महाराष्ट्रात ‘‘खंडोबा’’ आणि कर्नाटकात ‘‘मैलार’’ या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव. कर्नाटक – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीत आहे. ‘‘मल्हारी मार्तंड भैरव’’ हे त्याचे संस्कृत नांव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोश्यांपासून देशस्थ ब्राम्हणापर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशात त्याची अनेक प्रतिकस्थाने असून, तेथे यात्रा- उत्सवांच्या निमित्ताने समाजाचे सर्व स्तर गर्दी करीत असतात. १) ज्याला आपण खंडोबा किंवा मैलार या नावाने ओळखतो, तो शिवाचा मार्तंड भैरवरुपी अवतार आहे. २) मणी आणि मल्ल या दोन दैत्यांनी मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षींचा छळ केल्यामुळे त्याला मणी-मल्लांच्या वधासाठी अवतार घ्यावा लागला. ३) अवतार-ग्रहणापूर्वी त्याने आपल्या जटेतून ‘‘घृतमारी’’ नामक महामारी निर्माण केली. ४) मार्तंड भैरव चतुर्भूज, डमरु – त्रिशूल – खड्ग – पात्र धारण केलेला, सर्पभूषण, चंद्रकलान्वितमुकूट युक्त, रुंडमाला ल्यायलेला आणि कपाळावर भंडारा चर्चिलेला असा होता. त्याचे वाहन ‘‘नंदी’’ हेच होते. त्याच्या बरोबर कुत्रे होते. ५) मणी-मल्लांच्या वधानंतर त्या दैत्यांचा प्राणान्त होते वेळी त्यांना दिलेल्या वरांमुळे त्याच्या चरणाखाली दैत्यशिरे शोभू लागली. त्यास अश्वारुढ रुप प्राप्त झाले आणि ‘‘मल्लारी’’ या विशेषणाचा गौरव प्राप्त झाला. ६) मणी-मल्लांच्या वधानंतर सप्तर्षींच्या विनंतीवरुन तो मणीचूल पर्वताच्या सानिध्यात प्रेमपूर या स्थानी म्हाळसेसह लिंगद्वयरुपाने राहू लागला. ७) मार्तंड भैरवाच्या शक्तीचे नांव ‘‘म्हालसा’’ किंवा ‘‘गंगा-म्हालसा’’ असेच दिले आहे. ८) प्रेमपुरात मार्तंड भैरव म्हाळसेसह प्रकटल्यावर तेथे यात्रेसाठी देव गोळा झाले आणि त्यांनी उत्सवाहसाठी मार्तंड भैरवाची मृण्मय मूर्ती निर्माण केली, तिचे नांव ‘‘मैलार’’ म्हणजे प्रथम स्वयंभू लिंगद्वय होते, नंतर मूर्ती तयार झाली ‘‘मैलार’’ या गावांचे स्पष्टीकरण ‘‘मल्लारीमहात्म्या’’ त दिले आहे.
खंडोबा : इंद्र:
‘‘मल्हारी’’ या नावांने महाराष्ट्रात प्रसिध्द असलेला आणि ‘‘मल्लय्य’’ या नावाने कर्नाटकात प्रिय असलेला हा देव एकच असला, तरी या उभयप्रदेशांतील त्यांच्या रुपांची घडण काहींशी भिन्न आहे. ‘‘मल्लय्य’’ हा ‘‘गिरीश’’ रुद्र (मले – डोंगर) आहे, तर ‘‘मल्हारी’’ हा इंद्र आहे. ‘‘पुरे आणि पर्वत’’ यांविषयी ऋषींना आपुलकी नव्हती. त्याविषयी विरोधच असावा आणि मल्लासूर म्हणजे पर्वतेयांचा नाश करणारा देव म्हणजे तो (मल्हारी) इंद्र असावा असे वाटते. मल्लारीची मुर्ती अûवरोही असून तिच्या हातात खड्गासारखे आयुध आहे, यावरुन हा देव इंद्र असावा.
खंडोबा : रवळोबा आणि जोतिबा:
रवळनाथ हा कोकणातील देव खंडोबाशी एकरूप मानला आहे. ‘‘रवळनाथ-रवळदेवरवळेश्वर’’ हे खंडोबाचेच एक नाव असून, त्यांच्या मूर्तीवरुन त्या दोघांचे एकरुपत्व चांगलेच प्रत्ययास येते.
