नंदीग्राम ( श्रीकृष्ण सरस्वतींचे जन्मस्थान-नांदणी )

प्राचीन काळी करवीर प्रांतामध्ये पंचगंगेच्या काठावर वसलेले एक प्रमुख गाव नंदीग्राम या नावाने ओळखले जात होते. सध्या हे गांव नांदणी असे नामाभिधान घेऊन शिरोळ तालुक्यात एका बाजूला वसलेले दिसून येते.

प्राचीन काळापासून चालत आलेली आख्यायिका अशी आहे की, प्रभू श्रीरामचंद्र रावणावर विजय मिळवून बिभीषणाचा राज्याभिषेक करण्यासाठी कांही काळ श्रीलंकेतच थांबले. रावण वध आणि सीतेची मुक्तता या दोन्ही वार्ता मात्र वाऱ्याप्रमाणे अयोध्येत पोहोचल्या होत्या. आणि अधीर मनाने राजकुमार भरत, शत्रुघ्न यांच्यासह प्रभू रामचंद्राला सामोरे येण्यासाठी म्हणून अयोध्या सोडून दक्षिणेकडे निघाले.

राम भेटीच्या आतुरतेमुळे अयोध्येचे राजकुमार आणि सैन्य थोड्या द्रुत गतीने दंडकारण्यात प्रवेश करते झाले. दंडकारण्याचा स्वामी दंडकारण्येश्वर म्हणजे दंडोबा या ठिकाणी हे पोहोचले असता तेथील जागृत ऋषिंनी त्यांना मरीची ऋषींची समाधीची जागा दाखविली.

मरीची आश्रमात म्हणजे सध्याच्या मिरज ग्रामात ते पोहोचले. तेथून निवासीनीचे करवीरपूर नजिक असल्यामुळे ते तिकडे जावयास निघाले. ही वार्ता प्रभू रामचंद्रांना पोहोचली होती. म्हणून त्यांनी हनुमानाला भरतास असेल त्या ठिकाणी थांबण्याचा निरोप देऊन धाडले.

त्यावेळी करवीरपुराकडे निघालेले लोक या नंदीग्रामात पोहोचलेले होते. प्राचीन काळातले राज रस्ते या नंदीग्रामाशेजारुनच जात होते. आजही विजापुरला जाणारा रस्ता या गावाशेजारुनच जातो.

नंदीग्रामामध्ये भरत अयोध्यावासियांच्यासह पोहोचला असता हनुमानही त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी छद्म वेशात भरताची परीक्षा घेण्याचे ठरविले.

ज्याठिकाणी भरताची भेट झाली ते ठिकाण आजही पाटणकर वाड्याजवळ दिसते.

हनुमानानी भरताला एका सप्ताहाची मुदत दिली होती. तो सप्ताहपावेतो अयोध्येचे राजकुमार या गावी मुक्कामास होते. दररोज ते पंचगंगेच्या पात्रात उभे राहून सूर्यवंशी असल्यामुळे सूर्याला अध्र्यदान देत होते. एकाच परब्रह्माची राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही चार रुपडी असल्यामुळे भरताचे अध्र्यदानही जाज्वल्यच असावे.

ज्याठिकाणी राजकुमार भरत उभे राहत होते. त्याठिकाणी नदीच्या पात्रात आजही भरतानी रामासह अयोध्येस परत जाताना शिवलिंगाची स्थापना करुन देवालय तयार केले होते आणि त्यांच्या रामप्रभूची भेट झाल्याची आठवण म्हणून त्यांनी रामेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केलेले आहे. भरत स्वत: या स्थानाला अमृतेश्वर असे समजावयाचे. आजही नांदणी ग्रामवासीयात अशी आख्यायिका आणि असा विश्वास आहे की, पंचगंगेच्या या पात्रात हे स्थान वाळू माती यामध्ये दडून गेलेले असून योग्य तो अधिकारी पुरुष आल्यावर ते स्थान पुनरपि दर्शनास खुले होईल. आमच्यामते वैदिक धर्माच्या विरोधात असलेल्या धार्मिकांनी हे मंदिर पाडलेले असावे. मात्र भरताने प्राणप्रतिष्ठीत केलेले राम अमृतेश्वर त्या ठिकाणी नक्कीच सापडेल.

प्राचीन कथा अवलोकीता प्रभूरामचंद्र सप्ताह अवधीत न आलेने चिता रचून प्राणत्याग करण्याच्या तयारीने राजकुमार भरत याच गावी सिध्द झालेले होते आणि इतक्यात प्रभू रामचंद्र आकाश मार्गानी स्थानप्रत पोहोचले. प्रभू रामचंद्रांना प्रथम बसवून भरत, अयोध्यावासी आणि नंदीग्रामातील लोकांनी ज्याठिकाणी श्रीरामांची पाद्यपूजा केली ते ठिकाण भरताने ब्राम्हणांना दान दिले. आणि त्या ठिकाणी ब्राम्हण वस्ती शुध्द भावात उभी राहिली. जणू कांही राम-भरत भेट आणि प्रभूंची पाद्यपूजा झालेली जागा सतत पावित्र्यात रहावी अशी ही जागा करण्यात आलेली असावी.

