महाराजांच्या तपस्विनी शिवूबाई, म्हैसाळ- Maharaj’s Tapasvini Shivubai of Mhaisal

भयाण स्मशानी धाडले गुरुनी
शिवूबाई तर तरुणी
राहिली श्री गुरुंच्या चिंतनी… ॥धृ.॥
पती-विरहिणी आभागिनी ती
नैराशाचं जीणं भोगी ती
नसे आधार जीवन संगती
परि सद२गुरु मनिनी… ॥१॥
ओली करुन डाळ भक्षिती
त्याविण दुजा आहार घे न ती
सवे श्वान ते एक सोबती
गुरुंची आज्ञापिनी… ॥२॥
पावन पंचगंगेचे स्नान
त्रिकाल समयी निर्भय करुन
गुरुदर्शना आतुरतेने
ये वैराग्य भुवनी … ॥३॥
आशापाशी मन ते उखडून
ज्ञान भक्ती वैराग्याची पूर्ण
तप:साधना ऐसी होऊन
भोगिले क्लेश जीवनी…॥४॥
पाचारुन तिज सन्निध केले
सेवाशेष गुरुनी घेतले
अबला बल समर्थची केले
जाहली धन्य योग तपस्विनी… ॥५॥

शिवूबाई ह्या श्रीकृष्णसरस्वती महाराजांच्या एक थोर शिष्या होत्या. मुळच्या त्या म्हैसाळ ग्रामीच्या. विधात्याने त्यांना रुप संपन्नतेची देणगी दिली होती. ऐन तारुण्यात असताना वडीलांनी त्यांचे विवाहकौतुक मोठ्या थाटामाटात पार पडले. हा आनंदाचा सोहळा दृष्ट लागण्याजोगा झाला असावा व म्हणूनच की काय अगदी थोडक्या दिवसाच्या कालावधीत शिवूबाईचे मातापिता इहलोकीची यात्रा संपवून निघून गेले. ह्या दु:खाचा आघात सहन करीत त्या सासरी गेल्या. पतिसंगती ह्या दुखःला मागे टाकत असतांना त्यांना एका कन्यारत्नाचा लाभ झाला. सुखाची चुणूक त्यांना अशी मिळते न मिळते तोच त्यांचे सौभाग्य काळाने हिरावून नेले. ऐन पंचविशीच्या घरात पण न गेलेल्या शिवूबाईची धारणा मात्र पाचावर येऊन बसली. पती निधनाने त्यांना सर्वस्वाला मुकावे लागले. उदरभरणाचे साधन कोणतेच न उरल्यामुळे त्यांच्यावर भिक्षाटनाची पाळी आली व त्यास त्या लोकलज्जा सोडून सामोऱ्या पण गेल्या! मात्र त्या नितीमत्तेपासून जराही ढळल्या नाहीत.

त्या अंर्तमुख बनून स्वत:वर ओढवलेल्या दारुण दु:खाची कारणमीमांसा शोधू लागल्या. देव देवांना जे कर्मभोग चुकले नाहीत मग आम्हा माणसांना ते कसे चुकवता येतील? ह्या विचारातच त्यांना परमेश्वर कृपेचा ध्यास लागला मुळात त्यांचा देहपिंड भक्ति मार्गातला होता.

त्यांच्या म्हैसाळ गावी श्रीकृष्णसरस्वती महाराज कांही काळ वास्तव्य करुन राहिले होते. महाराजांच्या लीला तेथील सर्व ग्रामस्थांना माहित असल्यामुळे साहजीकच शिवूर्बाइंना महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यांना शरण जाऊन ते आपला उध्दार करतील. त्यांच्या कृपेनेच आपल्या चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवता येईल. हा निर्धार त्यांच्या मनाने घेतला व त्यांनी कोल्हापूरचा मार्ग धरला. वैराग्य मठात येऊन त्या महाराजांना शरणांगत झाल्या. तेंव्हा महाराज त्यांना म्हणाले ‘‘तुम्ही इथे राहणार का?’’ शिवूबाई म्हणाल्या ‘‘होय! महाराज! हीच अपेक्षा धरुन इथंवर आले तुमच्या चरणांचा तरी मला वियोग होऊ देऊ नका! तुम्हीच माझा एकमेव आधार!’’ महाराजांच्या आज्ञेने त्या वैराग्य मठीत राहिल्या. स्त्री देहाला उचीत अशी सर्व सेवा त्या दिवसभर करु लागल्या. कांही दिवस गेल्यावर एकदा महाराज शिवूर्बाइंना म्हणाले ‘‘तू आता आयाचित वृतीने रहा. जर कुणी डाळ दिली तर तेवढीच तू खाऊन रहात जा’’ शिवूबाई ‘‘बरं’’ असे म्हणाल्या. तोच महाराज जवळ असणाऱ्या रामभाऊ मुरगुडकरांना म्हणाले, ‘‘रामा हिला तू रोज थोडी डाळ देत जा.’’ ‘‘जशी महाराजांची आज्ञा’’ असे म्हणून रामभाऊनी शिवूर्बाइंना रोज चण्याची डाळ देण्याचे कबूल केले. शिवूबाईपण म्हणाल्या ‘‘जो मज आज्ञा करतो तोच सद्गुरु माझी सर्व सोय करतो. मग मी त्यांना विसंबून कशी राहू?’’ रामभाऊजी डाळ आणून देतील ती डाळ भिजवून शिवूबाई खाऊ लागल्या. अशा स्थितीत थोडे दिवस गेल्यानंतर परत महाराज शिवूर्बाइंना म्हणाले ‘‘शिवू, आता तू गंगातिरी स्मशानात जावून रहा.’’