रवळनाथाची स्थाने कोकण, गोमंतक आणि कारवार या भागत अनेक आहेत. रवळनाथाची मूर्ती उभी असते. तिचा डावा पाय किंचित वाकवून पुढे केलेला असतो. तो चतुर्भुज असून त्याच्या चार हातात खड्ग, त्रिशूल, डमरू व पानपात्र या वस्तू असतात. त्याचे वाहन घोडा हे उजव्या बाजूस कोरलेले असते. परंतु प्रत्येक मूर्ती वाहनयुक्त दाखवितात असे नाही. क्वचित एकाद्या ठिकाणी कुत्राही असतो. त्यास मिशाही दाखवितात. तो ब्रम्हचारी आहे. अशी द्विभुज, तर कुठे चर्तुभुज स्वरुपात आढळते. तिच्या चर्तुभुज रुपाची आयुधे रवळनाथाच्या आयुधांप्रमाणेच असतात.
जी स्थिती रवळनाथांची, तीच जोतिबा किंवा केदारनाथाची, कोल्हापूर जवळील जोतिबा हा देव केदारनाथ किंवा केदारलिंग या नावानेही ओळखला जातो. केदाराचे ध्यान असे आहे :
केयुरणी भूविशूषितै: करयुगै रत्नांकितै: सुन्दरै: ।
नानाहारविचित्रपत्रगयुतै: रत्नांकितै: सुन्दरै ।
हस्ताभ्यां धृतखड्गपात्रडमरुं शूलं सदा भ्राजितम् ।
वातहवानि-दैत्यदर्पदलनं केदारमीशं भजे ॥
मल्लारी मार्तंड भैरव : एक रहस्य
खंडोबाची उपासना कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, ‘‘मैलार’’ हे त्याचे कानडी नाव होय आणि ‘‘मैलार’’ व त्याची पत्नी ‘‘मालची’’ (म्हाळसा) यांच्या प्रतिष्ठेची प्राचीनता शिलालेखांच्या आधारे निदान अकराव्या शतका इतकी मागे नेता येते. खंडोबाचे उपासक आणि उपासना यांचे स्वरुप पाहता तो मूलत: (आणि अजुनही) समाजाच्या सर्व स्तरांत प्रिय असलेला एक देव आहे, हे उघड आहे.
खंडोबाची प्रतीके :
खंडोबाची प्रतीके विविध आहेत. लिंग, तांदळा, मूर्ती, टांक ही प्रतीके आज रुढ असून कापडी मुखवट्याचे एके काळी रूढ असणारे प्रतीक आज आढळत नाही.
खंडोबाचा परिवार:
खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई, हेगडे प्रधान, घोडा आणि कुत्रा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या परिवाराचे स्वरुप हे असे आहे. या परिवारातील म्हाळसेला स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हे-विभूतिमत्व आहे. म्हणून तिचे स्वरुप पुढील स्वतंत्र प्रकरणात स्पष्ट केले आहे.
म्हाळसा : नामरहस्य:
महाराष्ट्रात म्हाळसा आणि कर्नाटकात माळव्व या नांवानी लोकप्रिय असलेली ही देवता माळजदेवी, म्हालजा, मालचिदेवी, मालची, मालाची, मालती, माळवी, म्हालसा, म्हालसिका, महालसा, महालय्या, महालाय इत्यादी, नावांनी उल्लेखली गेली आहे. म्हाळसेची व्युत्पती ‘‘मदालसा-मआलसा-महालसा-म्हालसा-म्हाळसा’’ अशी दिली आहे.
म्हाळसेला ‘‘जोगेश्वरी’’, ‘‘भैरवी’’ अशीही नावे आहेत. म्हाळसा ही मार्तण्ड भैरवाची पत्नी. ‘‘भैरवी’’ हे भैरव-पत्नीवाचक स्त्रीलींगी रुप. जोगेश्वरी (योगेश्वरी) महाराष्ट्रात भैरवा बरोबर सर्वत्र आहे.
