आण्णा परांडेकर – Anna Parandekar

श्रीगुरुंचे चित्रगुप्त

(स्व. विष्णुपंत ऊर्फ आण्णा परांडेकर)
॥ प्रेमानंदी गुरुपदी आसरा ।
घेती मानुनी तुच्छ संसारा ।
वियोग न साहे ज्यांच्या अंतरा ।
त्या गुरु किंकरा प्रार्थितसे ॥

अशा भक्तापैकी स्व. विष्णूपंत ऊर्फ आण्णा परांडेकर हे श्रीगुरुंचे फार मोठे निस्सिम भक्त होते. त्यांचे श्रीगुरुंवर व त्यांचे भक्तांवर अतिशय प्रेम होते. स्वभावाने ते अतिशय भोळे होते. हे मूळचे करवीरचे. महाद्वार रोड, कोल्हापूर येथे त्यांचे घर होते.

एक क्षण सुध्दा ते श्रीगुरुंच्या भक्तिसाठी वाया जाऊ देत नसत. त्यांना पुत्र व दोन भगिनी असा त्यांचा परिवार होता. घरचे लहान थोर, स्त्री-पुरुष सर्व मंडळी भक्तियुक्त अंत:करणाने श्रीगुरुंचे दर्शनासाठी नित्य वैराग्यमठीमध्ये येत असत. आपल्या घरच्या सर्व मंडळीचे श्री गुरुवरील प्रेम, निष्ठा, पाहून त्यांना आनंद होत असे. ते सर्वांना उपदेश करीत, ‘‘नर देहाची राख रांगोळी आज ना उद्या होणार, तरी श्री गुरुंच्यावर निष्ठा ठेवून प्रेमाने त्यांची सेवा करुन नर देहाचे सार्थक करुन घ्या.’’

॥ धन्य धन्य ते जननी जनक । जयांचे पोटी ऐसे बालक ।
भगवद् भक्ती सुखदायक । मानुनी क्षण एक न सोडिती ॥

नित्य वैराग्यमठीमध्ये भक्तियुक्त अंत:करणाने ते जात असल्यामुळे श्रीगुरुंचा वियोग त्यांना सहन होत नसे. श्रीगुरुंच्या सेवेमध्ये कोणी अडथळा आणला अगर हायगय केलेली त्यांना खपत नसे.

॥ वेणीमाधव ते दळवी लाड । म्हादबासी न देहाची चाड ।
। विष्णुपंत म्हणे गुरुप्रदा आड । येई ते द्वाड टाकावे ॥

स्व. विष्णुपंत परांडेकर यांची बदली झाल्यामुळे नोकरीनिमित्त त्यांना दुसऱ्या गांवी जाणे भाग पडले. श्रीगुरुंचा वियोग त्यांना सहन होईना. त्यांना फार दु:ख झाले. नेहमी प्रमाणे श्रीगुरुंच्या दर्शनाकरीता वैराग्यमठीमध्ये गेले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. श्री गुरुंनी, त्यांना ठरल्याप्रमाणे ‘‘थोड्या दिवसांसाठी तुम्हाला जावे लागणार आहे. तरी कांहीही काळजी न करता आमुची आज्ञा मानून आपण आता जावे. तुम्हांला परत इकडे आणवूं तरी मनात कोणताही विचार न आणता आपण जावे’’ असा आपल्या मंगलमय वाणीने – प्रेमाने जाणेचा आदेश दिला.

