वारकरी संप्रदायात कळस झालेले / ठरलेले श्री संत तुकाराम महाराज हे या चैतन्य संप्रदायातील होय. राधव चैतन्य – केशव चैतन्य – बाबाजी चैतन्य – श्री संत तुकाराम अशी ही गुरुपरंपरा आहे. राघव चैतन्य हे श्री दत्त संप्रदायातील आहेत. श्री दत्त उपासनेतील आहेत. अवधूत उपासनेतील आहेत. या चैतन्य संप्रदयातील श्री संत तुकारामसह अनेक संतानी / महात्माने श्री दत्तात्रेय भगवानांची महती आपल्या अभंगातून / पदातून गायली आहे.
विश्वपट परिधान । करी अनुसूयानंदन ॥
दिगंबराचे अंबर । बरवे शोभे चराचर ॥
नाना रत्ने वसुंधरा । घेवूनीआली अलंकार ॥
लेववीले अंगोअंगी । रंग भरले निजरंगी ॥
ज्ञानसागराची शोभा । शिवगुरु अवधूत उभा ॥
भैरव अवधूतांनी वरील प्रमाणे भगवान श्री दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे.
श्री राघव चैतन्य हे फार मोठे सिध्द पुरुष होवून गेले. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांची कीर्ती जुन्नर, पुणे, बसव कल्याण (कल्याणी) गुलबर्गा भागात बरीच पसरली होती. त्यांचा शिष्यसंप्रदायही बराच मोठा व सर्वधर्मीय होता. त्यांचे आळंद (आळंद – गुंजोटी, जि.गुलबर्गा) येथील समाधीस्थान तर आज जवळ जवळ ४०० – ४५० वर्षे हिंदू – मुस्लीम – जैन – लिंगायत व इतरांनाही जागृत स्थान वाटत आले आहे. सर्व धर्मीयांची त्यांच्यावर श्रध्दा आहे.
श्री राघव चैतन्यांचे शिष्य श्री केशव चैतन्य यांची समाधी ओतूर (जि.पुणे) येथे आहे. तर श्री केशव चैतन्य यांचे शिष्य श्री बाबाजी चैतन्य यांची समाधी मान्यहाळी (जि.गुलबर्गा) येथे आहे.
सिध्द पुरुषांच्या पूर्व चरित्राची माहिती सहसा सहजपणे उपलब्ध होत नाही. ते आपले पूर्व आयुष्य, आपली योग साधना, साधना अज्ञात स्थळी लोकांच्या पासून दूर करीत असतात. आत्मनंदात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे पूर्व आयुष्य त्यांच्या शिष्यांनाही समजून येत नाही.राघव चैतन्यांच्या बाबतीत त्यांचे शिष्य, प्रशिष्य श्री केशव चैतन्य त्यांचे शिष्य श्री बाबाजीचैतन्य हे सर्वच सिध्द पुरुष असल्याने त्यांच्या मुखातून त्यांच्या गुरुविषयी, गुरुपरंपराविषयी पूर्वाश्रमीची माहिती सर्वांना समजणे शक्य नव्हते. श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या गुरुच्या नावां बरोबर म्हणजे श्री बाबाजी चैतन्यांच्या बरोबर आपले आजेगुरु श्री केशव चैतन्य व पणजेगुरु श्री राघव चैतन्य यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. श्री संत तुकारामांनी आपल्या गुरु परंपरेचा उल्लेख जर केला नसता तर श्री राघव चैतन्य, श्री केशव चैतन्य यांचा संपूर्ण महाराष्ट्राला विसर पडला असता.
चैतन्य संप्रदयाचा मुख्य ग्रंथ हा ‘‘चैतन्यलीला’’ हा ओवीबध्द ग्रंथ आहे. या ग्रंथात एकंदर २१ अध्याय आहेत. एकंदर ओळींचीसंख्या ३३८१ आहे. हा ग्रंथ कृष्णदासाने लिहला आहे. कृष्णदासाचे पूर्ण नाव कृष्णदास एकनाथ धर्माधिकारी असून तो ऋग्वेदी ब्राम्हण होता. त्याने केशव चैतन्यांच्या समाधीची बरीच सेवा केली. यामुळे श्री केशव चैतन्यांनी त्याला दर्शन देवून उपदेश दिला. कृष्णदासाचा काळ इ.स.१७०० ते १७७८ असावा. श्री केशव चैतन्यांची समाधी ओतूरला आहे. कृष्णदासांनी श्री केशव चैतन्यांच्या समाधीची सेवा बरीच वर्षे केली. ‘‘चैतन्यलीला’’ या त्यांच्या ग्रंथाचा काल इ.स. १७५३ ते १७५८ लेखन काल असावा. उध्दव चिद्घन हा संत तुकारामांच्या समकालीन संत तो चैतन्य परंपरा सांगणारा अभंग सांगतो. ‘‘लतीबशहा मुसलमान । रामदास भक्त पूर्ण । राघव चैतन्य केशव चैतन्य / बाबा चैतन्य तुकोबा ॥ वाचे वदे श्रीचिध्दन । झाला निमग्न उध्दव ॥ तर बहिणार्बाइंच्या गाथेत’’ पुढे विश्वंभर शिवरुप सुंदर । तेणे राघवी विचार ठेवीलासे ॥ केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य । झालासे प्रसन्न तुकोबासी ॥ एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी । म्हणोनी बहिणी लाधलीसे ॥ अशी गुरुपरंपरेचा उल्लेख आहे.
