्वरांना गुरु मानून श्री गुरु बुवा महाराज म्हणत. त्यांचा सर्वकाळ ईश्वर चिंतानात जात असे. काबरस सावकार, सिन्नाप्पा, हरभट रेणावीकर, महादेवशास्त्री, विनायक भट, मुकूंदपंत असे भक्त श्री सिध्देश्वर आश्रमाची व्यवस्था पहात होती. श्री सिध्देश्वर स्वामींचा वाडा म्हणजे ‘‘हे विश्वची माझे घर’’ झाले होते. त्यांचा सर्व वेळ तपसाधनेत, भक्तांना मागदर्शन करण्यात आनंदाने जात होता. जनसंपर्क आता वाढतच चालला होता. त्यामुळे श्री सिध्देश्वर स्वामींच्या साधनेत अडथळा येत चालला होता. आता त्यांनी मौन धरले होते.
याच काळामध्ये दीनांचे आश्रयदाते श्री भक्तांचे कनवाळू ही कीर्ती ऐकून एक मध्यम वर्गीय घरातील गृहस्थ बाजीपंत श्री सिध्देश्वर स्वामींच्या दर्शनाला आला. श्री स्वामींच्या दर्शनाने तो सुखावला. त्यांच्या सेवेत तो रमला. श्री स्वामींच्या कृपेने त्याचा भग्योदय झाला. त्यावेळी करवीर प्रांती श्री शिवछत्रपती राजे व त्यांच्या मातोश्री जिजाबाईसाहेब यांच्या आज्ञेने येसाजी शिंदे हे सर्व राज्य कारभार पहात होते. येसाजी शिंदे हे खूपच चाणाक्ष व राजकारण धुरंधर होते. ते अत्यंत व्यवहार कुशल होते. माणसांची अचूक पारख त्यांना होती. योगायोगाने श्री स्वामी कृपेने बाजीपंत येसाजी शिंदेकडे कामानिमित्त आले. दारिद्रयाने गांजलेल्या बाजीपंतातील कामाचा प्रामाणिक माणूस हेरला व त्यांना आपला कारभारी म्हणून आपल्या पदरी नोकरी दिली. ‘‘श्री स्वामी कृपेने’’ श्री गुरुकृपेने बाजीपंतांना सोन्याचे दिवस आले. येसाजी शिंदे या आपल्या धन्याची बाजीपंताने प्रामाणिकपणे घरचा माणूस म्हणून सेवा केली. एका व्याधीतून पोटदुखीतून बरे व्हायला मदत केली. याच बाजीपंताने आपले धनी येसाजी शिंदे यांना आपले गुरु श्री सिध्देश्वर स्वामींच्या दर्शनाला येता यावे, त्यांना श्री गुरु दर्शन व्हावे, या हेतूने व्यंकटराव सबनीस, आण्णाचार्य यांच्या मदतीने श्री सिध्देश्वर स्वामींना विनंती करुन नरसिंहपूरहून करवीरला आणले. येसाजी शिंदेना फार आनंद झाला. सर्वांनी श्री सिध्देश्वर स्वामींची शोभायात्रा काढली. श्री स्वामींची सबनीस वाड्यात चोख व्यवस्था ठेवली. येसाजी रोज तिन्ही त्रिकाळ दर्शनास जाऊ लागले. त्यांचाही भाग्योदय श्री स्वामी दर्शनाने झाला.