कालौघात संपूर्ण भारतावरील परधर्मियांच्या आक्रमणाने आणि अत्याचाराने पवित्र स्थळे नष्ट झाली किंवा दुर्लक्षीत बनली. अयोध्येस परत जाताना मात्र प्रभू रामचंद्रांनी चारीभावासह आणि ललिता गौरीचा श्रीविग्रह असलेल्या सीतेसह श्रीकरवीर निवासीनीचे दर्शन घेतले होते. निवासिनी स्वत: ललिता गौरी असल्यामुळे व प्रभू रामचंद्र तिचा प्रणव असल्यामुळे आणि लक्ष्मण त्या दोघांची मर्यादा असल्यामुळे ही तीन तत्वे गर्भागारात होती. भरत आणि शत्रुघ्न बाहेर द्वाराचे रखवालीस होते. त्याची सत्यता पटविण्यासाठी आणि खूण म्हणून महालक्ष्मीच्या मंदिरात आजही भरत आणि शत्रुघ्न पहारेकऱ्यांच्या रुपातच – मूर्तीरुपात ठेवलेले आढळून येतात.

निवासिनीजवळ अध्यात्म रामायणातील सीता लक्ष्मण सह वर्तमान राम शक्तीभावात असल्यामुळे राम भक्त हनुमानही तेथे पोहोचले. भक्तराज रामदास स्वामीही तेथे आले. खुद्द परम रामभक्त सिध्देश्वर महाराजही स्व-स्थान सोडून करवीरात राहण्यास आले. याच गोष्टीची जाणीव असलेले स्वत: श्रीधरस्वामी महाराज याठिकाणी रामजन्म करु लागले. या सर्वच गोष्टीची जाणीव असल्याने स्वत: श्रीकृष्ण सरस्वतीनी स्वामी समर्थांच्या एका हिऱ्याला आणि आपल्या भक्ताला अध्यात्म रामायण सतत चौदा वर्षे भावी काळासाठी याच एका जागी वाचणेची आज्ञा केली. नंदीग्राम मुस्लिम काळामध्ये एक श्रेष्ठ गाव म्हणून मान्य केलेले होते. ब्रिटीश काळामध्ये रेंदाळ संस्थानातील हे एक महत्वपूर्ण गांव होते. त्याच्या पूर्वी कुंतीभोज राजाच्या काळातही अन्य धर्मियांची या गावांवर सतत भक्तीपूर्ण नजर होती. ब्रिटीश कालखंडाच्या उत्तर काळात मात्र शाहू राजांच्या वडीलांनी जयसिंगपुरची स्थापना केल्यानंतर ते गाव वाढीस लागून हळूहळू नंदीग्रामचे महात्म्य कमी होत गेले. अशा या नंदीग्रामच्या आणि पुण्यवान भूमीच्या दर्शनार्थ मात्र अध्यात्म साधनेतील लोक न चुकता येत होते आणि कांहीही न बोलता हनुमानाचे आणि ग्रामरक्षक भैरवाचे दर्शन घेऊन पूण्यभूमीस नमन करुन निघून जात होते.

करवीर निवासिनीची पुर्नप्रतिष्ठापना करुन परत जात असताना आद्यगुरु शंकराचार्य या ठिकाणी काहीकाळ वास्तव्य करुन ब्राम्हण समाजास सदोपदेश करुन निघून गेले होते. नंतरच्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कृष्णेच्या परिक्रमेच्या वेळी उपनद्यांच्या परिक्रमेत या गावी वेळोवेळी मुक्काम करुन होते आणि जोशी घराण्याचे अन्नग्रहण करुन, ‘‘तुमच्या घरी दत्त भक्त जन्म घेतील, दत्तभक्ती सतत राहील आणि साक्षात दत्तही जन्म घेईल’’ असे आशीर्वचन दिलेले होते. कारण त्यावेळी अन्य धर्मियांच्या कडक धोरणामुळे वैदिक परंपरा किंवा हिंदू धर्मातील साधूसंत किंवा योग्याना अन्नभिक्षा देण्यास त्या गांवात बंदी होती.

जोशी कुटुंबीयांनी श्रीपाद श्रीवल्लभांना आदराने घरी बोलावून पाद्यपूजा करुन भोजन भिक्षा दिलेली होती. त्यानंतरच्या काळात नृसिंह सरस्वती वाडीक्षेत्री राहण्यास आले. सध्याची नृसिंहवाडी हे स्थान त्यावेळी जवळ जवळ निर्जन अवस्थेत होते आणि ते स्थान गाणपत्य करवीर प्रांतातील एक प्रमुख केंद्र होते.

याच ठिकाणी साधना करण्याचे नृसिंह सरस्वतींनी ठरवून भिक्षाटनास मात्र पंचक्रोशीत फिरणेचे नियोजन केलेले होते. प्रमुख गावांच्यापैकी नंदीग्राम हे क्षेत्र असल्यामुळे त्यांनी वरचेवर याच स्थानास भेट देऊन भावी काळात साक्षात गुरु दत्तात्रेयांनी जन्म घ्यावा अशी रचना करवून
घेतलेली होती.

लेखक :- श्री. एम. पी. रायबागकर

Comments are closed.