महाराजांचे हे उद्गार ऐकताच शिवूर्बाइंच्या पुढे काजवे चमकू लागले. ती त्यांची अवस्था पाहून महाराज परत धीर देत म्हणाले ‘‘अगं घाबरु नकोस. तुझ्या बरोबर तुला ही ‘‘कुसारी’’ देतो. ती बरोबर असल्यावर तुला घाबरण्याचे कांहीच कारण उरणार नाही.’’

‘‘कुसारी’’ हे त्या कुत्रीचे नांव. कृष्णा लाडांची पूर्व जन्माची ती जन्मदायिनी. तिच्या हातून बऱ्याच पापमय घटना घडल्या म्हणून तिला अंत्यघडीच्या वेळी अंत्यज दिसू लागले. पुत्राला तीने ही हकिकत सांगता ‘‘हे तर मूर्तिमंत पाप पुढ्यात उभे राहिले’’ म्हणून कृष्णा लाडांनी नेहमी स्वत: धारण करीत असलेल्या गळ्यातील महाराजांच्या पादुका काढून आईच्या गळ्यात घातल्या. तेंव्हा त्या माऊलीला अंत्यजांच्याऐवजी समस्त ‘‘ब्रम्हवृंद’’ दिसू लागला. तेंव्हा ती माऊली उद्गारली, ‘‘पोरा, ह्या महाराजांच्या पादुका नाहीत. भावार्णवीच्या नौका आहेत. त्यांच्या सेवेतच तू रहा. मी आता जाते.’’ म्हणून त्या माऊलीने प्राण सोडला. महाराजांना कृष्णा लाड त्या माऊलीच्या उध्दाराविषयी नेहमी विनंती करीत असता महाराज म्हणाले.

‘‘आधी येथीच आणू पोरगी।
मग पाठवू मागील दारी।
अनायासे साधली सुगी।
निवास स्वर्गा होईल…॥

‘‘महाराजांच्या भक्ताची आई’’ म्हणून तिला त्वरीत यमयातनेतूनही सुटका मिळाली आणि प्रामाणिक सेवेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या ेशान योनीत तिचा जन्म झाला. तोही पगी नावाच्या मंदिरातील कुत्रीच्या पोटी. ‘‘आधी येथे आणू पोरगी’’ हे महाराजांचे वचन त्वरीत सत्यपण झाले. ही ‘‘कुसारी’’ म्हणजेच कृष्णा लाडांची जननी म्हणून महाराजांच्या प्रत्येक भक्त ह्या कुत्रीला गोड गोड पदार्थ खाण्यास देऊन लाड करीत असत.

त्या कुसारीस हाक मारुन महाराजांनी बोलवले. ती जवळ आल्यावर महाराज तिला म्हणाले, ‘‘हे बघ पोरी, ह्या शिवूबरोबर तू गंगातिरी स्मशानात जा. ही जे देईल ते तू सेवन करुन संतुष्ट रहा. हिला सोडून तू कोठे राहू नकोस. रात्रंदिवस हिच्या सान्निध्यात राहून हिचे तू रक्षण कर.’’ महाराज शिवूर्बाइंना म्हणाले ‘‘हे बघ शिवू, ही माझी कुसारी तुझ्याबरोबर असता तुला भिती काळजी करण्याचे कांहीच कारण नाही. स्मशांनातील एकांतवास पण तुला सुखद होईल.’’ महाराजांची आज्ञा आणि त्यांचाच निरोप घेऊन शिवूर्बाइंनी पंचगंगेचा मार्ग धरला. त्यांच्या पायात पुढ्यात पुढ्यात कुसारीपण चालू लागली. शिवूबाई स्मशानात येऊन राहिल्या. दररोज त्या तिन्हीत्रिकाल गंगेचे स्नान करीत आणि महाराजांच्या दर्शनाला नेमाने येत. येता जाता कुसारी पायातून लुडबुडून चालत असायचीच. रामभाऊ मुरगुडकर त्यांना हरभऱ्याची डाळ देत. ती भिजवून दुपारी व रात्री भक्षण करीत. त्यापूर्वी त्यातील डाळीचा वाटा त्या कुसारीला देत असत. महाराजांची आज्ञा त्या कुसारीने पण अगदी तंतोतंत पाळली. ‘‘शिवू देईल तेवढेच तू खात जा’’ व ती पण तेवढेच खात असे. जर कोणी तिला क्रूध्द शब्दात बोलले तर ती रुसून बसावयाची. अशाच एका प्रसंगी तिने सलग दोन दिवस अन्नाचा एक कणपण भक्षिला नव्हता. डोळ्याच्या पापण्या उघडून पाहण्याचे त्राणपण तिच्यात उरले नव्हते तेव्हा तारामतीनी तिची अशी ही अवस्था महाराजांना सांगितली. महाराज तिच्याजवळ गेले व म्हणाले. ‘‘पोरी उठ जरा कांही तरी सेवन कर.’’ मग तिने डोळे उघडून महाराज देत असलेला पेढा अनंदाने खाल्ला. तिच कुसारी शिवूबाई देईल तेवढेच चण्याची डाळ खात असे.