म्हाळसेची मंदिर:
म्हाळसा खंडोबाची पत्नी आज नांदत असली. तरी, मूळची ती स्वतंत्र देवता होती आणि तिने खंडोबाशी नाते जोडल्यानंतरही आपल्या स्वतंत्र ‘‘निवासस्थानाचा त्याग केला नाही व आजही ती एक स्वतंत्र देवता म्हणून अनेक ठिकाणी गाजत आहे. देवीहोसूर येथील अकराव्या शतकात प्रसिध्द असलेले माळजदेवीचे मंदिर आज बनशंकरीचे मंदिर म्हणून ओळखले जाते.’’ ‘‘स्थानपोथी’’त भोगावती (पैठण), वालसेंग (जि.औरंगाबाद-‘‘वाल सावंगी’’) नांदुरा (‘‘अगर नांदरा’’ जि.बीड) आणि नेवासे (जि.नगर) या चार स्थानी म्हाळसेची मंदिरे असल्याचे उल्लेख आहेत. बीडजवळ म्हाळसापूर जवळे व टोक्याजवळ म्हाळापूर नामक म्हाळसेचे उपेक्षित स्थान आजही आहे. बीदर विभागात खंडोबाच्या मैलारपूरापासून दोन मैलावर एक म्हाळसापूर आहे. ‘‘महिकावतीच्या बखरीतील म्हाजलापूरची देवी ही म्हाळसाच. म्हालजापुरीच केशवाचार्याने म्हाळसेच्या साक्षीने महाराष्ट्र-धर्म-रक्षणाची स्फूर्तीदायक योजना मांडली. या बखरीत या देवीला ‘‘योगेश्वरी’’ म्हटले असून ‘‘श्रीदेवी जगदंबिका महाराष्ट्रधर्मरक्षिका’’ असा तिचा गौरव केला आहे.’’ सध्या विशेष प्रसिध्द असलेली म्हाळसेची स्थाने म्हणजे नेवासे (जि.नगर) आणि म्हाडदोळ (गोमंतक) ही दोन होत. पैकी नेवासे हे प्राचीन असून म्हाडदोळचे स्थान सतराव्या शतकारंभी निर्माण झाले आहे. गोमंतकातील म्हाळसेचे स्थान पूर्वी वेर्णे या गांवी होते. परंतु सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी हिंदू मंदिराचा विध्वंस सुरु केला. त्यात वेर्णे येथील म्हळसामंदिराचा क्रम पहिला लागला. वेर्णे येथील म्हळसा पुढे म्हाडदोळला स्थलांतरित झाली.
‘‘मल्लारिमहात्म्य’’ या संस्कृत ग्रंथाचे एकूण बावीस अध्याय असून, श्लोकसंख्या ९४० आहे. मोरोपंतानी ७७ आर्यात लिहीलेल्या ‘‘मल्लारी-विजया’’त मल्लारिमहात्म्या’’ तीलच कथा आहे. मैलारदेवाचे मैलार (जि.बळ्ळारी) हे कर्नाटकातील प्रसिध्द स्थान नेमके या दक्षिणी उज्जयिनीच्या वायव्येस आहे.
मैलार-खंडोबाची प्रतीकस्थाने:
खंडोबाची क्षेत्रे जशी महाराष्ट्रात तशीच कर्नाटकातही अनेक आहेत. जेजुरी, (ता. पुरंदर, जि. पुणे), निमगाव (ता. खेड, जि. पुणे), शेगुड (ता. कर्जत, जि. नगर), सातारे (ता. व जि. औरंगाबाद), नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) आणि पाली (जि. सातारा) ही महाराष्ट्रातील सहा प्रसिध्द स्थाने. तसेच नांदेड जवळील माळेगाव, पेठ (ता. वाळवा , जि. सांगली), मल्हारपेठ (जि. सातारा), तिलोरे (मुंबई-गोवे मार्ग), पुण्याजवळील कोंढापूर (पुणे नगर मार्ग), बीड, चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे), नेवासे (जि. नगर), नागपूर इत्यादी अनेक ठिकाणी खंडोबाची स्थाने आहेत. कनार्टकात मंगसुळी (बेळगाव), मैलारलिंग (धारवाड), मैलार- देवरगुड्ड (धारवाड), मैलार किंवा मण्मैलार (बळ्ळारी), मैलारपूर (बीदर) ही स्थाने जागती – गाजती आहेत.