त्याकाळी श्रीमंत महाराज शिवछत्रपती हे करवीरचे राजे त्यांचा मुक्काम पन्हाळगडावर असून तेथून ते कोल्हापूरची गादी व राज्यकारभार चालवीत होते. एकदा त्यांच्या पाठीवर पुटकुळी उठली व दुखू लागली. हळूहळू त्या पुटकुळीचा आकार वाढतच चालला. सर्व पाठ लाल झाली. असह्य वेदना चालू झाल्या. ते रात्रंदिवस वेदनेने तळमळू लागले. राजवैद्य, वैद्य, हकीम झाले. औषधे, गुटीका, मात्रा, भस्मे झाली. परंतु गुण नाही. महिना झाला. पालथे झोपून सुध्दा वेदना कमी नाहीत. रात्रंदिवस राजे वेदनेने तळमळत होते. दरबारचे सर्व मानकरी, सरदार, रयतही चिंतेत पडले. दिवसें दिवस छत्रपतींचे दुखणे वाढतच चालले. पुटकुळी / फोड फुटेना, अंगास वस्त्र लागू देईना, झोप लागेना, उठून बसणे सहन होईना अशी अवस्था छत्रपतींची होवून बसली. तेही चिंताक्रांत झाले. अशाच एके दिवशी छत्रपतींना किंचीत डोळा लागला होता. इतक्यात त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. सुवर्णकांती डोईस शालनामा बांधलेले, अंगावर भरजरी शालजोडी, कासेला रेशीमकाठी धोतर, अंगावर गोपीचंदनाचे टिळे, रामनामाची मुद्रा, एका हातात पळीपंचपात्र, पायामध्ये पादुका, गळ्यात पोवळ्यांची, स्फटिकाची माळ अत्यंत तेजस्वी अशी मूर्ती त्यांच्याजवळ आली व म्हणाली ‘‘आप्पा हे तुला काय झाले आहे? ऊठ चिंता करु नकोस, व्याकुळ होऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’’ असे म्हणून त्या दिव्य मूर्तीने त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला, त्यांच्या मस्तकी हात ठेवून ती मूर्ती अंर्तधान पावली. छत्रपती स्वप्नातून जागे झाले. त्यांना खूप आश्चर्य वाटले. दिवाणखान्याचा दरवाजा तर बंद होता. पाठीवरची पुटकुळी / फोड / करट फुटून त्यातून घाण वाहून गेली होती. वेदना कमी होत चालल्या होत्या. छत्रपतींना परम संतोष झाला होता. स्वप्नातील ‘‘आप्पा’’ ही हाक त्यांच्या हृदयात बसली होती. श्री स्वामींचे सोज्वळ रुप त्यांच्या डोळ्यात बसले होते. पण हे दिव्य पुरुष स्वामी कोण? हे त्यांच्या मनात घोळत होते.
छत्रपती या मोठ्या व्याधीतून मुक्त झाले. याचा सर्वांना आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. आता आपले स्वप्नात / दृष्टांतात कल्याण करणारे स्वामी कधी भेटतील याचा ध्यासच छत्रपतींना लागला. याच वेळी कारभारी येसाजी शिंदेनी, बाजीपंतांनी छत्रपतींना सबनीस वाड्यात वास्तव्याला आणलेल्या आपले गुरु श्री सिध्देश्वर स्वामींच्या दर्शनाला आणले. स्वप्नात ज्या दिव्य विभुतीने दर्शन दिले. पाठीवरुन हात फिरवला. ज्या हस्तस्पर्शाने पाठीवरील पुटकुळी / फोड गळू फुटला व वेदना नाहिशा झाल्या, त्या दिव्य त्रिमुर्तींना छत्रपतींनी ओळखले व त्यांचे दिव्य चरण धरले. श्री सिध्देशर स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. श्री सिध्देश्वर स्वामींनी त्यांना उठवले व म्हणाले ‘‘आप्पा, सुखरुप आहेस काय’’ आप्पा ही श्री गुरुंची वाणी ऐकून छत्रपतींच्या डोळ्यातून अश्रुधारा चालल्या. स्वप्नातील दृष्टांतातील ती हाक व ही हाक एकच होती. हेच ते आपले श्रीगुरु हे छत्रपतींनी ओळखले. श्री सिध्देश्वर स्वामी महाराज यांचे ते शिष्य झाले. श्री सिध्देश्वर स्वामी महाराज आता करवीर संस्थानचे राजगुरु झाले. लवकरच छत्रपतींनी श्री सिध्देश्वर स्वामी महाराजांच्या सर्व परिवाराला नरसिंहपूरहून करवीरला आणून त्यांच्या पायी आपली निष्ठा, श्रध्दा, धन अर्पण केले. छत्रपतींच्या परिवारातील राजघराण्यातील सर्वांना श्री सिध्देश्वर स्वामींना गुरु करुन घेतले, अनुग्रह घेतला. छत्रपतींच्या करवीर वासियांच्या
सर्व सुखात / दुःखात श्री सिध्देश्वर स्वामी महाराजांनी मार्गदर्शन केले, आशीर्वाद दिला, राज्य राखले, सुखी ठेवले.
