भारतातील १२ प्रमुख खंडोबा तीर्थक्षेत्रापैकी श्रीक्षेत्र मंगसुळी हे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मणी आणि मल्ल हे दोन भाऊ बलाढ्य दैत्य होते. त्यापैकी मल्ल दैत्याला मंगसुळी या ठिकाणी फाशी खंडोबाने दिली आहे. फाशी या शब्दाला संस्कृत मध्ये सुळी असे म्हटले जाते. म्हणून या तीर्थक्षेत्राचे नाव पूर्वी इतिहासामध्ये मल्लसुळी आत्ताचे मंगसुळी असे पडले.
खंडोबा देवाचा एक प्रामाणिक भक्त राजा होता. तो खंडोबाची भक्ति उपासना फार करत होता. कांही दिवसांनी दुसऱ्या एका राजाने या भक्त राजाला कैद करुन तुरुंगवासात ठेवले. त्यानंतर त्या राजाने तुरुंगवासात खंडोबा देवाची उपासना केली व खंडोबा त्याच्या भक्तिने त्याच्या स्वप्नात जाऊन राजाला सांगितले एक घोडा तुरुंगवासात येईल. त्यावरती बसून मागे
इकडेतिकडे न बघता गप्प बसून ये. त्यानंतर त्या राजाने घोड्यावरती बसून प्रवास सुरु केला. त्यावेळी मल्लसुळी (मंगसुळी) या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते. या ठिकाणी आल्यानंतर राजाने मागे वळून पाहिले व त्याच ठिकाणी घोडा अदृश्य झाला व त्या ठिकाणी घोड्याच्या पादुका उमटल्या व कांही अंतरावर स्वयंभू लिंग प्रकट झाले व त्यावरती बेल भंडारा होता. त्यानंतर बाजुला म्हाळसा, बानु, गंगा यांचे स्वयंभू रुपात लिंग प्रकट झाले. म्हाळसाच्या लिंगावरती कुंकू होते. हे तीर्थक्षेत्र खंडोबाचे इतिहासामध्ये नमूद असलेले शेवटचे तीर्थक्षेत्र आहे. इथून पुढचा प्रवास हा कुठल्याही ग्रंथामध्ये याचा उल्लेख नाही. त्यामुळे या जागृत तीर्थक्षेत्राला महत्व आहे. खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांची वरात या ठिकाणी काढली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन वधुवर पहिल्यांदा वावर जत्रा म्हणून दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणी खंडोबाच्या स्वयंभू लिंगाशेजारी गंगालिंग रुपात अवतरली आहे. तिच्या लिंगातून पाण्याचा लहान पाझर आहे.
मंगसुळी या ठिकाणी वर्षातून दोनवेळा साखळी तुटते. चैत्रशुध्द दशमी आणि विजया दशमी अशी दोन वेळा यात्रा भरते.
शब्दांकन :- श्री उमेश पुजारी, मंगसुळी