वरील स्थानकाशिवाय लैखिक आणि वाड्:मयीन उल्लेखांवरुन पुढील स्थानांची नावे कळतात : कौरवदुर्ग (भुवनदुर्ग), पाली (जि. बीड), साडेगाव (जि. औरंगाबाद), सोनई (ता. नेवासे, जि. नगर), कल्लुकोटे (शिरे-तुमकूर, म्हैसूर), अनेगुंदी (विजयनगर), कारीमनी (परसगड-बेळगाव), पेनुगोंडे (अनंतपूर), वेमवरम् (रामचंद्रपुरम्-गोदावरी), कोंडवीड्ड (गुंटूर), पट्टरु (पाटूर), कुबटूर (शिवमोग्ग-म्हैसूर), मैलापूर (मद्रासचा एक भाग), पेदीपाड (ओंगोल-नल्लूर) या स्थानापैकी पाली (बीड) साडेगाव व सोनई या तीन स्थानकाशिवाय बाकीची द्राविड प्रदेशांतील आहेत.
वाघ्या-मुरळी:
देवीचे जसे गोंधळी आणि भुत्ये हे उपासक, तसेच खंडोबाचे वाघ्यामुरळी. अपत्य प्राप्तीसाठी देवाला नवस करणारे लोक दोन मुले होताच पहिले मूल देवास अर्पण करीत. त्यातील मुलगे वाघ्ये बनत आणि मुली मुरळ्या बनत.
कुळधर्म-कुळाचार:
खंडोबा हा कुलदेव असल्यामुळे अनेक कुटुंबात देव्हाऱ्यात त्याचा टांक असतो आणि त्यासाठी कुळधर्म साजरा करावा लागतो. चंपाषष्ठीच्या निमित्ताने शु.प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राप्रमाणे खंडोबाचे नवरात्र (षड्रात्र) सुरु होते आणि षष्ठीच्या दिवशी कुळधर्म होतो. हा कुळधर्म षौषी, माघी, चैत्री, श्रावणी या पौर्णिमांनाही असतो. खंडोबाच्या कुळधर्मासाठी ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यात दहीमीठ घालून केलेला पदार्थ), कणकेचा रोडगा (जाड भाकरी) वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. तसेच गव्हाच्या ओंब्या, हुरडा, तीळ व गुळ असे एकत्र कांडून त्याचा दिवा करुन त्यात फुलवात लावतात. त्या दिव्याला ‘‘उंडी’’ असे म्हणत. चातुर्मासात कांदा – लसूण वर्ज्य मानणारे लोक चंपाषष्ठीच्या कुळधर्मानंतर त्याचदिवशी देवाच्या नैवेद्यात कांदा-लसणाचा समावेश करुन कांदा-लसूण खाण्यास प्रारंभ करतात.
कुळधर्माच्या वेळी नैवेद्य समर्पणापूर्वी ‘‘तळी भरण्या’’ चा विधी असतो.
लग्न मुंजीसारख्या संस्कारानंतर देवदर्शनाला जाणे आणि वाघ्या-मुरळ्यांचे जागरण करविणे हाही कुलाचार रुढ आहे. ‘‘जागरण’’ म्हणजे पाच ऊसांच्या मखरात प्रतिकात्मक देवस्थापन करुन वाघ्या-मुरळ्यांचा समूह तुणतुणे, घोळ या वाद्यांच्या साथीने देवाची गाणी गाण्याचा जो कार्यक्रम करतात तो होय.