तर संत महिपतीने आपल्या ‘‘भक्ती लिलामृतात’’ संत तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा व गुरु उपदेशाची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
राघव चैतन्य भक्त वैष्णव । तयासी शरण चैतन्य केशव ।
बाबा चैतन्य माझे नाव । तुकयासी देव बोलले ॥ ६३॥
केशव चैतन्य राघव चैतन्य । बाबाजी आपुले सांगितले नामभिधान ।
रामकृष्णहरी मंत्र जाण । मजकारणे सांगितला ॥ ७४॥
माघ शुध्द दशमी साचार । सुदिन पाहून गुरुवार ।
माझा करुनी अंगिकार । गेले सत्वर सदगुरु ॥७५॥
राघव चैतन्यांचे मूळ नांव रघुनाथ. ते गुजरात मधील गिरनार पर्वताच्या भागात शौर्यकुळात जन्मले इ.स. १४६० च्या सुमारास त्यांचे वडील मुसलमान आमदनीत पंडित, देशलेखक म्हणून होते. रघुनाथांनी गिरनार पर्वतावर श्री दत्ताची कडक उपासना केली, अनुष्ठान केले. श्री दत्तात्रेयाने रघुनाथाला योग अनुष्ठान करण्यास व जुन्नर जवळील ओतूरच्या डोंगरात जाणेस सांगून योग्य वेळी भगवान व्यासगुरु भेट देवून उपदेश करतील असे सांगितले. ओतूरचे डोंगर व वन त्याकाळी तपोवन म्हणून प्रसिध्द होते. ओतुरी त्यांनी पार्थिव लिंग स्थापन करुन अन्नपाणीवर्ज्य करुन घनघोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होवून व्यासानी त्यांना दर्शन दिले व त्यांचे परंपरेने ‘‘राघव चैतन्य’’ नाव ठेवून ‘‘ओम नमो भगवते वासुदेवाय’’ हा मंत्र दिला. यानंतर भगवान दत्तात्रेयाने त्यांना दर्शन देवून चतु:श्लोकी भागवताची उपदेश / शिकवण देवून संप्रदाय वाढविण्याचा आदेश दिला. श्री राघव चैतन्य प्रथम दत्तभक्त. नंतर शिवभक्ती करु लागले. शेवटी त्यांनी शिवालयाच्या यात्रा मुख्यत: केल्या. समाधी घेण्यापूर्वी ते आळंदला सोमेश्वराच्या देवळात राहिले. त्यांच्या समाधीजवळ शिवलिंगाचीच स्थापना करण्यात आलेली आहे. त्यांनी इ.स. १५६२ पूर्वी समाधी घेतली असावी. राघव चैतन्यांना मुस्लीम लोक लाडले मशायक म्हणतात. त्यांची समाधी आळंदला दर्ग्यातच आहे. हिंदू – मुस्लिम त्यांची आराधना करतात. श्री केशव चैतन्यांच्या आई वडीलांचे नाव नृसिंह व आनंदी असे होते. श्री नृसिंह निजामशाही शहा तहीरच्या नोकरीत / कारभारी होते. श्री केशव चैतन्यांचे मूळ नाव विश्वनाथ असून, तिनेवेलीच्या देशपांडे घराण्यात त्यांचा जन्म इ. ए. १५२४ च्या सुमारास झाला. त्यांना लोहगडची किल्लेदारी मिळाली होती. त्यांच्या पत्नीचे नाव गिरीजा. बुऱ्हाण निजामशहा व विजापूर आदीलशहा यांच्या संघर्षात विश्वनाथाला लोहगड सोडून ओतूर (जि. पुणे) येथे यावे लागले. त्यांची राघव चैतन्यांची गाठ पडली. त्यांच्या मनात विरक्तीने संचार केला. श्री राघव चैतन्याकडे संन्यास दीक्षा घेतली. अशा रीतीने विश्वनाथ देशपांडे (मूळ राजश्री घराणे) यांचे संन्यास दीक्षेनंतरचे नामकरण श्री केशव चैतन्य झाले. संन्यास ग्रहणा नंतर एक दोन वर्षे ओतूरात राहून आपले गुरु राघव चैतन्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला गेले. उत्तर भारत, काशी यात्रा करुन ते श्री राघव चैतन्यांच्या बरोबर इ.स. १५५८ च्या आसपास आळंदला (जि. गुलबर्गा) आले. पुढे वर्षे – दीड वर्षात श्री राघव चैतन्यांनी आळंदला समाधी घेतल्यावर ते इ.स. १५६३ ला ओतूरला परत आले. केशव चैतन्य ओतूरास आल्यावर त्यांचा बराच शिष्य वर्ग तयार झाला. त्यांनी गंगावाटे वर एक मठ बांधला. जवळच कपर्दिकेश्वराचे शिव मंदिर आहे. त्यांनी शके १४९३, प्रजापती संवत्वर वैशाख वद्य द्वादश (रविवार दि,. २०/५/१५७२) रोजी समाधी घेतली.