कांही दिवसांनी मात्र एक विपरीत घडले. शिवूबाईच्या तपात तपाची बाजू वाढली. नेहमीप्रमाणे स्नान करुन शिवूबाई पातळ बदलत असताना लुडबुडणाऱ्या कुसारीचा स्पर्श त्यांच्या पायाला परस्पर्शाप्रमाणे झाल्यामुळे त्या घाबरल्या. तो स्पर्श सर्पाचा नसून कुसारीचा होता हे लक्षात येताच त्या रागाने कुसारीला म्हणाली ‘‘काय कुसारी? अशी काय चळलीस, झटके देईन बघ तुला?’’

कुसारीला राग येताच तिने तेथून त्वरीत वैराग्य मठाचा मार्ग धरला. नंतर थोड्याच वेळाने शिवूबाई आल्या व नमस्कार करुन घडलेली हकीकत महाराजांना सांगितली. कुसारीचा कांहीच दोष नाही. मीच तिला घाबरले व वाईट शब्दाने बोलले. ती माझ्यावर रागावून तुमच्याकडे आली. मला क्षमा करुन परत तिला माझ्याबरोबर पाठवा.

महाराज म्हणाले ‘‘बाई तुम्ही पहिल्यांदा चुकला ते आता भरा. ही (कुसारी) आता तुमच्या बरोबर येणार नाही. तुम्ही आता एकटेच तिकडे जावा.’’ शिवूबाई महाराजांचे चरण वंदून आपल्या कर्माला दोष देत स्मशानात येऊन राहिल्या. तोच तिथे गवळ्यांची मुले आली व म्हणाली ‘‘तुम्ही मावशीबाई इथे कशाला राहताय? आमची गुरे मोठी मारकी आहेत तुमच्या अंगावर धावून येतील.’’

‘‘हा आता नसता अनर्थ मागे लागला आणि किती कशाची झडती द्यायची आहे हे महाराजांनाच माहित आहे’’ असे म्हणून शिवूर्बाइंनी आपला तळ तेथून हलवला. ब्राम्हणघाटावरील श्रीसिध्देश्वर महाराजांच्या मंदिरासान्निध्यात त्या येऊन राहिल्या. महाराजांनी त्यांना स्मशानात पाठवले तेव्हापासून त्यांचे मन अंतर्मुख होऊन विचार करु लागले. पंचगंगेचे हे स्मशान म्हणजे महान शिवक्षेत्र आहे. मायामोहात जखडलेल्या शरीराला इथे मुठमाती मिळते. घोर अरण्यात बसून उग्र तपश्चर्येला बसणारे तपस्वी काम क्रोध आणि माया मोहात वहात गेले. प्रारब्धात मला ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झाले तरी माझ्या देवानं सद्गुरुरुपी परमेश्वर श्री कृष्णसरस्वती महाराजांनी वेळीच मला सावध केले. नुसत्या चण्याची ओली डाळ सेवन करण्यास सांगून षड्रस अन्नाची हाव बाळगणाऱ्या रसनेला स्वत:च्या नामामृतात रमवले. त्या षड्रस पक्वान्नाबरोबर षड्रीपूनाही त्यांनी दूर पळवले. लाडीकपणात ज्या नेशर देहाला जतन करावं, शेवटी त्याचीपण इथे राखरांगोळी होत असलेली सदोदीत दाखवून देहावरची आसक्तीपणा त्यांनी उडवली. अबला असून, महाराजांनी मला बलवान केले. सुंदर शहर वस्तीपेक्षाही महाभयाण भयंकर अशा स्मशानातील माझे वास्तव्य सुखद केले. विवेक वैराग्याचा त्यांनी बळ देऊन मनोविकार अंकीत केले. धन्य माझे हे असे आगळे संचित म्हणून मला श्री कृष्णरस्वती महाराजांच्या रुपात साक्षात परमात्म्याची भवतारक पदकमले दिसली.