त्यामुळे स्व. विष्णुपंताना फार आनंद झाला. मला करवीर सोडावे लागणार हा विचार श्रीगुरुंना सांगण्याआधीच त्याचे उत्तर श्रीगुरुंनी सांगितले. श्रीगुरुबोल ऐकताक्षणी हे अंत:साक्षी दत्त आहेत यामध्ये आश्चर्य कांहीच नाही. याची त्यांना प्रचिती आली असो, आता आपल्याला जाणे कांही चुकणार नाही. तरी धीर सोडून चालणार नाही असा विचार करुन ते आपल्या घरी आले. त्याच दिवशी संध्याकाळी गांवी जाणेची सर्व तयारी करुन बायको-मुलांसह बदलीचे ठिकाणी दुसऱ्या गांवी गेले. श्रीगुरुंच्यावर मन एकाग्र करुन आपल्या निश्चित ठिकाणी सुखरुप पोचले. आपल्या व्यवसायामध्ये मग्न होऊन नित्य नियम सुरु केला. सायंकाळी घरी आल्यानंतर प्रपंचाचे थोडे काम करुन रात्री भोजन झाल्यानंतर श्रीगुरुंच्या ते नामस्मरणामध्ये तल्लीन होत. श्रीगुरुप्रतिमा पुढे ठेवून कन्या, पुत्र यांना बरोबर घेऊन श्री विष्णुपंत आनंदाने अरुणोदयी काकड आरती करु लागले. एके दिवशी प्रात:काली नित्याप्रमाणे आरती पूर्ण झाली. कोणी एक गृहस्थ त्यावेळी द्वाराजवळ उभे होते. रुद्राक्षधारी भस्मचर्चित एक दिव्य विभूती त्यांनी पाहिली. त्या नूतन सत्पुरुषांना पाहून द्वारस्थ गृहस्थाने ‘‘आपण कोठून आलात? पुढे कोठे जाणार?’’ अशी चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘श्री विष्णूपंत हे भगवतभक्त आहेत, हे ओळखून त्यांच्या भक्ति करिता रोज आम्ही आरतीस येतो. आता आम्हाला उशिरा होत आहे. आमचे स्थान फार दूर आहे.’’ एवढे सांगून ते निघून गेले. द्वारस्थ गृहस्थ ही सर्व घटना पहातच राहिले.

स्व. विष्णुपंत आरती पूर्ण करुन बाहेर आले. द्वारस्थ गृहस्थ श्री विष्णुपंतांचे जवळ जाऊन दिव्य तपोराशी अवधूत तुमच्या घरी रोज आरतीकरिता येतात असे त्यांना सांगितले. द्वाराबाहेर उभे राहून मी त्या अवधूतांना पाहिले व त्या विभूतीची, ज्ञानी पुरुषाच्या चौकशीची उत्कंठा लागली. स्व. विष्णुपंत आश्चर्याने पाहून ‘‘हे काय कोडे आहे?’’ याचा त्यांना उलगडा होईना. ‘‘आम्ही त्यांना पाहिले नाही. तुमच्या दृष्टीस कसे काय पडले?’’ याची चौकशी करु लागले. दुसरे दिवशी कोणीही अवधूत स्व. विष्णुपंतांना दिसले नाहीत. श्रीगुरुंनी पूर्ण कृपा केली व प्रगट झाले. श्रीगुरुंची लीला अगम्य आहे हे मनोमन जाणले. श्री गुरुंच्यावर पूर्ण श्रध्दा ठेवून कांही काळ तेथे क्रमिल्यानंतर कोल्हापूरला येण्याचा त्यांना संदेश मिळाला. कोल्हापूरला जाण्याची पूर्ण तयारी करुन, कोल्हापूरला येऊन श्रीगुरुंना भेटण्यासाठी ताबडतोब वैराग्यमठी येथे आले. श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. डोळ्यामधून प्रेमाश्रूधारा वाहू लागल्या. श्रीगुरु त्यांना प्रेमाने म्हणाले, ‘‘आता येथे राहावे, यानंतर तुम्हांला बाहेरगावी कोठेही जावे लागणार नाही.’’