यानंतर अनेकांचा उध्दार करुन तीर्थक्षेत्र नाशिक, अनेक महत्वाची तीर्थक्षेत्रे आपल्या परिवारासह प्रवास केला व परत कोल्हापूरला आले व राज घराण्याचे गुरु म्हणून वास्तव्यास राहिले. श्री अंबाबाई दर्शन करीत, साधना, तप करीत राहिले. श्री छत्रपती त्यांचे आज्ञेनुरुप वागत. सतत श्री स्वामी सेवेत रहात. अशा प्रकारे राजे श्री गुरु सेवा करीत. छत्रपतींना यश, संपदा, लढाईत जय मिळत गेला.
श्री सिध्देश्वर गुरु महाराज आता थकत चालले होते. ज्या कार्यासाठी त्यांनी अवतार धारण केला होता ते कार्यही संपत चालले होते. अनेक दीन दुबळ्यांना, आर्ताना, मुमुक्षाना त्यांनी ईश्वराबद्दल निष्ठा, भक्ति, प्रेम, शिकवले होते. भक्तिमार्ग सर्वांना दाखविला होता. त्यांचा संसार निष्काम कर्मयोग्याचा होता. त्यांच्या संसारात सर्व शुध्द, सात्विक, पवित्र, प्रेमळच होते. त्यांची मुले बाबा महाराज, नाना महाराज, भाऊ महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रात पारंगत होती. त्यांच्या दोन्ही कन्या बहिणाबाई (पती आनंदराव आबाजीराव प्रतिनिधी, विशाळगडकर) कृष्णाबाई (पती सदाशिवराव खंडेराव देशपांडे, कडेगांवकर) या अत्यंत सात्विक होत्या. न्यूनता कांहीही
नव्हतीे. गुरुशिष्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध परंपरा ध्यानी घेवून श्री सिध्देश्वर स्वामी महाराजांनी अनेकांचा उध्दार केला होता. अनेक भक्तांची संकटे त्यांनी दूर केली होती. करवीरचे छत्रपती राजे शिवाजी यांचे सर्व राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक व वैयक्तिक उध्दाराची गती साधली होती. अनेक जीवमात्रांचा उध्दार करुन शके १७२३ दुर्गती नाम संवत्सर, वसंत ऋतु वैशाख वद्य षष्ठी इंदुवार (इ.स. १८०१) रोजी श्री सिध्देश्वर स्वामी महाराजांनी समाधी घेतली. छत्रपतींनी त्यांची समाधी पंचगंगा घाटावर बांधून त्यांच्या पादुका स्थापन करुन मंदिर बांधले. हे मंदिर १६ मे १८०७ रोजी पूर्णत्वास गेले. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज रोज शुक्रवार पेठेतून पंचगंगा नदीकाठी फिरायला जात त्यावेळी याच सिध्दनाथांचे ते दर्शन घेत.
संदर्भ ग्रंथाचे नांव – श्रीगुरु सिध्देश्वर कथामृत
लेखकाचे नांव – डॉ. एम. आर. कुलकर्णी
प्रकाशक :- रामचंद्र पंडित ट्रस्ट, कृष्णानगर, सातारा
हा लेख, परम पूज्य श्री झेंडे महाराज लिखित, “समुद्र भरला आहे” या ग्रंथातून घेतला आहे.