शिवूबाई महाराजांच्या अशा भक्तीप्रेमाच्या नेहमी विचारात व त्यांच्या नामरुप स्मरणात असावयाच्या. शेवटी त्यांना ह्या सद्गुरुंची आपण नेहमी सेवा करीत रहावे ही इच्छा त्यांच्या अंत:करणात बळावत निघाली व एके दिवशी महाराज, दर्शनाला त्या आल्याबरोबर उद्गारले. ‘‘शिवू, आता किती किती असे तप करणार? बस, आता तू तूझी गंगातीरची वस्ती उठव आणि माझ्याजवळच इथे येऊन रहा.’’

शिवूबाई परत वैराग्य मठात येऊन राहिल्या आणि महाराजांच्या सेवेत रमल्या. तारामतीना पण सेवाकार्यात एक चांगला हात मिळाला. महाराजांच्या भोजन पंक्तिचा लाभ त्यांना मिळाला. बरीच वर्षे त्यांचा मुक्काम तारामतींच्या वास्तूत गेला.

त्यांची एकुलती एक मुलगी तुळसाचा विवाह ऋणमुक्तेश्वराची पूजा करणाऱ्या इंगळीकर ह्या द्विजाबरोबर झाला. नंतरचा काळ त्यांनी ऋणमुक्तेश्वर मंदिरात वस्तीसाठी म्हणून काढला. दिवसभर पडेल ती महाराजांची सेवा त्यांनी करण्यास कधीही कुचराई केली नाही.

रामभाऊ मुरगुडकर नेहमी शिवूर्बाइंना हरभऱ्याची डाळ देत असत म्हणून मुरगुडकर घराण्याचा त्यांचा जिव्हाळा वाढत गेला. महाराजांच्या दिनचर्येचा कार्यक्रम अगदी ठरल्यासारखा असायचा. महाराज पंचगंगेकडे फिरावयास जातांना व परत येताचा मुरगुडकरांच्या दुकानात सकाळ संध्याकाळ बसावयाचे. महाराजांच्या तो समय साधून नाष्टा म्हणून महाराजांच्यासाठी शिवूबाई मुरगुडकरांच्या घरात एका विशिष्ठ पध्दतीने हातावरच मांडे करुन ते महाराजांनी सेवन करावेत म्हणून तयार ठेवत. महाराज आले की त्यांना स्वत:च्या हातने मुखात त्या भरवीत असत. हे मांडे शिजवत असतांना स्वयंपाकघराचे दार त्या कुणीही व्यक्तीने पाहू नये म्हणून झाकून घेत असत. हेतू एवढाच की कुणाही व्यक्तीची नजर त्या करत असलेल्या मांड्यावर पडू
नये. महाराजांची उदंड सेवा शिवूबाईनी केली. वार्ध्यक्यात ऋणमुक्तेश्वराच्या मंदिरात असतांना त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. मृत्यूच्या वेळी त्यांना त्यांच्या देहाला महाराजांच्या कृपेने व्याधीयातना अशा कोणत्याही प्रकारच्या झाल्या नाहीत.

मंदिरात महाराजांच्या पूजाअर्चेची सर्व व्यवस्था शिवूबाई करीत असे. सर्व पूजा अर्चेची व्यवस्था स्वत: करुन स्वत:लाच केवळ स्त्रीदेह म्हणून महाराजांची साक्षात पूजा करता येत नाही. ह्याची खंत त्यांना नेहमी वाटे. पूजेमध्ये स्त्रीदेह हा निषिध्द एवढा का मानला गेला? महाराजांच्या पूजेचा मान फक्त पुरुषानाच का? स्त्री देहाला का असू नये? एवढ्या स्त्रिया काय म्हणून वाईट गणल्या? आपण पुरुष असतो तर महाराजांची आपण पण प्रत्यक्ष सेवा केली
असती. असा विचार मनात येताच शिवूबाईना महाराजा प्रत्यक्षात म्हणाले ‘‘तथास्तू’’

महाराजांच्या ह्या तपस्वीनी शिवूबाई म्हणजे आपणा सर्व भक्तांसाठी एक भक्तिमार्गदिपीकाच होय. त्या शिवूबाईच्या पवित्र स्मृतीस आमचे कोटी कोटी प्रणाम!,

लेखक :- श्री बाळासाहेब शांताराम नाडकर्णी, कोल्हापूर.
संदर्भ ग्रंथ :- श्रीकृष्ण सरस्वती लिला पुण्यतिथी
विशेषांक :- १० ऑगस्ट १९९५

Comments are closed.