धन्य धन्य ते श्रीगुरु – भक्त ज्यांच्या भक्तिसाठी प्रेमासाठी श्रीगुरु स्वत: प्रगट होऊन आरतीला हजर राहिले! श्रीगुरुंच्या समाधीनंतर श्रीगुरुचरणांच्या सेवेसाठी निजबोधमठी (व्यासमठी) येथे त्यांनी आपले सर्व आयुष्य तन-मन-धन अर्पण करुन श्रीगुरुंची उत्तम प्रकारे सेवा केली. ‘‘आण्णा’’ या नावानेच सर्व भक्त त्यांना संबोधित असत. सेवेची आवड व श्रीगुरुचरणी दृढ विश्वास असल्यामुळे श्रीगुरुंची वाणी, गूढ, भाषा थोडीफार ते जाणत असत. सदैव श्रीगुरुंच्या लीलासंग्रह करण्याचा त्यांना छंद होता. रात्रंदिवस श्रीगुरुंच्या लीला लेखन करण्यामध्ये गुंग असत. समजले अगर नाही समजले, श्रीगुरुवदनातुनी जे निघेल त्याची त्यांच्याकडे नोंद असे.

॥ श्रीगुरुचरित्र भाविकजना । पठणश्रवणा मिळो हे वासना ।
प्रत्यक्ष दिसला नाही लोचना । त्यास्तव प्रयत्न करिती जे ॥

श्री गुरुंच्या पूर्वचरित्रामधील लीलांची त्यांनी गाथाच तयार केली होती. यासाठी त्यांना भगीरथ प्रयत्न करावे लागले. त्यामुळे श्रीगुरुंचे लीलारुपी वैभव जगाला समजले. ‘‘श्रीकृष्णविजय’’ पूर्वचरित्राला विष्णुपंत आण्णा परांडेकर यांचाच फार मोठा आधार आहे. जणू काय ते (श्रीगुरुंचे) चित्रगुप्तच होते. त्यामुळे श्रीगुरुंचे पूर्वचरित्रांमधील लीलांचे तन्मय होऊन वाचन करतांना, प्रत्यक्ष श्रीगुरु, शिष्य व त्यांच्या लीला यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहाते व त्यांचे आपले देहभान हरपते.

॥ परांडेकर लिहीली गाथा । उपयुक्त झाली मागील चरित्रा ॥
आता स्वामी वदविती स्वत: । अंत:स्फत:स्फूर्तता सामर्थ्ये ॥

श्रीगुरुंचे उत्तर चरित्र स्वत:हून श्रीगुरुंनी श्री मुजुमदार यांचेकडून लिहून घेतले. तात्पर्य, श्रीगुरुंचे पूर्वचरित्राचा स्व. विष्णुपंत आण्णा परांडेकर यांचे प्रयत्नामुळेच व चतुरपणामुळे
आपल्याला लाभ झाला. त्यामुळे श्रीगुरुंच्या अगम्य लीला समजल्या व पठण श्रवण करणेस मिळाल्या.

॥ सूर्योदयापासूनी अस्तापर्यंत । रात्री तैसेची घडे जे वृत्त ।
निरलस लिहून ठेविती । नेणो मनोगत याती ॥

श्रीगुरुंचे चरित्र सद्भावाने सावकाश पठण केले असता, सर्वदु:ख क्लेश नाहीसे होऊन गृही समाधान नांदते व स्त्री, सुत, धन प्राप्त होऊन अंती वैकंठाची प्राप्ती होते. श्रीगुरुचरणी शुध्द भाव, दृढविश्वास ठेवल्यास सर्व इच्छा पूर्ण होऊन, दुर्गती नाहीशी होते व सर्वत्र विजय होतो.

सुदीर्घ काळ श्रीकृष्ण संगती । करीता नाठविली जया संस्कृती ॥
रंगले गुरुरंगी दिवसराती । काळ दडविती गुरु सेवे ॥

असे हे थोर पुण्य पुरुष स्व.विष्णुपंत आण्णा परांडेकर यांनी निजबोध मठी (व्यासमठी) येथे आश्विन कृष्ण चतुर्थी संकष्टी गुरुवार तारीख – ५/१०/१९४४ साली देहत्याग केला. स्व.
विष्णुआण्णा परांडेकर यांचे शुभ चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम ।

संदर्भ ग्रंथ :- श्री श्रीकृष्ण सरस्वती लीला
मासिक दि. ९/२/१९९६
लेखक :- श्री. विष्णूपंत कुलकर्णी

Comments are closed.