श्री केशव चैतन्यांच्या शिष्य वर्गात मुख्यत: कर्नाटक आंध्र मधील बरीच मंडळी होती. त्यांची माहिती व गुरु परंपरा संत तुकारामांनी पुढील अभंगात दिली आहे.
सद्गुरु राये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा काही ॥१॥
सांपडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जागा ठेवीला कर ॥२॥
भोजना मगाती तूप पावशेर । पडीला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काय कळे उपजला अंतराय । म्हणोनीया काय त्वरा झाली ॥४॥
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥५॥
बाबाजी आपले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्णहरी ॥६॥
माघ शुध्द दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥
वरील अभंगात संत तुकारामानी आपल्या मनाला लागलेली तळमळ व घडलेला प्रसंग सांगितला आहे. गुरु शिष्याची ओळख ही परमेश्वर प्राप्तीसाठी स्वीकारलेली असते. हेच संत तुकारामांनी, या अभंगात सांगून आपल्या गुरुंचे व गुरु परंपरेचे दर्शन करुन दिले आहे. केवळ स्वप्नातील नामनिर्देशनाने श्री संत तुकारामाना बाजींची ओळख पटली व त्यांनी त्यांना सदगुरुस्थानी आरुढ केले. संत तुकारामांना स्वप्नातील झालेला गुरु उपदेश इ.स. १६३३ ते १६४३ च्या दरम्यान झाला.
बाबाजींनी गुरु उपदेश दिल्यावर झालेल्या मनस्थितीचे वर्णन संत तुकारामांनी पुढील प्रमाणे केले आहे.
चौदेहाचे माथा ठेऊनीया हात । उन्मनी साक्षात दाखविली ॥१॥
उन्मनीची मुद्रा चेपोनीया दिली । अवघी ते जाली सुनील प्रभा ॥२॥
रक्त श्वेत पीत नीळ आणि कृष्ण । रंग उमटती नानापरी ॥३॥
रंग टाकोनीया अरंगात गेले । निर्मळ राहिले नीज तेज ॥४॥
तया तेजापाशी दृष्टांत साजेना । अरुप जाई ना कोणीकडे ॥५॥
कोणीकडे यावे कोणीकडे जावे । त्यातची असावे निरंतर ॥६॥
निरंतर म्हणजे अंतर ज्या नाही । सर्वाहूनी तेही तेची असे ॥७॥
तेही तेही म्हणता दैत लागू पाहे । अदैतासी काये शब्द बोलू ॥८॥
तुका म्हणे हे तो वाचे बोलवे ना । बाबाजीने खुणा सांगितल्या ॥९॥
बाबाजींचा शिष्य समुदाय सर्व जातीत होता. त्यांचा जीवनाचा बराच काळ आळंद -मान्यहाळ – बसव कल्याण (कल्याणी) गुलबर्गा हा भागात गेला. बाबाजी हे बालब्रम्हचारी होते. त्यांचा जन्म कोणत्या घराण्यात झाला हे माहीत नाही. त्या भागातील प्रमुख शिष्यांमध्ये नरसप्पा, बाबण्णा हे मान्यहाळीचे तर शेख सुलेमानशा राजापुरचे शिष्य आहेत. बाबाजींची समाधी मान्यहळीच्या उत्तरेस बाबाजींचा मठ आहे. या मठालाच नरसाप्पा मठ म्हणतात. मठातील देवाऱ्हात शंख, बाण, पादुका आहेत. मठासमोरच बाबाजींच्या दर्ग्याचे आवार आहे अशा प्रकारे हिंदू – मुस्लिम समाज बाबाजींना श्रध्देने भजतो. मठा शेजारीच संत एकनाथ महाराजांचे नातू शिवराम स्वामींची समाधी आहे. बाबाजींचा समाधीकाल इ.स.१६४१ ते १६४९ असावा. वर्षातून दोन वेळा उरुस बाबाजींचा भरतो. बाबाजींच्या दर्ग्यात आजही दीपासाठी तूपच वापरले जाते. प्रसादातही तूपच वापरले जाते. संत तुकारामांचा स्वभावात:च प्रथम ओढा योग मार्गाकडे होता व नंतर भक्ती मार्गाकडे ओढा लागला. श्री संत तुकाराम महाराजांच्या मुळे ‘‘श्री चैतन्य’’ संप्रदायाची ओळख खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला झाली.