भंडार, बेल-दवणा, तेलहंडा व कांदा-वांगे:
खंडोबाच्या उपासनेत भंडाराचे महत्व फार, भंडारा म्हणजे हळदीची पूड, हळद ही सौभ्याग्यभूषण आणि एक बहुगुणी औषधी म्हणून प्रसिध्द आहे. मैलाराच्या उपासनेत रुढ असणाऱ्या भंडाराला पुढे मार्तंड भैरवाच्या सुवर्णकांतीची जोड मिळाली असावी आणि भंडाराचे निराळे समर्थन पुढे आले असावे. सुवर्ण हा दिव्य धातु मानला जातो. खंडोबाला बेल आणि दवणा प्रिय आहे. या दोन्ही वनस्पती शिवसंबंध आहेत. खंडोबा हा शिवावतार ठरल्यामुळे त्या त्यांच्याही उपासनेत रुढ झाल्या. चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी एका हंड्यात अनेकांच्या घरातील तेल गोळा करुन, तो हंडा गडावर न्यावयाचा आणि ते तेल समर्पण करावयाचे – त्या तेलाने देवाला अभिषेक घालवयाचा, अशी प्रथा जेजुरीला आहे. चातुर्मासात वर्ज्य असलेली कांदा व वांगे ही शाका – फळे चंपाषष्ठीच्या नैवेद्यात आवर्जून वापरली जातात आणि त्या दिवसांपासून पुन्हा चातुर्मास सुरु होईपर्यंत त्यांचे भक्षण निषिध्द मानीत नाहीत. पण खंडोबाचा कांदा हा प्रिय पदार्थ आहे. खंडोबाला कांद्याचा नैवेद्य दाखवावा लागतो.
उत्सव आणि यात्रा:
खंडोबाच्या उपासनेतील दिनविशेष म्हणजेच रविवार, सोमवती अमावस्या, चैत्री-श्रावणी-माघी या पौर्णिमा आणि मार्गशीर्ष शुध्द षष्ठी (चंपाषष्ठी) हे होत.
‘‘येळकोट’’ गर्जना:
खंडोबाच्या यात्रेत आणि सर्व उपासनाविधीत ‘‘येळकोट’’ ही गर्जना होत असते’’, ‘‘खंडेरायाचा येळकोट’’, ‘‘सदानंदाचा येळकोट’’, ‘‘शिवामल्लारीचा येळकोट’’ हा शब्द येळु (सात) आणि कोटी (प्रकार किंवा कोटी ही संख्या) असे दोन शब्द मिळून झाला आहे. ‘‘येळकोट’’ प्रमाणेच ‘‘चांगभले’’ ही गर्जनाही रुढ आहे. ही गर्जना भैरव, ज्योतिबा यांच्या उपासनेतही आहे.
क्षेत्र-सुची:
अणदूर (जि.उस्मानाबाद), अनेगुंदी (विजयनगर-तुंगभद्र पलीकडे), कल्लुकोटे (शिरे – तुमकूर – म्हैसूर), कारीमनी (परसगड-बेळगांव) कुबटूर (जि. शिवमोग्ग – म्हैसूर) कोंडबीडू (गुंटूर), कोंढापूर, कौरवदुर्ग, चांदखेड (मावळ-पुणे), जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे), टाकळी खंडेश्वरी (ता. कर्जत, जि. नगर), तिलोरे, देवी-होसूर (ता. हावेरी, जि. धारवड), नळदुर्ग (जि. उस्मानाबाद), नागपूर (विदर्भ), नांदुरा (बीड), निंबगाव (ता. खेड, पुणे), नेवासे (ता. नेवासे, जि. नगर), पट्टरु (पाटूर), पाली (ता. कऱ्हाड, जि. सातारा), पेदिपाडू (ओंगल- नल्लूर), पेनुगोंडे (अनंतपूर), बीड, भोगावती (पैठण), मंगसुळी (ता. अथणी, जि. बेळगांव), मल्हार (विलासपूर-मध्यप्रदेश), मल्हारपेठ (ता.पाटण, जि.सातारा), मालेगाव, मैलार (ता. हडगल्ली, जि. बळ्ळारी), मैलारपूर (बिदर), मैलार – देवरगुड्ड, मैलारलिंग (धारवाड), म्हाडदोळ (फोंडे महाल – गोमंतक) म्हळसापूर, म्हळसापूर – जवळे, म्हाळापूर, वालसेंग (वाल सावंगी, औरंगाबाद), वेमवरम् (रामचंद्रपुरम – गोदावरी), शेगुड (जि. नगर), साडेगाव (जि. औरंगाबाद), सातारे (जि. औरंगाबाद), सोनई (ता. नेवासे, जि. अंहमदनगर)
संदर्भ ग्रंथाचे नांव : – दक्षिणेचा लोकदेव खंडोबा
लेखकाचे नाव :- रा. चिं. ढेरे
