ऐतवड्याचा देवगोंडा माहिती
ऐतवडे (बुद्रूक) ता. वाळवा, जि. सांगली येथे देवगोंडा पाटील रहात होता. शेत जमीन भरपूर होती. मोठा दगडी वाडा होता. दोन भावासह देवगोंडा पाटील आनंदाने एकत्रीत रहात होता. परंतु वेळ फिरली आणि देवगोंडाला वेळ वाईट आली. दिवस वाईट आले. देवगोंडाला महारोग झाला. त्याला खूप वाईट वाटले. परंतु त्याकाळी महारोगावर विशेष औषध उपचार नव्हते. हा संसर्गजन्य रोग असल्याने घरच्या मंडळींनी म्हणजे सख्ये भाऊ तसेच पत्नीने सुध्दा शेतात जाऊन राहण्याचा त्याला सल्ला दिला. देवगोंडाला खूप वाईट वाटले. जो संसार, जे नातलग त्याला आपले वाटले, स्वत:च्या पत्नीनेही त्यांना गांवा बाहेर, शेतात राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांचे संसारातील मनच उठले. देवगोंडाला त्याच्या भावानी गांवा बाहेर शेतात रामेश्वराच्या देवळाजवळ राहण्यासाठी झोपडी घालून दिली. त्याच्या कुटूंबीयांनी व गांवातील लोकांनी महारोगी म्हणून त्याची हेटाळणी केली. देवगोंडा अतिशय दु:खी झाला. या जगात एक सद्गुरु वाचून कोणी वाली नाही असा विचार करुन तो नृसिंहवाडीला आला.
रोज नदीत अंघोळ, श्री दत्त पादुकांचे दर्शन, भिक्षा मागून पोट भरु लागला. त्याचा महारोग दिवसेंदिवस वाढतच गेला. अशी तीन वर्षे गेली. एके दिवशी त्याचा एक ‘‘आण्णाप्पा’’ नांवाचा पाहुणा जो नृसिंहवाडीला देव दर्शनाला आला होता तो भेटला. देवगोंडा आण्णाप्पाला म्हणाला ‘‘जो पर्यंत आपण धड असतो, पैसे कमवितो, सर्वांचे चालवितो तो पर्यंत आपण सर्वांना गोड, प्रिय असतो. आता माझ्यावर कर्माची धाड पडली आहे. मला महारोग झाला आहे. मला घराबाहेर हाकलले आहे. मी आता पोरका झालो आहे. मरणाची वाट बघत आहे’’ हे ऐकून आण्णाप्पालाही अतिशय वाईट वाटले. आण्णाप्पा देवगोंडाला म्हणाला ‘‘कोल्हापूरात कुंभार गल्लीत श्री दत्त महाराज राहतात. तेही दत्ताचे अवतार आहेत. त्यांच्या कृपेने तू बरा होशील. तू चल माझ्या बरोबर’’ आण्णाप्पा देवगोंडाला घेवून कोल्हापूरात आला. त्याने देवगोंडाला कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांच्या चरणावर घातले. देवगोंडाला आता दररोज श्री दत्त महाराजांचे दर्शन घडू लागले. श्री दत्त महाराजांचे कांही भक्त देवगोंडाला महाराजाजवळ महारोग असल्याने येवू देत नसत. परंतू श्री दत्त महाराज भक्तांच्या गर्दीतून तुरुतूरू बाहेर येत देवगोंडाच्या अंगावरुन हात फिरवून आधार देत, माया करीत. बघता बघता चार महिने गेले. देवगोंडा महारोगातून बरा झाला. ही बातमी ऐतवड्याला त्याच्या भावाना व पत्नीला समजली. सर्वजण देवगोंडाला घरी नेण्यासाठी कोल्हापूरला आले. स्वामींना त्यांनी विनंती केली. पूर्वी भाऊ, पत्नी कसे वागले होते हे देवगोंडा जाणून होता. केवळ आण्णाप्पा मुळे कुंभार स्वामींच्या कृपेने आपण बरे झालो याची त्याला जाणीव होती. त्याला संसार नको होता. सद्गुरुंच्या सहवास, सेवा पाहिजे होती. तथापि, कुंभार स्वामींच्या श्री दत्त महाराजांच्या आज्ञेने त्याला संसाराकडे घराकडे जाणे भाग पडले. देवगोंडा पाटील परत पुन्हा ऐतवडे (बुद्रूक) ला आला. पुन्हा संसार करु लागला. पुन्हा पुन्हा स्वामी दर्शनाला कोल्हापूरला जाऊ लागला. त्याला एकूण पाच मुले होती.